आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Wednesday, April 27, 2011

अभिमन्युवध - भाग ४

तिसर्‍या दिवशी पुन्हा त्रिगर्तानीच अर्जुनाला आव्हान दिले व अर्जुन पुन्हा एकदा त्यांच्याशी लढायला गेला असे महाभारत म्हणते. दुसर्‍या दिवशीच्या त्रिगर्त-अर्जुन युद्धाचे दीर्घ आणि रसभरित वर्णन करणार्‍या व्यासानी या दिवशीचे अर्जुन-त्रिगर्त युद्ध कसे झाले, कोणी काय पराक्रम केला, अर्जुनाने कोणाकोणाला मारले याबद्दल अवाक्षरहि लिहिलेले नाही. सर्व दिवसाच्या युद्धाचे वर्णन फक्त दोन श्लोकांत ’उरकले’ आहे. हे अतिशय संशयास्पद आहे! शिवाय यादिवशी युधिष्ठिराच्या रक्षणाची कोणतीहि व्यवस्था अर्जुनाने केली नव्हती! आदल्या दिवशी ती जबाबदारी सत्यजितावर सोपवली त्याचे काय झाले हे कृष्णार्जुनाना ठाऊक नव्हते काय? या सर्वांमुळे मला असा दाट संशय आहे कीं त्या तिसर्‍या दिवशी अर्जुन थकव्यामुळे वा जखमांमुळे युद्धाला बाहेर पडलाच नसावा! मात्र या तर्काला महाभारत ग्रंथात कोणताही आधार मला देता येत नाही. या दिवशी अर्जुन युद्धात असणार नाही हे बहुधा कौरवपक्षाला खात्रीपूर्वक माहीत नसावे कारण तसे असते तर द्रोणाने युधिष्ठिराला पकडण्याच्या दृष्टीने ’आक्रमक’ व्यूहरचना केली असती. प्रत्यक्षात त्याने दुर्योधनाला आश्वासन दिले कीं ‘आज मी पांडवपक्षाच्या एकातरी प्रमुख वीराचा वध घडवून आणीन!’ आणि त्याने कौरव सैन्याचा चक्रव्यूह रचला. या व्यूहाचे ’भेदण्यास अत्यंत अवघड’ असे व्यासानी वर्णन केले आहे. हे वर्णन बचावात्मक व्यूहाला जास्त योग्य वाटते आक्रमक व्यूहाला नव्हे! त्यामुळे असे वाटते कीं अर्जुन आज कदाचित युद्धामध्ये नसेल याची कौरवाना काही कल्पना असती तर द्रोणाने सर्व बळ एकवटून युधिष्ठिराला पकडण्याचा प्रयत्न केला असता. बचावात्मक व्यूह रचला नसता. प्रत्यक्ष युद्धाला तोंड लागल्यावर काय झाले ते पुढील लेखात पाहूं

