आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, November 20, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग १३

कर्णाबद्दलचे हे लेखन फार विस्तारले. या लेखनात कर्ण व अर्जुन यांची तुलना वेळोवेळी करणे आवश्यकच होते. अर्जुन हा महाभारताचा एक नायक तर कर्ण हा प्रतिनायक, भीम नायक तर दुर्योधन प्रतिनायक असे म्हणता येईल. मी खलनायक असा शब्दप्रयोग मुद्दामच केलेला नाही. कर्ण व दुर्योधन या दोघांमध्येहि अनेक उत्तम गुणहि महाभारतकारांनी मुक्तपणे वर्णिले आहेत. कर्णाचे शौर्य व दातृत्वगुण निर्विवाद आहेत. दुर्योधनाबद्दलहि तसेच म्हणावे लागते. मात्र अखेर, महाभारतकारांना कर्ण हे गुणांपेक्षां दोष जास्त असलेले व्यक्तिमत्त्व रंगवावयाचे आहे याबद्दल शंका नाहीं. कर्णातील उणेपणा हा त्याच्या (माझ्या तर्काप्रमाणे ) सूताचा पुत्र म्हणून झालेल्या जन्मामुळे वा सूतपुत्र म्हणून आयुष्य व्यतीत करावे लागल्यामुळे आला असें खरे तर म्हणतां येणार नाहीं. सूत सर्व प्रकारच्या मानसन्मानापासून वंचित होते असे दिसत नाही. सूतांचे स्वत:चे स्वतंत्र राज्य होते. त्या राज्यात गेलेले असताना अधिरथ व राधा यांना कर्ण मिळाला असे म्हटले आहे. विराटाची पत्नी सुदेष्णा ही सूतकुळातील होती व तिचा भाऊ कीचक हा विराटाच्या राज्यात सर्वेसर्वा होता. तेव्हा सूतांचे स्थान क्षत्रियाच्या किंचित खालचे मानले जात असावे. कर्णाचे सुरवातीचे (धनुर्विद्येचे ) शिक्षण कोठे झाले याचा काही उल्लेख नाही पण परशुरामाकडे जाण्यापूर्वी बरीच प्रगति झालीच असणार.
कर्णाला आपण कुंतीपुत्र आहोत हे कळण्याचा काही मार्ग नव्हता. (कृष्ण वा कुंती यांनी सांगेपर्यंत). त्याने कौरवदरबारात आपली धनुर्विद्या प्रगट केली तेव्हा लगेचच दुर्योधनाने त्याला आयुष्यभरासाठी जवळ केले. सर्व मानसन्मान व वैभव त्याला प्राप्त झाले होते. त्यापुढील त्याचे आयुष्य सुखाने जाण्यास काही हरकत नव्हती. पण दुर्योधनाची मैत्री त्याला तशी महागच पडली म्हणावे लागते कारण नंतर आयुष्यभर दुर्योधनाच्या सर्व कुटिल बेतांमध्ये त्याला सामील व्हावे लागले. त्याने ते स्वखुषीनेच केले असे दिसते. घमेंडखोर व उद्धट स्वभावामुळे त्याला बढाया मारण्याची खोड जडली. परशुरामाकडून मिळवलेल्या विद्येवर तो संतुष्ट राहिला. उलट अर्जुनाने द्रोणापासून मिळवलेल्या विद्येवर संतुष्ट न राहातां अधिक कौशल्य मिळवण्यासाठी धडपड केली. अखेरच्या युद्धापूर्वी तो असे साधार म्हणू शकला की आज माझ्याकडे जी अस्त्रे आहेत त्यांचे ज्ञान द्रोणाला वा भीष्मालाहि नाही! सर्व दृष्टीने विचार करतां असे म्हणावे लागते कीं कर्णाच्या दोषांनी अखेर त्याच्यातल्या गुणांवर मात केली. हा विषय मी येथेच संपवीत आहे. या लेखनाला उदंड वाचक लाभले व प्रतिसाद मिळाला. मतभेद हे असणारच. तुमच्या सर्वांच्या मतांचा मी आदर करतो. धन्यवाद.

Thursday, November 13, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग १२

जयद्रथवधाच्या दिवशी झालेल्या युद्धप्रसंगांचे खुलासेवार वर्णन माझ्या त्या विषयावरील लेखांत पूर्वीच आलेले आहे. त्या दिवशी सहा महारथींना अर्जुनाने वारंवार हरवले, प्रचंड सैन्यसंहार केला व अखेर जयद्रथालाहि मारले. याउलट, अकराव्या दिवसापासूनच्या युद्धांत कर्णाला अभिमन्यु, सात्यकी, भीम, धृष्टद्युम्न, घटोत्कच या सर्वांनी वारंवार हरवले. भीम हा महाधनुर्धर असे त्याचे वर्णन नाही. तो गदायुद्ध व शरीरबळाच्या सर्व प्रकारच्या युद्धात प्रवीण! मात्र जयद्रथवधाच्या दिवशीं रथयुद्धात त्याने सतरा वेळा कर्णाचे धनुष्य तोडून कर्णाला सळो कीं पळो करून सोडले. भीमाने मला फार मार दिला आहे व केवळ आज युद्धाला उभे राहिलेच पाहिजे म्हणून मी उभा आहे असे त्याने स्वत:च दुर्योधनापाशी म्हटले! भीमार्जुनांनी क्वचितच जीव वांचवण्यासाठी युद्धातून पळ काढला असेल. कर्णाने तसे वारंवार केले. अनावर झालेल्या घटोत्कचाला मारण्यासाठी कर्णाला अखेर अर्जुनावर वापरण्यासाठी खास राखून ठेवलेली शक्ति वापरावी लागली. इतर बळाने वा अस्त्रविद्येने भागले नाही. द्रोणाला धृष्टद्युम्नापासून कर्ण वांचवूं शकला नाही. दुर्योधनाचे भाऊ रोज भीमाकडून मारले जात होते. कर्ण त्यांना, दु:शासनालाहि, वांचवू शकला नाही.
कर्ण सेनापति होईपर्यंत खरे तर युद्ध दुर्योधनाच्या हाताबाहेर गेलेले होते. दोन दिवसपर्यंत कर्णाने कडवा प्रतिकार केला. अर्जुनाचे व त्याचे अनेक वेळा संग्राम झाले. अर्जुनासमोर हे मोठे आव्हान होते. पण तो त्या कसोटीला पुरेपूर उतरला. अर्जुन उपस्थित नसताना झालेल्या अभिमन्युवधामध्ये कर्णाचा सहभाग होता म्हणून अर्जुनाने चिडून कर्णाला आव्हान दिले होते कीं अभिमन्यूला वांचवायला मी नव्हतो. पण तुझ्या पुत्राला मी तुझ्यासमक्षच मारीन. कर्णपुत्र वृषसेन हाही अभिमन्यूप्रमाणेच महारथी होता. कर्णाला डांबून ठेवून, तो हजर असतानाच, अर्जुनाने वृषसेनाचा वध केला व आपला शब्द खरा केला. कर्ण आपल्या पुत्रालाहि वांचवूं शकला नाही. सतरा दिवसांच्या अखंड परिश्रमांनंतर कर्णाचे रथचक्र रुतून बसले असताना, त्याला पुन्हापुन्हा निसटून जाण्याची संधि न देतां, अर्जुनाने अखेर कर्णाचा वध केला व वैराची अखेर केली. यांत अर्जुनाच्या पराक्रमाला कोठेतरी उणेपणा आला असे काहीना निव्वळ कर्णप्रेमामुळे वाटते पण माझ्या मते त्यांत काडीचाहि अर्थ नाही. युद्धामध्ये आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही तर संधि पुन्हापुन्हा येत नाही. या दोन दिवसांत कर्णालाहि अर्जुनवधाची संधि आली होती पण ती त्याला साधतां आली नाही. शल्याने त्याचे सारथ्य कौशल्याने केले पण युद्धाला उभे राहाण्यापूर्वी बढाईखोर व उद्धट स्वभावाच्या कर्णाने त्याचेबरोबर वितंडवाद घालून त्याचे संपूर्ण सहकार्य मिळण्याची संधि घालवली. शल्याने रुतलेले चाक काढण्याचे माझे काम नाही असे म्हणून सहकार्य नाकारले पण त्याला प्रसंग न ओळखणारा कर्णच स्वत: जबाबदार नाही काय? कर्णाने पराक्रमाची शर्थ करूनहि अखेर तो उणाच पडला व अपयशी झाला.
अद्यापपर्यंतचे १२ भागांमध्ये मी केलेले सर्व कर्णचित्रण महाभारतावरच आधारित आहे. कर्णाचा जन्म सूर्यापासून नव्हे तर मग कोणापासून याबद्दलचा माझा सप्रमाण तर्क मी वाचकांसमोर ठेवला आहे. सर्व चित्रणाचे समालोचन अखेरच्या भागात वाचा.

Saturday, November 8, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ११

भारतीय युद्ध अठरा दिवस चालले. युद्धाचे अतिशय विस्तृत व खुलासेवार वर्णन महाभारतात आहे. युद्धाचे पहिले दहा दिवस कर्ण युद्धाबाहेरच होता. भीष्म सेनापति असेपर्यंत त्याच्या आधिपत्याखाली त्याला लढावयाचे नव्हते. आपल्या पराक्रमाचे श्रेय भीष्माला मिळेल असे क्षुद्रपणाचे कारण त्याने दिले होते. वास्तविक, हा दुर्योधनाच्या जीवन-मरणाचा लढा होता, त्यापासून कोणत्याही कारणामुळे वा निमित्तामुळे कर्णाने दूर रहाणे हे उचित म्हणतां येत नाही. त्यापेक्षा स्वाभिमानाला थोडी मुरड घालणे जास्त उचित झाले असते! भीष्माने युद्धापूर्वी दोन्ही पक्षांतील प्रमुख वीरांचे मूल्यमापन दुर्योधनाच्या विचारण्यावरून केले त्यावेळी त्याने कर्णाला अर्धरथी ठरवले याचा कर्णाला राग आला होता. भीष्माने कर्णाच्या मूल्यमापनांत एका गोष्टीवर अचूक बोट ठेवले होते. त्याने ’कर्ण हा युद्धात बेसावध रहाणारा आहे’ अशी टीका केली होती. तसेच गुरूला फसवून मिळवलेली विद्या त्याच्या कामी येणार नाही असे म्हटले होते. कर्णाच्या अनेकांकडून झालेल्या पराभवांचे हेच कारण असावे. मात्र तो सामान्य योद्धा खासच नव्हता. कर्ण युद्धापासून अलिप्त राहिला यात भीष्माचाच हेतु साध्य झाला. आत्मसन्मान राखण्यापुरते थोडेसे युद्ध होऊन दोन्ही पक्षांमध्ये सन्माननीय तडजोड होऊ शकली तर बहुधा ती भीष्माला हवी होती. आततायी स्वभावाचा व दीर्घद्वेषी कर्ण बाजूला राहिला तरच कदाचित हे शक्य झाले असते. यासाठीच युद्धाची सूत्रे भीष्माने स्वत:च्या हातात ठेवली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे कर्ण वागला!
भीष्मपतनानंतर पांच दिवस द्रोण सेनापति असताना व पुढील दोन दिवस स्वत: सेनापति होऊन कर्ण युद्धात सहभागी झाला. या सात दिवसांच्या युद्धवर्णनात कर्णाचा सहभाग असलेले अनेकानेक युद्धप्रसंग आहेत. अनेकांवर त्याने विजय मिळवला पण अनेकांनी त्याला हरवले व पळवून लाविले असेहि प्रसंग आहेत. अर्जुन व कर्णाची तुलना अटळ आहे. अर्जुन सर्व अठरा दिवस लढला व युद्धाचा प्रमुख भार भीमाच्या बरोबरीने, वा जास्तच, त्याने वाहिला. कर्णाची परिस्थिति तशी नव्हती. अर्जुनाचा, भीष्म सोडला तर इतर कोणीहि, द्रोणानेहि निर्णायक पराभव केला नाही. भीष्म व द्रोण या दोघांशीहि तो केवळ नाइलाजाने युद्धाला तयार झाला होता. अखेर भीष्म व द्रोण दोघांशीहि त्याची सरशी झालीच. त्रिगर्तांचा त्याने दररोज पराभव केला व सर्वांना मारले. पुढील भागात ही तुलना पुढे चालू ठेवू.

Sunday, November 2, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग १०

अज्ञातवास संपून पांडवांनी राज्याची मागणी केली. दुर्योधनाने ती नाकारली. अनेक वाटाघाटींनंतर अखेर कृष्णशिष्टाई झाली. भीष्म, द्रोण, विदुर, कृप व इतर अनेकांनी धृतराष्ट्र व दुर्योधन याना अनेकवार समजावले. त्या प्रत्येक प्रसंगी कर्णाने त्यांची कुचेष्टा केली व दुर्योधनाला युद्धाच्या भरीस घातले. त्यानेहि आधींच्या प्रसंगांवरून धडा न घेतां, माझा भरवसा मी स्वत:, दु:शासन व कर्ण यांच्यावरच आहे असे म्हटले. कृष्णशिष्टाईच्या वेळी कर्ण दरबारात उपस्थित होता पण चर्चेत त्याने भाग घेतलेला नाही. दुर्योधनाने कृष्णाचे बोलणे धुडकावून लावले व खुद्द कृष्णालाच पकडण्याचा विचार केला. या बेतांत दु:शासन, शकुनि व कर्ण सामील होते. कृष्ण पूर्ण तयारीने आला असल्यामुळे तो बेत सोडून द्यावा लागला. प्रयत्न झाला असता तर कर्ण तोकडाच पडला असता. शिष्टाई असफल झाली. कृष्णाने कुंतीची भेट घेतली व परतण्यापूर्वी तो कर्णाला एकांतात भेटला. कृष्णाने कर्णाला सांगितले कीं तूं कुंतीपुत्र आहेस व पांडवांचा मोठा भाऊ आहेस तेव्हा तूं पांडवांचा पक्ष घे. त्यापासून तूं, पांडव, यादव या सर्वांचाच फायदा होईल. तूं पांडवांचा राजा होशील, युधिष्ठिर युवराज होईल, इतर पांडव व यादवही तुझे अनुचर होतील, सर्व पांडवांची पत्नी या नात्याने द्रौपदी तुझीहि पत्नी होईल वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या. कर्ण हा कुंतीपुत्र आहे हें कृष्णाला कसें माहीत? कुंतीनेच आदल्या दिवशी हे गुपित सांगून, आवश्यक तर ते कर्णालाहि सांगून त्याला वळवण्याचा प्रयत्न कर असे कृष्णाला विनवले असावे. महाभारत अर्थातच तसे स्पष्टपणे म्हणत नाही. पण शक्यता तीच आहे. कुंतीच्या संमतीशिवाय, कृष्णाने स्वत;हून कर्णाला तूं कुंतीपुत्र आहेस असे सांगणे अनुचितच व म्हणून असंभव वाटते. मात्र कर्ण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडला नाही. सर्व आयुष्य सूत म्हणून वावरून व दुर्योधनाचा मित्र म्हणून त्याच्या आश्रयाने राहून सर्व मानसन्मान मिळवून अखेर त्याचा त्याग करण्याचे त्याने स्पष्टपणे नाकारले. कुंतीला अर्थातच त्याने दोष दिला. कर्ण वळत नाही असे पाहून मग कृष्णाने तुला हवा तसा मृत्यु तुला लवकरच रणांत मिळेल असे म्हणून, सात दिवसानी कार्तिक अमावास्येला युद्ध सुरू करूं असा त्याचेबरोबर दुर्योधनाला निरोप दिला व पांडवांकडे कृष्ण परत गेला.
युद्ध अटळ आहे हे कळल्यावर विदुर कुंतीला भेटला. कुंतीने त्यानंतर स्वत:च कर्णाची भेट घेऊन त्याचे मन वळवण्याचा अखेरचा प्रयत्न केला. हें तिला विदुराने सुचवले असावे असा माझा तर्क आहे. कारण कुंतीचे गुपित विदुराला माहीत होते! कुंतीचीहि विनवणी कर्णाने मानली नाही. सर्व जन्म राधेय म्हणून घालवल्यानंतर व अर्जुनाशी उभा दावा केल्यावर दुर्योधनाचा विश्वासघात करून अखेर मी पांडवांकडे गेलो तर अर्जुनाला मी घाबरलो असेच जग म्हणेल. मी तसे करणे धर्माला धरूनहि नाही असे त्याने कुंतीला समजावले. एकच गोष्ट कबूल केली कीं अर्जुनाकेरीज इतर पांडवांना मी मारणार नाही. मी किंवा अर्जुन कोणीहि मेला तरी तुझे पांच पुत्र जिवंत राहतील. कुंतीला एवढ्यावरच समाधान मानावे लागले.
कृष्ण किंवा कुंती यांनी यावेळीहि कर्णाचा खरा पिता कोण हे सांगितले नाहीच. सूर्यापासून जन्म हीच कथा चालू ठेवली! आपला पिता ब्राह्मण वा क्षत्रिय नाही हेंच कर्ण यावरून समजून चुकला असणार. युधिष्ठिर व इतर पांडव यांनी आपला वडील भाऊ म्हणून स्वीकार केला तरी वर्षानुवर्षे मनात बाळगलेली शल्ये कोणाच्याच मनातून जाणार नाहीत. जग मात्र आपल्याला स्वार्थी, भेकड व विश्वासघातकी म्हणेल व तरीहि क्षत्रिय म्हणणार नाहीच, हे जाणूनच त्याने कृष्ण व कुंतीच्या विनंतीचा अव्हेर केला.
या दोन्ही प्रसंगी कर्णाचे वर्तन धीरोदात्त झाले हे निश्चित. त्याच्या आयुष्यातील हे दोन्ही कसोटीचे क्षण होते व त्यातून तो तावून-सुलाखून उजळून निघाला हे नि:संकोचपणे मान्य केले पाहिजे.
यानंतर भारतीय युद्धातील कर्णाच्या कामगिरीचे निरीक्षण पुढील भागात करूं.

Friday, October 24, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ९

यानंतर यथावकाश पांडव अज्ञातवासात गेले. त्यांच्या कथेत यानंतर कर्णाचा उल्लेख कौरवांनी विराटाच्या गायी हरण करण्याच्या प्रसंगात येतो. पांडवांच्या शोधार्थ पाठवलेले सेवक हात हलवीत दरबारात परत आले. तेव्हा कर्णाने पुन्हा जास्त हुशार माणसे शोधार्थ पाठवण्याचा सल्ला दिला. पांडव हुडकले गेले नाहीत तर लवकरच त्यांच्याशी युद्धप्रसंग उद्भवेल तेव्हा सैन्य, संपत्ति या साधनांचा विचार कर असा दुर्योधनाला कृपाने सल्ला दिला. पण तो सर्व विषय बाजूलाच राहून, त्रिगर्त राजा सुशर्मा याने सुचवले कीं कीचक मेल्यामुळे विराट आता दुबळा झाला आहे तेव्हां त्याचे गोधन लुटावे. कर्णाने मत दिले कीं पांडव आता दुबळे झाले आहेत तेव्हा त्यांची काळजी करण्याची जरुरी नाही, म्हणून त्रिगर्ताची सूचना मान्य करावी. त्रिगर्त व कौरव यांनी दोन्हीकडून विराटावर हल्ला केला. दक्षिणेकडून त्रिगर्ताने केलेल्या हल्ल्याचा विराटाने चार पांडवांच्या सहाय्याने यशस्वी प्रतिकार केला. मात्र रात्रीपर्यंत युद्ध चालल्यामुळे राजधानीला परत येतां आले नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवशी उत्तरेकडून कौरवांनी केलेल्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याची पाळी विराटपुत्र उत्तरावर आली. बृहन्नला वेषांतील अर्जुनाने सारथ्य केले. प्रत्यक्ष युद्धक्षेत्रावर उत्तराचा निभाव लागणे शक्यच नसल्यामुळे त्याला सारथी बनवून, शमीवरील शस्त्रे घेऊन अर्जुन स्वत:च युद्धाला सज्ज झाला. हा अर्जुनच हे पाहून द्रोणाने त्याची स्तुति आरंभली. कर्णाने नेहेमीप्रमाणेच, अर्जुनाला आपली वा दुर्योधनाची सर येणार नाही अशी बढाई मारली! हा अर्जुन उघडकीस आला आहे तेव्हा माझे कामच झाले कारण तेरा वर्षे पुरी झालेली नाहीत असे दुर्योधनाने म्हटले. अर्जुन प्रगट झाल्यामुळे भीष्म, द्रोण विचारांत पडले. कर्णाने ’मी एकटाच अर्जुनाचा सामना करतों’ अशी फुशारकी मारली. कृप व अश्वत्थामा यांनी त्याला बजावले कीं ’तूं अर्जुनाप्रमाणे एकट्याने कधीहि पराक्रम गाजवलेला नाहीस. सर्वांनी मिळून एकजुटीने अर्जुनाशीं सामना केला नाही तर निभाव लागणार नाही.’ कर्णाला क्षमा करा असें त्यांना भीष्माने म्हटले. भीष्माने सौरमानाचे गणित मांडून आज सकाळीच अज्ञातवास पुरा झाला आहे असे म्हटले ते सपशेल नाकारून दुर्योधनाने युद्धाची तयारी केली. दुर्योधन एकटाच गोधन घेऊन ह्स्तिनापुराकडे वळला व सर्व कौरववीर अर्जुनाला अडवून युद्धाला उभे राहिले. अर्जुनाने प्रसंग ओळखून, प्रथम दुर्योधनावरच हल्ला करून व त्याला हरवून गोधन मुक्त केले. नंतर सर्व कौरववीरांशी धैर्याने व कौशल्याने युद्ध करून सर्वांस पराभूत केले. अर्जुनाने कर्णबंधु संग्रामजित याला कर्णाच्या उपस्थितीतच मारल्यावर कर्ण व अर्जुन यांचा सामना झाला. अत्यंत त्रस्त व भयभीत होऊन कर्णाने पळ काढला. सर्वांचा अर्जुनाने पुन्हापुन्हा पराभव केल्यावर, भीष्माने, ’गोधन तर गेलेच आहे, आतां आपण सर्वांनी जीव वांचवून परत फिरावे’ असा सल्ला दिला. कौरव परत जात आहेत हे पाहून अर्जुनानेहि युद्ध आवरते घेतले. या एकूण युद्धप्रसंगांत अर्जुनाच्या अस्त्रबळापुढे कोणाचेहि चालले नाही व कर्णाचा पूर्न तेजोभंग झाला. या प्रसंगानंतर कर्णाने कधीहि बढाया मारल्या कीं अश्वत्थामा, कृप व द्रोण त्याला या प्रसंगाची आठवण देत! कर्णाच्या बळाच्या मर्यादा याही प्रसंगी दुर्योधनाला स्पष्ट दिसून आल्या तरी त्याचा कर्णावर भरवसा कायम राहिला हे नवलच!
यापुढील कर्णचित्रण पुढील भागांत वाचा.

