आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Wednesday, April 30, 2008

पांडव विवाह -भाग ७

पांडवांचा द्रौपदीशी संसार पुढे कसा चालला याही विषयाला अनेक पदर आहेत. सर्व पांडवांनी इतरही विवाह केले. भीमाचा हिडिंबेशी संबंध पूर्वीच आला होता व त्याला घटोत्कच हा पुत्रही झाला होता. मात्र त्याचा दुसऱ्या कोणा स्त्रीशी विवाह झाल्याचा उल्लेख नाही. युधिष्ठिर, नकुल व सहदेव यांचे दुसरे विवाह कधी झाले त्याचा उल्लेख नाही पण ते झाले हे नक्की. अर्जुनाचे तर अनेक विवाह झाले. पांडव-द्रौपदी विवाहानंतर पांडव इंद्रप्रस्थाला राज्य करू लागल्यावर एकदा नारद त्यांच्या भेटीला आले असतां त्यांनी सुंदोपसुंदांची कथा त्याना सांगून पत्नीवरून तुमच्यांत वितुष्ट येऊ देऊ नका असा सल्ला दिला. पांडवांनी स्वत:च यासाठी नियम केला की एका भावाच्या द्रौपदीशी एकांताचा दुसऱ्याने भंग केला तर अपराध्याने तीर्थयात्रा करावी व ब्रह्मचर्य पाळावे. किती काळ ते स्पष्ट नाही. नारदाने याला संमति दिली. मात्र पांच भावानी द्रौपदीचे पतित्व, एकमेकांशी वितुष्ट येऊ न देता कसे उपभोगावे याबद्दल या नियमात काहीच सांगितलेले नव्हते! फक्त एकांतभंगाला शिक्षा ठरवून दिली होती. पण मग, हा वेळपर्यंत व येथून पुढेहि आयुष्यभर, पांडव कोणता नियम पाळत होते? याचा स्पष्ट उल्लेख कोठेच केलेला नाही!
बहुपतित्वाचा रिवाज पाळणाऱ्या समाजात अजूनही जी चाल आहे असे म्हणतात व जी नैसर्गिक म्हणावी लागेल ती म्हणजे एकेका भावाने क्रमाक्रमाने, पतित्व उपभोगावे व अपत्यजन्मानंतर पतिहक्क पुढील भावाकडे जावा. संततीच्या पितृत्वाबद्दल निरपवादित्व असण्यासाठी ही चाल योग्यच म्हटली पाहिजे. पांडवांनीहि अर्थातच हाच क्रम चालवला असला पाहिजे. अर्जुन तीर्थयात्रेला गेला तोपर्यंत द्रौपदीला अपत्यप्राप्ती झालेली नव्हती. युधिष्ठिरापासून व मग भीमापासून तिला अपत्य झाल्यावर मग अर्जुनाचा क्रम येणार होता! हा वेळपर्यंत त्याचा इतरही कोणाशी विवाह झालेला नव्हता. त्यामुळे वैतागून जाऊन, द्रौपदीसाठी वाट पहात बसण्यापेक्षा बाहेर पडावे हे बरे असे त्याने ठरविले असावे. चोरांपासून ब्राह्मणांच्या गायी सोडवण्यासाठी शस्त्रागारात जावे लागून युधिष्ठिर-द्रौपदी यांचा एकांत भंग केल्याचे कारण त्याला आयतेच मिळाले. नियमच केलेला असल्यामुळे त्याला अडवताही आले नाही! ठरलेल्या नियमाप्रमाणे खरेतर त्याने तीर्थयात्रेच्या काळात ब्रह्मचर्य पाळावयास हवे होते. ते त्याने अजिबात पाळले नाही. उलुपी व चित्रांगदा यांचेशी त्याने विवाह केले. चित्रांगदेला बभ्रुवाहन हा पुत्रही झाला. मात्र तीं दोघें तिच्या पित्याच्या घरीं राहिली. अर्जुन पुन्हा एकटाच! तीर्थयात्रेच्या अखेरीला तो द्वारकेला गेला असतां सुभद्रा त्याला दिसली व आवडली. बलरामाची संमति मिळणार नव्हती तेव्हा कृष्णाच्या सल्ल्याप्रमाणे त्याने सुभद्रेला सरळ पळवून नेली. अर्जुनाशी कोण लढणार तेव्हा यादव अखेर कबूल झाले. मात्र विवाह करण्यापूर्वी दूत पाठवून युधिष्ठिराची संमति विचारली. बहूधा अर्जुनाला भीति वाटली असावी कीं ही पण पांचांची पत्नी होणार नाही ना? सुभद्रेला घेऊन तो इंद्रप्रस्थाला परत आला. लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अर्जुनाने नाही पण इतर पांडवांनी या काळात बहुधा ब्रह्मचर्य पाळले असावे. कारण अजूनहि द्रौपदीला अपत्य झालेले नव्हते! सुभद्रेचा पुत्र अभिमन्यु जन्मल्यानंतर मात्र एकएक वर्षाच्या अंतराने तिला एकेका पांडवापासून एकेक पुत्र झाला. यावरून स्पष्ट दिसते की पांडवानी वर उल्लेखिलेला रिवाजच पाळला.
तेथून पुढे जीवनाच्या अखेरीपर्यंत द्रौपदी सर्व सुखदु:खात, हाल अपेष्टांत, तसेच ऐश्वर्यांत पांडवांची पत्नी व सखी ल्हाली. कुंतीचा या विवाहामागे जो पांचांना एकत्र ठेवण्याचा हेतु होता तो निश्चितच सफळ झाला. पांडवांचे उदाहरण इतर कोणी गिरवल्याचे मात्र दिसून येत नाही. असा संसार यशस्वी करणे हे लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांनाच शक्य, येरागबाळाचे काम नोहे हे त्याचे कारण म्हणतां येईल.