Friday, April 22, 2011

अभिमन्युवध - भाग ३

पहिल्या दिवशी अर्जुन त्रिगर्त सैन्याशी लढण्यात बराच काल व्यग्र राहिला. हे संशप्तक सैन्य हे एक जरासे धुसर प्रकरण आहे. युद्धाच्या पहिल्या दिवसापासून यांनी आव्हान दिले कीं अर्जुन त्यांच्याशी लढत बसे. अठरा अध्याय गीता ऐकून देखील अर्जुन पितामह भीष्म वा गुरु द्रोण यांच्याशी अटीतटीने लढण्यास कधीच उत्सुक नसे. तो आपला संशप्तकांशी लढत राही! अगदी पांडवांच्या इतर वीराना भीष्म वा द्रोण झेपेनासे झाले म्हणजे त्याला पुढे व्हावेच लागे. कृष्णही त्याला तसे करू देत होता असें दिसते. या द्रोणपर्वातीलप्रथम दिवशीही दिवस अखेर द्रोणाचा हल्ला परतवण्यासाठी अर्जुनाला संशप्तकांचा नाद सोडून देऊन द्रोणाशी सामना करावा लागला. मात्र द्रोणालाही युधिष्ठिराला पकडण्यात यश आले नाही. दुर्योधनाने नाराजी व्यक्त केल्यावर द्रोणाने पुन्हा निक्षून सांगितले कीं अर्जुन प्रतिकार करत असताना युधिष्ठिराला पकडणे मला जमणार नाही तेव्हां त्याला दिवसभर अडकवून ठेवा. मग पुन्हा त्रिगर्तराज सुशर्मा, त्याचे भाऊ व इतर त्रिगर्त वीरांनी हे आव्हान स्वीकारले व आम्ही पडेल ती किंमत देऊन उद्यां दिवसभर अर्जुनाला व्यग्र ठेवूं असे दुर्योधनाला आश्वासन दिले. त्याप्रमाणे युद्धाच्या बाराव्या दिवशी अर्जुन युधिष्ठिराच्या रक्षणाचे काम सत्यजित नावाच्या द्रुपदपुत्रावर सोपवून त्रिगर्तांशी लढायला गेला. वास्तविक, सत्यजित हा कोणी सात्यकी वा धृष्टद्युम्न यांच्यासारखा महावीर नव्हता. तेव्हां ही व्यवस्था पुरेशी नव्हती. पण याबद्दल युधिष्ठिर, इतर पांडव वा कृष्ण यांनी नाराजी व्यक्त केली नाही. बहुधा वेळ आलीच तर नेहेमीप्रमाणे आपण त्रिगर्ताना सोडून परत येऊं असे अर्जुनाला वाटले असावे. मात्र हा सर्व दिवस त्रिगर्तानी अर्जुनाला सोडले नाही. अर्जुनाने त्यांची अपरिमित हानि केली. अनेकाना मारले. या युद्धाचे रसभरित वर्णन व्यासानी केले आहे. मात्र इकडे बिचारा सत्यजित द्रोणापुढे काही न चालून अखेर मारला गेलाच. दिवसभर प्रयत्न करून द्रोणालाहि युधिष्ठिराला पकडता आले नाहीच कारण इतर पांडवपक्षाच्या वीरानी प्रखर प्रतिकार केला. दिवसाच्या उत्तरभागात कौरवपक्षाचा एक योद्धा भगद्त्त हा पांडवांना फार भारी पडूं लागला व कोणालाही आवरेना त्यामुले अखेरीस, द्रोण बाजूलाच राहून, अर्जुनाला भगदत्ताचाच प्रतिकार करण्यासाठी धाव घ्यावी लागली. अर्जुनाने भगदत्ताला मारेपर्यंत दिवस मावळला व दुर्योधन व द्रोण यांचा युधिष्ठिराला पकडण्याचा मुख्य बेत असफलच राहिला. दुर्योधनाने नाराजी व्यक्त केल्यावर द्रोणाने पुन्हा तेच कारण सांगितले कीं अर्जुन असताना जमणार नाही.

