Tuesday 9 August 2011

महाभारताबाबत काही गैरसमजुती भाग ६

’सौभद्र’ हे मराठीतील एक गाजलेले व सदा लोकप्रिय नाटक आहे. अजूनहि कधीतरी त्याचे प्रयोग होतात. नाटकाची अन त्यातील पदांची मोहिनी अजून कायम आहे. मात्र या नाटकामुळे एक मोठा गैरसमज निर्माण झाला आहे ज्याला महाभारतात काही आधार नाही!
नाटकातील कथानकाप्रमाणे अर्जुन-सुभद्रा यांचे बालवयापासून परस्पर प्रेम होते, अर्जुन तीर्थयात्रेला गेलेला असताना बलराम सुभद्रा दुर्योधनाला द्यायचे ठरवतो, सुभद्रा हवालदिल होते, अर्जुनाचा ठावठिकाणा नसल्यामुळे कृष्णालाहि काय करावे सुचत नाही. पण मग अर्जुन तीर्थयात्रेनिमित्तने भटकत द्वारकेच्या जवळ आल्याचे कृष्णाला कळते व मग अनेक गमतीचे बेत रचून अखेर कृष्ण सुभद्र-अर्जुनाचा विवाह घडवून आणतो! नाटकाची रचना सुरेखच आहे यात शंकाच नाही! मात्र महाभारतात असे काही नाही!
महाभारताप्रमाणे अर्जुन सुभद्रा यांचे बालवयापासून काही ’रहस्य’ नव्हते. कधी गाठभेट झाल्याचेहि उल्लेख नाहीत. पांडव कृष्ण-बलराम यांची प्रथम प्रत्यक्ष भेट द्रौपदीच्य़ा स्वयंवर-मंडपात झालेली वर्णिली आहे. पांच पांडवांचे द्रौपदीशी विवाह झाले, मग त्यानी खांडवप्रस्थ वसवून तेथे राज्य करण्यास सुरवात केली. अर्जुनाने युधिष्ठिर-द्रौपदी याचा एकांतभंग केला म्हणून पांडवांनी स्वत:च केलेल्या नियमाप्रमाणे त्याला तीर्थयात्रेला जावे लागले. (माझ्या मते, ‘स्वयंवराचा पण मी जिंकला, मात्र द्रौपदी पाचांची पत्नी झाली आतां युधिष्ठिर, भीम यांच्या नंतर ज्येष्ठता क्रमाने ती माझ्या वाट्याला येणार कधी?’ असा वैताग येऊन त्याने रस्ता सुधारला व आपली सोय पाहिली!) त्याने ब्रह्मचर्य पाळावे अशीहि अट खरे तर होती पण त्याने ते मुळीच पाळले नाही! उलुपी, चित्रांगदा अशी एकेक ‘प्रकरणे’ करीत तो काही काळाने द्वारकेला आला. यादव समुदायात सुखाने काही काळ काढत असताना कृष्णासमवेत असताना एकदा सुभद्रा त्याचे नजरेस पडली. त्याने कृष्णाला विचारले ‘कोण रे ही?’ कृष्णाने म्हटले ‘अरे ही माझी सावत्र बहिण सुभद्रा’
अर्जुनाचे मन सुभद्रेवर गेलेले ओळखून कृष्णाने विचारले की ‘ही तुला आवडली आहे काय?’ अर्जुनाने कबूल केल्यावर कृष्णाने सल्ला दिला की ‘हिचा आतां विवाह करावयाचा आहे पण स्वयंवर योजले तर तेव्हा ही कोणाला वरील याचा काय भरवसा? तू हिला संधी पाहून पळवून ने. क्षत्रियाना मुलगी पळवून नेऊन केलेला ‘राक्षस विवाह’ शास्त्रसंमत आहे.’
मग योग्य संधी पाहून अर्जुनाने सुभद्रेला रथात घालून पळवून नेले! सर्व यादव वीर रागाने खवळून जाऊन युद्धाला तयार होऊ लागले पण कृष्ण ‘थंड’ बसलेला पाहून बलरामाने म्हटले कीं ‘अरे त्या कृष्णाचे काय मत ते तरी विचारा.’ तेव्हा कृष्णाने सल्ला दिला ‘युद्धाला उभे राहण्यापूर्वी जरा विचार करा. गाठ अर्जुनाशी आहे, कोणा सोम्यागोम्याशी नव्हे. निभाव लागला नाहीं म्हणजे अब्रू जाईल. अर्जुनापेक्षा चांगला पती सुभद्रेला मिळेल काय? तेव्हा झाले आहे ते चांगलेच आहे. दोघाना बोलावून आणून सन्मानाने त्यांचा विवाह करून द्यावा आणि यादव-पांडवांचे सख्य साधावे.’ हे सर्वांना पटले व तसेच झाले. या सर्व कथेत दुर्योधनाचे नाव कुठेच आलेले नाहीं.
तेव्हा सौभद्र नाटक छानच आहे. पण महाभारताबद्दल तो एक मोठाच गैरसमज!