Monday, April 28, 2008

पांडव विवाह - भाग ६

आतां या सर्व कथेतील अद्भुत भाग दूर सारला तर काय उरते? असे दिसते कीं द्रौपदीची कीर्ति, व स्वयंवराचा पण कळल्यावर तो जिंकणे फक्त अर्जुनालाच साधणार आहे हे स्पष्ट होते. सर्व पांडवांना तिचा मोह पडला आहे हे कुंतीला दिसत होते. युधिष्ठिराचा व तिचा प्रथमच विचार ठरला असावा कीं अर्जुनाने पण जिंकला की पांचही पांडवांनी तिच्याशी विवाह करावा. व्यास स्वयंवरापूर्वी भेटले तेव्हांच याची चर्चा झाली व पांडवांची पूर्वपीठिका माहीत असल्याने व्यासानी मान्यता दिली. अर्जुनाने पण जिंकल्याबरोबर युधिष्ठिर, नकुल व सहदेव घाईघाईने परत आले ते आता पुढे कसे-काय करावे हे कुंतीशी ठरविण्यासाठी! कुंतीला भीम-अर्जुन द्रौपदीला घेऊन आले आहेत हे माहीतच होते. तेव्हां भिक्षा पांचांत वांटून घ्या वगैरे संवाद हा द्रौपदीला राजी करण्यासाठी होता. अर्जुनहि मुकाट्याने तयार झाला त्याअर्थी सर्व बेत आधीच ठरला होता हे उघड आहे. मोठ्या भावाचा प्रथम विवाह झाला पाहिजे ही अडचण हिडिंबेच्या वेळी आली नव्हती. हिडिंबा ही सर्वांच्या मनात भरण्यासारखी नव्हती वा भीमाची पत्नी होऊन राजवाड्यात येणार नव्हती!. पण द्रौपदीची गोष्ट वेगळी होती. ती आपल्या बेताला प्रतिकूल नाही हे दिसल्यावरच युधिष्ठिराने आपला बेत द्रुपदाला सांगितला. त्याने तो अखेर कां मानला? युधिष्ठिराचा मुख्य भर, हा आमच्या पूर्वजांचा प्राचीन आचार आहे यावर होता. कुरुकुळाच्या इतिहासात बहुपतित्वाच्या आचाराची कोणतीहि कथा महाभारतात नाही. मग युधिष्ठिराच्या विधानाच अर्थ काय व व्यासांनी काय सांगून द्रुपदाला राजी केले व द्रौपदीहि कां तयार झाली? याचे मूळ पांडवांच्या खऱ्या जन्मकथेत शोधावे लागते. पांडव हे पांडुचे पुत्र नव्हते असें महाभारतच म्हणते. पांडव मनुष्य, तेव्हा त्यांचा देवांपासून जन्म ही अद्भुत कल्पना सोडून दिली तरच या गोष्टीची संगति लागते. आपल्याला संतति होणार नाही हें नक्की कळल्यावर पांडु कुंती व माद्री उत्तर दिशेला गेलीं. कुरुवंश हे सोमवंशीय आर्य व त्याचा उगम या भागातील. भारताच्या या अति उत्तर भागामध्ये काही जमातींमध्ये बहुपतित्वाची चाल अद्यापहि प्रचलित आहे. त्या काळी ती असणारच. जेव्हा नियोगमार्ग पत्करण्याची वेळ आली तेव्हां पांडूला आपल्या मूळ पूर्वजांच्या या आचाराची आठवण आली असावी. म्हणून कुंती व नंतर माद्री यांनी कुरुकुळाशी संबंधित अशा एकाच कुटुंबातील ४ किंवा ५ भावांपासून पुत्रप्राप्ति करून घेतली असावी. युधिष्ठिर मोठा, तेव्हां त्याला या गोष्टीची थोडीफार कल्पना असेल. हा पूर्वीचा आचार स्वत: कुंतीने पाळला असल्यामुळे आपल्या पांच पुत्राना एकत्र ठेवण्यासाठी द्रौपदीसारखी एक समान पत्नी उपयुक्त ठरेल या विचाराने तिने व पांच पांडवानी हा बेत एकविचाराने घडवून आणला. पांडवजन्माची ही खरी कथा व्यासांना माहीत असल्यामुळे, एकांतात ती द्रुपदाला सांगून, युधिष्ठिर म्हणतो आहे त्याप्रमाणे हा त्याच्या खऱ्या पूर्वजांचा आचार आहे व त्याप्रमाणे त्यांना करावयाचे असेल तर करूं दे असे पटविले असावे. द्रौपदीची संमति कोणी विचारली नाही हे खरे पण विवाहानंतर सर्व आयुष्यात तिने एकदाही या अपवादात्मक विवाहाबद्दल असंतोष, राग वा नाराजी व्यक्त केली नाही. त्याअर्थी तिलाही तो मान्य होता. याचाही उलगडा सहजीं होत नाही. तिच्या (खऱ्या) आजोळच्या (कदाचित अनार्य) कुळातही असा बहुपतित्वाचा आचार अपवादाने कां होईना पाळला जात असेल तर व्यासांनी तीहि पूर्वपीठिका तिला व द्रुपदाला सांगितली असेल असा तर्क करावा लागतो. बुध्हिमती, सडेतोड व निर्भीड द्रौपदीने तिला पटले नसते तर कर्णाला झिडकारले तसा युधिष्ठिराचा विचारही झिडकारला असता व मग युधिष्ठिरालाही आपला हेका चालवतां आला नसता! तेव्हा द्रौपदीहि आनंदाने तयार झाली असे मानले पाहिजे. कुरुकुळातील कोणीहि, खुद्द दुर्योधनहि, (द्यूतोन्माद सोडल्यास), या विवाहाबद्दल कुत्सित बोलले नाहीत. यादवांनीहि गैर मानले नाही. त्याअर्थी त्याना पांडवांची खरी जन्मकथा ठाऊक असावी व हे मागील पानावरून पुढे चालू आहे तेव्हा हरकत नाही असे त्यानी मानले असावे. पांच पांडव व द्रौपदी यांच्या या अपवादात्मक विवाहाची ही माझ्यामते खरी कथा आहे. पुढील अखेरच्या भागात त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील काही घटनांचा विचार करणार आहे.

Saturday, April 26, 2008

पांडव विवाह - भाग ५

भीम-अर्जुन परत आल्यावर बाहेरूनच त्यांनी ’भिक्षा आणली आहे’ असे कुंतीला म्हटले व तिने ’पाचांत वाटून घ्या’ असे म्हटले. द्रौपदी दृष्टीला पडल्यावर मग तिने युधिष्ठिराला, ’आता तूच योग्य काय ते ठरव’ म्हटले. त्याने प्रथम अर्जुनालाच ’तूच द्रौपदीशी विवाह कर’ म्हटले. त्याने ’प्रथम तुझा, मग भीमाचा व मग माझा विवाह होणे उचित तेव्हा तूच विचार कर’ असे म्हटले. विचारांती त्याने द्रौपदी पांचांची पत्नी होईल असा निर्णय दिला. हा सर्वपरिचित कथाभाग एक बनाव वा नाटक होते व त्याच हेतु वेगळाच होता, पांचांनी द्रौपदीला वरावे असे कुंती व पांडवांचे पूर्वीच ठरलेले होते असे वाटते. याचा खुलासा यथावकाश करूं.
यानंतर लगेचच कृष्ण व बलराम आले व आपली ओळख देऊन इतर कुणाला हे पांडव आहेत हे एवढ्यात कळू नये म्हणून घाईने परत गेले. पाठोपाठ धृष्टद्युम्न येऊन गुपचुप पांडवांची व द्रौपदीची हालहवाल पाहून गेला. त्याने द्रुपदाला पांडवाचे आचारविचार, बोलणीं यावरून हे पांडवच आहेत असे म्हटले व आपला हेतु सफळ झाला असे सांगितले. रात्र उलटली. सकाळी द्रुपदाचा पुरोहित येऊन युधिष्ठिराला भेटला व ’आपण पांडवच ना?’ असे विचारले. युधिष्ठिराने मुत्सद्देगिरीने ’ज्याने पण जिंकला तो सामान्य माणूस नव्हेच, द्रुपदाला इच्छेप्रमाणे उत्तम जावई मिळाला आहे’ असे ऐकविले पण स्पष्ट ओळख दिली नाही व पांचांचा द्रौपदीशी विवाह करण्य़ाचा बेत मुळीच कळू दिला नाही. पांडव द्रुपदाच्या वाड्यावर गेल्यावर त्यांच्या चालचलणुकीवरून द्रुपदाची खात्रीच पटली कीं हे पांडवच. त्याने स्पष्टच विचारल्यावर युधिष्ठिराने सर्वांची ओळख करून दिली. द्रुपदाने वारणावताची हकीगत समजून घेतली, धृतराष्ट्राची निर्भर्त्सना केली व पांडवांना त्यांचे राज्य मिळवून देण्यासाठी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर द्रुपदाने म्हटले की आजच अर्जुनाने द्रौपदीचे पाणिग्रहण करावे. येथून घोटाळ्याला सुरवात झाली!
प्रथम युधिष्ठिराने म्हटले की मलाही विवाह करावयाचा आहे. त्यावर द्रुपदाने त्याला व इतर पांडवांना, ’माझ्या वा माझ्या कुळातील इतर कोणाच्याही कन्या तुम्ही पसंत करा.’ म्हटले. मात्र द्रुपदाची सूचना न स्वीकारतां युधिष्ठिराने ’आम्हा पाचही भावाना द्रौपदीशी विवाह करावयाचा आहे’ असे म्हटले! हे ऐकून द्रुपद हतबुद्धच झाला. ’ही धर्मविरुद्ध, वेदविरुद्ध व जगरहाटीविरुद्ध गोष्ट करावी असे तुला वाततेच कसे?’ असे त्याने म्हटले. यावरचे युधिष्ठिराचे उत्तर अतिशय महत्वाचे आहे. त्यात त्याच्या विचारांचा पाया कशावर आधारला आहे हे दिसून येते. त्याने तीन-चार गोष्टी मांडल्या. १. धर्माची गति गहन आहे. २. माझी वाणी असत्य बोलत नाही ३. माझ्या आईचा माझ्यासारखाच विचार आहे. ४ हा प्राचीन काळापासूनचा आमच्या पूर्वजांचा आचार आहे. ५. हा शाश्वत धर्म आहे. नवलाची गोष्ट म्हणजे हे विचार ऐकल्यावर द्रुपदाने हात झटकले व ’तू, तुझी आई व धृष्टद्युम्न काय ते ठरवा’ असे म्हटले! द्रौपदीची काय इच्छा आहे हे कोणीच विचारले नाही! या वेळी नेमके व्यासांचे आगमन झाले.
द्रुपदाने प्रष्न त्यांच्यासमोर मांडला व हा माझ्या दृष्टीने निव्वळ अधर्म आहे असे म्हटले. धृष्टद्युम्नाने तेच म्हटले. युधिष्ठिराने पुन्हा आपल्या मनाचा व आईच्या मताचा निर्वाळा दिला व कुंतीनेहि त्याला दुजोरा दिला. यावर व्यासांनी ’हा सनातन धर्म आहे व हे कसे ते मी तुला एकट्यालाच सांगतो’ असे म्हटले. मग एकांतात व्यासानी द्रुपदाला द्रौपदीची पूर्वजन्मीची कथा सांगितली. पांडव हे इंद्र, द्रौपदी ही लक्ष्मी, द्रौपदीने तप करून उत्तम पति दे असा वर पांच वेळा मागितला व शंकराने तो दिला. पांच वरांचे फळ म्हणून पांच पांडवांचा व द्रौपदीचा विवाह हा देवांनीच, विशेषत: शंकरानेच योजलेला आहे असे बरेच काही सांगितले! यावर बोलण्यासारखे काही न उरल्यामुळे ’शंकरानेच हे योजले असेल तर मग हा धर्म असो वा अधर्म, माझ्याकडे दोष नाही’ असे म्हणून, अजूनही द्रौपदीला न विचारतांच द्रुपदाने विषय समाप्त केला! त्यानंतर पांचहि पांडवांचा एकेका दिवशी क्रमाक्रमाने द्रौपदीशी विवाह झाला. द्रुपदाने अनेक अहेर केले. नवल म्हणजे पांडवाचे तर्फे कौरव, यादव वा इतर कोणीही उपस्थित नव्हते. कृष्णाने अहेर पाठवून दिले. विवाहांची बातमी स्वयंवराला जमलेल्या राजेलोकांना गुप्तदूताम्कडून कळली! पांडव लाक्षागृहांतून वांचल्याचे कळ्ल्यावर या राजांनी कौरवांची, खुद्द भीष्माचीहि, निंदा केली व सर्व परत गेले. कौरवही पांडवांना वांचलेले पाहून चरफडत हस्तिनापुराला परत गेले. अशा प्रकारे हा लोकविलक्षण विवाह पांडव व द्रुपद यांनी गुपुचूप उरकून घेतला! प्रत्यक्ष विवाहाची कथा येथे संपली. याचे मागील खरी कथा पुढे पाहू.