Monday, October 13, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ८

पांडव बारा वर्षांच्या वनवासासाठी गेले. या काळात कर्णाची कसोटी लागण्याचा प्रसंग उद्भवला. मात्र कसोटीच्या वेळी तो पूर्णपणे उणाच ठरला. वनात गोधनाच्या पाहणीच्या निमित्ताने जावयाचे व आपले वैभव दाखवून पांडवाना खिजवायचे हा बेत दुर्योधनाला शकुनि व कर्ण यानीच सुचवला. दुर्दैवाने द्वैतवनात दुर्योधनाची गाठ चित्रसेन गंधर्वाशी पडली व युद्धप्रसंग उभा राहिला. कर्णाच्या नेतृत्वाखाली कौरवांनी गंधर्वाचा सामना केला. मात्र गंधर्वांपुढे मात्रा न चालून, कर्णाला जीव वांचवण्यासाठी विकर्णाच्या रथावर बसून पळून जावे लागले. गंधर्वांनी दुर्योधनावर मात करून त्याला बंदी बनवले. सैनिकांनी पळून जाऊन पांडवांना हकीगत कळवली तेव्हां कुरुकुळाचा अभिमान धरून, वयं पंचाधिकं शतं असे भीमार्जुनाना समजावून त्याना गंधर्वांशी सामना करावयास पाठवले. त्यांनी दारुण युद्ध करून गंधर्वांचा पराभव करून दुर्योधनाला सोडवले. युधिष्ठिराने दुर्योधनाची समजून घालून, ’पुन्हा असे साहस करू नको’ असे सांगून हस्तिनापुरास परत जाण्यास सांगितले. अपमानाने व अपरिमित लाजेने दुर्योधन विमनस्क होऊन, परतीच्या वाटेवर बसूनच राहिला. पराजित होऊन पळून गेलेला कर्ण खूप दूर गेलेला असावा. कारण येवढा वेळ गेल्यावर मग सावकाश तो दुर्योधनापाशी परत आला व त्याला बांधवांसह सुखरूप पाहून, दुर्योधनानेच गंधर्वांवर विजय मिळवला असे वाटून, त्याने दुर्योधनाचे अभिनंदन केले! दुर्योधनाने कर्णावर राग न धरता, त्याला सत्य परिस्थिति सांगितली. कर्ण हतबुद्धच झाला! दुर्योधनाने हाय खाऊन ’आपण हे अपेशी मुख घेऊन हस्तिनापुराला येणार नाही व भीष्मद्रोणविदुरांना भेटू शकत नाही’ असे म्हणून बैठक मारली. दु:शासन शोकाकुल झाला. कर्णाने व शकुनीने कशीबशी दुर्योधनाची समजूत घातली. पांडवांच्या पराक्रमाची, ’ते कुरुराज्याचे नागरिक, तेव्हा तुझे रक्षण करणे त्यांचे कर्तव्यच होते, ते त्यानी केले, त्याचे काय येवढे मोठेसे?’ अशी वासलात लावली! त्यानंतर नेहेमीप्रमाणेच कर्णाने ’तेरा वर्षांनंतर युद्धात मी अर्जुनाला मारीन’ अशी प्रतिज्ञा केली. कर्णावरच्या दुर्योधनाच्या भरंवशाला अजूनहि तडा गेला नव्हता हे नवलच! सर्वजण तोंडे लपवीत हस्तिनापुराला परत गेले. सर्व हकिगत कळल्यावर भीष्माने, ’धनुर्वेद, शौर्य व धर्माचरण यांत कर्ण हा पांडवांच्या चतुर्थांशहि योग्यतेचा नाही’ असे दुर्योधनाला स्पष्ट सांगितले. या निंदेने राग येऊन कर्णाने दुर्योधनाच्या वतीने दिग्विजय केला व दुर्योधनाला एक खास यज्ञ करण्याचा अधिकार मिळवून दिला. कर्णाच्या पराक्रमाचे हे एकुलते एक उदाहरण म्हणावे लागेल. कर्णाच्या खालावलेल्या प्रतिमेला उजाळा देण्यासाठी हे प्रकरण मागाहून घुसडलेले असावे असे माझे मत आहे. अध्याय २५४ मध्ये ३१ श्लोकांमध्ये हे प्रकरण उरकले आहे! सर्व राजेलोकाना भेटून त्याना दुर्योधनाच्या पक्षाला वळवण्यासाठी या सदिच्छाभेटी असाव्या असे वाटते.
यानंतर अज्ञातवासाच्या अखेरीला पुन्हा कर्णाची कसोटी लागली त्याबद्दल पुढील भागात वाचा.

Sunday, October 5, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ७

राजसूय यज्ञ आटपल्यावर काही काळ कॊरव इंद्रप्रस्थात राहून मग हस्तिनापुराला परत आले. पांडवांचा उत्कर्ष व वैभव सहन न होऊन, त्यांचा नाश करण्यासाठी दुर्योधनाने शकुनीच्या सल्ल्याने द्यूताचा बेत ठरवला व बर्‍याच प्रयत्नांनी व युक्तिवादाने तो धृतराष्ट्राच्या गळी उतरवला. हा बेत ठरवण्यात कर्णाचा काही सहभाग नव्हता. युधिष्ठिर पांडवांसह द्यूतासाठी हस्तिनापुराला आल्यावर ज्यांना भेटला त्यांच्या नामावळीत कर्णाचे नाव येते. द्यूतसभेत अर्थातच तो उपस्थित होताच. द्यूतामध्ये युधिष्ठिर सर्वस्व हरून भावांना व नंतर स्वत:लाही पणाला लावून हरला. नंतर शकुनीच्या चिथावणीने त्याने द्रौपदीला पणाला लावली. त्यावेळी दु:शासनाला व कर्णाला अपार आनंद झाला असा त्याचा प्रथम उल्लेख द्यूतप्रकरणात येतो. हाही पण युधिष्ठिर हरला. दुर्योधनाने प्रथम दूत प्रातिकामीला द्रौपदीला दरबारात घेऊन येण्यास पाठवले. तिने प्रश्न उभा केला कीं युधिष्ठिर प्रथम स्वत:ला पणाला लावून हरला व मग मला पणाला लावले काय? तिने प्रातिकामीला दाद दिली नाही तेव्हा दु:शासन स्वत:च गेला व त्याने तिला बळाने ओढून आणले. दरबारातहि तिने तोच प्रश्न पुन्हा विचारला. पांडव काहीच बोलूं वा करूं शकत नव्हते. दु:शासनाने तिला जोरात हिसडले व ’दासी’ असे संबोधिलें. तें ऐकून कर्ण आनंदाने बेहोष झाला! (शब्दयोजना माझी नव्हे, महाभारताची!) त्याने दु:शासनाला शाबासकी दिली. या प्रसंगी, येथपासून, कर्णाचे सर्व वर्तन अति अनुचित व बेतालपणाचे झाले.
द्रौपदीच्या प्रश्नावर भीष्मही काही उत्तर देऊ शकले नाहीत. ’शकुनीने आपली वंचना केली असे युधिष्ठिर म्हणत नाही’ एवढेच त्यानी दाखवून दिले. भीमाने युधिष्ठिराची कठोर निंदा केली व त्याचे हातच जाळून टाकण्याची इच्छा व्यक्त केली. अर्जुनाने त्याला आवरून धरले. द्रौपदीने पुन्हापुन्हा आपला प्रश्न विचारला. कोणीहि उत्तर देईना. अखेर विकर्णाने तिच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला, सर्व उपस्थितांची निंदा केली व युधिष्ठिर प्रथम स्वत:ला पणाला लावून हरला व नंतर शकुनीच्या चिथावणीने त्याने द्रौपदीला पणाला लावली. ती पांचांची पत्नी, तिला पणाला लावण्याचा युधिष्ठिराला काय अधिकार होता? त्यामुळे ती जिंकली गेलेली नाहीच असे स्पष्ट मत दिले. यावर इतर कोणी काही बोलण्याआधीच, कर्णाने क्रोधाने खवळून जाऊन, त्याचा प्रतिवाद केला. ’द्रौपदीने पुन्हापुन्हा डिंवचूनहि पांडव काहीच बोलत नाहीत. द्रौपदीला आम्ही धर्मानेच जिंकिले आहे. तूं लहान आहेस, तुला कळत नाही, युधिष्ठिर सर्वस्व हरला त्यात द्रौपदीचा समावेश नाही काय? द्रौपदी आम्ही जिंकली असे शकुनि ओरडून म्हणाला त्यालाहि पांडवांनी कसलाहि विरोध केला नाही मग ती जिंकली गेली नाही असे तुला कसे काय वाटते?’ अशी त्याची कर्णाने हेटाळणी केली. द्रौपदीला एकवस्त्रा असताना सभेत ओढून आणली याचेहि त्याने, निर्लज्जपणे समर्थन केले व ते करताना त्याच्या मनातील सर्व विखार बाहेर पडला. ’द्रौपदी ही पांचाची पत्नी तेव्हां ती वेश्येसमानच आहे व आतां तिला आम्ही जिंकले आहे तेव्हां ती एकवस्त्रा असली काय वा विवस्त्रा असली काय सारखेच,’ असे म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. ’हा विकर्ण पोरकट आहे, त्याच्याकडे लक्ष देऊं नको, दु:शासना, तूं खुशाल पांडवांची व द्रौपदीची वस्त्रे हिसकावून घे’ अशी त्याने दु:शासनाला चिथावणी दिली. कर्णाबद्दल प्रेम वा आदर वाटणार्‍या लेखकांनाही त्याच्या या प्रसंगीच्या सर्वस्वी असभ्य व अनुचित वर्तनाचे समर्थन करणे शक्य नाही. वास्तविक हा कुरुकुळाचा अंतर्गत प्रश्न होता व पांचालांच्या कन्येच्या प्रतिष्ठेचाहि होता. याचे परिणाम फार दूरवर पोचू शकणार होते. दुर्योधनाचा मित्र व हितकर्ता या नात्यानेहि त्याला संयम बाळगण्यास सांगणे हे कर्णाला शोभून दिसले असते. पण त्याचा तोल पूर्णपणे सुटला. द्रौपदीचा प्रश्न भीष्माने व खुद्द दुर्योधनानेहि पांडवांवरच सोपवला व पांडव म्हणतील ते मी मान्य करीन असे त्याने म्हटले. दुर्योधन थोडातरी ताळ्यावर होता! कर्णाने पुन्हा, पांडवांच्या उत्तरासाठी न थांबतां, खुद्द द्रौपदीलाच ऐकवले की ’तूं दासी झालीस, आतां दुर्योधनाच्या अंत:पुरात जा व त्याच्या परिवाराची सेवा कर!’
अर्जुनाने बोलावयास सुरवात केली कीं युधिष्ठिर स्वत:ला पणाला लावून हरल्यावर तो कोणाचा स्वामी उरला?
आता द्रौपदी जिंकली गेलेली नाही असे दुर्योधनाला मान्य करावे लागणार होते. पण एव्हाना धृतराष्ट्राला बहुधा, द्रौपदीच्या झालेल्या घोर अपमानाचे दुरगामी परिणाम ’दिसू’ लागले असावे. त्याने अधिक वाट न पाहतां द्रौपदीला वर माग म्हटले, तिने फक्त, सर्व पांडवाना त्यांच्या शस्त्रास्त्रांसह मुक्त करून घेतले पण स्वत:ला मुक्त करण्याची मागणी केलीच नाही! ती दासी झाली कीं नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहिला व कर्णासकट कोणीच तो पुन्हा उपस्थित केला नाही! कर्णाने अखेर द्रौपदीची स्तुति केली कीं पांडवांना संकटसागरातून तारून नेणारी ती नौकाच ठरली!
युधिष्ठिराने इंद्रप्रस्थाला परत जाण्याची परवानगी मागितली तेव्हा मात्र धृतराष्ट्राने द्यूताचा सर्व व्यावहारिक परिणाम पुसून टाकून त्याला सर्व वैभवासह परत जाण्यास सांगितले. पांडव व द्रौपदी निघून गेल्यावर दुर्योधन, दु:शासन व कर्ण यांचे डोळे उघडले. पांडव आपला सूड उगवतील या भीतीने त्यांची गाळण उडाली! त्यांनी पुन्हा नवीन बेत ठरवून धृतराष्ट्राच्या तो गळीं उतरवला व वाटेतूनच पांडवाना परत बोलावले व पुन्हा एकच पण लावून द्यूत खेळण्यास बसवले.
वनवास-अद्न्यातवासाचा पण उच्चारताना आम्ही हरलो तर आम्ही वनात जाऊ असे शकुनि म्हणाला. कौरव हरते तर शकुनि व कर्ण दुर्योधनाबरोबर वनात जाणार होते काय? हरण्याची त्याना शंकाच नव्हती! जर हरले असते तर कर्ण वनात गेला असता काय याबद्दल मला मात्र शंका आहे. ’मी काही कौरव नाही, मी फक्त प्रेक्षक आहे.’ असेच तो बहुधा म्हणाला असता!
युधिष्ठिर हरलाच, त्यामुळे प्रश्नच सरला.
पांडव वनात जाताना त्यानी व्यक्त केलेला त्वेष, केलेल्या सूड उगवण्याच्या प्रतिद्न्या यामुळे कौरवांबरोबरच कर्णाचीहि घाबरगुंडी उडाली. कोणतेहि धैर्य वा स्वाभिमान न दाखवता वा दुर्योधनाला धीर न देता, तो, दुर्योधन व दु:शासनाबरोबर, ज्याची तो नित्य हेटाळणी वा कुचेष्टा करी, त्या द्रोणाला शरण गेला! द्रोणाने मी पूर्णत: तुमच्या पक्षाला राहीन असे आश्वासन दिले.
या सर्व प्रसंगात कर्णाचे वर्णन महाभारतकारानी खलपुरुष असेच केले आहे व ते नजरेआड करणे वा पुसून टाकणे वा त्याच्या वर्तनाचे समर्थन करणे अशक्य आहे.
यापुढील कर्णकथा पुढील भागात.

Monday, September 29, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ६

स्वयंवर होऊन पांडवाना द्रुपदाचा पाठिंबा मिळाला आहे हे लक्षात आल्यावर आता काय करावयाचे याबद्दल दुर्योधन, धृतराष्ट्र व कर्ण यांची चर्चा झाली. दुर्योधनाने अनेक कुटिल डावपेच धृतराष्ट्राला सुचवले. कर्णाने या प्रसंगीं मात्र या सर्व डावपेचांची निंदा केली. पांडव येथे तुमच्यापाशी असताना व त्याना कोणाचे सहाय्य नसताना तुम्ही त्यांचे काही वाकडे करू शकला नाही. आता त्याना पांचालांचे सहाय्य आहे. तेव्हां पोरकट उपायांचा विचारही करूं नका. उलट, त्यांनी पक्का पाय रोवण्यापूर्वीच आपण त्यांचेवर हल्ला करून त्याना पकडून आणू असा वीरोचित सल्ला त्याने दुर्योधनाला दिला. धृतराष्ट्राने त्याची वीरवृत्तीबद्दल पाठ थोपटली पण त्याच्यावर भरवसा ठेवला नाही! भीष्म, द्रोण व विदुरा बरोबर सल्लामसलत करण्यास सांगितले! त्या तिघांनी पांडवांना त्यांचा वाटा देण्याचा सल्ला दिला. कर्णाने त्या तिघांबद्दल संपूर्ण अनादर दाखवून त्यांची कुत्सित्पणे निंदा केली. त्यांना धृतराष्ट्राचे आश्रित ठरवले. विदुर व भीष्माने पुन्हा निक्षून सागितल्यावर धृतराष्ट्राला पांडवाना राज्याचा हिस्सा देणे भाग पडले. कर्णाचा युद्धबेत कोणीच स्वीकारला नाही. या प्रसंगी कर्णाचे वर्तन व बोलणे अतिशय अनुचित व माजोरीपणाचे झाले. वास्तविक, कुरुराज्याच्या अंतर्गत वादाशी त्याचा काही संबंध नव्हता. येथून पुढे, वेळोवेळी, कर्ण स्वत:ला भीष्मद्रोणांच्या बरोबरीचा मानून नेहेमीच त्यांचा अनादर करताना दिसतो. भीष्म स्वत: परशुरामशिष्य व कर्णहि, फसवणुकीने, पण परशुरामाचाच शिष्य. इतर कोणीहि समकालीन वीर परशुरामाचा शिष्य नव्हता. कदाचित या जोरावर कर्ण स्वत:ला भीष्माच्या बरोबरीचा मानताना दिसतो. परिणामी, भीष्माने कर्णाला नेहेमीच तुच्छतेने वागवले. त्याचे कारण तो सूतपुत्र हे नाही. तो खलप्रवृत्तीचा, पांडवांचा अकारण वैरी व दुर्योधनाला खलकृत्यात नेहेमी सहाय्यक म्हणून त्याचेवर भीष्माचा राग होता. कर्णाचे गुणदोष तो उत्तमपणे जाणत होता. कर्णाचा त्याने वेळोवेळी अपमान व तेजोभंग केला.
पांडवानी इंद्रप्रस्थ वसवले व राज्यविस्तार केला. अर्जुन राज्य सोडून, उलुपी, चित्रांगदा याचेबरोबर राहून अखेर द्वारकेहून सुभद्रेशी विवाह करून परतला. नंतर अभिमन्यु व इतर पांडवपुत्रांचा जन्म झाला, पांडवानी मयसभेची निर्मिति केली व राजसूय यज्ञ ठरवला. त्या निमित्ताने जरासंधवध झाला व मग पांडवांनी दिग्विजय केला. त्यावेळी भीमाचे व कर्णाचे युद्ध होऊन भीम जिंकला. मात्र हे युद्ध फारसे गांभीर्याने लढले गेले असे म्हणता येणार नाही. बहुतेक राजांनी नाममात्र युद्ध करून पांडवांच्या यज्ञाचे स्वागत केले तसेच कर्णानेहि केले असणार.
राजसूय यज्ञ पार पडला. अग्रपूजेच्या वेळी शिशुपालाने बेताल वर्तन केले, कृष्णाने त्याचा वध केला. या प्रसंगात कर्णाची उपस्थिति विशेष जाणवत नाही. मात्र, उपस्थित राजांच्या नामावळीत त्याचे नाव आहे. शिशुपालाने कृष्णाच्या अग्रपूजेला विरोध करताना अनेकांबरोबर कृष्णाची तुलना करून त्याला अग्रपूजेला अपात्र ठरवले. त्यात कर्णाबरोबरहि त्याची तुलना केलेली होती व कर्णाला वरचढ ठरवले होते. मात्र, यांत शिशुपालाचा कॄष्णद्वेषच दिसून येतो. खुद्द कर्णानेहि कधी आपण कृष्णापेक्षा वरचढ असल्याचा दावा केलेला नाही. शिशुपालाच्या कृष्णाने केलेया अचानक वधाने अनेक राजे चवताळले व युद्धाचा बेत करू लागले. यात कर्णाचे वा दुर्योधनाचे नाव नाही. भीष्माचा शिशुपालाने फार अपमान केल्यावर मग त्याचा वध झाला त्यामुळे दुर्योधनाला गप्प बसणे भागच होते. परिणामी कर्णहि स्वस्थ बसला!
यापुढील द्यूतप्रसंगातील कर्णाचा सहभाग पुढील भागात पाहूया.

