आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Tuesday, March 3, 2009

स्फुट प्रकरणे - भाग ६

रुरु आणि प्रमद्वरा
महाभारताच्या आदिपर्वात सुरवातीला भृगुऋषींच्या कुळातील अनेक व्यक्तींच्या कथा आहेत. त्यांतील एक पुरुष म्हणजे रुरु. भृगूचा पुत्र च्यवन, त्याचा पुत्र प्रमति व त्याला घृताची नावाच्या अप्सरेपासून झालेला पुत्र म्हणजे रुरु. रुरुचा पुत्र शुनक व नातू शौनकऋषि. हा ऋषि व त्याचे सहकारी यांनी एक द्वादशवर्षीय यज्ञसत्र केले. त्या सत्रासाठी जमलेल्या अनेक ऋषिमुनींना, संध्याकाळच्या वेळी, सूत लोमहर्षण याचा पुत्र, सौति नावाचा पुराणिक, मनोरंजनासाठी अनेक कथा सांगत असे. पूर्वी व्यासांनी परीक्षितपुत्र जनमेजयाला त्याच्या पूर्वजांच्या कथा सांगितल्या होत्या. तो मूळ ’जय’ग्रंथ. (परीक्षित हा पांडवांचा नातू अभिमन्यूचा पुत्र. आपला मृत्यु समीप आल्यावर त्याला युधिष्ठिराने हस्तिनापुराच्या राज्यावर स्थापित केले होते.) त्या ’जय’ ग्रंथांतिल कथा सौतीने खूप विस्ताराने सांगितल्या व ’जय’चे महाभारत झाले. असा रुरूचा महाभारताशी दूरचा संबंध आहे.
रुरुला शुनक हा पुत्र प्रमद्वरा या त्याच्या पत्नीपासून झाला. रुरु आणि प्रमद्वरा यांची कथा ही एक प्रेमकहाणीच आहे.
विश्वावसु नावाच्या गंधर्वराजापासून मेनका अप्सरेला प्रमद्वरा ही कन्या झाली. मात्र जन्मत:च मेनकेने तिला स्थूलकेश नावाच्या ऋषीच्या आश्रमाजवळ नदीकाठी ठेवून दिले व ती ’निर्घृण व निर्लज्ज स्त्री’ (महाभारतकारांचे वर्णन) खुशाल चालती झाली. तीच ही मेनका, जिने शकुंतलेला असेच जन्मत:च कण्वमुनींच्या आश्रमापाशी सोडून दिले होते! यावेळींहि तिच्या कन्येला स्थूलकेश ऋषींनी उचलले व तिचा सांभाळ केला व लहानाची मोठी केली. ती रूपवान व गुणवान असल्यामुळे तिचे प्रमद्वरा असे नाव पडले.