Thursday, April 24, 2008

पांडव विवाह - भाग ४

आतां द्रौपदीच्या स्वयंवराची कथा विस्ताराने पाहूं. अध्याय १८५-श्लोक ८-१० मध्ये म्हटले आहे कीं द्रुपदाची खरी इच्छा द्रौपदी अर्जुनाला द्यावी ही होती. अर्जुनाला हरवतां येत नाही व त्याशिवाय द्रोणाचा पराभव शक्य नाही या पेचातून सुटका होण्यासाठी अर्जुनाला जामात करून घेणे हा एकच मार्ग होता. पण अडचण ही होती कीं पांडव तर लाक्षागृहात जळून मेले असे जाहीर झाले होते. पण तरीहि जर पांडव जिवंत असलेच तर अवघड पणाचे आव्हान स्वीकारून अर्जुन पुढे येईलच आणि तो जिवंत नसलाच तर मग जो कोणी वीर पण जिंकेल तो महावीरच असेल व द्रोणाविरुद्ध तो उपयोगी पडेलच या विचाराने मत्स्यवेधाचा पण लावलेला होता. स्वयंवराला आलेले लोक १५ दिवस मंडपाची शोभा पाहत होते व मत्स्ययंत्रहि निरखत होते. सोळाव्या दिवशी सुरवातीलाच धृष्टद्युम्नाने केलेल्या घोषणेत, पण जिंकण्याबरोबरच थोर कुळात जन्म, देखणा व बलवान असणे याही अटी स्पष्ट सांगितल्या. द्रौपदीने कर्णाला नाकारले ते अनपेक्षित खासच नव्हते. कर्णानेच हात दाखवून अवलक्षण करून घेतले होते!
अध्याय १८७ मध्ये ब्राह्मण समुदायात त्याच वेषात बसलेल्या पांडवाना कृष्णाने ओळखले व बलरामाला खुणेने दाखवले असे म्हटले आहे. पांडव लाक्षागृहातून वाचले असावेत अशी कृष्णाला आशा वा माहिती असावी म्हणून इतर कोणाचे नाही पण त्याचे पांडवांकडे लक्ष गेले असावे. खरे तर या प्रसंगापूर्वी पांडव व कृष्ण यांच्या भेटीचा एकहि उल्लेख महाभारतात नाही. कृष्ण कंसवधापर्यंत गोकुळात दडून होता. नंतर दीर्घकाळ जरासंधाशी युद्ध, द्वारकेला स्थलांतर, रुक्मिणीस्वयंवर, या घटनांत व्यग्र होता. पांडवांची भेट होण्याची वेळच आली नव्हती. तेव्हां तर्कानेच ओळखले असावे.
पणाचे धनुष्य सज्ज करतानाच जरासंधासारख्याचेहि बळ पुरले नाही याचा अर्थ बळापेक्षा हा कौशल्याचा प्रश्न होता. कर्ण ते करू शकला पण तो पडला सूतपुत्र! द्रौपदीने स्वत:च सांगून टाकले कीं मी सूतपुत्राला वरणार नाही. कर्णानंतर कृष्ण, यादव, कौरव वा इतर कोणा क्षत्रियवीराने प्रयत्नहि केला नाही. अखेर ब्राह्मणवेषातील अर्जुनाने पण जिंकल्यावर द्रुपद हर्षभरित झाला. हा अर्जुनच अशी त्याची खात्री झाली. कृष्णाच्या कानावर आलेली बातमी द्रुपद व धृष्टद्युम्न यानाही माहीत होती. अध्याय १९३ श्लोक ९-१३३ मध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. खुद्द कौरवांकडे मात्र विदुर सोडून इतर कोणाला, भीष्मालाहि, पांडव जिवंत असल्याची शंका नव्हती.
एका ब्राह्मणकुमाराने पण जिंकल्यामुळे मंडपात कोलाहल झाला. पांडवांना अजूनहि कोणी ओळखले नव्हते. तेव्हाच, युधिष्टिर, नकुल व सहदेव, राजेलोकांच्या क्षोभाला तोंड देण्याचे काम भीमार्जुनांवर सोडून देऊन, त्वरेने (महाभारतांतील शब्दप्रयोग) मुक्कामाचे ठिकाणी निघून गेले. ही त्वरा कोणती होती? राजेलोकांच्या युद्धेच्छेला भीमार्जुनानी तोंड दिले. भीमाने एक झाडच उपटून सर्वांना झोडपले. अखेर कृष्णाने सर्वांना समजावले की या ब्राह्मणाने धर्मानेच पण जिंकला आहे तेव्हा युद्ध पुरे करा. युद्ध थांबले. भीम, अर्जुन व पाठोपाठ द्रौपदीहि मुक्कामाचे ठिकाणी परतलीं. युधिष्ठिर आधीच परतला होता व अर्जुनाने पण जिंकला आहे व भीमार्जुनांबरोबर द्रौपदीहि येणार आहे हे कुंतीला कळलेच होते. मध्ये भरपूर वेळहि गेला होता. यापुढचा परिचित नाट्यप्रसंग हा एक बनाव होता व त्यामागचा हेतु वेगळाच होता. पुढील भागात त्याची सविस्तर तपासणी करू!