Tuesday, September 23, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ५

पांडवांचा उत्कर्ष सहन न होऊन व युधिष्ठिराला युवराजपद व कालांतराने राजपद मिळणार हे पाहून दुर्योधनाने धृतराष्ट्राला अनुकूल करून घेऊन त्याचे करवीं पाडवांना वारणावतास पाठवले व त्यांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा कट रचला. पांडव हस्तिनापुरांतून द्ज़ुर जाणे धृतराष्ट्राला नक्कीच हवे होते. पुढचा बेत त्याला कदाचित माहीत नसेल. या बेतांत कर्ण सामील होता काय? त्याचा या दुष्ट बेतात सहभाग नव्हता. त्याला बेत बहुधा माहीत नव्हता. असा बेत त्याला पसंत पडला असता असे वाटत नाही.
यानंतर महाभारतात कर्णाचा उल्लेख द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी येतो. पांडव लाक्षागृहातून वांचून, पुष्कळ हाल अपेष्टा सोसून, ब्राह्मणवेषात स्वयंवराला आले होते. स्वयंवराच्या सुरवातीलाच धृष्टद्युम्नाने फक्त मत्स्यवेधाचा पण जिंकणे पुरेसे नसून, उच्चकुल, आकर्षक व्यक्तिमत्त्व हींहि आवश्यक असल्याचे स्पष्ट्पणे सांगितले होते. स्वयंवराला अनेक राजे आले होते. पण जिंकण्याचा प्रयत्न करणारांच्यात कृष्ण, सात्यकी वा इतर यादव धनुर्धराचा समावेश नाही. इतर क्षत्रिय राजे पण जिंकू शकत नाहीत असे दिसून आल्यावर मगच, कर्ण पुढे झाला. द्रौपदीने ताबडतोब, ’मी सूतपुत्राला वरणार नाही’ असें म्हटले. यांत कर्णाचा अपमान झाला असे आजच्या दृष्टिकोनातून विचार करणार्‍या काहींना वाटले तरी ते खरे नाही. क्षत्रिय राजकन्या द्रौपदी आपणाला वरील काय याचा कर्णानेच प्रथम विचार करावयास हवा होता. एक प्रकारे त्याने हात दाखवून अवलक्षण करून घेतले असेच म्हणावे लागते. या प्रसंगी कोणीहि द्रौपदीला वा द्रुपदाला दोष दिलेला नाही. कर्ण हा कुंतीपुत्र आहे हे कोणाला माहीत नव्हते पण ते माहीत असते तरीहि त्याचा पिता ब्राह्मण वा क्षत्रिय असल्याशिवाय त्याला क्षत्रियांत स्थान मिळणे शक्य नव्हते. कर्ण ही एक वर्णसंकरातून निघालेली जात असा स्पष्ट उल्लेख अ. ११५, श्लोक ४०-४४ मध्ये आहे. (धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांच्या यादीत दुष्कर्ण, कर्ण व विकर्ण अशी तीन नावे आहेत. हे अर्थातच गांधारीचे पुत्र नव्हेत! बहुधा, दुर्योधन व दु:शासन हे दोघेच गांधारीचे पुत्र असावे. धृतराष्ट्राने ’तूं माझ्या सर्वात ज्येष्ठ राणीचा सर्वात ज्येष्ठ पुत्र आहेस’ असे दुर्योधनाला संबोधिलेले आढळते. धृतराष्ट्राच्या इतर स्त्रियांचा उल्लेख आहेच. युयुत्सु यालातर स्पष्टपणे दासीपुत्र म्हटलेले आहे. दु:शासन सोडून इतर कोणीहि भाऊ दुर्योधनाच्या फारसे खिसगणतीत नव्हते. यावरूनहि ते त्याचे सख्खे भाऊ नसावे असा तर्क निघतो.)
कर्णाला पण जिंकण्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागला. त्याला पण जिंकता आला असता काय? या प्रष्नाचे उत्तर अर्थातच देता येणार नाही! इतर अनेकांना यश आले नव्हते. ब्राह्मणवेषांतील अर्जुनाने पण जिंकला याचा इतर क्षत्रिय राजांना अपमान वाटला व त्यानी अर्जुनाला घेरले. याप्रसंगी इतर क्षत्रिय राजांबरोबर कर्णहि अर्जुनाविरुद्ध युद्धाला उभा राहिला. खरे तर क्षत्रिय राजांच्या मान-अपमानाशी कर्णाचा काय संबंध? त्याला आपले शौर्य दाखवण्याची खुमखुमी आली! पण जिंकणारा ब्राह्मण म्हणजे अर्जुन हेहि अजून उघड झाले नव्हते. अर्जुनाने भीमाच्या मदतीने सर्वांना भरपूर झोडपले. हें कर्णाचे व अर्जुनाचे प्रथमच प्रत्यक्ष युद्ध होते. कर्णाचे अर्जुनापुढे काही चालले नाही. हा आपल्या तोडीस तोड आहे अशी अ. १९०, श्लोक १६-१९ मध्ये कर्णाची स्पष्ट कबुली आहे! ब्रह्मतेजापुढे काही चालत नाही अशी लटकी सबब सांगून कर्ण स्वस्थ बसला! कर्णाला पूर्वीपासूनच पाडवांबद्दल अकारण असूया व द्वेष वाटत होता त्यात आतां द्रौपदीच्याहि द्वेषाची भर पडली.
आपण कुंतीपुत्र आहोत हें कर्णाला हा वेळ्पर्यन्त माहीत झाले होते असे महाभारत म्हणत नाही. मात्र खुद्द अधिरथ वा त्याचा कोणी जवळचा आप्तच माझ्या तर्काप्रमाणे कर्णाचा पिता असेल तर, केव्हांतरी, आपली माता कुंती हे त्याला कळणे शक्य आहे. अशा गोष्टी कोठून तरी फुटतातच! भारतीय युद्धापूर्वी प्रथम कृष्णाने व नंतर कुंतीने स्वत:च, तो कुंतीपुत्र असल्याचे त्याला सांगितले तेव्हा त्याने आश्चर्य व्यक्त केलेले नाही! मात्र पिता कोण हे रहस्य कुंतीने तेव्हाही उघड केलेले नाही. सूर्यापासून जन्म हीच कथा कायम ठेवली. देवापासून माणसाचा जन्म हे अमान्य केले तर तर्क करण्यावाचून पर्याय नाही. म्हणून कर्ण हा खरा सूतपुत्रच असा तर्क मी केलेला आहे.
या स्वयंवरप्रसंगात कर्णाचे व्यक्तिमत्त्व उजळून निघालेले म्हणता येत नाही. महाभारतकारानी अर्जुनापुढे त्याला डावाच ठरवला आहे.
यापुढील कर्णचित्रण पुढील भागात वाचा.

Wednesday, September 17, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ४

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, कर्णाचा खरा पिता कोण हे रहस्य कुंतीने अखेरपर्यंत जपले. पांडूशी विवाह होऊन पुष्कळ काळ विवाहसौख्य भोगूनहि तिला वा माद्रीला अपत्य झाले नाही. पुत्राशिवाय मोक्ष नाही या भावनेने पांडूने अखेर नियोग पत्करला व कुंतीला तसे सुचवले तेव्हाही कुंतीने आपल्या कानीन पुत्राच्या (कर्णाच्या) अस्तित्वाचा उल्लेख केला नाही. तो कोठे आहे हे तिला माहीत नसावें हे एक कारण असेल. त्याचा जन्म ब्राह्मण वा क्षत्रिय पित्यापासून झालेला नसल्यामुळे तो पांडूला मान्य होणार नाही हे कुंती जाणून होती हे जास्त सयुक्तिक कारण दिसतें. विचित्रवीर्याच्या मृत्यूच्या वेळी ही अडचण आली नव्हती. सत्यवतीचा कानीन पुत्र व्यास हा पराशर पुत्र होता. तो ऋषि असल्यामुळे स्वत: कुरुंचा राजा होणार नव्हता पण अंबिका-अंबालिका यांना पुत्रवती करण्य़ासाठी त्याला बोलावण्याचा सल्ला खुद्द भीष्मानेच सत्यवतीला दिला व तिलाही तो वावगा वाटला नाही.
नियोगांतून पांडव जन्मले. पांडू व माद्री यांचा मृत्यु झाला व कुंती पुत्रांसह हस्तिनापुराला आली. तोवर दुर्योधनादि कौरवांचाहि जन्म झालेला होता. दुर्योधन व भीम एका वयाचे होते. कौरव-पांडव मोठे झाले. प्रथम कृपाचार्य व मग द्रोणाचार्य यांनी त्यांचे युद्धकलेचें शिक्षण केले. या सर्व काळात एकदांहि कर्णाचा उल्लेख येत नाही. त्याचे बालपण व शिक्षण कोठे झाले याबद्दल काही उल्लेख नाही. कुंती पांडुपत्नी बनून हस्तिनापुराला येण्यापूर्वी कर्णाला अधिरथाने दूर पाठवले असले पाहिजे. त्या काळात त्याचे शिक्षण दुसर्‍या कोणा गुरूपाशी झाले व मग त्याने धनुर्वेदाचे उच्च शिक्षण परशुरामापाशी झाले. आपण ब्राह्मण असल्याचे त्याने म्हटले होते ते खरे नाही असे उघडकीस आल्यामुळे ’मी दिलेली विद्या तुला ऐनवेळी कामास येणार नाही’ असा शाप परशुरामाने त्याला दिला अशी कथा आहे. यांतहि कर्णावर अन्याय झाला असे काहीना वाटते. माझ्या मते कर्ण अनेक वेळा कसोटीच्या वेळी उणा पडलेला दिसतो त्याचे हे स्पष्टीकरण दिलेले असावे.
गुरु द्रोण, त्याचे कौरव, पांडव व इतर शिष्य, विशेषेकरून अर्जुन, यांची कीर्ति कर्णाच्या कानावर गेली असावी. कौरवपांडवांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांच्या कौशल्यप्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे हेहि त्याच्या कानावर गेले असणार. या कार्यक्रमाच्या वेळी, जन्मकथेनंतर प्रथमच महाभारतात कर्णाचा उल्लेख येतो. सर्व शिष्य व शेवटी अर्जुन याचे कौशल्यप्रदर्शन पार पडल्यानंतर अचानक कर्ण आपल्या कौशल्याचे प्रदर्शन दाखवण्यासाठी पुढे सरसावला. त्याला अर्जुनाचा वाटणारा मत्सर त्याच्या आव्हानात्मक भाषणातून स्पष्ट झाला. आव्हान दिल्याप्रमाणे त्याने अर्जुनाच्या बरोबरीने सर्व कौशल्याचे प्रदर्शन केले. अधिरथाला कर्ण असा अचानक रंगमंचावर येणार आहे याची बिलकुल कल्पना नव्हती, नाहीतर त्याने खचितच त्याचे अचानक कुंतीसमोर येणे टाळले असते! कर्णाच्या कौशल्याने भीष्म-द्रोण चकित झाले. हा परशुरामशिष्य आहे हे कोणाला माहीत नसावे. या प्रसंगाच्या वर्णनात तसा उल्लेख अजिबात नाही. कर्ण हा द्रोणाचा शिष्य होता अशी काहींची समजूत असते पण ते मुळीच खरे नाही. सूतपुत कर्णाचा द्रोणाने शिष्य म्हणून स्वीकार केला नसता. निषादराजपुत्र एकलव्य याचाही त्याने स्वीकार केला नव्हता! कर्णजन्मानंतर काही काळाने कुंतीचा विवाह, मग हस्तिनापुरात दीर्घकाळ वास्तव्य व संसारसुख भोगल्यावर वनात काही काळ संचार, अपत्यप्राप्तीबद्दल पांडूची पूर्ण निराशा झाल्यावर मग नियोगाचा स्वीकार, नंतर युधिष्ठिर, भीम व नंतर अर्जुन यांचा जन्म हा कालक्रम विचारांत घेतला तर, कर्ण हा अर्जुनापेक्षा १२-१४ वर्षांनी वडील असला पाहिजे! अर्जुन या प्रसंगी १६ वर्षांचा कोवळा तरुण असणार तर कर्ण २८-३० वर्षांचा होता! त्याने नवतरुण अर्जुनाबरोबर स्पर्धा करणे हास्यास्पदच म्हणावे लागेल! त्याने अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिल्यावर साहजिकच त्याच्या कुळशीलाची चौकशी झाली. याचवेळी अधिरथाने पुढे येऊन त्याला पुत्र म्हणून संबोधिल्यामुळे तो सूतपुत्र आहे हे उघड झाले. पूर्वी कधीहि न पाहिलेला कर्ण समोर आल्यावर कुंतीने त्याला ताबडतोब ओळ्खले व तिला भोवळ आली! विदुराच्या ते लगेच लक्षात आले व त्याने तिच्यावर उपचार करविले. कुंतीचे रहस्य उघड होऊ दिले नाही. कुंतीने जन्मजात कवचकुंडलांमुळे कर्णाला ओळखले असे महाभारत म्हणते. कवचकुंडले ही एक अद्भुत कथा आहे. ती दूर ठेवावयाची तर कवचकुंडले म्हणजे दागदागिने, सोनेनाणे असे मानले पाहिजे. तेव्हा कुंतीने कर्णाला ओळखण्याचे कारण, ओळखीचे दागिने किंवा, बहुधा, खर्‍या पित्याशी कर्णाचे असलेले साम्य हे असावे. कुंतीने अर्थातच कर्णाची ओळख दाखवली नाही. ते शक्यच नव्हते. ती अगतिक होती.
कर्ण सूतपुत्र ठरल्यामुळे द्वंद्वाचा विषय संपला. दुर्योधनाने कर्णाला लगेच जवळ केले, अंगदेशाचे राज्य दिले. हे कसे काय? वास्तविक दुर्योधन स्वत: राजा वा युवराजहि नव्हता. वयानेहि दुर्योधन अर्जुनापेक्षा किंचित मोठा, तरीहि विशीतलाच होता. अंगदेश कुरूंच्या राज्यात समाविष्ट होता काय? त्याची राजधानी कोठे होती? महाभारत म्हणते तेव्हा राज्य दिले हे खरे मानले पाहिजे. कर्णाने तेथे जाऊन राज्य चालवले असे दिसत नाही. तो कायम दुर्योधनापाशीच दिसतो. अंगदेशाचे राज्य या वेळेपर्यंत ज्या कोणाकडे होते त्यांनी कर्णाचे स्वामित्व मान्य केले काय व कां? महाभारतांत खुलासा नाही. अंगदेशाचे राज्य हा जणू एक नाममात्र सन्मान होता! किंवा अंगराज्याकडून कौरवांना मिळणारी खंडणी यापुढे कर्णाला मिळणार होती. अर्थात राज्य दिले तरी दुर्योधन कर्णाला क्षत्रिय करू शकत नव्हता. अखेरपर्यंत कर्णाला सूत म्हणूनच जन्म घालवावा लागला. मात्र कर्णाने या प्रसंगी दुर्योधनाची बाजू घेतली ती अखेरपर्यंत कधीहि सोडली नाही. दुर्योधनानेहि दु:शासनाएवढेच प्रेम व सन्मान कर्णाला नेहेमीच दिला. मैत्रीचे असे उज्वल उदाहरण क्वचितच सापडेल. अर्जुनाबद्दल असूया व स्पर्धेची भावनाहि कर्णाने कायमच बाळगली. वयाचा फरक लक्षात घेतला तर या प्रसंगात कर्ण अर्जुनापेक्षा उजवा ठरला असे म्हणता येत नाही.
यानंतर लगेचच, पूर्वीच्या अपमानाची भरपाई करून घेण्यासाठी द्रोणाच्या मागणीप्रमाणे प्रथम कौरवांनी व नंतर पांडवांनी द्रुपदावर हल्ला केला. यावेळी कर्ण दुर्योधनाबरोबर होता. मात्र कर्णाच्या धनुर्विद्येचा द्रुपदावर काहीहि प्रभाव पडला नाही! कर्णाचा पराभव झाला याचे दुर्योधनाला फारसे वैषम्य वाटलेले दिसत नाही. द्रोण हा काही कर्णाचा गुरु नसल्यामुळे त्याच्या अपमानाशी त्याला काही देणेघेणे नव्हते त्यामुळे तो पूर्ण बळाने लढला नाही असे फार तर त्याच्या समर्थनासाठी म्हणता येईल. कौरव व द्रोण हरल्यावर मात्र, पांडवांनी द्रुपदाचा पूर्ण पराभव करून द्रोणाच्या अपमानाची भरपाई केली. यात मुख्य पराक्रम अर्थातच अर्जुनाचा होता. या प्रसंगात त्यामुळे अर्जुन कर्णापेक्षा निश्चितच उजवा ठरला.
यापुढील कर्णकथेचा मागोवा पुढील भागात वाचा.