रुरु हा एक विद्वान ऋषि होता. एकदा प्रमद्वरा काही कारणाने रुरूच्या नजरेला पडली व त्याचे तिच्यावर प्रेमच जडले. त्याने मित्रांतर्फे ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली. त्यांनी स्थूलकेशाकडे प्रमद्वरेसाठी रीतसर मागणी घातली व ती मान्य होऊन रुरु व प्रमद्वरा यांचा विवाह ठरला. मात्र विवाह होण्यापूर्वी काही दिवस आधी, प्रमद्वरा मैत्रिणींसह क्रीडा करत असताना चुकून तिचा पाय एका झोपलेल्या भुजंगावर पडला. त्याने तिला दंश केला व ती कोसळली. अनेक ऋषि व रुरु जमा झाले पण ती गतप्राणच झाली. सर्वजण शोकमग्न झाले. रुरु एकटाच वनात जाऊन आक्रोश करत बसला. तिची आठवण काढून तो स्वत:शी म्हणत राहिला कीं माझ्या हातून जर तपश्चर्या, दान व गुरुसेवा घडली असेल तर माझी प्रिया जिवंत होवो. बराच काळ त्याने असा विलाप केल्यावर एक देवदूत आला व त्याला समजावूं लागला कीं ’हिचे आयुष्यच संपले आहे त्याला काय करणार? तुझे आयुष्य तूं तिला देतोस काय?’ रुरूने म्हटले कीं ’माझ्या उरलेल्या आयुष्यातील अर्धे आयुष्य तिला मिळो व ती जिवंत होवो’ (सर्व आयुष्य देऊन काय उपयोग कारण मग रुरुच मरून जाणार!) मग तो देवदूत व गंधर्वांचा राजा यमधर्माकडे गेले व त्यांनी रुरूसाठी रदबदली केली. यमानेहि ते मान्य केले. रुरूच्या उरलेल्या दीर्घ आयुष्यातील अर्धे प्रमद्वरेला मिळाले व ती जिवंत झाली! मग रुरु आणि प्रमद्वरेचा विवाह झाला.
मात्र रुरूने सर्पांचा दीर्घद्वेष धरला व हातात दंड घेऊन, सापडेल त्या सर्पाला तो मारीत सुटला. एकदां एका निर्विष सर्पालाही तो मारूं पहात असताना त्या सर्पाने त्याला उपदेश केला कीं ’अशा तर्‍हेचे आचरण तुला ब्राह्मणाला शोभत नाही. तूं हे सोड. पूर्वी राजा जनमेजयाने पिता परीक्षित याचा मृत्यु तक्षक नागाच्या दंशामुळे झाला या रागापोटीं सर्पयज्ञ केला व अनेक सर्प यज्ञाग्नीत जळाले. सर्पकुल नष्ट होण्याची वेळ आली होती तेव्हां आस्तीक या ब्राह्मण ऋषीनेच त्याला थांबवले होते व सर्पकुल वांचवले होते. तसे वागणे हेच तुला शोभेल.’ त्याचे म्हणणे मानून रुरूने सर्प मारणे बंद केले. अशी ही रुरु-प्रमद्वरा यांची प्रेमकहाणी.