Tuesday, April 22, 2008

पांडव विवाह - भाग ३

सर्व पात्रे मानवी आहेत अशी भूमिका घेतली तर धृष्टद्युम्न व द्रौपदी यांचा जन्म यज्ञातून झाला ही कल्पना सोडून द्यावी लागते. या कथेतील सर्व अद्भुत भाग दूर सारला तर हीं दोघे प्रत्यक्षात द्रुपदाचींच (कदाचित अनार्य स्त्री पासून झालेलीं !) अपत्यें असावीं पण अद्याप त्यांचा राजकुळात समावेश नसावा व यज्ञ करून द्रुपदाने तो ब्राह्मणांच्या व नागरिकांच्या साक्षीने व संमतीने सन्मानपूर्वक करून घेतला, असे या कथेचे मूळ स्वरूप मला वाटते. दोन्ही मुलांचा कृष्णवर्ण हेच सुचवतो. द्रुपदाला हा यज्ञ करण्यासाठी प्रथम कोणी ब्राह्मण मिळत नव्हता. याज व उपयाज अशी एक ब्राह्मणांची जोडी होती. द्रुपदाने प्रथम उपयाजाला विचारले. त्याने नकार दिला पण सुचवले की तू याजाला विचार, तो योग्यायोग्य फारसे पाहत नाही. तो तुझा यज्ञ करील! असे दिसते की यज्ञाला ब्राह्मण अनुकूल नव्हते व याजाने तो बहुधा द्रव्यलोभाने करून दिला! यज्ञ करण्याचा हेतु वर तर्क केल्याप्रमाणे असेल तर हे सयुक्तिक वाटते! पूर्वी दशरथाने पुत्रांसाठी यज्ञ केला त्याला कोणी गौण मानले नव्हते. मात्र एकदा याजाने यज्ञ करून दिल्यानंतर, दोन्ही अपत्ये द्रुपदाच्या घरात व समाजातहि सन्मानाने स्वीकारली गेली तेव्हा द्रुपदाचा हेतु सफळ झाला असे म्हणावे लागते. यज्ञामुळे स्वत:ला अपत्य झाले नाही याचा विषाद न मानता राणीने याजाला विनवले की यांनी मलाच आई म्हणावे. यावरून असे वाटते कीं त्यांची खरी आई हयात नसावी. यांनी स्वत:च्या खऱ्या आईला विसरावे अशीहि इच्छा तिने व्यक्त केली. जणू तिने त्यांना दत्तक घेतले! धृष्टद्युम्न यानतर द्रोणापाशी धनुर्विद्या शिकला असे मानले जाते. ते खरे वाटत नाही. कौरव-पांडवांचे शिक्षण पुरे झाले होते. द्रोणाचा बदल्याचा हेतुही पुरा झाला होता. त्याची अकादमी केव्हाच बंद झाली होती!
धृतराष्ट्राने युधिष्ठिराला यौवराज्याभिषेक केला. नंतर बऱ्याच काळाने पांडव वारणावतास गेले व एक वर्ष तेथे राहून मग वाड्याला लागलेल्या आगीतून बचावून वनात पळून गेले. तो पर्यंत द्रुपदाचा हा यज्ञ झाला नव्हता. कारण द्रौपदीची ही जन्मकथा पांडवांना वनात तिच्या स्वयंवराची वार्ता कानी येईतोवर माहीतच नव्हती. द्रुपदाच्या पराभवानंतर बऱ्याच काळाने हा यज्ञ झाला या तर्काला यावरून पुष्टि मिळते. तेव्हा इतक्या वर्षांनंतर द्रोणाने पुन्हा सुरवात करून धृष्टद्युम्नाला शिकवले असणे संभवत नाही. पांडवांनी लाक्षागृह सोडल्यानंतर काही काळाने द्रुपदाचा यज्ञ झाला व त्यावेळी द्रौपदी कुमारी होती तेव्हा पांडव व द्रौपदी यांच्या वयात बराच फरक होता असेहि दिसते!
द्रौपदीच्या स्वयंवराची व रूपगुणांची बातमी पांडवांच्या कानी आली तेव्हा ते एकप्रकारे अज्ञातवासातच होते. ते वारणावताच्या आगीत जळून मेले अशीच हस्तिनापुरात समजूत होती. भीष्माने त्यांचे और्ध्वदैहिकहि केले होते! आपण प्रगट व्हावे की नाही हा त्यांच्यापुढे प्रष्नच होता. मग आपण स्वयंवराला कसे जावे हा प्रष्न होता. त्यांचे मनोगत जाणून कुंतीने धोका पत्करून पांचालदेशाकडे जाण्याचे ठरवले. पांडवांना पांचालनगरात व्यास भेटले व द्रौपदी तुमची पांचांची पत्नी होईल असे त्यानी पांडवांना सांगितले असे अ.१६९ मध्ये म्हटले आहे. हे मागाहून घुसडलेले स्पष्ट दिसते. कारण पुढील अध्यायात वनात पांडवाची चित्ररथाशी गाठ पडली व अर्जुनाने त्याचा अस्त्रबळाने पराभव केला व पांडव पुन्हा पांचालदेशाला निघाले असे वर्णन आहे. अध्याय १८५ मध्ये पुन्हा व्यास भेटले. मात्र येथे द्रौपदी तुम्हा पाचांची पत्नी होईल असे त्यानी म्हटलेले नाही. द्रुपदाने द्रौपदीचे स्वयंवर योजले होते व पण असा लावला होता की अर्जुनासारख्या अद्वितीय धनुर्धरालाच तो जिंकता येईल. यामागे त्याचा काय हेतु होता?
द्रौपदीच्या स्वयंवराची कथा पुढील भागात विस्ताराने पाहूं.

Saturday, April 19, 2008

पांडव विवाह - भाग २

द्रुपद व द्रोण हे बालपणीचे सहाध्यायी. द्रुपद राजा झाल्यावर द्रोण त्याला भेटायला गेला व जुन्या मैत्रीची आठवण दिली तेव्हा द्रुपदाने त्याला झिडकारले व तुझई माझी मैत्री आता शक्य नाही असे म्हणून त्याचा अपमान केला. तो भरून काढण्याची द्रोणाची तीव्र इच्छा होती. स्वत: द्रुपदाशी युद्ध करून त्याचा पराभव करण्यापेक्षां उत्तम शिष्य मिळवून त्यांचेकडून द्रुपदाला धडा शिकवणे त्याला जास्त श्रेयस्कर वाटले. शिष्यांच्या शोधात भटकत असतां भीष्माचे आमंत्रण स्वीकारून द्रोण कुरुदरबाराच्या आश्रयाला राहिला व कौरव, पांडव व इतरहि राजकुमारांना त्याने शिकविले. अर्जुनाकडून त्याच्या विशेष अपेक्षा होत्या. शिक्षण संपल्यावर गुरुदक्षीणा म्हणून द्रुपदाचा पराभव करा अशी शिष्यांकडे मागणी केली. प्रथम कौरव एकटेच लढले व हरले. नंतर पांडव युद्धात उतरले व अर्जुनाने अपेक्षेप्रमाणे द्रुपदाचा पराभव केला. अनेक पांचालवीरांचे काही चालले नाही. यांत द्रुपद, पुत्र सत्यजित व भाऊ होते. द्रुपदाच्या इतर पुत्रांचा, शिखंडीचाहि उल्लेख नाही. कुरु-पांचालांचे वैर नव्हते. हे युद्ध द्रोणामुळे झाले. द्रोणाने आपल्या अपमानाची भरपाई म्हणून अर्धे राज्य मागून घेतले व द्रुपदाला सोडले. प्रत्यक्षात द्रोण काही राज्य करावयास गेला नाही तेव्हा अपमानाची भरपाई व द्रुपदाशी बरोबरी एवढाच त्याचा अर्थ होता.
या युद्धानंतर द्रुपदाने हाय खाल्ली. स्वबळावर द्रोणाला व त्याच्या शिष्यांना धडा शिकवणे शक्य नाही हे जाणून तो फार उद्विग्न झाला. आपल्या पराभवाचा बदला घेऊ शकेल अशा पुत्राच्या प्राप्तीसाठी त्याने यज्ञ केला. यज्ञ्याचे फळ म्हणून त्याला पुत्र धृष्टद्युम्न व कन्या द्रौपदी मिळालीं. या यज्ञ्याची कथा तपासली पाहिजे. अर्जुनाकडून झालेल्या पराभवानंतर किती काळाने हा यज्ञ झाला ते सांगितलेले नाही. द्रुपदाने पराभवाचा बदला घेईल अशा शूर पुत्राचीच इच्छा धरली होती. यज्ञाचा हविर्भाग द्रुपदपत्नीला देण्याची वेळ आली तेव्हां तुला पुत्र व कन्या दोन्ही मिळणार आहेत आसे मुनि म्हणाले. रजस्वला असल्यामुळे राणीने हविर्भागाचा स्वीकार केला नाही. तिच्यासाठी न थांबता हवि यज्ञातच अर्पण केला व मग अग्नीतून धृष्टद्युम्न व द्रौपदी बाहेर पडलीं. यज्ञ पुरा होण्याच्या वेळी पट्टराणी तयार नव्हती हे जरा चमत्कारिकच वाटते. यज्ञाचे फलित म्हणून खुद्द तिला अपत्य न होतां कुमारवयाची अपत्ये निर्माण कां झालीं याचें हें एक लंगडे समर्थन वाटते!