Wednesday, September 10, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ३

कर्णजन्माबद्दल माझा तर्क असा आहे. कुंती माता होणार हे दिसून आल्यावर तिच्या दत्तक मातापित्यानी म्हणजे कुंतिभोज व पत्नी यानी, तिचे पुढील जीवन नासून जाऊं नये यासाठी तिच्या बालकाला जन्मानंतर लगेचच दूर पाठवून देण्याची व्यवस्था केली व तिच्या चुकीवर पांघरूण घातले असावे असा तर्क सहजच सुचतो. आईबापाना काहीहि कळू न देतां एकट्या अल्पवयीन कुंतीने स्वत:च्या विचाराने व सेविकेच्या मदतीने, स्वत:चे पूर्ण गर्भारपण व बाळंतपण पार पाडले व कर्णाला पेटीत घालून नदीत सोडून दिले असे महाभारतात म्हटले आहे खरे पण ते कसे शक्य आहे? ती व्यवस्था आईवडिलानी केली असे मानणे जास्त सयुक्तिक आहे. काही काळ गेल्यावर हिचे स्वयंवर करावे असा त्यांनी विचार केला असेल. पण कुंतीच्या आईनेहि मूल पेटीत घालून नदीत सोडले हे खरे वाटत नाही. पण मग काय केले असेल? कर्ण अधिरथापर्यंत कसा पोचला?
अधिरथ हा हस्तिनापुरातील सूत म्हणजे सारथी पण तो खुद्द पांडू, भीष्म, धृतराष्ट्र वा दुर्योधनाचा वा इतर कुणा नामवंताचा सारथी असल्याचा उल्लेख नाही. तसा तो नगण्यच आहे. खुद्द त्याचा वा त्याच्या कुणा आप्ताचा कुंतिभोजाशी काही सेवा-संबंध असणे शक्य आहे. अधिरथ स्वत: वा त्याचा कोणी आप्त कर्णाचा खरा पिता होता काय? असा काही संबंध असेल तर कदाचित बालकाच्या जन्मानंतर लगेच, सोनेनाणे, दागदागिने (जन्मजात कवचकुंडले!) बरोबर देऊन त्याला अधिरथाकडे गुपचुप पाठवून दिले असणे नैसर्गिक वाटते. अधिरथ व राधा याना अपत्य नसल्यामुळे त्यांनी ही व्यवस्था मान्य केली व कर्णाला लहानाचा मोठा केला. अधिरथाचा वा त्याच्या कुणा आप्ताचा कर्णजन्माशी संबंध असल्यामुळे त्यानी ही जबाबदारी पत्करली असेल हा माझा तर्क आहे. मात्र याला महाभारतात काहीहि आधार नाही.
सूत हे क्षत्रियांच्या बरॊबरीचे नव्हे पण फारसे खालच्या दर्जाचे मानले जात नव्हते. सारथ्यकर्म हे त्यांचे मुख्य काम. मात्र सारथ्यकौशल्याची महति क्षत्रिय जाणून होते. स्वत:च्या सारथ्यकौशल्याचा त्यांना अभिमानहि असे. खुद्द श्रीकृष्ण, शल्य, अर्जुन, सुभद्रा, विराटपुत्र उत्तर, नलराजा, ऋतुपर्ण राजा, रामायणकाळात कैकेयी, या क्षत्रियांची सारथ्यकौशल्याबद्दल ख्याति होती. धृतराष्ट्राला युद्धवर्णन ऐकवणारा संजय आणि विराटाचा मेहुणा कीचक हे सूत होते. (क्षत्रियकन्येने सूताला वरल्याचे मात्र उदाहरण नाही!). यावरून सूतांचे सामाजिक स्थान क्षत्रियांच्या खालोखाल होते असे दिसते. कर्ण हा माझ्या तर्काप्रमाणे अधिरथ वा त्याचा आप्त, कुंतिभोजाचा सारथी, याचा पुत्र असेल तर जन्मानंतर त्याला अधिरथाकडे पाठवून देण्यात आपण त्याच्यावर काही अन्याय करतो आहोत असें कुंतिभोजाला व त्याच्या पत्नीला वाटण्याचे काही कारण नव्हते. मातापित्यानी कर्णाची काय व्यवस्था केली वा त्याला कोठे पाठवले हे कदाचित कुंतीला माहीतहि नसेल! कुंतिभोजाने कुंतीचे स्वयंवर थोड्या काळाने योजिले तेव्हां तिने पांडूला वरले. कर्ण हस्तिनापुरातच वाढतो आहे हें तिला माहीत असतें तर पांडूला वरण्याचा धोका तिने कदाचित टाळला असता. मात्र कुंती हस्तिनापुराची राणी होणार म्हटल्यावर कुंतिभोजाने वेळीच अधिरथाला कळवून कर्णाला हस्तिनापुरापासून दूर केले असावें. त्यामुळे विवाहानंतरच्या हस्तिनापुरातील सुरवातीच्या वास्तव्यात कर्ण तिच्या नजरेला येऊन तिने त्याला ओळखण्याची वेळ आली नाही. विदुर हा अतिशय दक्ष असा मंत्री असल्यामुळे व त्याचे हेरखाते कार्यक्षम असल्यामुळे कुंतीचा पुत्र हस्तिनापुरात अधिरथाकडे वाढतो आहे हे माहीत होते. कर्णाला हस्तिनापुरातून दूर पाठवण्याचे काम कदाचित त्यानेच केले असेल!
कर्णजन्माची कथा आदिपर्वात प्रथम आली आहे. तिचे स्वरूप वर वर्णिल्याप्रमाणे आहे. महाभारतात पुढे प्रत्यक्ष युद्धापूर्वी सूर्य कर्णाला भेटला व इंद्र तुझ्याकडे येऊन तुझी कवचकुंडले मागेल ती तूं देऊ नको असे त्याने कर्णाला सांगितले असा एक प्रसंग आहे. याठिकाणी कर्णजन्माची कथा जास्त विस्ताराने सांगितली आहे व ती आदिपर्वांतील कथेपेक्षा काहीशी वेगळी आहे. येथे कुंतीला वर देणारा ब्राह्मण दुर्वास असे म्हटलेले नाही. अधिरथाचा उल्लेख धृतराष्ट्राचा मित्र असा केलेला आहे. अधिरथ व राधा अंगदेश या सूतांच्या राज्यात गेलेली असताना गंगाकिनारी राधेला कर्णाची पेटी मिळाली असे वर्णन आहे. (कुंतिभोजाचे राज्य कोठे होते, गंगाकिनारी वा तिच्या एखाद्या उपनदीच्या किनारी? अंगदेश हा त्या राज्याच्या शेजारी होता काय?) येथील कथेप्रमाणे वर मिळाले तेव्हा कुंती अजाण कुमारी होती. वयात आल्यावर उत्सुकतेपोटी तिने मंत्राचा वापर करून सूर्याला बोलावले. प्रथम घाबरून तिने सूर्याला नकार दिला पण नंतर तो आपल्या कुळाला शाप देईल या भीतीने त्याची मागणी मान्य केली असे म्हटले आहे. बालक पेटीत ठेवून नदीत सोडण्याचे काम तिनेच स्वत: दासीच्या मदतीने केले असे वर्णन आहे. त्यानंतर अर्ध्या रात्रीपर्यंत नदीकाठी शोक करून मग पित्याला कळेल या भीतीने ती राजवाड्यात परत आली. पुढे स्वत:चे दूत पाठवून आपला पुत्र हस्तिनापुरात कसाकाय वाढतो आहे याचीहि बातमी तिने काढली होती असे वर्णन आहे. हें सर्व वर्णन असंभव वाटते. त्यापेक्षा वर वर्णिलेला माझा तर्क जास्त सयुक्तिक वाटतो. मात्र या प्रसंगीहि सूर्याने कर्णाला तू माझा पुत्र आहेस असे म्हटलेले नाहीच! कर्णाचा खरा पिता कोण हे रहस्य कुंतीने अखेरपर्यंत जपले. कर्णाच्या जन्माबद्दल व पितृत्वाबद्दल याहून जास्त काही सांगण्यासारखे नाही. त्याच्या पुढील आयुष्याचा आढावा पुढील लेखात घेऊंया. वाचत रहा.

Monday, September 8, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग २

कर्णाची माता कुंती याबद्दल कोणताही संदेह नाही. कुंती ही वसुदेवाचा पिता शूर याची कन्या. वसुदेवाची सख्खी भगिनी कीं सावत्र हें स्पष्ट नाही. शूराचा मित्र कुंतिभोज याला अपत्य नव्हते म्हणून शूराने आपली कन्या त्याला देऊन टाकली. कन्या दत्तक देण्याचे हे एक अपवादात्मक उदाहरण म्हणावे लागेल! शिशुपालाची माता ही पण कृष्णाची आत्या म्हणजे वसुदेवाची बहीणच पण सख्खी नव्हे. कुंती व शिशुपालाची माता वा कुंती व वसुदेव यांच्या भेटीगाठी वर्णन करणारा एकही प्रसंग महाभारतात नाही. जणू कुंतीला कुंतिभोजाकडे देऊन टाकल्यावर तिचे आईबाप व भावंडे तिला विसरलीच! दत्तक दिली तेव्हा तिचे वय काय होते, तिचा प्रतिपाळ कुंतिभोज व त्याच्या पत्नीने कसाकाय केला हे अज्ञात आहे. कुमारी वयात असताना तिला दुर्वासाच्या सेवेला ठेवले गेले हे एक नवलच. त्याने तिला खुशाल वशीकरण मंत्र शिकविले हे आणखी एक नवल! कुंतीच्या (गैर)वर्तनाचे समर्थन करण्यासाठी ही कथा मागाहून घुसडली कीं काय असा मला संशय येतो. कुंतिभोजाला मागाहून इतर कोणी अपत्ये झाली होती काय हे माहीत नाही. भारतीय युद्धात पांडवांकडून लढलेल्या वीरांमध्ये ’पुरुजित कुंतिभोज’ असा उल्लेख येतो. हा खुद्द कुंतिभोजच कीं त्याचा पुत्र हे उलगडलेले नाही. त्याच्या कुळातील इतर कोणा वीराचा उल्लेख नाही.
कुंतिभोजपत्नीचे कुंतीकडे पुरेसे लक्ष नव्हते असे म्हणावे लागते. कुंतीला कौमार्यावस्थेत पुत्र कर्ण झाला. सूर्यापासून नव्हे तर मग कोणापासून? येथे प्रत्यक्ष माहितीच्या अभावी तर्काचा आश्रय घेणे आवश्यक आहे. कुंतीला कोणा उच्च कुळातील राजपुत्राचा वा राजपुरुषाचा सहवास घडलेला असता तर त्यांच्या विवाहाला कोणतीहि अडचण आली नसती. क्षत्रियांसाठी गांधर्व वा राक्षसविवाहहि(कन्येला पळवून नेणे) सर्वमान्य होता. ज्या अर्थीं कुंतीला पुत्राचा त्याग करावा लागला त्या अर्थी कर्णाचा पिता उच्च कुळातील असण्याची शक्यता वाटत नाही. ऋषींपासून क्षत्रियकन्यांना पुत्र होणे व पित्याने अल्पकालीन मोह सोडून देऊन, संसाराच्या पाशात न अडकतां, अपत्याची जबाबदारी मातेवर सोडून देऊन, स्वत: निघून जाणे, असा प्रकार अनेक उपकथानकांतून दिसून येतो. तेव्हा तर्कच करावयाचा तर खुद्द दुर्वासच कर्णाचा पिता होता काय? पण दुर्वास ब्राह्मण व कुंती क्षत्रियकन्या तेव्हा त्यांचे मीलन अनुचित मानले गेले नसते व पुत्राचा त्याग करण्याची कुंतीवर पाळी आली नसती. यावरून कर्णाचे पितृत्व इतर कोणाचे तरी म्हणावे लागते. बालक पेटीत घालून नदीत सोडून दिले ही अद्भुत कथा बाजूला ठेवली तर प्रत्यक्षात काय घडले असावे याचा तर्क केला पाहिजे. त्याबद्दल पुढील भागात वाचा. धन्यवाद.

Saturday, September 6, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग १

महारथी म्हणून गाजलेला कर्ण ही व्यक्तिरेखा अनेक लेखकांची आवडती आहे. मराठीत त्याचेवर विपुल लेखन झाले आहे. कर्ण हा प्रत्यक्षात कुंतीपुत्र असूनहि त्याला राधेय, सूतपुत्र म्हणून सर्व जन्म घालवावा लागला हा त्याचेवर फार मोठा अन्याय झाला या दृष्टिकोनातून या बहुतेक लेखनामध्ये एक सहानुभूतीचा सूर सर्वत्र ऐकू येतो. जातिभेद, अनौरस संतति, या विषयांवर आजच्या काळातील विचारांच्या पार्श्वभूमीवर योग्यच असले तरी ज्या काळातील ही कथा आहे त्या वेळच्या समाजधारणांशी हे फारसे सुसंगत नाही. महाभारतकथेमध्ये कर्ण हे एक महत्वाचे पात्र आहे. काही प्रसंगात त्याची प्रमुख भूमिकाहि आहे. महाभारतातील या प्रसंगांतील कर्णाच्या चित्रणाचा विचार करून खुद्द महाभारतकारांना कर्ण कसा दिसत होता, इतर समकालीनांना कसा वाटत होता हे पाहाणे उद्बोधक होईल. यासाठी कर्णजन्माच्या कथेपासून सुरवात करून पूर्ण मागोवा घेण्याचा विचार आहे. अद्भुतता बाजूला ठेवून, ही सर्व माणसांची कथा आहे या भूमिकेतून मी माझे विचार मांडणार आहे. पांडवांचे काय किंवा कर्णाचा काय, जन्म देवांपासून झाले ही कल्पना वा श्रद्धा दूर सारून, विचार करावयाचा व काही ठिकाणी तर्क चालवावयाचा आहे. पुढील लेखापासून माझ्या प्रतिपादनाला सुरवात होईल. आपण वाचत रहालच असे वाटते. धन्यवाद.

Sunday, August 31, 2008

जयद्रथवध - भाग ६

सर्व संरक्षकाना वारंवार हरवून व सैन्यसंहार करून अखेर अर्जुनाने जयद्रथाला गाठलेच. त्याने जयद्रथाचा सारथी मारला व ध्वज तोडला. तोंवर पुन्हा संरक्षकानी त्याला मध्ये घेऊन अर्जुनाला अडवले. अर्जुनाने कृप, कर्ण, शल्य, दुर्योधन या सर्वांवर बाणवृष्टि करून व जखमी करून पुन्हा जयद्रथाला गाठले. अखेर सर्व संरक्षकाना दाद न देतां त्याने जयद्रथाला ठार केले. हा वेळ पर्यंत संध्याकाळ झाली होती व सूर्य आहे कीं अस्ताला गेला हे कळत नव्हते. मात्र कृष्णाने अर्जुनाला बजावून सांगितले होते की तूं सूर्याकडे न पाहातां जयद्रथ तावडीत सापडला कीं त्याला मार. त्याप्रमाणे अर्जुनाने जयद्रथवध केल्यावर नंतर पुन्हा सूर्य स्पष्ट दिसूं लागला. त्यामुळे अर्जुनाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली याबद्दल शंकेला जागाच उरली नाही. त्यानंतरही प्रत्यक्ष सूर्यास्त होईपर्यंत अर्जुन विरुद्ध कृप/अश्व्त्थामा व सात्यकी विरुद्ध कर्ण अशी युद्धे काही काळ चालूच राहिलीं.
सूर्य काही काळ स्पष्ट न दिसणे व नंतर पुन्हा दिसू लागणे या नैसर्गिक घटना आहेत व त्याचे कर्तृत्व कृष्णाला देण्याचे काहीच कारण नाही. कृष्णाने योगमायेने सूर्य काही काळ अदृश्य केला अशी समजूत आहे त्याला काहीहि आधार नाही. महाभारतात तसे म्हटले आहे हे खरे पण तो मजकूर, कृष्णाला देवाचा अवतार मानू लागल्यानंतर, त्याचे महत्व वाढविण्यासाठी, मागाहून घुसडलेला स्प्ष्ट दिसून येतो. ते विशिष्ट श्लोक गाळले तर कोठेहि तुट्कपणा जाणवत नाही. सूर्य दिसत नव्हता असे अर्जुनाने वा कौरवपक्षाच्या कोणीहि म्हटलेले नाही. खुद्द जयद्रथही अखेरपर्यंत शर्थीने लढतच होता पण त्याचा अर्जुनापुढे टिकाव लागला नाही. ’हा सूर्य व हा जयद्रथ’ असे कृष्णाने म्हटले व मग अर्जुनाने समोर असलेल्या बेसावध जयद्रथाला मारले हे मुळीच खरे नाही. ती हरदासी कथाच! सूर्यास्ताला अजून काही काळ बाकी आहे याचा हिशेब कृष्णाने मनाशी बरोबर ठेवला होता व अर्जुनाचे चित्त त्याने विचलित होऊं दिले नाही हे खरे. ’सूर्य अस्ताला जाण्याची वेळ आली आहे तेव्हा आता वेळ न घालवता जयद्रथाला मार’ असे त्याने अखेरच्या क्षणी अर्जुनाला म्हटले व अर्जुनाने लगेच जयद्रथवध केला.
सूर्यास्त झाला व अर्जुनाची प्रतिज्ञा फोल झाली अशा समजुतीने कौरवांकडून जयद्रथाच्या रक्षणाच्या प्रयत्नात शिथिलता आली असे बिलकुल झाले नाही वा तसा दावा वा कांगावाही कौरवांकडील कोणी केला नाही. अखेरपर्यंत अर्जुनाला जोराचा प्रतिकार होतच होता व तो मोडूनच त्याला यश मिळाले. दिवसभर शर्थीचे प्रयत्न करूनहि सगळे संरक्षक अर्जुनापुढे टिकले नाहीत हेंच खरे. अर्जुनाचा स्वबळावरचा विश्वास सार्थ ठरला व कृष्णावर स्वत:ची प्रतिज्ञा मोडून युद्धात उतरण्याची वेळ आली नाही. अर्जुनाने दिवसभर केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाचे यश कृष्णाच्या पदरात घालण्याचे काहीच कारण नाही. त्याने दिवसभर उत्तम सारथ्य करून अर्जुनाला जयद्रथापर्यंत नेले हे त्याचे कार्य थोडे नव्हे! कृष्णाची खरी थोरवी, त्याने डोळसपणे जो, वेळ आली तर, युद्धात स्वत: उतरण्याचा निर्णय घेतला होता व सारथी दारुकाला दिवसभर आपल्या मागे रहावयास सांगितले होते, त्यात आहे. रथ तयारच होता व अखेरच्या पर्वात त्याचा उपयोग रथहीन झालेल्या सात्यकीला झाला.
जयद्रथवधामुळे दुर्योधन फार नाउमेद झाला. या एका दिवसात, अर्जुन, सात्यकी व भीम यानी सात अक्षौहिणी सैन्य मारले. (अ. १५०, श्लोक १४-१६) यातील अतिशयोक्ति सोडली तरी कौरवांचे सैन्यबळ हटले हे खरे. दुर्योधनाची खात्री पटली कीं आपल्या पक्षातील कोणीहि वीर अर्जुनाच्या तोडीचा नाही. दिवसभरात भीमाने व सात्यकीनेहि वारंवार कर्णाला हारविले त्यामुळे दुर्योधनाचा त्याच्यावरील विश्वासहि डळमळू लागला. यापुढील युद्धात द्रोण व कर्ण यानीहि पांडवसैन्य मोठ्या प्रमाणावर मारले पण सुरवातील ११ विरुद्ध ७ असे असलेले विषम प्रमाण या दिवशी जे उलट झाले व ते पुढे कायमच कौरवाना प्रतिकूल राहिले.
युधिष्ठिराने जिवाची पर्वा न करतां सात्यकी व भीम यांना अर्जुनाच्या मदतीला पाठवले तेहि निर्णायक क्षण होते. द्रोणानेहि कबुली दिली कीं दिवसभर अर्जुन आणि बराच काळ सात्यकी व भीम नसूनहि त्याला धृष्टद्युम्न व इतर पांचालांचा निर्णायक पराभव करता आला नाही व युधिष्ठिराला पकडता आले नाही. ’आता आपली धृष्टद्युम्नापासून सुटका नाही’ असे द्रोणाने म्हटले. (अ. १५१ श्लोक २४-२६). जयद्रथाला वाचवणे व युधिष्ठिराला पकडणे हे या दिवसाचे दोनही युद्धहेतु विफल झाले.
अशा प्रकारे कौरवांनी केलेला अभिमन्यूचा वध त्याना फार महागात पडला. एक दिवस अर्जुनाला अडवून धरले व जयद्रथाला वाचवले तर विजय आपलाच आहे अशी त्याना वाटलेली आशा फोल ठरली व येथून पुढे हे युद्ध पूर्णपणे त्यांचेविरुद्ध गेले.
एक काल्पनिक प्रश्न असा की दुर्दैवाने सूर्य अस्ताला जाईपर्यंत जयद्रथवध झाला नसता तर काय झाले असते? माझ्या मते, कृष्णाने अर्जुनाला ताबडतोब अग्निकाष्ठे भक्षण करू दिली नसतीं. ’तुझे युद्ध तू पूर्ण कर, सर्व कौरवांचा संहार तूं व भीम पुरा करा व मग पाहूं’ असा निर्वाणीचा सल्ला दिला असता व अर्जुनाने ऐकलेच नसते तर मात्र त्याची जागा स्वत: नक्कीच घेतली असती पण कौरवांना विजयी होऊ दिले नसते! त्याच्या प्रतिमेशी हे सुसंगत आहे.
हा विषय आता संपला. नवीन विषय पुढील लेखापासून सुरू होईल. वाचत रहा. धन्यवाद.

