पांडवांचा उत्कर्ष सहन न होऊन व युधिष्ठिराला युवराजपद व कालांतराने राजपद मिळणार हे पाहून दुर्योधनाने धृतराष्ट्राला अनुकूल करून घेऊन त्याचे करवीं पाडवांना वारणावतास पाठवले व त्यांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा कट रचला. पांडव हस्तिनापुरांतून द्ज़ुर जाणे धृतराष्ट्राला नक्कीच हवे होते. पुढचा बेत त्याला कदाचित माहीत नसेल. या बेतांत कर्ण सामील होता काय? त्याचा या दुष्ट बेतात सहभाग नव्हता. त्याला बेत बहुधा माहीत नव्हता. असा बेत त्याला पसंत पडला असता असे वाटत नाही.
यानंतर महाभारतात कर्णाचा उल्लेख द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी येतो. पांडव लाक्षागृहातून वांचून, पुष्कळ हाल अपेष्टा सोसून, ब्राह्मणवेषात स्वयंवराला आले होते. स्वयंवराच्या सुरवातीलाच धृष्टद्युम्नाने फक्त मत्स्यवेधाचा पण जिंकणे पुरेसे नसून, उच्चकुल, आकर्षक व्यक्तिमत्त्व हींहि आवश्यक असल्याचे स्पष्ट्पणे सांगितले होते. स्वयंवराला अनेक राजे आले होते. पण जिंकण्याचा प्रयत्न करणारांच्यात कृष्ण, सात्यकी वा इतर यादव धनुर्धराचा समावेश नाही. इतर क्षत्रिय राजे पण जिंकू शकत नाहीत असे दिसून आल्यावर मगच, कर्ण पुढे झाला. द्रौपदीने ताबडतोब, ’मी सूतपुत्राला वरणार नाही’ असें म्हटले. यांत कर्णाचा अपमान झाला असे आजच्या दृष्टिकोनातून विचार करणार्या काहींना वाटले तरी ते खरे नाही. क्षत्रिय राजकन्या द्रौपदी आपणाला वरील काय याचा कर्णानेच प्रथम विचार करावयास हवा होता. एक प्रकारे त्याने हात दाखवून अवलक्षण करून घेतले असेच म्हणावे लागते. या प्रसंगी कोणीहि द्रौपदीला वा द्रुपदाला दोष दिलेला नाही. कर्ण हा कुंतीपुत्र आहे हे कोणाला माहीत नव्हते पण ते माहीत असते तरीहि त्याचा पिता ब्राह्मण वा क्षत्रिय असल्याशिवाय त्याला क्षत्रियांत स्थान मिळणे शक्य नव्हते. कर्ण ही एक वर्णसंकरातून निघालेली जात असा स्पष्ट उल्लेख अ. ११५, श्लोक ४०-४४ मध्ये आहे. (धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांच्या यादीत दुष्कर्ण, कर्ण व विकर्ण अशी तीन नावे आहेत. हे अर्थातच गांधारीचे पुत्र नव्हेत! बहुधा, दुर्योधन व दु:शासन हे दोघेच गांधारीचे पुत्र असावे. धृतराष्ट्राने ’तूं माझ्या सर्वात ज्येष्ठ राणीचा सर्वात ज्येष्ठ पुत्र आहेस’ असे दुर्योधनाला संबोधिलेले आढळते. धृतराष्ट्राच्या इतर स्त्रियांचा उल्लेख आहेच. युयुत्सु यालातर स्पष्टपणे दासीपुत्र म्हटलेले आहे. दु:शासन सोडून इतर कोणीहि भाऊ दुर्योधनाच्या फारसे खिसगणतीत नव्हते. यावरूनहि ते त्याचे सख्खे भाऊ नसावे असा तर्क निघतो.)
कर्णाला पण जिंकण्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागला. त्याला पण जिंकता आला असता काय? या प्रष्नाचे उत्तर अर्थातच देता येणार नाही! इतर अनेकांना यश आले नव्हते. ब्राह्मणवेषांतील अर्जुनाने पण जिंकला याचा इतर क्षत्रिय राजांना अपमान वाटला व त्यानी अर्जुनाला घेरले. याप्रसंगी इतर क्षत्रिय राजांबरोबर कर्णहि अर्जुनाविरुद्ध युद्धाला उभा राहिला. खरे तर क्षत्रिय राजांच्या मान-अपमानाशी कर्णाचा काय संबंध? त्याला आपले शौर्य दाखवण्याची खुमखुमी आली! पण जिंकणारा ब्राह्मण म्हणजे अर्जुन हेहि अजून उघड झाले नव्हते. अर्जुनाने भीमाच्या मदतीने सर्वांना भरपूर झोडपले. हें कर्णाचे व अर्जुनाचे प्रथमच प्रत्यक्ष युद्ध होते. कर्णाचे अर्जुनापुढे काही चालले नाही. हा आपल्या तोडीस तोड आहे अशी अ. १९०, श्लोक १६-१९ मध्ये कर्णाची स्पष्ट कबुली आहे! ब्रह्मतेजापुढे काही चालत नाही अशी लटकी सबब सांगून कर्ण स्वस्थ बसला! कर्णाला पूर्वीपासूनच पाडवांबद्दल अकारण असूया व द्वेष वाटत होता त्यात आतां द्रौपदीच्याहि द्वेषाची भर पडली.
आपण कुंतीपुत्र आहोत हें कर्णाला हा वेळ्पर्यन्त माहीत झाले होते असे महाभारत म्हणत नाही. मात्र खुद्द अधिरथ वा त्याचा कोणी जवळचा आप्तच माझ्या तर्काप्रमाणे कर्णाचा पिता असेल तर, केव्हांतरी, आपली माता कुंती हे त्याला कळणे शक्य आहे. अशा गोष्टी कोठून तरी फुटतातच! भारतीय युद्धापूर्वी प्रथम कृष्णाने व नंतर कुंतीने स्वत:च, तो कुंतीपुत्र असल्याचे त्याला सांगितले तेव्हा त्याने आश्चर्य व्यक्त केलेले नाही! मात्र पिता कोण हे रहस्य कुंतीने तेव्हाही उघड केलेले नाही. सूर्यापासून जन्म हीच कथा कायम ठेवली. देवापासून माणसाचा जन्म हे अमान्य केले तर तर्क करण्यावाचून पर्याय नाही. म्हणून कर्ण हा खरा सूतपुत्रच असा तर्क मी केलेला आहे.
या स्वयंवरप्रसंगात कर्णाचे व्यक्तिमत्त्व उजळून निघालेले म्हणता येत नाही. महाभारतकारानी अर्जुनापुढे त्याला डावाच ठरवला आहे.
यापुढील कर्णचित्रण पुढील भागात वाचा.
महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
No comments:
Post a Comment