Monday, April 14, 2008

पांडव- द्रौपदी विवाह

पांडव विवाह

महाभारत हा भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे. त्यांतील मुख्य कथा सर्वपरिचित आहे. पांच पांडव व एक द्रौपदी यांचा विवाह ही एक विलक्षण घटना आहे. एका स्त्रीचा पांचांशी विवाह हा आर्यांच्या आचारचौकटीत बसणारा नाही. इतिहास-पुराणात इतरत्र कोठेही अशी घटना आढळत नाही. भारताच्या उत्तरसीमेवरील काही लोकसमूहांमध्ये असा आचार अजूनहि चालू आहे असे म्हणतात पण त्याला कोठेहि प्रतिष्ठित समाजात मान्यता नाही. मात्र नवलाची गोष्ट ही कीं महाभारताचे नायक म्हणतां येतील अशा पांडवांशी ही घटना निगडित असूनहि त्यामुळे त्याना गौणत्व आले असे दुर्योधन व कर्ण सोडून इतर कोणीहि म्हणत नाही. इतर कोणी लेखक, विचारवंत वा टीकाकार तसे म्हणत नाही. पांडव, द्रौपदी, व कुरु-पांचाल कुळांनी हा विवाह आनंदाने मान्य केला. पांडवांच्या वैवाहिक जीवनावर त्याची छाया पडलेली नाही. महाभारतांतील अनेक कोड्यांपैकी हे एक कोडे आहे. महाभारत वाचताना या घटनेचा सर्व तपशील चौकसपणे तपासला तर अनेक गोष्टी नजरेला येतात. त्यांचा परामर्ष घेताना मी अशी भूमिका घेतली आहे कीं ही माणसांची कथा आहे, देव वा राक्षसांच्या अवतारांची नव्हे. घडलेल्या घटना मूळ लेखकाने यथातथ्य नोंदल्या आहे पण जय चा महाभारत होताना कित्येक विसंगति भरल्या आहेत व त्या या विवाहाचे समर्थन करण्यासाठी आल्या आहेत. सर्व पात्रे मानवी आहेत ही भूमिका घेतली की काही गोष्टींचा खुलासा शोधण्यासाठी थोडे कल्पनास्वातंत्र्य घ्यावे लागते. या दृष्टिकोनातून पांडवविवाहाची पूर्वपीठिका तपासून पहावयाची आहे. सर्व पांडवकथा सुरवातीला पाहण्याची गरज नाही, ती सुपरिचित आहे. कौरव-पांडवांच्या शिक्षणसमाप्तीपासून सुरवात करूं.

Wednesday, April 9, 2008

पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ६


अर्जुन व कौरव यांच्या युद्धप्रसंगाची तिथि व पक्ष स्पष्ट्पणे सांगितलेलीं नाहीत. दुर्योधनाने म्हटले की त्रिगर्ताच्या स्वारीची तिथि सप्तमी ठरली होती. कौरव दुसऱ्या दिवशी चालून आले म्हणजे त्या दिवशी अष्टमी होती. पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाने कृष्णपक्ष चालू होता. ऋतु ग्रीष्म होता. अर्जुनाने शमीच्या झाडावरून शस्त्रे काढून घेतली हे खरे पण काहींच्या समजुतीप्रमाणे ही विजयादशमी नव्हती! महिना दुसरा अधिकमास चालू होता. द्यूत अनुद्यूताच्या प्रसंगाची तिथिहि सांगितलेली नाही त्यामुळे या दिवशी तोच महिना व तीच तिथि नव्हतीच ही वस्तुस्थिति थोडीशी नजरेआड होते. पांडवांच्या दृष्टीने ही बाब अडचणीची होती म्हणून ती हेतुपूर्वक झाकली आहे काय असा प्रश्न पडतो. भीष्माने पांडवांनी केलेला हिशेब उलगडून दाखवला पण त्याचे उघडपणे समर्थन केव्हाच केलेले नाही. इतर कुणीहि नाही. दुर्योधनाने या प्रसंगी व नंतर अखेरपर्यंत पण पुरा झाल्याचे कधीच मान्य केले नाही.
युद्धापूर्वी अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्णाने कौरवदरबारात पांडवांची बाजू मांडली तेव्हा त्यानेहि ’पण पुरा केल्याचा पांडवांचा दावा आहे’ एवढेच म्हटले त्याचे समर्थन केले नाही. धृतराष्ट्र, गांधारी व इतर अनेकांनी दुर्योधनाला युद्ध टाळ असा उपदेश केला पण ’पांडवांचा पण पुरा झाला आहे तेव्हा त्यांचे राज्य परत दिलेच पाहिजे’ असे कोणीहि म्हटले नाही! युद्धात तुझा सर्वनाश होईल अशी भीति घातली. दुर्योधनाला माहीत होते कीं केव्हातरी पांडवांशी लढावे लागणारच आहे व त्यालाहि खुमखुमी होतीच. यावेळी पांडवांची बाजू कच्ची असल्यामुळे भीष्म-द्रोण-कृप-अश्वत्थामा उघडपणे त्यांची बाजू घेण्याची शक्यता कमी होती. इतर राजांना समजावून आपल्या बाजूला वळवण्याची शक्यता होती.
प्रत्यक्षात तसेच झाले. राजेलोकांनी जी बाजू पटली ती घेतली! भीष्माची पंचाईत झाली. पांडवांच्या बाजूला सरळ मिळणे कठीण होते. द्रुपद हा पांडवांचा प्रमुख पाठीराखा असल्यामुळे द्रोणाला कौरवांची बाजू घेणे प्राप्तच होते. कृप व अश्वत्थामा दुसरे काय करणार? बलरामाने कृष्णाला सरळच सांगितले की ’पांडवांच्या दुर्दशेला युधिष्ठिर स्वत:च जबाबदार आहे. आपल्याला दोन्ही पक्ष नातेसंबंधाने सारखेच आहेत तेव्हा आपण दूर राहणे योग्य!’ युद्ध अटळ आहे असे दिसल्यावर बलराम उद्विग्न होऊन यात्रेला निघून गेला. कृष्णाला बलरामाशी मतभेद नको असल्यामुळे पांडवांच्या बाजूने प्रत्यक्ष युद्धात उतरणे शक्यच नव्हते! ’ न धरी शस्त्र करी मी’ यामागचे खरे कारण हे आहे! अर्जुनाचे सारथ्य करण्यालाहि बलरामाने आक्षेप घेऊ नये यासाठी आपले सैन्य त्याने दुर्योधनाला दिले! कोणत्याही परिस्थितीत बलराम कौरवपक्षाला मिळणे परवडणारे नव्हते!
सौरमान की चांद्रमान या वादात शास्त्र पांडवांचे बाजूने होते असे आज आपणाला वाटेल. पण जनव्यवहार चांद्रमानानेच चालत होता. भारतात हिंदु सत्ता आजतागायत चालू राहिली असती तर आजही कदाचित चांद्रवर्ष मान्यताप्राप्त असते. रविवार ऐवजी चतुर्थी-एकादशीच्या सुट्या घेतल्या असत्या व दर २९ महिन्यानी आपण एक अधिक पगार घेतला असता! तेव्हा दुर्योधनाचा राज्य देण्यास नकार हा पूर्णपणे अन्यायाचा म्हणता येईल काय? प्रश्नच आहे!
पांडवांना शक्य झाले असते तर त्यानी सहा अधिक महिने पुरे केले असते हे नक्की. मात्र तरीहि दुर्योधनाने राज्य परत दिले नसतेच कारण तो त्याचा प्रथमपासूनचा ठाम बेत होता. मात्र मग कदाचित युद्ध एका बाजूस पांडव, पांचाल, विराट, कदाचित कृष्ण व यादव, शल्य व दुसऱ्या बाजूस कौरव, कर्ण, द्रोण, कृप, अश्वत्थामा व शकुनि असे झाले असते!
पहिल्या भागात उपस्थित केलेल्या काही प्रष्नांची उत्तरे याप्रकारे मिळतात असे म्हणतां येईल.