Monday 18 July 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग ५

नरो वा कुंजरो वा।
हे आपण बाळपणापासून ऐकत आलो. असे खोटे वाक्य बोलल्यामुळे चार बोटे अधांतरी चालणारा युधिष्ठिराचा रथ पंक्चर होऊन जमिनीवर टेकला अशीहि हरदासी कथा आपण ऐकत आलो. पण महाभारतात असे वाक्यच नाही!
हा उलगडा मलाहि हल्लीच वाचलेल्या श्री. जातेगांवकर यांच्या एका पुस्तकावरून झाला.
भीष्मपतनानंतर द्रोण सेनापति झाला व चौथ्या दिवशी जयद्रथवध झाल्यावर पांचव्या दिवशी द्रोण फार त्वेषाने युद्ध करू लागला व त्या दिवशी पांडव व पांचाल यांचा विध्वंस त्याने आरंभला. तो कोणालाच, अर्जुनाला देखील आवरेना. कृष्णाने अखेर पांडवांना सावध केले कीं असेच युद्ध चालले तर दिवस अखेर तुम्ही पूर्ण नष्ट व्हाल. तेव्हां काहीहि करून याला युद्धत्याग करण्यास उद्युक्त केले पाहिजे. कृष्ण व भीमाने एक कुटिल बेत ठरवला. भीमाने प्रथम एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि द्रोणापाशी जाऊन ’अश्वत्थामा हत:’ असे पुन्हापुन्हा त्याला म्हणाला! आपला पुत्र मारला गेला यावर द्रोणाचा विश्वासच बसेना पण पुन्हापुन्हा ऐकल्यावर खात्री करून घेण्यासाठी तो युधिष्ठिरापाशी आला. असे होईल याची कल्पना असल्यामुळे कृष्ण व भीम यानी युधिष्ठिराला विनवले होते कीं ‘तूं होय म्हण!’ भीमाने त्याला सांगितले कीं मी अश्वत्थामा हत्ती खरोखरीच मारला आहे. असत्य बोलण्यास युधिष्ठिर सहजीं तयार होणेच शक्य नाही याची कृष्ण व भीमाला भीति होती. पण हत्ती कां होईना, अश्वत्थामा मारला गेला आहे या आधारावर युधिष्ठिराने मनाशी तडजोड केली आणि द्रोणाने जेव्हां विचारले कीं ’किं अश्वत्थामा हत:? ’, तेव्हा जबाब दिला ’हत:, कुंजर:’ ! जबाब देताना कुंजर: हा शब्द हळू व तोंड चुकवून उच्चारला जेणेकरून तो द्रोणाला ऐकू जाऊ नये!
द्रोणाला युधिष्ठिराचा ’हत:’ एवढाच शब्द ऐकू गेला व त्याचे मनोधैर्य खचले. काही काळाने त्याने धनुष्य खाली ठेवले आणि मग त्याचा वध झाला. कृष्ण-भीमाचा हेतू साध्य झाला पण खोटे बोलल्याचा डाग युधिष्ठिराला लागला नाहीं! कारण ‘हत:, कुंजर:’ हे सत्यच होते! त्याने ‘नरो वा कुंजरो वा’ म्हटले असते तर ते मात्र असत्य भाषण ठरले असते कारण युधिष्ठिराला नर अश्वत्थामा मारला गेलेला नाहीं हे पक्के ठाऊक होते! कृष्ण आणि भीम खरे हुशार म्हटले पाहिजेत. आपल्याला पाहिजे ते त्यांनी युधिष्ठिराकडून बरोबर वदवून घेतले! आपण मात्र अजूनही ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणत असतो! पण तो गैरसमजच!