Sunday, February 22, 2009

स्फुट प्रकरणे - भाग ५

परशुराम कथा
महाभारतांतील परशुरामकथा ही देखील आपल्या समजुतीपेक्षा थोडी निराळी आहे.
परशुरामाचा पिता जमदग्नि. हा भृगुचा नातू व ऋचीकाचा पुत्र. तो वेदवेत्ता व सर्व शास्त्रांचा व शस्त्रांचाहि जाणकार होता. मात्र जमदग्नि म्हणजे शीघ्रकोपि अशी आपली समजूत असते तसा तो नव्हता! परशुरामाची माता रेणुका ही राजा प्रसेनजित याची कन्या म्हणजे क्षत्रियकन्या. रेणुका व जमदग्नि यांचे चार पुत्र, त्यांत परशुराम सर्वात लहान. स्नानासाठी नदीवर गेलेली असताना जलक्रीडा करीत असलेल्या राजा चित्ररथावर, ( कार्तवीर्यावर नव्हे!) क्षणभरासाठी कां होईना, रेणुकेचे मन गेले. त्या मानसिक व्यभिचाराने रेणुका निश्चेष्ट होऊन पाण्यात पडली. आश्रमात परत आली तेव्हां तिची अवस्था जमदग्नीने ओळखली व तिचा धि:कार केला. चारही पुत्र क्रमाने आश्रमांत आले तसतसे जमदग्नीने प्रत्येकाला आईला मारून टाकावयास सांगितले. मोठ्या तिघांनीहि नकार दिला. त्यांना पित्याने रागाने शाप दिले. चौथ्या परशुरामाने मात्र आज्ञेप्रमाणे परशूने आईचे मस्तक तोडले. जमदग्नीचा क्रोध एकदम शमला व त्याने परशुरामाला ’वर माग’ असे म्हटले. परशुरामाने मागितलेले वर लक्षणीय आहेत. ’आई जिवंत व्हावी, मी मारल्याची तिला स्मृति राहूं नये, मानसिक पापाचा स्पर्श तिला न व्हावा, भावांचे शाप परत घ्यावे, आणि स्वत: युद्धात अजिंक्य व दीर्घायुषी व्हावे’ असे ते वर होते. व ते सर्व पित्याने त्याला दिले.
जमदग्नीचे सर्व पुत्र आश्रमाबाहेर गेले असताना एकदां राजा कार्तवीर्य सहस्रार्जुन आश्रमांत आला. रेणुकेने त्याचे योग्य ते स्वागत केले तरीहि त्याने आश्रमाचा विध्वंस केला. (जमदग्नीला मारले नाही!) परशुरामाने परत आल्यावर ते पाहून रागावून कार्तवीर्यावर चाल करून त्याचा वध केला. पुढे एकदा परशुराम आश्रमात नसताना पुन्हा कार्तवीर्याच्या पुत्रांनी आश्रमांत येऊन, जमदग्नीवर हल्ला करून त्याला मारून टाकले. परशुराम परत आल्यावर पितृहत्या पाहून त्याने फार विलाप केला व युद्ध करून त्याने सर्व कार्तवीर्य पुत्राना व त्यांच्या मदतनीस सर्व क्षत्रिय राजाना मारले. वारंवार झालेल्या युद्धांमुळे एकवीस वेळां पृथ्वी नि:क्षत्रिय झाली. नंतर यज्ञ करून परशुरामाने सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली. कश्यपाने त्याला आपल्याला दान केलेल्या भूमीवर वसती करण्यास मनाई केली. त्यामुळे परशुराम महेद्रपर्वतावर वसती करूं लागला. परशुरामाने नवीन वसवलेल्या कोकण भूप्रदेशात हा महेंद्रपर्वत असल्याचे मानले जाते. नंतर कधीहि परशुराम रात्री इतर कोठे राहत नसे. याचा इतरत्रहि उल्लेख आहे. रामाने शिवधनुष्य तोडले तेव्हां व भीष्माने अंबेचा स्वीकार करण्याचे नाकारले तेव्हां त्याने त्या दोघांना शिक्षा करण्याचा त्याने प्रयत्न केला पण दोन्ही प्रसंगी तो हरला. त्याचे बळ संपले होते व क्षत्रिय राजे पुन्हा प्रबळ झाले होते. या कथेप्रमाणे जमदग्नीच्या वधाचा दोष कार्तवीर्याला नव्हे तर त्याच्या पुत्रांना दिलेला आहे. तेव्हां ’सहस्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला’ हे दशावतार आरतीतील वर्णन बरोबर नाही!