Thursday, August 28, 2008

जयद्रथवध - भाग ५

अर्जुनाचे व दुर्योधनाचे युद्ध सुरू झाले. अर्जुनाचे बाण लागूनहि दुर्योधनाला इजा होत नाही हे पाहून कृष्ण चकित झाला. तुझ्या हातातील बळ संपले की काय असे त्याने अर्जुनाला खिजविले! द्रोणाने दुर्योधनाला बांधलेले मंत्रकवच ओळखून अर्जुन कृष्णाला म्हणाला की ही विद्या द्रोणाने मला एकट्यालाच शिकवली आहे व कवचाचा भंग करणेहि शिकवले आहे! त्याप्रमाणे कवचभंगासाठी त्याने केलेला अस्त्रप्रयोग मात्र अश्वत्थाम्याने दुरूनच दुसरे अस्त्र सोडून निष्फळ केला. आतां त्याच अस्त्राचा पुन्हा प्रयोगहि करता येणार नव्हता! त्यामुळे निर्भय झालेल्या दुर्योधनाने जोरदार शरवृष्टि सुरू केली तेव्हा राग येऊन अर्जुनाने त्याचा रथ, सारथी, घोडे यांचा नाश केला व त्याच्या तळहातांवर व नखांवर बाण मारले. हे भाग कवचाने संरक्षित नसल्याने भयंकर इजा होऊन दुर्योधनाने पळ काढला! आकस्मिक आलेल्या अडचणीला अर्जुनाने कौशल्याने तोंड दिले. यानंतर अर्जुनाचीं सहा संरक्षक वीरांशी वारंवार युद्धे झाली.
द्रोणाशी सामना करताना युधिष्ठिराला कृष्णाच्या पांचजन्याचा सारखा आवाज येत होता पण अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा येईना त्यामुळे अर्जुनाच्या सुरक्षिततेची चिंता वाटून त्याने अखेर सात्यकीला ’माझे रक्षण मी कसेही करीन पण तू जा’ असे निक्षून सांगून त्याला अर्जुनाच्या मदतीला पाठवले. युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी भीमावर सोपवून सात्यकी निघाला. द्रोण व कृतवर्मा यांचा जोरदार विरोध मोडून काढून सात्यकी सैन्यात घुसला. अनेक वीरांचा व सैन्याचा पुन्हापुन्हा संहार करून शेवटी तो अर्जुनाजवळ पोचला. सात्यकी जाऊनहि बराच वेळ झाला तरीहि अर्जुनाची खुशाली कळेना तेव्हा मोठा धोका पत्करून युधिष्ठिराने भीमालाहि अर्जुनाच्या मदतीला पाठवले. नाइलाजाने, युधिष्ठिराच्या संरक्षणाचा भार धृष्टद्युम्नावर सोपवून भीम निघाला. त्यालाहि द्रोणाशी जोरदार सामना करावा लागला. द्रोणाची पर्वा न करता, अनेक वीरांचा व सैन्याचा संहार करीत तोहि अर्जुनापर्यंत पोचला व त्याला खुशाल पाहून भीमाने मोठमोठ्याने गर्जना केल्या. त्या ऐकून अर्जुन व कृष्ण यांनीहि केल्या. त्या ऐकून युधिष्ठिराची खात्री पटली की अर्जुन, सात्यकी व भीम एकत्र व सुखरूप आहेत. ’सात्यकी व भीम सैन्यात घुसले कसे व आता जयद्रथाचे काय होणार’ अशी तक्रार घेऊन दुर्योधन पुन्हा द्रोणापाशी गेला. तेव्हा, ’सात्यकी व भीम आता येथे नाहीत तेव्हा मी आता युधिष्ठिराला पकडण्याचा निकराचा प्रयत्न करतो, तुम्ही सर्वानी अर्जुनाचा प्रतिकार करा’ असे सांगून द्रोणाने त्याला परत पाठवले. आता पुन्हा सैन्यात शिरलेल्या युधामन्यु व उत्तमौजा यांची दुर्योधनाशी गाठ पडली. दुर्योधनाने त्याना हारवले पण त्यानीहि दुर्योधनाला रथहीन केले. भीम व कर्ण यांच्या वारंवार चकमकी झाल्या. भीमाने दरवेळी कर्णाला मार देऊन पळवून लावले. सतरा वेळा त्याचे धनुष्य तोडले. त्याच्या व दुर्योधनाच्या देखतच, त्याच्यावर चालून येणार्‍या अनेक कौरवांचा वध केला. अनेक चकमकींनंतर अखेर कर्णाने भीमाचा पराभव केला व त्याला दुरुत्तरे केली. अखेरपर्यंत भीमाने हार मानली नाहीच वा पळूनहि गेला नाही. त्याने कर्णाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. कर्णाचेहि धनुष्य तुटले होतेच. अर्जुन भीमाच्या मदतीला आल्यावर अखेर कर्ण व भीम इतरांच्या रथांवर बसून दूर झाले. अर्जुनाने यावेळी कर्णावर सोडलेला घातक बाण मात्र अश्वत्थाम्याने दुरूनच तोडून टाकला व आपण पळून गेला! कर्ण वांचला. इकडे सात्यकी व भूरिश्रवा यांचे तुंबळ युद्ध होऊन भूरिश्रवा सात्यकीचे केस पकडून त्याचे डोके उडवण्याच्या प्रयत्नात आहे असे कृष्णाने अर्जुनाच्या नजरेला आणले तेव्हा अर्जुनाने दुरूनच बाण सोडून भूरिश्रव्याचा हातच तोडला! नंतर सात्यकीने भूरिश्रव्याला मारले. जयद्रथाच्या रक्षणासाठी नेमलेल्या सहा वीरांपैकी भूरिश्रवा मेला व भीमाने कर्णाला वारंवार हरवून जखमी व नामोहरम केले त्यामुळे अर्जुनाला फार मदत झाली. कर्णाने दुर्योधनाशी कबुली दिली कीं ’भीमाकडून मी आज एवढा मार खाल्ला आहे की युद्धात उभे राहिलेच पाहिजे म्हणून मी नाइलाजाने उभा आहें.’ यानंतर जयद्रथाच्या प्रत्यक्ष वधाचे वर्णन पुढील भागात वाचा.

Sunday, August 24, 2008

जयद्रथवध - भाग ४

युद्ध सुरू झाल्यावर दोन स्पष्ट भाग पडले. कित्येक वीर व प्रचंड सैन्य अर्जुनाचा प्रतिकार करत होते तर दुसरीकडे द्रोणाचा प्रतिकार युधिष्ठिर, सात्यकी, धृष्टद्युम्न व इतर पांचाल वीर करत होते. अर्जुनाने सबंध दिवसभर कित्येक प्रमुख वीरांशी, काहींशी पुन्हापुन्हा, सामना करत व प्रचंड सैन्यसंहार करत जयद्रथाच्या दिशेने प्रगति चालू ठेवली. युधामन्यु व उत्तमौजा या दोन पांचाल राजपुत्रांकडे अर्जुनाचा रथ रक्षण्याचे काम होते. मात्र सुरवातीलाच, कृतवर्म्याने त्यांना अडवून धरले. अर्जुन पुढे निघून गेला. त्यानंतर दिवसभर त्याना अर्जुनाला गाठता आले नाही. सगळ्या कौरवसैन्याला वळसा घालून दिवस अखेरीला ते पाठीकडून अर्जुनापाशी पोचले.
द्रोणाला बाणांनीच वंदन करून व कृतवर्म्याला हारवून अर्जुन एकटाच सैन्यात घुसल्यावर, दिवसभर अनेकानी त्याला अडवले. अनेकाना त्याने मारले. सर्वांची यादी देत बसण्यात अर्थ नाही. दुर्योधन द्रोणापाशी जाऊन तक्रार करू लागला की तुम्हाला ओलांडून अर्जुन पुढे कसा गेला? तुम्ही वचन दिले नसते तर मी जयद्र्थाला परत जाऊं दिले असते. आता त्याचे रक्षण कसे करावे याची सर्वाना चिंता वाटते आहे. द्रोणाने उत्तर दिले की कृष्णाने रथ एवढ्या वेगाने नेला की माझे बाण त्याच्यापर्यंत पोचेनात. आता तो गेलाच आहे व समोर युधिष्ठिर आहे तर त्याला पकडण्याचा मी यत्न करतो. तुला मी मंत्र कवच बांधतो. म्हणजे तुला अर्जुनाचे बाण लागणार नाहीत. तूंहि शूरवीर आहेस तेव्हा तू अर्जुनाशी सामना कर. कवच बांधून दुर्योधन अर्जुनाला गाठण्यासाठी गेला. इकडे दिवसभर, अर्जुनाशी सामना करण्यासाठी मोकळे ठेवलेले सहा महावीर सोडून इतर अनेक वीरांनी द्रोणाला युधिष्ठिराला पकडण्यासाठी साह्य केले. युधिष्ठिर, सात्यकी, भीम, धृष्टद्युम्न व इतर पांडव व पांचालवीर यांनी या हल्ल्यांचा भार वाहिला.
अर्जुन हळूहळू जयद्रथाच्या दिशेने प्रगति करीत होता. अवंतीचे महारथी राजे विंद व अनुविंद यानी त्याला अडवले. त्याना अर्जुनाने मारले व त्यांचे सैन्य उधळून लावले. यानंतरची एक अद्भुत घटना म्हणजे, आपल्या घोड्याना विश्रांति व सेवा हवी आहे असे पाहून अर्जुन रथातून खाली उतरून फक्त एका धनुष्याने सैन्याचा प्रतिकार करत राहिला व कृष्णाने शांतपणे घोडे सोडून व त्याना खरारा करून, अंगात घुसलेले बाण काढून टाकून व हलकेच फिरवून त्याना परत हुशार केले व पुन्हा रथाला जोडले. अर्जुन व कृष्ण पुन्हा रथावर चढलेले पाहून कौरव योद्धे उदासीन झाले व जयद्रथ आता वाचत नाही असें म्हणू लागले. यावेळी मंत्रकवच बांधलेला दुर्योधन स्वत: अर्जुनाला भिडला. तो वृत्तांत पुढील भागात वाचा.

Wednesday, August 20, 2008

जयद्रथवध भाग - ३

अर्जुनापासून जयद्रथाला एक दिवसभर वांचवण्यासाठी द्रोणाने सर्व कौशल्य पणाला लावून व्यूहरचना केली. सर्व सैन्याच्या व्यूहाच्या मागे दूरवर जयद्रथाला ठेवून त्याच्या रक्षणासाठी खुद्द जयद्रथाचेच मोठे सैन्य ठेवले. शिवाय कर्ण, अश्वत्थामा, शल्य, कृप, भूरिश्रवा, कर्णपुत्र वृषसेन या सहा महावीरांना मोकळे ठेवून त्याना अर्जुनाचा प्रतिकार करण्याचेच काम दिले. मुख्य सैन्याचा चक्रशकट नावाचा व्यूह रचून त्याचे प्रमुखपदी दु:शसन, दुर्मर्ष व विकर्ण याना नेमून व्यूहाच्या अग्रभागी द्रोण स्वत: होता. पाठीमागील कौरव सैन्याचा पद्मव्यूह रचून त्याचे प्रमुखपद कृतवर्म्याकडे दिले होते. हा सर्व व्यूह तोडून व सहा महावीरांचा प्रतिकार मोडून काढल्यावरच अर्जुनाला जयद्रथ दिसणार होता व मग त्याच्याशी अंतिम युद्ध करावयाचे होते! सहा महावीराना मोकळे ठेवण्याचा हेतु त्यानी दिवसभर अर्जुनाला पाळीपाळीने अडवावयाचे असा होता. हा एक Dynamic Defense चा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. अर्जुन हा व्यूह तोडण्यात व सहांशी लढण्यात दिवसभर मग्न असताना द्रोणाच्या हाताखालील वीरांचा मुख्य रोख युधिष्ठिरावर राहणार होता. त्याला पकडण्याची या दिवशी चांगली संधि होती. पांडवांनाहि याची जाणीव होती त्यामुळे या दिवशी मात्र व्यूहात शिरण्यापूर्वी अर्जुनाने युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी महारथी सात्यकीवर टाकली होती. या दिवशीच्या युद्धाचे फार निर्णायक परिणाम झाले त्याचे वर्णन महाभारतात फार सुंदर व खुलासेवार केले आहे. ते आता पुढील भागात वाचा.

Sunday, August 17, 2008

जयद्रथवध भाग - २

आदल्या दिवशी प्रचंड हानि होऊनहि या दिवशी पुन्हा एकदा त्रिगर्तांनी अर्जुनाला आव्हान दिले व यावेळी मात्र त्याला दिवसभर अडवून ठेवण्यात यशस्वी झाले. सर्व भारतीय युद्धाच्या वर्णनात अर्जुनाच्या अनेक पराक्रमांचे खुलासेवार वर्णन आहे. आदल्या दिवशी त्रिगर्तांचे अर्जुनाने केलेले हाल तसेच खुलासेवार वर्णिले आहेत. या दिवशीचे त्रिगर्त-अर्जुन युद्धवर्णन मात्र अतिशय त्रोटक आहे. हे एक नवल आहे. प्रत्यक्षांत अर्जुन या दिवशी थकव्यामुळे वा जखमांमुळे युद्धापासून दूरच राहिला होता कीं काय अशी मला शंका आहे! दुसरे नवल म्हणजे या दिवशी अर्जुन मुख्य युद्धापासून दूर असूनहि द्रोणाने युधिष्ठिराला पकडण्याचा प्रयत्न केलाच नाही! त्याने सैन्याचा चक्रव्यूह रचला. तो खरेतर बचावात्मक व्यूह होता. आक्रमण करण्यास अत्यंत कठीण असेच त्याचे वर्णन केलेले आहे. तो कसा तोडावा हे अर्जुन सोडून इतर कोणाला माहीत नव्हते. अर्जुनाशिवाय जो कोणी या व्यूहावर आक्रमण करील तो मारला जाईल ही द्रोणाची अपेक्षा असावी. त्यानुसारच त्यांची एकातरी प्रमुख वीराला मारण्याची प्रतिज्ञा होती. मात्र अर्धवट ज्ञानावर अभिमन्यूने प्रयत्न केला व व्यूह तोडल्यावर तो फारच अनावर झाला. एकटा असूनहि दिवसभर त्याने अतुल पराक्रम केला व कौरवसैन्याची अपरिमित हानि झाली. अनेक वीर मारले गेले. दिवस अखेरीला द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा, बृहत्बल व कृतवर्मा या सर्वांनी एकत्र येऊन त्याला घेरण्यात व त्याचे धनुष्य तोडण्यात यश मिळवले व मग कसाबसा त्याचा वध केला व सुटकेचा निश्वास टाकला! प्रत्यक्ष म्रूत्यु मात्र दु:शासनपुत्राबरोबर गदायुद्ध करताना झाला. व्यूहांत अभिमन्यु एकाकी पडण्याचे कारण असे की त्याने मोकळी करून दिलेल्या वाटेने व्यूहात शिरूं पाहणार्‍या सात्यकी, भीम व इतर पांडव वीरांना जयद्रथाने दिवसभर अडवून ठेवले. महाभारतामध्ये याचा खुलासा, एक दिवस अर्जुन सोडून इतर पांडवांना तू अजिंक्य होशील असा शंकराकडून त्याला वर मिळाला होता असा केला आहे. तेव्हां हा जयद्रथाचा दिवस होता असे म्हणावे लागते. मात्र अभिमन्यूच्या वधात त्याचा प्रत्यक्ष सहभाग मुळीच नव्हता. मृत्युमुखीं पडलेल्या अभिमन्यूला त्याने लाथ मारली अशी एक हरदासी कथा आहे पण त्याला महाभारतात आधार मुळीच नाही. एकूण या दिवसाचे लक्ष्य, युधिष्ठिराला पकडणे असे न राहता अभिमन्यूला मारणे हे ठरले व त्यांत मात्र कौरव यशस्वी झाले. त्याची भयंकर किंमत त्याना दुसरे दिवशी मोजावी लागली!
अभिमन्यूच्या मृत्यूबरोबरच या दिवशीचे युद्ध संपले. अर्जुन परत आल्यावर त्याला झालेला प्रकार समजला. अभिमन्यूला संरक्षण न दिल्याबद्दल त्याने सर्व पांडववीरांना दोष दिला. जयद्र्थाने सर्वांना अडवले असे कळल्यावर झाल्या अनर्थाला जयद्रथच व्यक्तिश: जबाबदार आहे असे ठरवून, उद्यां सूर्यास्तापूर्वी जर मी जयद्रथाला मारले नाही तर मी अग्निकाष्टे भक्षण करीन अशी घोर प्रतिज्ञा अर्जुनाने अचानक केली. पांडवपक्षाला ही प्रतिज्ञा अडचणीत टाकणारी होती. अर्जुनाने कृष्णाशी वा इतर पांडववीरांशी सल्लामसलतही केली नाही. रागाच्या भरात केलेल्या या प्रतिज्ञेचे युद्धावर फार निर्णायक परिणाम झाले. याबद्दल पुढील भागात सविस्तर वाचा!

Thursday, August 14, 2008

जयद्रथवध - भाग १

आजपासून नवीन विषयाला सुरवात करीत आहे. जयद्रथवध हे महाभारत युद्धातील एक अतिशय वेधक असे प्रकरण आहे. सर्व अठरा दिवसांच्या युद्धाचे खुलासेवार वर्णन महाभारतात आहे. त्यातील संख्यात्मक अतिशयोक्ति व अद्भुत असे अस्त्रवापराचे वर्णन सोडून दिले तर युद्धहेतु, डावपेच, असेहि बरेच वाचण्यासारखे आहे. जयद्रथवधाच्या दिवशीचे डावपेच, दोन्ही पक्षांच्या प्रमुख योद्ध्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य व कौशल्य, या दिवसाच्या घोर युद्धाचा दोन्ही पक्षांच्या तौलनिक बळांवर झालेला निर्णायक परिणाम, कृष्ण व अर्जुन दोघानीहि अनेक अडचणींवर दिवसभर धैर्याने व युक्तीने मात करून अखेर मिळवलेले यश या सर्वांमुळे हे एक अतिशय रंगतदार युद्धप्रकरण ठरते.
भीष्माच्या आधिपत्याखाली दहा दिवस युद्ध चालले तोवर दोन्ही पक्षांनी थोडाफार संयम राखला होता व अनुचित प्रकार झाले नाहीत. भीष्मपतनानंतर द्रोण सेनापति झाला, तसेच दहा दिवस युद्धापासून अलिप्त राहिलेला कर्णहि युद्धात उतरला. त्यानंतर डावपेचांचे युद्ध सुरू झाले! दुर्योधनाच्या सूचनेवरून द्रोणाने युद्धहेतु ठरवला कीं रणात युधिष्ठिराला पकडावयाचे व पुन्हा द्यूत खेळावयास लावून व हरवून वनांत पाठवावयाचे! युद्ध संपवण्याचा कौरवांनी ठरवलेला तो मार्ग होता. द्रोणाने या हेतूसाठी अट घातली की अर्जुनाला दूर ठेवू शकलात तरच हे जमेल, त्याच्या उपस्थितीत नाही! हा बेत साधला तर पांडवाना मारण्याची गरज उरणार नाही हे जाणून द्रोणाने तो मान्य केला असावा. पांडवपक्षाला हा बेत कळल्यामुळे द्रोण जिवंत असेपर्यंतच्या पांच दिवसांच्या युद्धात त्यांनी या बेताचा निकराने प्रतिकार केला. इंद्राकडून कर्णाला मिळालेली अमोघ शक्ति नष्ट होईपर्यंत कृष्णालाहि त्याचा व अर्जुनाचा निर्णायक युद्धप्रसंग टाळावयाचा होता. युधिष्ठिराला पकडण्याच्या बेताचा दुर्योधनाने बराच गाजावाजा केला होता, त्यामुळे आपला शब्द पाळण्याचे द्रोणावरहि दडपण होते.
द्रोणाच्या आधिपत्याखाली पहिल्या दिवशी (युद्धाच्या अकराव्या दिवशी) दोन्ही पक्षांच्या वीरांची घनघोर युद्धे झाली. अर्जुन उपस्थित असल्यामुळे द्रोणाचा बेत सफळ झाला नाही. दिवस अखेर पांडवांचीच सरशी राहिली. द्रोणानी पुन्हा म्हटले कीं अर्जुनाला इतरत्र गुंतवलेत तरच मला काही करतां येईल. तेव्हा त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा व त्याचे भाऊ यानी हे कार्य पत्करले. त्यानी अर्जुनाला अडवण्याची प्रतिज्ञा केली. त्याप्रमाणे बाराव्या दिवशी सुरवातीलाच त्यानी अर्जुनाला आव्हान दिले. युधिष्ठिराच्या रक्षणाचे काम द्रुपदपुत्र सत्यजित याच्यावर सोपवून अर्जुन त्रिगर्तांकडे वळला. या दिवशी अर्जुनाने अद्भुत पराक्रम करून त्रिगर्त सेनेला धूळ चारली. मात्र इकडे द्रोणापुढे मात्रा न चालून सत्यजित मारला गेला. युधिष्ठिराला धृष्टद्युम्न व इतरानी वाचवले. पाठोपाठ राजा भगदत्ताने पांडवांवर जोराचा हल्ला केला व द्रोण बाजूलाच राहून भगदत्तच पांडवाना भारी पडू लागला तेव्हा त्रिगर्तांचा प्रतिकार मोडून काढून अर्जुन परतला व त्याने भगदत्ताला मारले. दिवसभर निकराचे प्रयत्न करूनहि दुर्योधन-द्रोणांचा बेत सफळ झाला नाही. दुर्योधनाने यासाठी द्रोणाला दोष दिला तेव्हा त्याने पुन्हा तेच म्हटले की अर्जुन असताना काही जमत नाही. त्यामुळे तेराव्या दिवसाचा युद्धबेत पुन्हा तोच ठरला की त्रिगर्तानी अर्जुनाला अडवावयाचे. द्रोणाने आश्वासन दिले की हे जमले तर आज मी पाडवपक्षाच्या एकातरी महान वीराला मारीन. युधिष्ठिराला पकडण्याबद्दल मात्र त्याने काही म्हटले नाही. हा दिवस अभिमन्यूचा व जयद्रथाचा ठरला व अभिमन्यु मारला गेल्यामुळे अर्जुनाने जयद्रथवधाची प्रतिज्ञा केली. त्याबद्दल सविस्तर पुढील भागात वाचा.

Sunday, August 10, 2008

वाचकांस विनंति

माझे महाभारतावरील लेखन बरेच लोक आवडीने वाचतात असे दिसते. आपल्या मराठी न जाणणार्‍या मित्रांसाठी मी एक नवीन ब्लॉग इंग्लिश मध्ये सुरू केला आहे. www.mahabharat-newviews.blogspot.com वर तो पहावयास मिळेल. त्यावर पांडवांच्या अज्ञातवासाबद्दल मी लिहिण्यास सुरवात केली आहे. त्याबद्दल आपण आपल्या अ-मराठी मित्रांना माहिती द्यावी ही विनंति. वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर दोन्ही ब्लॉग चालू ठेवणार आहे मात्र इग्लिश ब्लॉगला फारशा भेटी दिल्या गेल्या नाहीत तर एक विषय पुरा करून तो ब्लॉग बंद करण्याचा विचार आहे. इंग्लिश ब्लॉगची माहिती इंग्लिश वाचकांपर्यंत कशी पोचवावी याबद्दल काही सूचना असल्यास जरूर कळवा. (मराठी ब्लॉगविश्व व ब्लॉगवाणी यांचा मला फायदा मिळाला.)या मराठी ब्लॉगवर पुढील पोस्टपासून नवीन विषयाला सुरवात होईल. वाचत रहा!
प्र. के. फडणीस.