Wednesday 13 July 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग ४

धृतराष्ट्राला युद्धदर्शन
कौरव-पांडव युद्ध सुरू होण्यापूर्वी धृतराष्ट्राला, आपल्याला युद्धवार्ता कशा कळतील असे वाटत होते. संजयाला दिव्य दृष्टि देऊन कृष्णाने त्याला धृतराष्ट्राशेजारीच बसून सर्व युद्ध पाहता येईल असे केले व मग संजयाने ’आंखों देखा हाल’ धृतराष्ट्राला रोजच्या रोज सांगितला अशी समजूत असते. कृष्णाने कौरवदरबारात विश्वरूपदर्शन घडवले तेव्हां धृतराष्ट्राला व गांधारीला ते दिसावे म्हणून दिव्य दृष्टि दिली होती (खरेखोटे देव जाणे) त्यामुळे अशी समजूत होते.
प्रत्यक्षात दिव्यदृष्टि व्यासानी दिली होती आणि धृतराष्ट्राला नव्हे तर संजयाला दिली होती असे महाभारतात म्हटले आहे. मात्र १८ दिवसांच्या युद्धवर्णनांत काही वेळा संजय स्वत: युद्धभूमीवर होता असा स्पष्ट उल्लेख आहे. युद्धवर्णनहि १८ दिवसांचे अलगअलग नसून चार सरळ भागात आहे. पहिला भाग भीष्मपतनापर्यंतच्या दहा दिवसांचा, मग दुसरा भाग द्रोणवधापर्यंतच्या पांच दिवसांचा, तिसरा भाग कर्णवधापर्यंतच्या दोन दिवसांचा व अखेरचा भाग शेवटच्या दिवशी शल्यवध व दुर्योधन-भीम गदायुद्ध झाले तोपर्यंतचा असे चार भागात युद्धवर्णन संजयाने धृत्रराष्ट्राला ऐकवलेले आहे.
संजयाचे वर्णन तो स्वत: सर्व घटना पाहत असल्याप्रमाणे आहे. दिव्यदृष्टि वगैरे अद्भुत कल्पना सोडून दिल्या तर असे मानावे लागते कीं हल्ली युद्धात जसे वार्ताहराना वा टी. व्ही. ला वा रेड-क्रॉसला संरक्षण असते तसे संजयाला असावे व त्यामुळे त्याला युद्धभूमीवर सर्वत्र फिरतां येत होते व घटना पाहतां येत होत्या. त्यामुळे त्याचे वर्णन प्रत्यक्षदर्शी झाले आहे. चार महत्वाच्या टप्प्यांवर युद्धभूमि सोडून धृतराष्ट्रापाशी परतून त्याने झालेल्या घटना वर्णिल्या आहेत. तेव्हा दिव्यदृष्टि ही एक गैरसमजूतच!

Wednesday 6 July 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग 3

भारतीय युद्धाचे वेळीं अभिमन्यु काय वयाचा होता?
हा प्रश्न विचारला असतां महाभारताशी कमीजास्त परिचय असलेल्या बहुतेकांचे उत्तर १७-१८ वर्षांचा नवतरुण होता असें येईल. पण हें बरोबर आहे का?
थोडासा विचार केला तर लक्षात येईल कीं हें शक्य नाहीं. पहा बरें! अभिमन्यूच्या जन्मानंतरच द्रौपदीच्या पांच पुत्रांचा जन्म झाला असें महाभारतच म्हणते. अर्थातच द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र (सहदेवाचा) अभिमन्यूपेक्षा ७-८ वर्षांनी तरी नक्कीच लहान होता. राजसूय यज्ञाचे वेळी द्रौपदी अगदीच लेकुरवाळी होती असें महाभारत म्हणत नाही, म्हणजे हा पुत्र २-३ वर्षांचा तरी झाला होता असे मानणे भाग आहे म्हणजे अभिमन्यु निदान १० वर्षांचा झालेला होता! राजसूय यज्ञानंतर काही महिन्यांचा काळ दुर्योधनाचे व शकुनीचे कुटिल बेत ठरून व धृतराष्ट्राची त्याला मान्यता मिळण्यात गेला. मग द्यूत झाले आणि त्यानंतर १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात गेले. अर्जुन प्रगट झाला तेव्हा ग्रीष्म ऋतु चालू होता असे भीष्माने स्पष्ट म्हटलेले आहे. त्यानंतर कार्तिक अमावास्येपर्यंतचा काळ - सहा महिने - कृष्णशिष्टाईपर्यंत व युद्धाला सुरवात होईपर्यंत गेला. तेव्हा युद्धाचे वेळी अभिमन्यु कमीतकमी २४ वर्षांचा नक्कीच झाला होता. द्रौपदीचे सर्व पुत्र युद्धात लढले होते व शेवटच्या दिवशी अश्वत्थाम्याकडून मारले गेले. त्या सर्वाना भीष्माने रथी ठरवले होते. द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र युद्धात सक्रीय भाग घेत होता तेव्हां तो १७-१८ वर्षांचा तरी असला पाहिजे हेहि अभिमन्यूच्या वयाशी व दोघांच्या वयातील फरकाशी जुळते. अज्ञातवासात विराटाची कन्या अर्जुनापाशी नृत्य शिकत होती व ती लहान होती असा उल्लेख असल्यामुळे (तिने आपला भाऊ उत्तर याला कौरवांची उची वस्त्रे मला बाहुल्या करण्यासाठी घेऊन ये असे म्हटले होते व अर्जुनाने कौरववीरांचा पराभव केल्यावर उत्तराकडून तसे करून घेतले)आणि तिचा अभिमन्युशी अज्ञातवास संपल्यावर लगेचच विवाह झाला तेव्हा तोही नवतरुण - १८ वर्षांचा - होता असा गैरसमज आपण करून घेतो! पण तो गैरसमजच! प्रत्यक्षात द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र १७-१८ वर्षांचा व अभिमन्यु २४-२५ वर्षांचा होता हे खरे!