Tuesday, April 19, 2011

अभिमन्युवध - भाग २

अभिमन्यूचा वध ही भारतीय युद्धातील एक फार महत्त्वाची घटना आहे. कारण आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे चिडून जाऊन अर्जुनाने जयद्रथाचा दुसऱ्या दिवशींच वध करण्याची प्रतिज्ञा केली आणि दिवसभर जयद्रथाचे अर्जुनापासून संरक्षण करण्याचा कौरवांनी आटोकाट प्रयत्न करूनही ते जयद्रथाला वाचवू शकले नाहीत. अर्जुनापुढे आपले कोणाचेच काही चालत नाही हे त्याना कळून चुकले. जयद्रथाच्या वधाबद्दल मी विस्ताराने लिहिले आहे. त्यामुळे आतां त्याची पार्श्वभूमी असलेल्या अभिमन्यू वधाबद्दल लिहिणार आहे.
युद्धाचे पहिले दहा दिवस भीष्म कौरवांचा सेनापती होता. त्याने प्रथमच दुर्योधनाला सांगितले होते कीं मी एकाही पांडवाला मारणार नाही. दहा दिवसात पांडव पक्षाचा एकही प्रमुख वीर मेला नव्हता. भीष्माने पांडव सैन्याचा मात्र फार संहार केला होता. भीष्म शरपंजरी पडल्यावर त्याने दोन्ही पक्षांना युद्ध संपवा असें विनवले होते. मात्र ते शक्य नव्हते. भीष्म पडल्यावर दुर्योधनाने द्रोणाला सेनापती होण्यास विनवले. त्याने ते स्वीकारले. येथून पुढे डावपेचाचे युद्ध झाले. सुरवातीलाच द्रोणाने दुर्योधनाला विचारले कीं तुला काय हवे आहे. त्यावर दुर्योधनाने म्हटले कीं ‘युधिष्ठिराला पकडावे. द्रोणाने आनंद व्यक्त केला कीं ‘तू युधिष्ठिराला मारुं इच्छित नाहीस.’ दुर्योधनाने म्हटले कीं ‘युधिष्ठिराला मारून युद्ध संपणार नाही, इतर पांडव आमचा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाहीत. युधिष्ठिराला पकडले तर मी त्याला पुन्हा द्युत खेळायला बसवीन व पुन्हा वनवासाला धाडीन.’ द्रोणाला हा विचार पसंत पडला कारण पांडवाना मारण्याचे अप्रिय काम यामुळे टळणार होते. द्यूत खेळणे योग्य कीं अयोग्य याचा विचारही त्याला पडला नाही. तेव्हा त्याने मान्य केले कीं ‘मी युधिष्ठिराला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करीन मात्र अर्जुन त्याचे संरक्षण करण्यास उपस्थित असेल तर हे शक्य होणार नाही. तेव्हां त्याला काही करून दूर ठेवा.’ दुर्योधनाने हे मान्य केले. पुढील तीन-चार दिवस कौरवांचा हा मुख्य युद्धहेतू राहिला व सर्व युद्धबेत त्याप्रमाणे ठरले. ही गोष्ट अर्थातच पांडवाना समजलीच व त्यांनीही युधिष्ठिराचे संरक्षण करण्याला प्राधान्य दिले.

Monday, April 18, 2011

अभिमन्युवध भाग १

महाभारतांतील विविध विषयांवर विस्ताराने लिहून झाले. माझ्या अपेक्षेपेक्षाहि अनेक वाचक, विषेशेकरुन तरुण वाचक मला लाभले. नवीन लिहिण्यासारखे मला काहि सुचले नसल्यामुळे लिखाण बरेच दिवस बंदच आहे. मात्र अजूनहि नित्यनेमाने हा ब्लॉग नवनवीन व जुनेहि वाचक वाचतच आहेत. आजपासून एका नवीन विषयाला सुरवात करीत आहे. खरे तर जयद्रथवधावरच्या माझ्या लेखांमध्ये त्याची पार्श्वभूमि या नात्याने अभिमन्युवधाबद्दल थोडेफार लिहिले आहेच तेव्हां काही प्रमाणात पुनरुक्ति होणार आहे. ती आपण चालवून घ्यावी.

Friday, April 1, 2011

ब्लॉग स्पर्धा

या ब्लॉगला स्टार माझाच्या स्पर्धेत बक्षीस मिळाले हे वाचकांस माहीत आहेच. बक्षीससमारंभाचे चित्रीकरण दि. २७ मार्चला दाखवले गेले. श्री. गंगाधर मुटे यांनी त्याची व्हिडिओ क्लिप पाठवली त्यातला पांचवा भाग (ज्यात मी आहे!) खालील URL वर YOUTUBE वर पाहतां येईल.

http://www.youtube.com/watch?v=301ZV7LNEqU

तुम्ही पहाल अशी आशा आहे.

धन्यवाद.
प्र. के. फडणीस