Tuesday, August 5, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ८

कौरव दरबारातील सर्व प्रयत्न असफल झाल्यावर पांडवांकडे परत जाण्यापूर्वी कृष्णाने दुसरे दिवशी सकाळी कर्णाची एकांतात भेट घेतली. त्यावेळी त्याने कर्णाला तूं कुंतीपुत्र या नात्याने पांडवांचाच वडील भाऊ आहेस असे सांगितले. त्यांचेविरुद्ध तू दुर्योधनाची बाजू घेणे उचित नाही. पांडव सत्य कळल्यावर तुला वडील भावाचा सर्व सन्मान देतील, तू दुर्योधनाची बाजू सोडलीस तर अजूनहि शम होईल व पांडवाना मिळणार्‍या राज्यभागाचा तूच मालक होशील, द्रौपदी ही सर्व पांडवांची पत्नी या नात्याने तुझीहि पत्नी होईल असे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व जन्म सूतपुत्र म्हणून काढल्यावर आता मला यातून काय मिळणार? दुर्योधनाने मला सर्व सन्मान, वैभव दिले आहे. त्याची बाजू अशी आयत्या वेळी मी सोडली तर ती अर्जुनाला भिऊन, असेच सर्व जग म्हणेल व माझी छीथू होईल. आता वेळ गेली आहे व मला असे करणे मुळीच उचित नाही असे म्हणून कृष्णाच्या सूचनेला त्याने स्पष्ट नकार दिला. तेव्हा कृष्णाने नाइलाज होऊन त्याचेजवळ दुर्योधनाला निरोप दिला की आजपासून सात दिवसानी कार्तिक अमावास्या आहे त्या दिवशी कुरुक्षेत्रावर आपली रणांगणावर गाठ पडू द्या. त्यानंतर कृष्ण रथात बसून सरळ उपप्लव्याला पांडवांकडे गेला.दुसरी महत्वाची घटना म्हणजे कृष्ण परत गेला व अमावास्येला युद्ध सुरू करण्याचे ठरले असे कळल्यावर खुद्द कुंतीने भल्या सकाळी सूर्याला अर्घ्य देत असताना कर्णाला गाठून ’तू माझाच पुत्र आहेस व पांडवांचा वडील भाऊ आहेस तेव्हा त्यांच्या विरुद्ध जाऊ नको असे विनवले. कर्णाने तिलाही स्पष्ट नकारच दिला. फक्त एकच गोष्ट कबूल केली कीं ’मी अर्जुन सोडून इतर चारांशी लढताना त्यांचा वध करणार नाही. माझे व अर्जुनाचे युद्ध मात्र अटळ आहे व आमच्यापैकी कोणीहि एक जगला तरी तुझे पांच पुत्र जिवंत राहतील.’ कुंतीला एवढ्याच आश्वासनावर समाधान मानावे लागले.या दोन घटनांमध्ये कर्णाचे वर्तन धीरोदात्त झाले असे म्हणावे लागते. कृष्ण वा कुंती दोघानीहि कर्णाचा खरा पिता कोण हे सांगितले नाही. सूर्यापासून जन्म याचेवर श्रद्धा असेल तर प्रश्न उरत नाही पण सर्व कथा माणसांची आहे व माणसापासूनच सर्वांचे जन्म आहेत हे मान्य केले तर हा प्रश्न उरतो. कर्णाचा खरा पिता ब्राह्मण वा क्षत्रिय असता तर ते यावेळी सांगावयास प्रत्यवाय नव्हता. त्यामुळे माझ्यामते कर्ण हा (बहुधा) खरोखर सूतपुत्रच असावा! याबद्दल मी कर्णावर लेखन करीन तेव्हा जास्त विस्ताराने लिहिणार आहे. दुसरी नवलाची गोष्ट म्हणजे कर्ण हा कुंतीपुत्र आहे हे कृष्णाला कसे माहीत होते? तो देवाचा अवतार तेव्हा त्याला सर्वच ज्ञात असे मानले तर प्रश्न उरत नाही! पण तो मानवच असे मानणारांसाठी शंका उरते! माझे मते शिष्टाई असफल होऊन कृष्ण विदुराकडे परत आला व कुंतीला भेटून तिला सर्व हकीगत सांगितली तेव्हा पुत्रस्नेहाने कुंतीनेच आपले एवढा दीर्घकाळ जपलेले गुपित स्वत:च कृष्णाला सांगून ’तू हे कर्णाला सांग व त्याला वळवण्याचा अखेरचा प्रयत्न कर’ असे म्हटले असले पाहिजे. तो प्रयत्नहि असफळ झाला व युद्ध होणार हे कळल्यावर मात्र सर्व भीडभाड बाजूला ठेवून तिने स्वत:च कर्णाला भेटून व त्याचे जन्मरहस्य स्वमुखाने सांगून अखेरची विनवणी केली. तीहि असफळ झाली ते एकप्रकारे अटळच होते.अशा प्रकारे सर्व प्रयत्न संपून अखेर कौरव-पांडवाची गाठ नियतीने ठरवल्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर पडली. कृष्णशिष्टाईची कथा येथे संपली. या प्रकरणामध्ये कॄष्णाचे मानवी पातळीवरील सर्व अलौकिक गुण प्रगट झालेले दिसून येतात. त्याला अवतार मानण्याची मला त्यामुळेच गरज वाटत नाही! तो एक थोर व आदर्श मानव म्हणूनच आपल्याला प्रिय व्हावा हेच योग्य.

Sunday, August 3, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ७

दुर्योधनाच्या या जबाबानंतर कृष्णाचाहि तोल सुटला व त्याने रागारागाने त्याला त्याच्या सर्व कुटिल कृत्यांची यादी ऐकविली व ’तुझे मातापिता व सर्व हितकर्ते तुला शम करावयास सांगत असून तू शम करूं इच्छित नाहीस तर मग तुला हवी असलेली वीरगति तुला लवकरच मिळेल’ अशी तंबी दिली. दु:शासन त्यावर दुर्योधनाला म्हणाला कीं ’तूं सख्य न करशील तर तूं, मी व कर्ण यांना बांधून भीष्म, द्रोण व धृतराष्ट्र पांडवांचे स्वाधीन करतील असा रंग दिसतो आहे.’ यावर क्रुद्ध होऊन दुर्योधन व त्याचे समर्थक सभा सोडून गेले. भीष्म यावर कृष्णाला म्हणाला कीं हे सर्व लोक कालवश झालेले दिसतात. हें ऐकून, क्रुद्ध होऊन, कृष्ण भीष्मद्रोणांचीहि निंदा करून म्हणाला कीं दुर्योधनाला तुम्ही थोपवत नाही हा तुम्हा कुरुवृद्धांचा अपराध आहे. आम्ही यादवानी जुलमी कंसाला मारून, उग्रसेनाला पुन्हा सत्तेवर आणले, आता आम्ही सर्व यादव सुखात आहोत. कुळाच्या हितासाठी (कु)पुत्राचा त्याग करणेच योग्य होय. यावर धृतराष्ट्राने विदुराकरवी दुर्योधनाला परत बोलावले व गांधारीकडून त्याला उपदेश करविला. तिने सांगितले की ’परस्परांतील भेदाला भिऊनच भीष्म, युझा पिता व बाल्हीक यानी पांडवाना राज्यभाग दिला होता. तुला अर्धे राज्य पुरेसे आहे. मूर्खा, तुला दिसत नाही का की भीष्म, द्रोण व कृप सर्व शक्तीनिशी तुझ्यातर्फे लढणार नाहीत? तुझा व पांडवांचा राज्यावर सारखाच हक्क आहे हे ते जाणतात.’
पालथ्या घड्यावर पाणी पडून, उलट, दुर्योधनाने शकुनीबरोबर कॄष्णालाच पकडण्याची चर्चा चालवली! ते लक्षांत येताच सात्यकी व कृतवर्मा बाहेर गेले व त्यानी सैन्य सज्ज केले. सात्यकीने परत येऊन कृष्णालाहि सावध केले. कृष्णाने धृतराष्ट्राला म्हटले की दुर्योधनाला खुशाल मला पकडण्याचा प्रयत्न करूं दे!. धृतराष्ट्राने पुन्हा दुर्योधनाला बोलावून उपदेश केला कीं हे बरे नाही. कृष्णाने त्याला सरळ दम दिला कीं तूं मला पकडण्य़ाचा प्रयत्न करच व मग माझा प्रताप पहा! कृष्णाने यावेळी विश्वरूप दर्शन दाखवले काय? हा श्रद्धेचा भाग आहे. महाभारत तसे म्हणते. माझ्या मते त्याची आवश्यकताच नव्हती. सात्यकी, कृतवर्मा यांची तयारी व कृष्णाचा आविर्भाव पाहून दुर्योधनाला वेळीच भान आले की आपला बेत तर सफळ होणार नाहीच पण उलट कृष्ण उघडच पांडवांच्या वतीने युद्धाला उभा रहावयास मोकळा होईल. बलरामहि मग त्याला थांबवू शकणार नाही. हे जाणून त्याने आपला बेत सोडून दिला.
धृतराष्ट्राने कृष्णापाशी सरळच कबूल केले कीं माझी दुर्योधनावर सत्ता चालत नाही. यावर बोलण्यासारखे काही न उरल्यामुळे कृष्णाने भीष्म-द्रोणाना म्हटले की धृतराष्ट्र काय म्हणाला ते तुम्ही ऐकले आहे. आता मी तुमचा निरोप घेऊन परत जातो. माझे प्रयत्न हरले. त्यानंतर सात्यकी व कृतवर्मा यांच्यासह बाहेर पडून तो कुंतीकडे गेला.
कृष्णशिष्टाई अशा प्रकारे असफळ झाली. मात्र पांडवांचा व कृष्णाचा आपणावर बोल येऊ नये हा उद्देश सफळ झाला.
यानंतर प्रत्यक्ष युद्धापूर्वी दोन महत्वाच्या घटना घडल्या त्यांबद्दल पुढील भागात.

Monday, July 28, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ६

दुसरे दिवशी कृष्ण कौरवदरबारात उपस्थित झाला. त्याचे यथोचित स्वागत झाले. शिष्टाई ऐकण्यासाठी थोर ऋषि आले होते. त्यांना उचित आसनावर बसविल्यावर मग सभा सुरू झाली. कृष्णाशेजारीं सात्यकी व कृतवर्मा बसले होते. कृष्णाने आपले मुद्देसूद भाषण दुर्योधनाकडे दुर्लक्ष करून, खुद्द धृतराष्ट्रालाच उद्देशून केले. त्याने मुख्य मुद्दे माडले ते असे,
१. क्षत्रिय वीरांचा व सैन्याचा संहार व सर्वनाश न होतां कौरवपांडवांचा शम व्हावा हेच चांगले.
२. तुमच्या थोर कुळात तूं निमित्त होऊन कुलक्षय होऊं नये.
३. शम करणे तुझ्या हातात आहे. तूं कौरवाना आवरलेस तर पांडवाना मी आवरीन.
४. शम केलास तर पांडव व त्यांचे सर्व समर्थक – आम्ही यादवही – तुझ्या आधीन होतील. ते सर्व व तुझे सध्याचे समर्थक मिळून तूं अजिक्य सम्राट होशील.
५. युद्ध झाले तर दोन्ही पक्षांचा प्रचंड संहार होईल. त्यांत तुला काय आनंद?
६. पांडवांची तुला विनंति आहे की आम्ही द्यूताच्या अटी पाळल्या व तूही त्या पाळशील असा विश्वास बाळगला. वडील या नात्याने तूंच आता आमचे रक्षण कर व ठेव म्हणून तुजपाशी ठेवलेले आमचे राज्य आता आम्हाला परत दे.
७. सभेलाही पांडवांची विनंति आहे की येथे धर्मज्ञ सभासद उपस्थित असताना अनुचित गोष्ट वा अन्याय होऊ नये.
८. तुझ्या पुत्रांचा लोभ अनावर झाला आहे. त्यांना तूच आवर.
९. पांडव तुझ्या सेवेला तत्पर आहेत तसेच युद्धालाहि तयार आहेत. उचित काय ते तूंच ठरव.
हे भाषण अत्यंत मुद्देसूद आहे. पांडवांचा दावा स्पष्ट्पणे मांडून युद्ध झालेच तर त्याची जबाबदारी तुमचीच आहे असे बजावले आहे. दुसर्‍या महायुद्धाचे वेळी युद्ध करणारी दोन्ही राष्ट्रे एकमेकांकडे वकील पाठवून आमच्या मागण्या मान्य न केल्यात तर होणार्‍या युद्धाला जबाबदार तुम्हीच असे बजावत असत त्याची आठवण येते! लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पांडवांनी द्यूताच्या अटी पूर्ण केल्या आहेत असे कृष्ण स्वत: बजावून सांगत नाही! पांडवांचा तुला तसा निरोप आहे असे म्हणतो. पांडवांच्या दाव्यातील कच्चेपणा जाणवत असल्यामुळे त्यावर कमीतकमी भर दिलेला आहे!
यानंतर सभेमध्ये भाषण करून परशुरामाने सांगितले कीं अर्जुन व कॄष्ण हे नर-नारायणांचे अवतार आहेत, त्यांचेविरुद्ध तुम्ही जिंकू शकणार नाही. कण्वमुनीनेहि त्याला दुजोरा दिला. दुर्योधनाने त्यांच्या भाषणाची ’वटवट’ अशी वासलात लावली! व्यास, भीष्म, नारद यानीहि नानाप्रकारे समझावले. त्यांतल्या कोणीहि, पांडवांनी द्यूताच्या अटी पूर्ण केल्या आहेत त्यामुळे त्याना राज्य दिले पाहिजे असे म्हटले नाही! तूं जिंकू शकत नाहीस व सर्वनाश होईल म्हणून शम कर एवढेच म्हटले! मुख्य प्रष्नाला सर्वानीच बगल दिली. धृतराष्ट्राने अखेर दुर्योधनाला समजावण्याची आपली असमर्थता व्यक्त करून कृष्णाला म्हटले कीं तूंच त्याला समजाव. कृष्णाने नानाप्रकारे पांडवाची थोरवी सांगून व दु:शासन, कर्ण यांची निंदा करून समजावले. त्यानंतर पुन्हा भीष्म-द्रोणानी पुन्हापुन्हा सांगितले की युद्ध सुरू होण्यापूर्वीच शम करा. इतक्या सर्वांनी केलेले अप्रिय भाषण एवढावेळ मुकाट्याने ऐकून घेणार्‍या दुर्योधनाने अखेर कृष्णाला आपला मुद्देसूद जबाब ऐकवला. तो असा :-
१. तुम्ही सर्वांनी माझी निंदा करण्याचे मला काही कारण दिसत नाही.
२. पांडव स्वखुशीने द्यूत खेळले व सर्व राज्य व वैभव हरले, तरी अखेर वडिलांनी ते सर्व त्याना परत केले पण तरीहि मी त्याला विरोध केला नाही. त्यानंतर ते पुन्हा अनुद्यूतात हरले व त्याना वनवास – अज्ञातवास भोगावा लागला यात माझा काहीहि दोष नाही.
३. पांडवांनी अज्ञातवास पुरा केलेला नाही. त्यापूर्वीच ते ओळखले गेले.
४. पांडवांना वा त्यांच्या सहाय्यकाना भिऊन मी नतमस्तक होणार नाही. ताठ मानेने वागणे हेच माझ्या क्षात्रधर्माला उचित आहे. युद्धात वीरगतिहि मला प्रिय होईल.
५. वास्तविक पूर्वीच पांडवाना राज्य देणे उचित नव्हते. आम्ही लहान असताना, अज्ञानामुळे व भीतीने ते दिले गेले.
६. आता सुईच्या अग्रावर राहील एवढीहि भूमि पांडवाना मिळणार नाही.
अद्यापपर्यंत संयमाने व दरबारी रिवाजाना धरून होणार्‍या सभेतील कामाने या जबाबानंतर वेगळेच व अनिष्ट वळण घेतले. त्याचे वर्णन पुढील भागात.

Friday, July 25, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ५

इकडे पांडवांकडे कृष्ण कौरवदरबारात जाणार यावर बरीच चर्चा झाली. युधिष्ठिराने भीति व्यक्त केली कीं तुझा अपमान होईल वा तुला धोका होईल. कृष्ण म्हणाला की तूं माझी काळजी करू नको. माझा मी समर्थ आहे. भीमार्जुनानी प्रथम म्हटले कीं युद्ध टळेल असेच तू बोल. यावर कृष्णाने त्यांची हेटाळणी केली. तेव्हा रागावून दोघानीहि म्हटले की ’तू आमचे मन ओळखत नाहीस काय? कुलक्षय टळत असेल तर ठीकच पण नसेल तर आमचा प्रताप दिसेलच.’ कृष्णानेहि म्हटले की ’यशाची मुळीच आशा नाही पण लोकांनी आपल्याला बोल लावू नये यासाठी मी शेवटचा प्रयत्न करणार आहें’. सहदेव व सात्यकी या दोघानी मात्र म्हटले कीं ’आम्हाला अपमानांचा बदला घेण्यासाठी युद्धच हवे आहे!’ द्रौपदीने आपल्या सर्व घोर अपमानांची कृष्णाला आठवण देऊन म्हटले कीं ’भीमार्जुनाना शम हवा असेच वाटत असेल तर माझा वृद्ध पिता, माझे बंधुबांधव, माझे पुत्र व अभिमन्यु हेच लढतील व अपमानांचा बदला घेतील!’ कृष्णाने तिचे सांत्वन केले व तुला हवे तेच घडेल असे म्हटले. युधिष्ठिराचे मत विचारात घेऊन कॄष्णाने सर्व शस्त्रास्त्रे, सैन्य, सात्यकी व कृतवर्मा यांना बरोबर घेतले. अखेर निघतेवेळी अर्जुनाने पुन्हा स्पष्ट सांगितले कीं अर्धे राज्य किंवा युद्ध! अर्जुनाचा ठाम निर्धार ऐकून भीमाला फार हर्ष जाला.

इकडे कौरवांकडे, कृष्ण येतो आहे हे कळल्यावर, धृतराष्ट्राने त्याच्या स्वागताची जंगी तयारी केली. त्याच्यावर देणग्यांचा वर्षाव करण्याचा बेत केला. विदुराने त्याला खडसावले की तुझी सख्य करण्याची खरी इच्छा नाही पण तू कृष्णाला वश करून घेण्याची आशा करतो आहेस पण ती फोल आहे. तुझ्या स्वागताकडे तो ढुंकूनही पाहणार नाही. दुर्योधनाने याला दुजोरा दिला पण आपल्या स्वभावाप्रमाणे म्हटले की फार मोठा सत्कार केला तर तो भीतीपोटी आहे असे कृष्ण समजेल! उलट माझा तर त्यालाच पकडण्य़ाचा बेत आहे! यावर, हा दुर्योधन पापमार्गाने जात आहे व धृतराष्ट्रा तूंहि त्याचे अनुकरण करू इच्छितोस! मला हे ऐकवत नाही असे म्हणून विदुर सभेतून उठून गेला.

दुसरे दिवशी कृष्ण हस्तिनापुराला आला. भीष्मद्रोणानी त्याचे वाटेतच स्वागत केले. धृतराष्ट्राच्या वाड्यांत सर्वांचे क्षेम कुशल विचारून तो विदुराकडे गेला. तेथे कुंतीची भेट झाली. कुंतीने पांडवाना भोगाव्या लागलेल्या विपत्तींबद्दल शोक केला. पांडवाना, तुमचा पुरुषार्थ दाखवा असा स्पष्ट निरोप दिला. कृष्णाने सांत्वन केल्यावर मात्र, धर्माचा लोप न करतां व कपट न करतां पांडवांच्या हिताचे असे सर्व तू कर असे त्याला सांगितले. त्यानंतर कृष्ण दुर्योधनाला भेटला. त्याने स्वागत करून भोजनाचे आमंत्रण दिले ते मात्र कृष्णाने नाकारले. ’असें कां? तुझे-माझे काही भांडण नाही’ असे दुर्योधनाने म्हटल्यावर, ’पांडवांचा द्वेष तूं करतॊ आहेस व मी त्यांचा दूत म्हणून आलो आहे त्यामुळे तुझ्याकडे अन्नग्रहन मला उचित नाही, मी फक्त विदुराकडेच जेवेन’ असे म्हणून कृष्ण परत आला.