Sunday, April 6, 2008

पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ५

विराट व पांडव यांनी त्रिगर्त राजाचा पूर्ण पराभव केला व ते दुसरे दिवशी सकाळी राजधानीला परतले. मात्र सकाळीच कौरवांचा उत्तरेकडून हल्ला आला तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी कुमारवयाच्या राजपुत्र उत्तराला जावे लागले. त्याचे सारथ्य करण्यासाठी बृहन्नडावेषातील अर्जुन द्रौपदीच्या आग्रहावरून गेला. अर्जुन व द्रौपदी दोघानाही माहीत होते की कौरवांपुढे उत्तराचा मुळीच निभाव लागणार नाही व अर्जुनालाच लढावे लागणार आहे व तो लगेचच ओळखला जाईल. दोघानीहि त्याची पर्वा केली नाही. सौरमानाने तेरा वर्षे आज सकाळीच पुरी झालेली आहेत अशी त्यांची खात्री असली पाहिजे. मग कौरवांचा समाचार घेण्याची संधि अर्जुन कशाला सोडील? अपेक्षेप्रमाणेच उत्तराची जागा अर्जुनाला घ्यावी लागली व जरी तो बृहन्नडा वेषांत होता तरी कौरवांनी त्याला लगेचच ओळखले. दुर्योधनाने ताबडतोब सांगून टाकले की हा अर्जुन ओळखला गेला आहे व अद्न्यातवासाची मुदत पुरी झालेली नाही. तेव्हा त्यांना राज्य देण्याचा प्रष्नच उद्भवत नाही, त्यानी पुन्हा बारा वर्षे वनात जावे. (विराटपर्व अ. १ श्लोक १-७).


अर्जुनाला ओळखून भीष्म द्रोण व इतर कौरववीरहि चकित झाले. द्रोण व दुर्योधन यांनी विचारल्यावरून यावेळी भीष्माने प्रथमच सौरवर्षाचा विचार करून अधिकमासांचे गणित मांडले. त्यांनी म्हटले की बारा चांद्रमासांचे चांद्रवर्ष व सौरवर्ष यांतील फरकामुळे पांच चांद्रवर्षांमध्ये दोन अधिकमास धरावे लागतात (५८ + २ = ६०). या हिशेबाने तेरा चांद्र्वर्षांचे वर (१५६ चांद्रमासांचे वर) पांच महिने व बारा रात्री एवढा अधिक काळ मोजावा लागेल. द्यूताच्या दिवशीच्या संध्याकाळ्पासून आज सकाळपर्यंत हा काळ पुरा झाला आहे! भीष्माने बारा दिवस न म्हणतां बारा रात्री असे कां म्हटले? कारण वनवास द्यूत संपल्याबरोबर संध्याकाळी लगेच सुरू झाला व ती रात्र व कालची रात्र देखील विचारात घेऊन बारा रात्री पुऱ्या झाल्या होत्या व अद्न्यातवास सौरमानाने जेमतेम पुरा झाला होता! दुर्योधनाने हे गणित साफ धुडकावून लावले व मी पांडवांना राज्य मुळीच देणार नाही असे साफ सांगितले. भीष्म, द्रोण वा इतर कुणीहि यावर काही मतप्रदर्शन केले नाही.
सौरवर्ष व चांद्रवर्ष यांतील फरक जुळवून घेण्यासाठी भीष्माने सांगितलेली व सध्या प्रचलित असलेली पद्धति यांत थोडा फरक आहे. साधारणपणे दरेक चांद्रमासामध्ये सूर्य कोणत्यातरी दिवशी एका राशीतून पुढील राशीत प्रवेश करतो. त्या राशिनामावरून त्या महिन्याचे नाव ठरते. मात्र ज्या महिन्यामध्ये असे राशिसंक्रमण होत नाही तो महिना बिननावाचा, अधिक महिना होतो. साधारणपणे दर २८-२९ चांद्रमासांनंतर असा अधिक महिना येतो. महाभारतकाळी आपल्याकडे राशी नव्हत्या. नक्षत्रे होती. आप्ली महिन्यांची नावे नक्षत्रांवर आहेत. राशी पुष्कळ मागाहून, वराहमिहिराच्या काळी आल्या. सूर्याच्या भ्रमणमार्गाचे बारा समान भाग म्हणजे राशि. सूक्ष्म वेधाशिवाय राशिसंक्रमण निश्चित करणे पूर्वी शक्य नव्हते त्यामुळे आताची पद्धतहि शक्य नव्हती. राशि ग्रीकांकडून आल्या असे म्हणतात. आपली व परदेशीयांची राशिनामेहि त्यामुळे एकच आहेत. पूर्वी ५८ महिन्यांनंतर महिने व ऋतु यांचे संतुलन पूर्णपणे बिघडून जाई व मग दोन महिने एकदम अधिक घेऊन ते पुन्हा जुळवले जात होते (एकेक ऋतु दोन महिन्यांचा असतो) असा तर्क करणे सयुक्तिक वाटते. वनवास-अद्न्यातवासाच्या तेरा वर्षांच्या काळात १५६ चांद्र्मासांचेवर २ अधिक महिने तीन वेळा आले असले पाहिजेत. दोनच वेळां आले असते तर तेरा चांद्रवर्षे सौरवर्षांपेक्षा लवकर संपली असती व काही प्रष्नच उभा राहिला नसता ! पांडवांना सहा अधिक महिने मोजायचे होते. कीचकाचा वध करावा लागला नसता तर युधिष्ठिराने तसेच केले असते! शेवटचे दोन अघिक महिने पूर्वीच येऊन गेलेले असते तर इलाज नव्हता. पण त्रिगर्त-कौरवांच्या आक्रमणामुळे उघडकीला येण्याची पाळी आली. विराटाची बाजू घेणे भागच होते कारण त्याने वर्षभर आश्रय दिला होता. यावेळी बहुधा सहावा अधिकमास चालू होता. त्यामुळे तेरा सौरवर्षे सकाळी पुरी झाली आणि अर्जुन खुशाल प्रगट झाला! मात्र पांच महिने-बारा रात्री व सहा महिने यांतील फरक, १८-१९ दिवस कमी पडले हे नक्की!

Saturday, April 5, 2008

पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग 4

कौरवांकडून पांडवांचा शोध :-
वनवासाचीं बारा वर्षे पुरी होऊन पांडव अद्न्यातवासात गेल्यावर त्यांचा शोध करण्यासाठी कौरवांनी पुष्कळ हुशार माणसे सर्व दिशाना पाठवली होती. पांडवांचा शोध लागला असता तर द्यूताच्या अटीप्रमाणे त्याना पुन्हा बारा वर्षे वनवासाला जावे लागले असते! मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. कीचकाचा वध झाला त्यापाठोपाठच ते सेवक हस्तिनापुराला हात हलवीत परत आले होते. कीचकवध होऊन किती दिवस लोटले होते ते स्पष्ट सांगितलेले नाही. त्यामुळे भीमाने उल्लेखिलेल्या दीड महिन्याच्या काळापैकी किती दिवस शिल्लक होते? कौरवदरबारात भीष्मद्रोणांसमक्ष याची चर्चा झाली. ’अद्न्यातवासाचा थोडाच काळ शिल्लक उरला’ असे म्हटले गेले. मात्र २-३दिवस उरले असे कोणी म्हटले नाही. घबराट उडाली नाही. सेवकाना पुन्हा शोधासाठी पाठवले गेले. भीष्मानी त्याना खुलासेवार सूचना दिल्या व विषय संपला! त्रिगर्तांचा राजा सुशर्मा, दुर्योधनाचा मित्र, दरबारात उपस्थित होता त्याने कीचक मारला गेल्याच्या बातमीला दुजोरा देऊन सुचवले की राजा विराट आता दुर्बळ बनला आहे तेव्हा त्याचे गोधन लुटून आणण्याची संधी आली आहे. तेव्हा आपण दोन्ही दिशांनी हल्ला करावा. त्याची सूचना मान्य होऊन दुसऱ्याच दिवशी हल्ला करावयाचे ठरले. यावरून असे दिसते की कौरवाना अद्याप पांडवांच्या शोधाची निकड भासत नव्हती. अजून वेळ होता! भीष्मानेही पांडव सौरमानाने तेरा वर्षे पुरी करण्याची शक्यता विचारात घेऊन, त्याचे गणित करून, प्रकरण २-३ दिवसांवर आले आहे असे म्हटले नाही. चांद्रमानाने तेरा वर्षे, द्यूताच्या तिथि/मासाची तेरा आवर्तने, हीच मर्यादा सर्वांच्या नजरेसमोर होती असे स्पष्ट दिसते. विराटावरच्या स्वारीत भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, कृप सारेच नि:शंकपणे सामील झाले. तेथे अर्जुनाशी लढावे लागणार आहे याची कोणी कल्पनाहि केली नव्हती!
त्रिगर्त - विराट युद्ध -
दुसऱ्याच दिवशी सुशर्म्याने दक्षिण दिशेने विराटावर स्वारी केली. या दिवसाच्या तिथीचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. युद्ध वर्णनात म्हटले आहे कीं सूर्यास्तानंतर बऱ्याच वेळाने चंद्रोदय होऊन प्रकाश पडला. यावरून ही कृष्णपक्षाची सप्तमी-अष्टमी ठरते. पुढे दुर्योधनाचे तोंडी स्पष्ट उल्लेखच आहे कीं त्रिगर्तांनी सप्तमीला दुपारी हल्ला करण्याचे ठरले होते. विराटाचे बाजूने अर्जुन सोडून इतर चारहि पांडव युद्धात उतरले. मात्र युधिष्टिराने भीमाला सूचना दिली की ’इतर वीरांप्रमाणेच लढ, तुझ्या खास पद्धतीप्रमाणे झाड उपटून लढू नको नाहीतर ओळखला जाशील.’ ओळखणे टाळता आले तर तेरा चांद्रवर्षे पुरी करावीत असा युधिष्ठिराचा विचार असावा. पांडवांच्या मदतीने विराटाने त्रिगर्ताचा सपशेल पराभव केला व गायी सोडवून सर्वजण राजधानीला सकाळी परत आले. त्या आधीच, सकाळीच कौरवांचा उत्तरेकडून हल्ला आल्यामुळे, राजपुत्र उत्तर व बृहन्नडा वेषातील अर्जुन त्यांच्याशी लढायला निघून गेले होते. ती हकीगत पुढील भागात पाहू.