Sunday 3 July 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग २

‘दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्’
कर्णाच्या तोंडचे हे वाक्य फार प्रसिद्ध आहे. उत्तम कुलात जन्म न लाभलेल्या पण असाधारण कर्तबगारी अंगी असलेल्या अनेक व्यक्तीना या वाक्याने स्फूर्ती दिली असेल. ही उक्ती महाभारतात असणार अशी आपली ठाम समजूत असते. मात्र महाभारतात शोधू गेले असता हे वाक्य सापडत नाहीं!
हे महाभारतातील वचन नाहीच मग सापडणार कसे? ‘वेणीसंहार’ नावाच्या संस्कृत नाटकात कर्ण आणि अश्वत्थामा यांच्या कलहाचा एक जोरदार प्रवेश आहे. त्यात अश्व्त्थाम्याने कर्णाला सूतपुत्र म्हणून हिणवल्यावर कर्णाने त्याला हे प्रत्युत्तर दिले आहे. पूर्ण श्लोक असा आहे –
सूतोSवा सूतपुत्रोSवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्तम् कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ||

Thursday 30 June 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग १

काही शब्दप्रयोग आपल्या कानावर बालपणापासून पडत आलेले आहेत आणि त्यामुळे ते खरेच आहेत असे आपण गृहीत धरतो. पण ते गैरसमजुतीवर आधारलेले असतात.
१. ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ –
जयद्रथ वधाचे दिवशी कृष्णाने काहीतरी उपायाने काही काल सूर्य दिसणार नाहीं असें केले. मग जयद्रथ ‘आपण आतां वाचलो’ असें समजून गैरसावध झाला. कौरव वीरही गैरसावध झाले. जयद्रथ अर्जुनासमोर आल्यावर कृष्णाने सूर्यासमोरचे आच्छादन अचानक काढून घेतले व अर्जुनाला म्हटले ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ मग लगेच अर्जुनाने जयद्रथाला बाण सोडून मारले. अशी कथा बालपणापासून हरदास पुराणिक आपल्याला सांगत आले. आणि ती आपण खरी मानत आलो!
महाभारतात असें काही नाहीं. प्रत्यक्षात काय घडले याचे विस्तृत विवेचन मी पूर्वी केलेच आहे. अर्जुनाने अखेरचा बाण मारून जयद्रथाचा वध केला तोपर्यंत तो स्वत:च्या रथावर बसून जमेल तसा अर्जुनाचा प्रतिकार करत होता कृष्णाने अर्जुनाला सावध केले कीं ‘सूर्य अस्ताला जाण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा वेळ फुकट घालवू नकोस.’ मग अर्जुनाने तो अखेरचा बाण सोडला व जयद्रथाचा वध केला. त्यानंतरही काही काळ युद्ध चालू राहिले व मग सूर्यास्त झाला. ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ असें शब्द महाभारतात कृष्णाच्या तोंडी मुळीच आलेले नाहीत. आपले गैरसमज मात्र पक्के असतात त्यामुळे यां शब्दांना साहित्यात व व्यवहारातही अनेकदां स्थान मिळते.