विदुराकडे भोजन होऊन रात्री विश्रांति घेताना विदुराने मत दिले की ’तुझे येणे योग्य नाही. दुर्यॊधन स्वत:च्या, कर्णाच्या व भीष्म-द्रोणांच्या बळावर विसंबून शम करण्यास मुळीच तयार नाही. तुझे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत. त्या दुष्टांच्या मेळाव्यात तू जाऊच नकॊ.’ कृष्णाने उत्तर दिले की ’मी कौरवांचाहि आप्त व मित्र आहे. शक्य असूनहि मी युद्ध टाळण्य़ाचा प्रयत्न केला नाही असे कोणी म्हणू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करून मला लोकनिंदा टाळावयाची आहे.’

या सर्व मतप्रदर्शनावरून असे दिसते की, सहदेव, सात्यकी, द्रौपदी व कुंती याना युद्धच हवे होते. भीम व मुख्यत्वे अर्जुन याना कुलक्षय नको होता. पण युद्धाची त्यांची तयारी होती. युधिष्ठिरालाहि कुलक्षय नको होता पण पांच गावे कां होईना, पण दुर्योधनाने दिलींच पाहिजेत म्हणजे द्यूताचा पण पुरा न केल्याचा ठपका येणार नाही असे वाटत होते. युद्ध झालेच तर त्याचा निर्णय काय लागेल याबद्दलहि तो साशंक असावा. अपमानांच्या बदल्य़ासाठी युद्ध त्याला आवश्यक वाटत नव्हते. खरे तर युद्ध अटळच आहे हेहि सर्वांना दिसत होते.

दुसर्‍या दिवशी कौरवदरबारात काय झाले ते पुढील भागात वाचा.

Thursday, July 24, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ४

संजय पांडवाना बनवण्य़ात अपेशी होऊन परत गेला व त्याने प्रथम धृतराष्ट्राची भेट घेतली. होणार्‍या युद्धाला कौरवच जबाबदार राहतील असे आपले स्पष्ट मत सांगून, पांडवांचा संदेश उद्यां दरबारात सांगेन असे म्हणून तो घरी गेला. अस्वस्थ होऊन धृतराष्ट्राने विदुराला बोलावून त्याच्याशी मसलत केली. त्याने अनेक सद्विचार सांगितले पण धृतराष्ट्र अखेर म्हणाला की मला सर्व पटते पण दुर्योधन समोर आला की माझी बुद्धि फिरते!
दुसरे दिवशी दरबारात धृतराष्ट्राने प्रथम, अर्जुन काय म्हणाला, असे संजयाला विचारले. संजयाने सांगितले कीं अर्जुनाने अनेक प्रकारे आपला निर्धार व्यक्त करून कळविले आहे कीं युद्धांत मी तुम्हा सर्वांचा खास नाश करीन तेव्हा भीष्म, द्रोण, कृप, विदुर यांचा सल्ला ऎका. भीष्म, द्रोणानी कबुली दिली कीं आपण अर्जुनापुढे टिकणार नाही. कर्णाने नेहेमीप्रमाणे, मी एकटाच सर्व पांडवाना मारीन, अशी प्रौढी मिरवली. भीष्माने धृतराष्ट्राला समजावले कीं यात काही अर्थ नाही. हा अनेक वेळा पांडवांकडून हरला आहे हे विसरू नका. द्रोणानेहि भीष्माला दुजोरा दिला. धृतराष्ट्राने नेहेमीप्रमाणे त्यांचेकडे दुर्लक्ष केले! त्याने संजयाला विचारले कीं कोणाच्या भरवशावर पांडव युद्धाला तयार झाले आहेत? आमचे बळ त्याना माहीत नाही काय? त्यावर संजयाने पांडवांकडील सर्व वीरांचे सविस्तर वर्णन केले. पुन्हा पलटी घेऊन, भीमार्जुनांची आपणाला वाटणारी धास्ती सांगून, कौरवांनी युद्ध न करणेच चांगले असे मला वाटते असे धृतराष्ट्र म्हणाला. त्याची धरसोड वृत्ति यातून दिसते.
यावर दुर्योधनाने म्हटले कीं द्यूतांनंतर लगेच सर्व यादव, पांचाल व इतर मित्र पांडवांकडे जमून आमचे पारिपत्य करण्यास तयार झाले होते तेव्हा मदतीला कोणी नसल्यामुळे मला भय होते तेव्हा भीष्म-द्रोणानी मला धीर दिला. आता तर त्यांच्याशिवाय इतरही अनेक वीर व प्रचंड सैन्य माझेपाशी जमले आहे. माझे बळ जाणूनच युधिष्ठिर फक्त पाच गावे मागतो आहे. मला पराभवाची मुळीच भीति वाटत नाही.
अशीच चर्चा पुन्हापुन्हा होऊन अखेर धृतराष्ट्राने दुर्योधनाला दाखवून दिले की भीष्म-द्रोण युद्धाला मुळीच उत्सुक नाहीत. यावर दुर्योधनाने स्पष्ट केले कीं माझा भरवसा मी स्वत:, दु:शासन व कर्ण यांच्यावरच आहे. आम्ही जिंकूं वा मरूं पण सुईच्या अग्रावर राहील एवढीहि भूमि मी जिवंत असेपर्यंत पांडवाना मिळणार नाही! कर्णाने पुन्हा बढाया मारल्या व भीष्माने त्याची निंदा केली. यावर कर्णाने ’भीष्मा तू चिरशांत झाल्यावरच माझा प्रताप सर्वजण पाहतील’ असे म्हणून सभात्याग केला. कौरवपक्षात ही एक मोठी फूट पडली! यानंतर संजयाने सर्वांना सांगितले की अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्ण स्वत:च पांडवांतर्फे शिष्टाई करण्यासाठी येणार आहे.
यापुढील घटना पुढील भागात वाचा.

Monday, July 21, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ३

धृतराष्ट्राने संजयाला पांडवांकडे जाण्यापूर्वी स्वत;चे विचार ऐकवले. त्यामध्ये त्याने सर्व प्रमुख पांडववीरांची त्याला वाटणारी भीति व धाक व्यक्त केला. कृष्णाने पांडवांच्या हितासाठीच पूर्वी शिशुपालाचा वध केला असे म्हटले. खरे तर तो काही पांडवांचा वैरी नव्हता, कृष्णाचा वैरी. तो जिवंत असता तर कौरवांना मिळाला असता असा धृतराष्ट्राचा अभिप्राय दिसतो. युद्धापूर्वीच पांडवांचे राज्य त्याना द्यावे हेच मला योग्य वाटते. तेव्हा संजया तू पांडवांना व कृष्णाला भेट व धृतराष्ट्र पांडवांशी सख्य करू इच्छितो असेच त्याना सांग, जे पांडवांचा क्रोध वाढवणार नाही वा युद्धाला कारण होणार नाही असेच समयोचित भाषण सभेत तू कर, असे धृतराष्ट्राने त्याला सांगितले. पण हे सर्व खोटे व वरवरचे होते. त्याला स्पष्ट दिसत होते कीं दुर्योधन, दु:शासन, कर्ण व शकुनि पांडवांचे राज्य परत देण्यास मुळीच तयार नाहीत व युद्धाच्या भीतीने तर नक्कीच नाहीत. मग संजयाला पाठवण्य़ात व मवाळपणे बोल असे त्याला सांगण्यात त्याचा खरा हेतु काय होता? पांडवसभेतील संजयाच्या भाषणात तो उघड झाला!
पांडवानी आपला मुक्काम विराटाच्या राज्यातील उपप्लव्य गावी ठेवला होता व अनेक राजे सैन्यासह तेथे जमले होते. संजय पांडवाना भेटला. युधिष्ठिराने हस्तिनापुरातील सर्वांचे बारकाईने कुशल विचारले. त्यात अश्वत्थामा, कृप, द्रोण आमच्यावर दोषारोप तर करीत नाहीत ना असेहि विचारले. संजयाने सुरवातीलाच सर्वांच्या हितासाठी तूच सलोखा कर असे युधिष्ठिराला विनवले. दरबारात सर्वाना उद्देशून बोलताना धृतराष्ट्र सलोखा करू इच्छितो असेच पुन्हा म्हटले. मात्र खुलासेवार बोलताना, तुम्ही सर्व शत्रूना मारून जिवंत राहिलात तरी ज्ञातिवधाचे दु:ख भोगत रहाल पण खरे तर भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, कर्ण, शल्य व इतर अनेक राजे यांचेविरुद्ध तुम्ही कसे जिंकाल असेहि म्हटले. युधिष्ठिराने जबाब दिला की युद्धाशिवाय आमचा हेतु साध्य झाला तर युद्ध कोणाला हवे आहे? पूर्वीचे सर्व विसरून मी सलोखा करीन पण इंद्रप्रस्थात माझे राज्य असूदे हस्तिनापुरात दुर्योधनाचे! यावर बोलताना संजयाचा पर्यायाने धृतराष्ट्राच्या मनातील खरा हेतु बाहेर पडला. संजय युधिष्ठिराला म्हणाला की युद्धाशिवाय जर दुर्योधन तुला राज्य देत नसेल तर तुम्ही वृष्णींच्या वा विराटाच्या राज्यात भीक मागून रहा पण राज्यासाठी युद्ध करू नका! जर तुम्ही राज्यासाठी ज्ञातिवधाला तयार होणार असाल तर दुर्योधनाने तुम्हाला वनात पाठवले हा धर्मच झाला म्हटले पाहिजे! तुम्हाला युद्धच पाहिजे होते तर द्यूत झाले तेव्हाच करणे योग्य होते. आता युद्ध केलेत तर भीष्मासह सर्वांच्या वधाचे पातक लागेल म्हणून युद्ध करू नको! युद्ध झाले तर त्याचा सर्व दोष पांडवाच्या माथी मारण्याचा धृतराष्ट्राचा कुटिल डाव स्पष्ट झाला!
युधिष्ठिराने व कृष्णानेहि जबाबात स्पष्ट सांगितले की राज्य देत असाल तरच युद्ध टळेल. अखेर कृष्णाने सामोपचाराचा अखेरचा प्रयत्न म्हणून स्वत: कौरवांकडे शिष्टाईसाठी जाण्याची तयारी दर्शवली. युधिष्टिराने संजयाला निरोप दिला, सर्वांचे कुशल पुन्हा विचारले व खुद्द दुर्योधनाला अखेरचा निरोप दिला की पांडव युद्धालाहि तयार आहेत व शांतीलाहि. व शांती रहावी यासाठी राज्याचा एक तुकडा, फक्त पांच गावे, आम्हाला दे व येथेच युद्धाचा शेवट होऊदे! मात्र तू जाणतोसच की मी शांतीला तयार असलो तरी युद्धालाहि समर्थ आहें! युधिष्ठिराचा सर्व सद्भाव, वडिलांचा मान राखण्याची वृत्ति त्याचबरोअर ठाम निश्चय हीं या निरोपातून स्पष्ट दिसून येतात. पांच गावांवर समाधान मानण्य़ाची तयारी दाखवून धृतराष्ट्राचा कुटिल डाव त्याने बरोबर उलटवला व युद्ध झाले तर कौरवच जबाबदार राहतील हे स्पष्ट केले. संजय परत गेल्यावर काय झाले ते पुढील भागात वाचा.

Thursday, July 17, 2008

कृष्णशिष्टाई -भाग २

दृपदाचा पुरोहित कौरवांकडे गेला न गेला तोंच सैन्य जमा करण्याचा उद्योग दोन्ही पक्षांकडे सुरू झाला. आमच्याकडे शेवटी या असे कृष्णाने स्पष्ट सांगितले असूनहि, सुरवातीलाच, अर्जुन व दुर्योधन दोघेही एकाच वेळी कृष्णाकडे गेले असे महाभारत म्हणते. कृष्ण स्वत: दुर्योधनाला मिळणे शक्यच नव्हते. मात्र बलरामाशी वितुष्ट टाळण्यासाठी काहीतरी तडजोड करणे भागच होते. त्यामुळे साहजिकच, सैन्यची मदत दुर्योधनाला व स्वत: फक्त नि:शस्त्र सहायक म्हणून अर्जुनाकडे, अशी वाटणी अनिवार्य होती. प्रचंड सैन्य स्वत:ला मिळाले व कृष्ण स्वत: युद्धात उतरणार नाही असा दिलासा मिळाला म्हणून दुर्योधन खूष झाला. अर्जुनाला कृष्णाच्या सारथ्याची व सल्ल्याची किंमत ठाऊक होती. त्याला हवे ते मिळाले. कृष्णाच्या निर्णयाचा मुख्य फायदा म्हणजे बलरामाने युद्धापासून पूर्णपणे दूर राहाण्याचे ठरवले. कृष्ण-बलराम वितुष्ट टळले. इतर अनेक यादववीरहि स्वस्थ बसले. सात्यकी व कृतवर्मा यानी आपल्या आवडीप्रमाणे पांडव व कौरवांचा पक्ष एकेक अक्षौहिणी सैन्यासह घेतला. अर्जुन व दुर्योधन एकाच वेळी कृष्णाकडे आले तेव्हा तो झोपला होता, दुर्योधन डोक्याशी व अर्जुन पायांशी बसला वगैरे प्रसंग मात्र अगदीच हरदासी आहे! जे निर्णय कृष्णाने घेतले ते अनिवार्यच होते!
इतर कित्येक राजे आपापल्या विचारांप्रमाणे एकेका पक्षाला मिळाले. त्यांत नकुलसहदेवांचा मामा शल्य कौरवपक्षाला मिळाला हे एक नवलच. त्याचा खुलासा अज्ञातवासावरील माझ्या लेखात केला आहे. पांडवानी त्याचे सहाय्य गृहीत धरले असावे. त्याला आपल्या बाजूला वळवण्यात दुर्योधनाचा मुत्सद्दीपणा दिसून आला. कौरव सैन्याचा सेनापति भीष्म होणार हे उघड होते. त्याखालोखाल द्रोण, कर्ण, कृप, अश्वत्थामा होते. या सार्‍यांना डावलून शल्य कौरवांचा सेनापति होणे शक्यच नव्हते. तरीहि दुर्योधनाने शल्याला तूं सेनापति हो अशी विनंति केली. भीष्म-द्रोण युद्धविन्मुख राहिले तर? अशी कदाचित त्याला शंका असावी! या सन्मानाचा शल्याला मोह पडला असे दिसते.
द्रुपदाचा पुरोहित कौरवदरबारात पोचला. त्याने मुद्दे मांडले कीं धृतराष्ट्राने मुळात कौरवांच्या राज्याचा हिस्सा पांडवाना दिलाच नव्हता! इंद्रप्रस्थाचे नवे राज्य पांडवानी स्वपराक्रमाने मिळवले. द्यूतामुळे ते कौरवांच्या ताब्यात गेले. आता पांडवानी द्यूताची अट पुरी केली आहे तेव्हा ते त्याना परत मिळाले पाहिजे. त्यानी मोठे सैन्य जमा केले आहे व ते स्वत:ही फार प्रबळ आहेत तेव्हा युद्ध झालेच तर त्यांचा विजय ठरलेलाच आहे! तेव्हा आपल्या वचनाप्रमाणे विनाविलंब त्यांचे राज्य त्याना परत द्या!
उत्तरादाखल भीष्म काही बोलत असतानाच त्याला अडवून कर्णाने मुख्य मुद्दा मांडला की अज्ञातवास पुरा होण्यापूर्वीच पांडव ओळखले गेले तेव्हा राज्य मागण्यापूर्वी त्यानी पुन्हा बारा वर्षे वनवास भोगावा. पांडवांच्या युद्धाच्या धमकीला आम्ही मुळीच घाबरत नाही. भीष्माला कर्णाच्या आगाऊपणाचा राग आलेला पाहून, धृतराष्ट्राने त्याला चुचकारून, दूताला सांगितले की आम्ही तुझ्या म्हणण्याचा विचार करून मग संजयाला युधिष्ठिराकडे आमचा दूत म्हणून पाठवतो. हा निरोप घेऊन द्रुपदाचा पुरोहित परत गेला. द्रुपदाच्या अपेक्षेप्रमाणे कौरवपक्षात फूट पडू लागली! संजयाला धृतराष्ट्राने काय पढवून पाठवले हे पुढील भागात पहा.

Monday, July 14, 2008

कृष्णशिष्टाई - भाग १

महाभारताच्या मुख्य कथेशी बहुसंख्य भारतीय परिचित असतात. पांडव व कौरवांमध्ये द्यूत व अनुद्यूत होऊन पांडव दोन्हीत हरले व आपले राज्य कौरवांच्या हवाली करून त्याना बारा वर्षे वनवास अ एक वर्ष अज्ञातवास सोसावा लागला. त्यानंतर कौरवानी त्यांचे राज्य परत देण्याचे नाकारले त्यामुळे अखेर दोन्हीमध्ये भीषण युद्ध झाले व कुळाचा संहार झाला. हे युद्ध टाळण्यासाठी पांडव अज्ञातवासातून प्रगट झाल्यापासून पुढील काही महिने समेटाचे अनेक प्रयत्न झाले. कृष्णाने कौरव दरबारात पांडवांचे बाजूने शिष्टाई केली ती त्यातील अखेरची घटना. त्या प्रयत्नांची ही कथा आहे.
अर्जुन गायी लुटण्यासाठी आलेल्या कौरवांच्या प्रतिकारासाठी युद्धाला उभा राहिला व ओळखला गेला तेव्हाच अज्ञातवास संपला. पांडव त्यानंतर तीन दिवसानी विराटासमोर स्वरूपात उभे राहिले. विराटाने आपली कन्या अर्जुनाला देऊ केली पण अर्जुनाने तिचा सून म्हणून स्वीकार केला. अर्थातच ती अभिमन्यूलाच वयाने जुळणारी होती. त्या विवाहाच्या निमित्ताने पांडवपक्षाचे अभिमानी व समर्थक असे सारे यादव व पांचाल वीर एकत्र जमले होते. विवाह आटोपल्यावर आता पांडवाना त्यांचे राज्य कसे परत मिळवून द्यावयाचे याचा विचार सुरू झाला. त्यानिमित्ताने झालेल्या चर्चा, विचारविनिमय, दूतांची देवेघेव, राजकारणाचे डावपेच यात काही महिन्यांचा काळ गेला. तो दोन्ही पक्षानी सैन्याची जमवाजमव व इतरांचे सहाय्य मिळवण्यासाठी वापरला. या दीर्घ राजकीय घडामोडींमध्ये बुद्धिकौशल्य, डावपेच, राजकारण याचे अनेक चित्तवेधक नमुने पहावयास मिळतात. यांचा आता तपशीलवार परामर्ष घ्यावयाचा आहे.
विराटाच्या दरबारातील चर्चेने या घडामोडीना सुरवात झाली. पांडवांचे वतीने प्रथम भाषण करून कृष्णाने त्यानी भोगलेल्या हाल अपेष्टांचे वर्णन केले व त्यानी स्वपराक्रमाने कौरवांच्या राज्यात जी इंद्रप्रस्थाची भर घातली ते राज्य परत मिळवण्यासाठी एखादा धर्मशील, कुलीन, दक्ष असा दूत कौरवांकडे पाठवावा असा प्रस्ताव मांडला. यावेळी कृष्णाने असा स्पष्ट दावा केला कीं पांडवानी वनवास व अज्ञातवासाची अट पुरी केली आहे. यावर, प्रचलित चांद्रवर्ष गणनेप्रमाणे तेरावे वर्ष पांडवानी पुरे केलेले नाही असे कोणी म्हटले नाही. बलरामाने मात्र दूत पाठवण्यास अनुमोदन दिले पण कौरवानी अन्याय केल्याचा आरोप धुडकावून लावला. द्यूताचे वेळी पांडवाच्या झालेल्या अपमानाना त्याने युधिष्ठिरालाच जबाबदार धरले कारण शकुनीसारख्या कुटिल द्यूतप्रवीणाशी तो स्वत:हून बेफामपणे द्यूत खेळला होता. यादववीर व अर्जुनाचा मित्र व शिष्य असलेल्या सात्यकीने प्रत्युत्तरात, अज्ञातवास पुरा झाल्याचे कौरवाना मान्य नाही याची दखल घेतली व अखेर युद्ध करावे लागेलच असे म्हटले. द्रुपदाने सात्यकीला अनुमोदन दिले व दुर्योधनाशी मृदु भाषणाचा उपयोग नाही तेव्हा सरळ सैन्य जमवण्यास सुरवात करावी व राजेलोकांकडे दूत पाठवून सहाय्य मागावे असा युद्धबेत सुचवला. मात्र उपचार पाळण्यासाठी स्वत:चा पुरोहित दूत म्हणून पाठवावा असे सुचवले. कृष्णाने दूताला काय कार्य सांगावयाचे ते द्रुपद व विराट यानी ठरवावे, सख्य न झाल्यास मग राजांकडे दूत पाठवावे, आम्हा यादवांचा दोन्ही पक्षांशी नातेसंबंध असल्यामुळे ( बलरामाची कन्या दुर्योधनाची सून होती) आमच्याकडे शेवटी यावे असा उपसंहार केला. आपण व बलराम यांच्यात मतभेद होऊन वितुष्ट येण्याची भीति एव्हाना कृष्णाला स्पष्ट दिसूं लागली होती व ते कृष्णाला टाळणे भाग होते त्यामुळे त्याने सुरवातीला थोडे दूर राहण्याचे ठरवले असे दिसते!
सख्य प्रयत्नातील पहिली पायरी म्हणून द्रुपदाने आपल्या पुरोहिताला कौरवांकडे पाठवले. त्याला त्याचे काम काय हे द्रुपदाने समजाविले. त्याने त्याला स्पष्टच सांगितले की कौरव पांडवांचे राज्य परत देण्याची मुळीच शक्यता नाही. तुझ्या बोलणी करण्यामुळे निदान काही कौरव योदध्यांचे मन आपल्या बाजूला वळवणे, भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा व दुर्योधन यांच्यात काही मतभेद निर्माण होणे, कौरवांच्या सैन्यसंघटनास बिलंब घडवणे हे तुझ्या जाण्याचे खरे हेतु आहेत! द्रुपदाची राजकीय परिपक्वता यात स्पष्ट दिसते. यापुढील घटना पुढील भागात पाहूंया.