Wednesday, April 2, 2008

पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ३

अद्न्यातवास - पुष्कळ संकटे व हाल सोसून बारा वर्षांचा वनवास पांडव व द्रौपदी यांनी पुरा केला. पांडवांच्या इतर बायका व मुले वनवासात नव्हती. पणामध्ये त्यांचा समावेश नव्हता. पांडवांनी अनुद्यूताला सुरवात करताना द्रौपदीला पणातून वगळण्याची मागणी केली नाही. युधिष्टिराला, आपण पण हरलोच तर द्रौपदीहि वनात आलेलीच बरी असे वाटले असेल कारण ती स्वस्थ बसणार नाही व युद्ध टाळण्याचा उद्देश विफल होईल ही भीति होती! वनवासाचे अखेरीस पांडवांनी सर्व नोकर सारथी आश्रित यांना निरोप दिला व सर्वजण गेल्यावर पांडव स्वतंत्रपणे दुसरीकडे गेले व काही काळ वनात भटकून मग विराटाच्या नगरात गेले. ज्या दिवशी पांदव विराटासमोर व द्रौपदी सुदेष्णाराणीसमोर उभीं राहून चाकरीला लागलीं त्या दिवसापासून अद्न्यातवास सुरू झाला असे म्हटले पाहिजे. या दिवशी कोणती तिथि व महिना होता याचा उल्लेख केलेला नाही! एक वर्षानंतर याच तिथीला अद्न्यातवास संपावयाचा होता. तिथि सांगितलेली नसल्यामुळे तसे झाले काय हा प्रश्न शिल्लक राहतो.
विराटाच्या आश्रयाने आपण अद्न्यातवासाचे एक वर्ष पुरे करू ही आशा बाळगून होते. वर्षापैकी बराचसा काळ, तसे पाहता निर्विघ्नपणे पार पडला. सर्वांना अर्थातच हाल अपेष्टा सोसाव्या लागतच होत्या. विराटाचा मेहुणा कीचक हा राजधानीला परतून सैरंध्री-द्रौपदी त्याच्या नजरेला पडली तेव्हांपासून अडचणी सुरू झाल्या. कीचकाला, ही द्रौपदी आहे याची कल्पना नव्हती. त्याच्या लेखी ती फक्त एक सुंदर दासी होती. तिची अभिलाषा कीचकाने धरली हे सत्ताधीशांच्या वागणुकीशी सुसंगतच होते! कीचकाने विराटाच्या भर दरबारात, युधिष्टिरासमक्ष द्रौपदीचा घोर अपमान केला व त्याचा प्रतिकारहि कोणाला करता आला नाही. हा अपमान न सोसून, नाइलाजाने द्रौपदीने त्याच रात्री भीमाची भेट घेतली व कीचकाला मारून टाकण्याचा आग्रह केला. प्रथम भीमाने तिची समजूत घालून तिला ’दीड महिन्याचा काळ कसा तरी काढ’ असे म्हटले. (विराटपर्व अ. २१/१६-१७). यावेळी अद्न्यातवास संपण्यास तेवढा काळ बाकी होता असे यावरून दिसते. द्रौपदीने दीड महिन्याबद्दल शंका न काढतां भीमाला स्पष्ट सांगितले कीं ’एवढा काळ कीचकाचा छळ सोसत काढणे शक्य नाही. पुन्हा अपमान झाला तर मी प्राअत्याग करीन. पण पुरा होण्याची वाट पहात बसशील तर पत्नी गमावून बसशील तेव्हा लगेचच कीचकाला मार.’ द्रौपदीची अवस्था पाहिल्यावर व तिचा निर्धार ऐकल्यावर अद्न्यातवास पुरा होण्याची वाट न पाहतां व युधिष्टिराशी चर्चा न करताच, दुसऱ्याच रात्री कीचकाला मारण्याचा बेत ठरवला व पारही पाडला. कीचकाचा व अनुकीचकांचाही भीषण वध झाल्यावर याला पर्यायाने द्रौपदीच कारण आहे हे जाणून, भीतीने, विराटाने पत्नी सुदेष्णा हिचेतर्फे द्रौपदीला राज्य सोडून जा असा आदेश दिला. सुदेष्णेशी गयावया करून द्रौपदीने थोडा अवधि मागून घेतला तो मात्र फक्त तेरा दिवस! सुदेष्णेने द्रौपदीला कीचकाकडे मद्य आणण्यास पाठ्वले व तेथे तिचा घोर अपमान झाला त्या दिवसाची तिथि चतुर्दशी होती असा स्पष्ट उल्लेख सुदेष्णेच्या तोंडी आहे मात्र शुक्ल कीं कृष्ण पक्ष याचा खुलासा नाही. तसेच महिनाहि सांगितलेला नाही. लगेच दुसऱ्या रात्री कीचकवध झाला तेव्हा साहजिकच पौर्णिमा वा अमावास्या होती. कीचकवधाच्या रोमहर्षक वर्णनावरून ती अमावास्या होती असे दिसते. तेथून पुढे तेरा दिवस शुक्लपक्ष चालू होता. सुदेष्णेची सूचना कीचकाचे सुतक संपल्यावर दिली गेली असे समजले तर तेरा दिवसांची मुदत कृष्ण्पक्षाच्या सप्तमी - अष्टमीपर्यंत पोचते. प्रत्यक्षात अर्जुन कौरवांबरोबर युद्धाला उभा राहिला व ओळखला गेला तो कृष्ण अष्टमीलाच. मात्र कीचकवधापासून २२ - २३ दिवसच लोटले होते. दीड महिना नव्हे! अद्न्यातवासाचा उरलेला काळ भीमाने दीड महिना म्हटला होता तो द्रौपदीने सुदेष्णेकडे मुदत मागताना २२-२३ दिवसांवर कसा आणला याचा खुलासा महाभारतकारानी केलेला नाही. पुढे या कमी केलेल्या काळाचा खुलासा सौरमानाने तेरा वर्षे पुरी झाली असा केला गेला. त्याबद्दल पुढील भागात पाहूं.

पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग २

द्यूत व अनुद्यूत : -युधिष्टिर शकुनीशी द्यूत खेळला व पणांसाठी धन दुर्योधनाने दिले. ही विचित्र व्यवस्था युधिष्ठिराने फारशी तक्रार न करता स्वीकारली. काही करून त्याला द्यूत खेळायचेच होते! तो फार बेफामपणे खेळला. फार थोड्या वेळात तो सर्व वैभव गमावून बसला. याबद्दल बलरामाने त्याला दोषी ठरवले. नळराजा व त्याचा भाऊ पुष्कर यांचे द्यूत हे आणखी एक गाजलेले द्यूत. त्यांत सर्वस्व गमावण्यासाठी नळराजाला काही महिने लागले!कौरवांनी पांडवांचा व द्रौपदीचा नाना प्रकारे अपमान व छळ करून राजसूय यद्न्यापासून त्यांच्या मनात डाचत असलेले वैषम्य धुवून काढले! आपले पुत्र जिंकत असल्याचा आनंद उपभोगणाऱ्या धृतराष्ट्राने अखेर द्रौपदीला वर देऊन पांडवांना दास्यातून मुक्त करून द्यूताचा व्यावहारिक परिणाम सर्व पुसून टाकला. दुर्योधनाने त्याला हरकत घेतली नाही. धृतराष्ट्राच्या अंतिम आदेशाप्रमाणे पांडव व द्रौपदी इंद्रप्रस्थाला परत निघालीं. झालेल्या अपमानांचा बदला घेण्यासाठी पांडव लगेच पांचालांच्या व यादवांच्या मदतीने चालून येतील अशी भीति कौरवांना निर्माण झाली. मी तुमच्या बाजूने उभा राहीन असे स्पष्ट आश्वासन द्रोणाने दिले. तरीहि युद्ध टाळणेच श्रेयस्कर होते. त्यासाठी अनुद्यूताची कल्पना पुढे आली. धृतराष्ट्राने ती स्वीकारली व पांडवाना परतीच्या वाटेवरूनच परत बोलावले गेले.
पुन्हा द्यूताला बसताना ’आतातरी आपण जिंकू अशी मला आशा वाटली होती’ असे युधिष्टिर वनवासात नंतर द्रौपदीजवळ म्हणाला! युद्ध टळले तर युधिष्टिरालाहि हवे होते. त्याला कर्णाची धास्ती होती. भीष्मद्रोण आपलीच बाजू घेतील याची मुळीच खात्री नव्हती आणि केवळ भीम-अर्जुन यांच्या बळावर जिंकण्याची खात्री नव्हती. कौरवाना तयारीला, इतर राजे आपल्या बाजूला वळवण्याला वेळ हवा होता. अनुद्यूताच्या पणामुळे कोणताही पक्ष जिंकला तरी युद्ध तेरा वर्षे टळणार होते! पांडव जिंकले तर कौरवांपैकी कोणकोण वनात जाणार होते याचा खुलासा कोणी विचारलाच नाही. आपण हरू अशी शंकाही कौरवाना आली नाही. पांडव हरले तर मात्र त्यांचेबरोबर द्रौपदीनेहि वनात जावयाचे होते! कारण ती स्वस्थ बसली नसती, तिने पांचाल-यादवांच्या मदतीने कौरवांवर युद्ध लादले असते. अपेक्षेप्रमाणे युधिष्टिर हरला त्यामुळे हा प्रष्नच उद्भवला नाही. पांडव हरून वनात गेले तर परत आल्यावर त्याना राज्य परत द्यावयाचे नाहीच असा दुर्योधनाचा ठाम बेत होता व तो त्याने साथीदारांपाशी बोलूनहि दाखवला होता. (सभापर्व अ. ७४/श्लोक २१-२३).
एक महत्वाची गोष्ट म्हणजे द्यूत-अनुद्यूत कोणत्या तिथीला झाले याचा काहीहि उल्लेख महाभारतात नाही! महिनाहि दिलेला नाही. अनुद्यूतानंतर पांडव लगेचच वनात गेले. तेरा वर्षे त्याच तिथीला पुरी व्हावयाची असल्यामुळे तिथिचा उल्लेखच नाही ही नवलाची गोष्ट आहे. वनवासाची बारा व अद्न्यातवासाचे एक वर्ष सौरमानाने मोजावयाचे की चांद्रमानाने याची चर्चा झाली नाही. सर्व व्यवहार चांद्रमानाने चालत असल्यामुळे हा विषय निघाला नसणार! सौरमानाने वर्षे कशी मोजावयाची याचा खुलासा अर्थातच कोणी विचारला नाही वा कोणी केला नाही! महाभारतात इतरत्र तिथि, वार, महिना, नक्षत्र यांचे विपुल उल्लेख पाहता या महत्वाच्या घटनेची तिथि कां सांगितलेली नाही हे एक कोडेच म्हटले पाहिजे!

पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग १

महाभारतात अनेक कोडी आहेत त्यात मला जाणवणारे एक कोडे म्हणजे पाडवांचा अद्न्यातवास पुरा झाला कीं नाही? महाभारतकारांनी स्वत:चे स्पष्ट मत दिलेले नाही. दुर्योधनाने पांडवांचा दावा मुळीच मान्य केला नाही हे स्पष्टपणे नमूद केले आहे. महाभारतातील इतर अनेक प्रष्न या गोष्टीशी निगडित आहेत. त्यातील काही असे :-
१. कौरव आपल्या पक्षाला अनेक विख्यात राजे व अकरा अक्षौहिणी सैन्य जमवू शकले. त्यांचा पक्ष अन्यायाचा असेल तर हे कसे झाले?
२. भीष्म,द्रोण व कृप यांनी युद्धात कौरवांची बाजू घेण्याचे खरेंतर काही कारण नाही. अर्थस्य पुरुषो दास: हे दिलेले कारण पोरकट वाटते. कौरवांचा पराभव होऊन पांडव हस्तिनापुरचे राजे झाले असते तर त्यांनी या तिघानाहि सन्मानानेच वागवले असते. प्रत्यक्षात कृप पांडवांपाशी राहिलाच होता. मग या तिघानी युद्ध एवढे हिरिरिने कां लढवले?
३. युधिष्ठिराने प्रथम अर्धे राज्य मागितले होते, पण मागाहून संजयाबरोबर निरोप पाठवून फक्त पांच गावांवर समाधान मानण्याची तयारी दाखवली. हा त्याचा मोठेपणा खरा पण आपण अ द्न्यातवास पुरा केलेला नसल्यामुळे आपला दावा कच्चा आहे याची त्याला जाणीव होती हेहि कारण असू शकते!
४. युद्ध सुरू होण्यापूर्वी अनेकानी दुर्योधनाला युद्ध टाळण्याचा उपदेश केला. मात्र पांडवानी द्यूताचा पण पूर्ण केलेला असल्यामुळे तुला त्यांचे राज्य परत दिलेच पाहिजे असे कोणीहि म्हटले नाही! फक्त सर्वनाशाची भीति घातली. खुद्द कृष्णानेहि शिष्टाईच्या वेळी ’आम्ही द्यूताची अट पूर्ण केली आहे असा पांडवांचा दावा आहे” एवढेच म्हटले.
५. अर्जुन कौरवसैन्यासमोर प्रगट झाला दुर्योधनाने ’अद्न्यातवास पुरा झालेला नाही’ असे म्हटले. तेव्हा भीष्माने ’पांडवांनी सौरमानाने तेरा वर्षे पुरी केलेली दिसतात’ एवढेच म्हटले पण हे बरोबर की चूक यावर मत दिलेले नाही!
६ बलराम दुर्योधनाचा गुरु. पांडवानी जर अद्न्यातवास निर्विवादपणे पुरा केलेला असता तर त्याने दुर्योधनाला राज्य देण्यास सांगितले असते. त्याने तसे न करता उलट कृष्णालाच बजावले की पांडवाच्या दुर्दशेला युधिष्ठिरच जबाबदार आहे व आपणाला दोन्ही पक्ष सारखेच असल्यमुळे आपण युद्धापासून दूर रहाणेच योग्य!
७. नकुल-सहदेवांचा मामा, शल्य, पांडवांच्या सैन्यात सामील होण्यासाठी निघालेला असतां वाटेत दुर्योधनाची भेट झाल्यावर सरळ कौरवसैन्यात गेला! हे कसे झाले? आपला पक्ष अन्यायाचा नाही अशी त्याची खात्री पटवण्यात दुर्योधनाला यश आले. दुर्योधनाने काहीहि म्हटले तरी कौरवसैन्यात भीष्म असताना इतर कोणी सेनापति होण्याचा संभव नव्हताच.
७. राजा पांडु याचा मित्र असलेला राजा भगदत्त पांडवांऎवजी कौरवानाच मिळाला. कारण दिलेले नाही.
८. याउलट ज्या जरासंधाला भीमाने मारले वा शिशुपालाला कृष्णाने मारले त्यांचे पुत्र पांडवपक्षात होते!
यामुळे असे वाटते की पांडवांचा राज्यावर हक्क ज्या मूलाधारावर आधारलेला त्या पणाची अट पूर्ण केल्याच्या त्यांच्या दाव्यामध्येच काही कमतरता होती काय? कीं ज्यामुळे प्रत्येकाने आपल्याला योग्य वाटलेली बाजू घेतली?
या शंकेमुळे द्यूत, अनुद्यूत व त्यातून उद्भवलेला वनवास व अद्न्यातवास या घटनांची अभिनिवेश दूर ठेवून तपासणी करणे आवश्यक ठरते. पुढील भागात ती करूं.