Thursday 19 May 2011

अभिमन्युवध - भाग ८

दिवस मावळला. सैन्ये शिबिरात परतलीं. त्यानंतर संशप्तकांकडून कॄष्ण व अर्जुन परत आले असे महाभारत म्हणते. पांडव शिबिरात सामसूम व शोक पाहून काय झाले ते अर्जुनाने विचारले व मग नाइलाजाने युधिष्ठिराने अभिमन्यु मारला गेल्याचे अर्जुनाला सांगितले. त्याने अर्जुनाला सांगितलेली हकिगत व आधीच्या लेखात दिलेली हकीगत यात किरकोळ विसंगति दिसते. युद्धाच्या सुरवातीला पांडववीरानी संयुक्तपणे द्रोणावर हल्ला केल्याचे व तो द्रोणाने परतवून लावल्याचे युधिष्ठिर सांगत नाही. तो म्हणाला, ’मला पकडण्याचा द्रोणाने शर्थीचा प्रयत्न केला आणि त्याचाच प्रतिकार आम्हाला जड पडत होता मग सैन्याचा मुख्य चक्रव्यूह कोण तोडणार हा प्रष्न होता. नाइलाजाने ते काम अभिमन्यूवर सोपवावे लागले कारण त्यालाच ते माहीत होते. त्याने व्यूह तोडल्यावर त्याच वाटेने त्याच्या पाठोपाठ जाऊन त्याचे रक्षण करण्याचे आमचे सर्व प्रयत्न जयद्रथामुळे विफल झाले आणि अभिमन्यु एकटाच व्यूहात सापडला. मग द्रोण, कृप, अश्व्त्थामा, कर्ण, बृहत्बल व कृतवर्मा यांनी त्याला घेरले आणि अखेर दु:शासनपुत्राकडून तो मारला गेला.’
अर्जुन संशप्तकांकडे अडकलेला असो वा माझ्या शंकेप्रमाणे शिबिरातच असो, पण एक दिवस तो नसताना त्याचा पुत्र मारला गेला. अर्जुनाने, जणू, जयद्रथाला या अनर्थाला जबाबदार धरून, ’उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर अग्निकाष्टे भक्षण करीन’ अशी घोर प्रतिज्ञा अचानक केली. प्रत्यक्षात अभिमन्यूला घेरणार्‍या सहाही वीरांना सोडून (त्यातील बृहत्बलाला अभिमन्यूनेच मारले होते.) जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने कां केली हे एक जरासे कूट आहे. आपले हरदास-पुराणिक म्हणत कीं अर्जुन आणि कृष्ण रणात अभिमन्युचा शोध घेत फिरत होते व मरणासन्न अभिमन्यूने त्याना सर्व हकीगत स्वत:च सांगितली. रणात पडलेल्या अभिमन्यूला जयद्रथाने लाथ मारली हे अभिमन्यूकडून ऐकून चिडून अर्जुनाने त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. महाभारतात असें काही मुळीच नाही. थोडा विचार केल्यावर अर्जुनाच्या प्रतिज्ञेचा मला असा खुलासा सुचतो कीं कौरववीरांनी अनेकांनी मिळून एकट्या पडलेल्या अभिमन्युचा वध केला तर आतां त्या सर्वांना अर्जुनाचे हे एक निर्वाणीचे आव्हान होते कीं ‘मी जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा केली आहे, ती माझ्या एकट्याच्या बळावरच विसंबून. अभिमन्यु एकटाच होता त्याला तुम्ही सर्वानी मिळून मारलेत, आता तुमच्यात बळ असेल तर सर्वांनी मिळून जयद्रथाला एकट्या माझ्यापासून वांचवा!’ पुत्राच्या मृत्यूमुळे त्याला अनिवार शोक झाला असणारच तेव्हा आता एक तर कौरववीरांचा नक्षा उतरवणे किंवा स्वत: मरून जाणेच श्रेयस्कर असे त्याला वाटणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. दुसर्‍या दिवशी काय घडले याचा विस्तृत परामर्ष मी पूर्वीच जयद्रथवध प्रकरणात घेतला आहे. तो वाचकानी अवश्य पुन्हा नजरेखालून घालावा. अनेकांनी मिळून केलेला अभिमन्यूचा वध कौरवपक्षाला फार महाग पडला व दिवस अखेर पांडवपक्षाची अंतिम विजयाकडे वाटचाल सुरू झाली एवढेच म्हणून हा विषय पुरा करतों.
Locations of visitors to this page
Marathi