Wednesday, July 9, 2008

देवयानीची कथा - भाग २

देवयानीच्या कथेचा उत्तरार्ध म्हणजे देवयानी, ययाति व शर्मिष्ठा यांची त्रिकोणी प्रेमकथा. ययाति कादम्बरी व ययाति-देवयानी हे नाटक यामुळे ही कथाही मराठी वाचकांना सुपरिचित आहे. देवयानीचा हट्टी, आग्रही व पोरकट स्वभाव या कथेत स्पष्ट दिसतो. शर्मिष्ठेने केलेल्या आपल्या व आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिला स्वत:ची दासी व्हावयास लावले तरी ती देवयानीची मैत्रीणच राहिली. तिच्यावरचा राग फार टिकला नाही. तिला देवयानीने प्रत्यक्षात दासी म्हणून वागवले नाही. देवयानीचा ययातीशी विवाह झाल्यावर शर्मिष्ठा तिच्याबरोबरच गेली. काही काळाने शर्मिष्ठेने स्वत:च ययातीला वश करून घेतले हे खरे पण असा काही प्रकार होऊ घातला आहे याची देवयानीला कल्पनाच नव्हती. ती बेसावधच होती. शर्मिष्ठेला तीन पुत्र झाले तरी देवयानीला पत्ताच नव्हता! शर्मिष्ठेला पहिला पुत्र झाला तेव्हा ऋषीपासून मला पुत्र झाला असे तिने सांगितले व देवयानीने ते खरे मानले. ती स्वत:च्या सुखोपभोगात दंग होती व निष्काळजी राहिली किंवा तिने कळूनसवरून काणाडोळा केला! शर्मिष्टेचा विवाह होणार नव्हता पण पतिसुखापासून तिला पूर्णपणे वंचित ठेवण्याएवढा तिचा अपराध घोर नव्हता याची जाणीव असल्यामुळे कदाचित दुर्ल्क्ष केले असावे. सत्य सामोरे आल्यावर तिने शुक्राचार्याकडे धाव घेतली पन तक्रार काय केली तर शर्मिष्ठेला तीन पुत्र आणि मला मात्र दोनच! शुक्राचार्याने ययातीला शिक्षा केली पण शर्मिष्ठेला वा तिच्या पुत्रांना शिक्षा केली नाही. ययातीचे शुक्राचार्याच्या शापामुळे आलेले वार्धक्य शर्मिष्ठेच्याच पुत्राने पत्करले व ययातीनंतर तो पुत्र पुरु हाच राजा होऊन त्याचा वंश पौरव या नावावे प्रख्यात झाला. दुष्यंत व भरत हे पौरव वंशाचे. शुक्राचार्याच्या शापामुळे आलेले वार्धक्य पुत्राला घेण्यास सांगताना माझी कामसुखाची आसक्ति अद्याप संपलेली नाही असे म्हणताना ययातीने देवयानीबरोबरच शर्मिष्ठेचाही उल्लेख केला. देवयानी वा शुक्राचार्य यांनी त्याला आक्षेप घेतला नाही हे नवलच. सर्वांनी जणू शर्मिष्ठेचे पत्नीपद मान्यच केले! यापुढील ययातीची कथा एक उत्कृष्ठ बोधकथा आहे व ययाति कादंबरी व महाभारत दोन्हीकडे सारखीच आहे.
शकुंतला व देवयानी यांच्या कथा स्वभावचित्रण, काव्यमयता व तत्वविचार या तिन्ही अंगानी परिपूर्ण व रमणीय आहेत व अनेक साहित्यकृतीना जन्म देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. कवि वा नाटककार थोडेफार कल्पनास्वातंत्र्य घेणारच. मात्र मूळ महाभारतातील कथाही खूपच वेधक आहेत त्या वेधकतेचा परिचय करून देण्याचा प्रयत्न मी केला आहे.

Tuesday, July 1, 2008

देवयानीची कथा भाग - १

आतां महाभारतांतील दुसरे उपकथानक पाहूया. हे कथानक कच, देवयानी, ययाति व शर्मिष्ठा यांचे आहे. या कथानकाने खाडिलकरांचे विद्याहरण व शिरवाडकरांचे ययाति-देवयानी हीं दोन नाटके व वि. स, खांडेकरांची गाजलेली ययाति कादंबरी या तीन प्रमुख व सुपरिचित साहित्य कृतीना जन्म दिला आहे. या लेखकानी महाभारतातील मूळ कथेमध्ये मोठे फेरफार केलेले दिसून येत नाहीत. या साहित्यकृतींमुळे ही कथा सुपरिचित आहे. त्यामुळे मूळ कथेची तपशीलवार उजळणी न करतां मला जाणवलेल्या काही खास गोष्टींचाच उल्लेख करणार आहे.
देवगुरु बृहस्पति व दैत्यगुरु शुक्राचार्य यांचेतील स्पर्धा कच-देवयानीच्या प्रेमाच्या आड आली असे विद्याहरण नाटकावरून वाटते. ब्रह्नदेवाचे अंगिरस व भृगु हे दोन पुत्र. बृहस्पती हा अंगिरसपुत्र व कवि हा भृगुपुत्र. शुक्राचार्य हा भृगुपुत्र व कच हा बृहस्पतिपुत्र म्हणजे कच व शुक्र हे एकाच कुळातील व नात्याने भाऊ. त्यामुळे, कच व देवयानी यांचे काका-पुतणीचे नाते होते. हे नाते त्यांच्या विवाहाच्या आड आले काय? देवयानीची विवाहाची याचना नाकारताना मात्र कचाने हे कारण सांगितलेले नाही. कचाने देवयानीची अभिलाषा धरू नये असे शुक्राचार्याने कधीच म्हटले नाही. कच व देवयानी समवयस्क होतीं व देवयानीचे प्रेम कचालाही हवे होते. देवांनी कचाला शुक्राचार्याकडे पाठवले तेव्हा त्यांचाहि तोच हेतु होता की कचाला देवयानी व संजीवनी विद्या दोन्ही मिळवतां येतील! देवयानीचे कचावर खरेखुरे प्रेम होते. त्यापोटी पित्याला गळ घालून तिने कचाला वारंवार जिवंत करविले. अखेर दैत्यांच्या अविचारामुळे कचाची राख शुक्राचार्याच्या पोटात गेल्यामुळे त्याला जिवंत केले तर शुक्र मरणार असा पेच पडल्यावरहि तिने अगतिकपणे, मला तुम्हीहि हवेत व कचहि हवा असा हट्ट धरला. नाइलाजाने, इच्छेविरुद्ध, शुक्राचार्याला कचाला संजीवनी विद्या द्यावी लागली. जिवंत झालेल्या कचाने शुक्राचार्याला जिवंत केले. विद्याहरण नाटकात दाखवल्याप्रमाणे तो लगेचच देवलोकाला गेला नाही तर दीर्घकाळ शुक्रापाशी राहून तपाचरण केले असे महाभारत म्हणते. त्यानंतर तो देवलोकी जाण्यास निघाला तेव्हा देवयानीने, आपल्याला वरावे अशी त्याला विनंति केली ती त्याने नाकारली. तपाचरणाच्या काळात त्याने देवयानीबद्दलचे आकर्षण मनातून काढून टाकले असावे. संसार हा आपला मार्ग नाही व आपण देवयानीला सुखी करू शकणार नाही हे त्याने ओळखले होते. तिचा उतावळा व रागीट स्वभावहि त्याने जाणला असणार. शुक्राचार्याने मला पुनर्जन्म दिल्याने आपले भावाबहिणीचे नाते झाले आहे हे त्याने पुढे केलेले कारण खरे नव्हते. त्यांचे खरे नाते काका-पुतणीचे होते. कचाने नाकारल्यावर रागीट देवयानीने ’संजीवनी विद्या तुझ्या कामास येणार नाही’ असा त्याला शाप दिला. त्यामुळे त्याचे काहीच अडणार नव्हते. आवश्यक तर त्याने ती विद्या देवलोकी इतर कोणाला दिली असती! त्यानेहि तिला उलट शाप दिला की कोणीहि ब्राह्मण तुला वरणार नाही. पुढे ययाति हा क्षत्रिय पतिच तिला लाभला.
कचाची कथा हे एक रूपक असावे असे मला वाटते. गुरु-शुक्र हे ग्रह, कच हा गुरूचा उपग्रह, त्याचे मृत्यु व पुनर्जन्म म्हणजे त्याची ग्रहणे, एक ग्रहण खुद्द शुक्राच्या मागे (शुक्राच्या उदरात) गेल्यामुळे झालेले, तो शुक्राच्या पाठीमागून बाहेर पडताना प्रथम शुक्र तेजोहीन (मृत) व नंतर पुन्हा तेजस्वी (जिवंत) होणे असा काही खगोलशास्त्रीय प्रकार या कथेमध्ये रूपक रूपाने सांगितलेला असावा अशी माझी कल्पना आहे. याला आधार काहीहि नाही! गुरु,शुक्र हे ग्रह आहेत, देवयानी, शर्मिष्ठा, ययाति,वृषपर्वा हे सर्व तारे-तारका आहेत. कचाचा तारा नाही. यावरून दुसरा तर्क म्हणजे कच हा गुरूचा उपग्रह नसून एखादा धूमकेतू असावा! तो प्रथम गुरूजवळ (म्हणून गुरुपुत्र), मग शुक्राजवळ, दिसणे, नंतर शुक्रामागे जाऊन न दिसणे, मग पुन्हा दिसू लागणे व दीर्घकाळ शुक्राच्या जवळपास दिसून मग दिसेनासा होणे असा काही घटनाक्रम या कथेने सुचवला आहे काय अशी कल्पना मला सुचते! याहि कल्पनेला आधार नाहीच!
देवयानीच्या कथेचा उत्तरार्ध पुढील भागात पाहू.

Friday, June 27, 2008

महाभारतातील शकुंतला - भाग ४

महाभारत म्हणते, शकुंतला पुत्रासह निघाली तेव्हा अशरीरिणी वाणी झाली कीं ’दुष्यंता, हा तुझाच पुत्र आहे तेव्हां याचा स्वीकार करणे तुझे कर्तव्य आहे.’ तेव्हा दुष्यंताने मान्य केले व पुत्र व भार्या यांचा स्वीकार केला. अशरीरिणी वाणी झाली म्हणजे माझ्या मते, उपस्थित ऋत्विज, पुरोहित, आचार्य, व अमात्य यानी दुष्यंताची कान उघाडणी केली असेल, समजूत घातली असेल, तुझ्या आश्रमभेटीना आम्हीहि साक्षीदार आहोत असे बजावले असेल. स्वीकार केल्यावर मात्र आपल्या वर्तणुकीच्या समर्थनासाठी दुष्यंत शकुंतलेला म्हणाला कीं तुझा माझा संबंध नगरात कोणाला माहीत नव्हता. पुरुषाला मोहात पाडणे हा स्त्रियांचा स्वभाव असल्यामुळे तूं तसेच केले असशील व वर आपल्या पुत्राला राज्य मिळाले पाहिजे असा आग्रह धरून बसली आहेस असेंच सार्‍या लोकाना वाटले असते. म्हणून मी तुझा उतावळेपणाने स्वीकार केला नाही. तुला अनावर क्रोध यावा असे मी वागलो हे खरे आहे.’ हे सर्व म्हणून झाल्यावर मग त्याने उच्चारलेले वाक्य मात्र आश्चर्यकारक आहे! तो म्हणतो ’त्यानंतर तू मला जे कटु शब्द ऐकवलेस त्याबद्दल, लाडके, मी तुला क्षमा केली आहे.’ खासा न्याय! अपराध कोणाचा व क्षमा कोणाला!
महाभारतातील या मूळ कथेमध्ये दुष्यंताच्या चित्रणाला उजाळा देण्यासाठी कालिदासाने घुसवलेला दुर्वासाचा शाप, मेनकेने दुष्यंताच्या दरबारातून शकुंतला-भरत याना थेट स्वर्गात घेऊन जाणे, दुष्यंताला माशाच्या पोटातली अंगठी पाहून स्मृति येणे, त्याची विरहावस्था, दुष्यंताने इंद्राच्या मदतीसाठी स्वर्गात जाणे, तेथे भरताला अचानक पाहणे, मग शकुंतलेची भेट व स्वीकार, यातील काहीहि नाही! तेव्हा दुष्यंताचे कालिदासकृत उदात्तीकरण बाजूला ठेवून, त्याच्या वर्तणुकीचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे.
ज्याअर्थी, आपला पुत्र युवराज व्हावा ही शकुंतलेची मीलनापूर्वीची मागणी दुष्यंताने बेलाशक मान्य केली होती त्याअर्थी त्याला पत्नी असली/असल्या तरी पुत्रलाभ झालेला नसावा असे मानण्यास हरकत नाही. (भीष्मपिता शंतनु याला सत्यवतीची अशीच मागणी मान्य करता आली नाही.) भरताच्या जन्माआधी काही काळ दुष्यंताचे शकुंतलेला भेटणे बंद झाले असावे. त्यामुळे भरताच्या जन्माची त्याला कदाचित माहिती नसेल. त्याच्या प्रथम आश्रमभेटीला अनेक साक्षीदार होते. नंतरच्या भेटीहि गुप्त थोड्याच राहिल्या असणार? पण शकुंतला भरताला घेऊन दरबारात उपस्थित झाल्यावर, खुद्द दुष्यंत मान्य करीत नाही तोवर अमात्य वा पुरोहित स्वत:हून काय करणार? शकुंतलेने निकराच्या गोष्टी बोलल्यावर अखेर त्यानीच राजाला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली असणार व अन्यायापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असेल. दरबारातील मंडळींचे मत अनुकूल आहे असे दिसल्यावर मग दुष्यंतालाही शकुंतलेचा स्वीकार करण्याचा धीर आला! या सर्व प्रसंगवर्णनात, इतर राजस्त्रिया वा राजकुमारांचा उल्लेख कोठेहि नाही. दुष्यंतामागून भरताला निर्विघ्नपणे राज्य मिळाले, त्याअर्थी दरबारी राजकारणाचा वा वारसांचा प्रश्न नव्हता, तरीहि सुरवातीला दुष्यंताने शकुंतलेचा स्वीकार न करता उलट असभ्यपणे तिचा अपमान केला तो कां याचा खरेतर पुरेसा उलगडा होत नाही. दरबारी लोक वा जनमत यांचा कौल होईपर्यंत सत्य स्वीकारण्याचा त्याला धीर झाला नाही हे खरे.
या महाभारतातील मूळ कथेमध्ये शकुंतलेचे चित्रण अतिशय ठसठशीत व मनोज्ञ आहे. तिने पति व पिता यांची कर्तव्ये, पितृत्वाचे अवीट सुख व सत्याची असाधारण महति याचे केलेले वर्णन सुंदर आहे. स्वमनाची साक्ष असत्य भाषण करणाराला धुडकावून लावणे अशक्य असते हे प्रतिपादन अप्रतिम आहे. दुष्यंताचा दोष सौम्य करण्यासाठी कालिदासाने त्याला व शकुंतलेला दुर्दैवाची शिकार बनवले आहे यात तिच्यावर अन्यायच केला आहे असे मला वाटते.

Friday, June 20, 2008

महाभारतातील शकुंतला - भाग ३

दुष्यंतासमोर आल्यावर शकुंतलेने पूर्वी त्याने दिलेल्या वचनांची आठवण देऊन त्याप्रमाणे वाग अशी मागणी केली. (श्लोक१६-१८). पुढील श्लोकांत स्पष्ट उल्लेख आहे कीं राजाला सर्व गोष्टी चांगल्या आठवत होत्या! तरीहि राजाने शकुंतलेची ओळख व झालेला गांधर्वविवाह सरळसरळ (निर्लज्जपणे!) नाकारला!
शकुंतला ओशाळली, खजिल झाली, तिला भोवळ आली, दु:खाने ती सुन्न झाली. पण त्याचबरोबर संतापाने तिचे डोळे लालबुंद झाले, ओठ थरथरले, ती बेभान झाली. पण भावनांचा कल्लोळ बाहेर पडू न देतां, स्वत:चे तेज मलिन होऊ न देतां तिने दुष्यंताची सरळ खरडपट्टी काढली, निर्भर्त्सना केली. तिचे सर्व भाषण श्लोक २४ ते ७२ मध्ये येते. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. विस्तारभयास्तव ते सर्व उद्धृत करता येणार नाही. ही कालिदासाची असहाय अबला नाही,वाघीण आहे. ती शोक करीत नाही., स्वत:ला दोष देत नाही. तिने दुष्यंताला अनेक प्रकारे समजावले. ती म्हणाली – महाराज, आपणास सारे माहीत असतां आपण एख्याद्या असंस्कृत रासवट माणसाप्रमाणे मला काही माहीत नाही असे बेलाशक खोटे कसे बोलता? खरे काय व खोटे काय याला आपले मनच साक्षी असते. माझा मी एकटा आहे असे माणसास वाटत असते पण हृदयस्थ ईश्वराच्या नजरेतून कोणतेहि पाप सुटत नाही. दुसर्‍या कोणा साक्षीदाराची गरजच काय असा तिचा मुद्दा होता. नंतर तिने भार्या व पुत्र यांची महती अनेक प्रकारानी विशद करून सांगितली. मुंगीसारखा क्षुद्र प्राणीहि आपल्या संततीचे जतन करतो, तेव्हा पुत्राचा स्वीकार करून त्याचे जतन करणे हे तुझे कर्तव्य आहे असे दुष्यंताला बजावले. शेवटी असेहि म्हटले की तूं माझा त्याग केलास तर मी माझ्या आश्रमात परत जाईन पण तू तुझ्या पुत्राचा त्याग करू नकोस.
एवढे सर्व ऐकूनही दुष्यंताने मानले नाहीच. त्याने शकुंतलेची व तिच्या मातापित्यांची निंदानालस्ती केली. मुख्य शंका व्यक्त केली कीं हा मुलगा लहान वयाचा आहे म्हणतेस मग हा एवढा थोराड व दणकट कसा? हा माझा मुलगा नाहीच. तूं जें काही बोललीस त्यातले काहीहि मला मान्य नाही. मी तुला ओळखत नाही. तू वाटेल तिकडे निघून जा!
शकुंतलेने यावर पुन्हा त्याच्या वाकडे बोलण्य़ाबद्दल त्याची खरड काढली. पुत्रमहति पुन्हा वर्णन करून पुत्राचा त्याग करणे तुला शोभत नाही, स्वत:बरोबर सत्याचे रक्षण करणे तुझे कर्तव्य आहे असे म्हणून सत्याची महति नानाप्रकारे वर्णन केली. शंभर विहिरी बांधण्य़ापेक्षा एक तळे बांधणे श्रेष्ठ, शंभर तळ्य़ांपेक्षा एक यज्ञ चांगला, शभर यज्ञांपेक्षा एक पुत्र चांगला, पण शंभर पुत्रांपेक्षाहि सत्य श्रेष्ठ! हजार अश्वमेध व सर्व वेदांचे अध्ययन यांहूनही सत्य श्रेष्ठ ठरेल. एवढे बोलल्यावर तिने व्यक्त केलेला स्वाभिमान तर केवळ अजोड आहे. ती पुढे म्हणाली की तू जर असत्याचीच कास धरणार असशील तर तुझ्यासारख्याशी संबंधच नको! ही पहा मी निघाले. दुष्यंता, तुझ्याखेरीजही हा माझा पुत्र पृथीचे राज्य करीलच! एवढे बोलून ती पुत्रासह निघाली. यावेळी काय झाले? पुढील भागात वाचा.