Saturday, February 7, 2009

स्फुट प्रकरणे भाग ४

अणिमांडव्यांची कथा
मांडव्य नांवाचे एक विद्वान व पुण्यशील ऋषि तपश्चर्येसाठी ध्यानस्थ बसलेले असताना एक चोर त्यांचे आश्रमांत आला. व दडून बसला. पाठलाग करणार्‍या शिपायांनी मांडव्यांकडे चौकशी केली तेव्हा मौनव्रत असल्यामुळे ते काही बोलले नाहीत. चोर आश्रमांतच सांपडल्यावर रागाने शिपायांनी त्याचेबरोबर मांडव्यांनाहि पकडून राजापुढे उभे केले. अविचारी राजाने चोराबरोबर मांडव्यांनाही सुळावर चढवले. सुळावर चढवलेले मांडव्य बराच काळ पर्यंत यातना भोगत जिवंत राहिले. रखवालदारांनी राजाला हे कळवल्यावर त्याने अमात्यांशी चर्चा करून ऋषीना खाली उतरवले व क्षमायाचना केली. सुळावरून उतरवताना त्याचे टोक (अणि), तुटून ते मांडव्यांच्या शरीरात तसेच राहिले. त्यामुळे त्यांचे नाव अणिमांडव्य पडले. ऋषीनी राजाला क्षमा केली पण जेव्हा यमाच्या दरबारात गेले तेव्हा त्यानी यमालाच जाब विचारला कीं माझ्या कोणत्या घोर अपराधामुळे मला सुळावर यातना भोगाव्या लागल्या? यमाने उत्तर दिले कीं तूं लहान असताना एका पाखराला काडीने टोचले होतेस त्याचे फळ तुला भोगावे लागले.!
या विलक्षण कथेचा पुढील भाग महत्वाचा आहे. मांडव्य ऋषीनी हे ऐकून यमधर्माला दोष दिला व शापहि दिला. मूल बारा वर्षांचे होईपर्यंत जें करील त्याला धर्म/अधर्म ठरवता येत नाही. कारण तोंवर त्याच्या बुद्धीला ती ताकद आलेली नसते. तेव्हा मूल १४ वर्षाचे होईपर्यंत त्याच्या कृत्याची पापात गणना करू नये व त्याला शिक्षाही होऊ नये असा दंडक त्यानी यमधर्माला घालून दिला! गुन्हा व शिक्षा यांचेमध्येहि प्रमाण राखले पाहिजे असाहि विचार त्याचेपुढे मांडला व ’माझ्या क्षुद्र पापाला एवढी कठोर शिक्षा तूं कशी दिलीस?’ असा त्याला जाब विचारला!’या गुन्ह्याबद्दल तुला मनुष्यजन्म घ्यावा लागेल’ अशी शिक्षाही फर्मावली! यमधर्माचा मनुष्यावतार म्हणजे पांडु-धृतराष्ट्रांचा भाऊ विदुर होय.
या कथेमध्ये मांडव्यांनी इतक्या पुरातन काळात मांडलेला, गुन्हा व शिक्षा यांमध्ये प्रमाण हवे हा विचार व १४ वर्षांपर्यंत अजाण मानून गुन्ह्याला शिक्षा नसावी हाही विचार आजच्या काळातहि सर्व पुढारलेल्या मानवसमाजांमध्ये न्यायाचे तत्त्व मान्यता पावलेला आहे हें विषेश!

Tuesday, February 3, 2009

स्फुट प्रकरणे - भाग ३

शिष्यांची परीक्षा.
आदिपर्वामध्ये धौम्य ऋषि व त्यांचे तीन शिष्य यांची एक छोटीशी कथा आहे. विद्या देण्यापूर्वी धॊम्यांनी आपल्या आरुणी, उपमन्यु व वेद या तीन शिष्यांची कठोर परीक्षा घेतली. शेतात शिरणारे पाणी अडवण्यासाठी बांध घालण्याचे काम आरुणीला सांगितले. त्याला ते जमेना तेव्हा बांधातील भगदाड अडवून तो स्वत:च झोपून राहिला. (आपल्या शरीराचाच बांध केला.) तो बराच वेळ दिसेना तेव्हा त्याला शोधत गुरु स्वत: शेतात आले व त्यानी आरुणीला जोरात हांक मारली तेव्हा तो बांधातून उठून आला.त्याने धोका पत्करून केलेलें आज्ञापालन पाहून गुरु प्रसन्न झाले व मग त्याला विद्या दिली.
दुसरा शिष्य उपमन्यु. त्याला गुरे राखायला पाठवीत पण काही खावयास मिळत नसे. तो गायींचे दूध प्यायचा. वासरांच्या वाटचे दूध तूं पिऊं नको असे त्याला गुरु म्हणाले. मग तो फक्त फेस प्यायचा. त्यालाहि गुरूनी बंदी केली. मग उपासमार झाल्यामुळे त्याने एकदां रुईचीं पाने खाल्ली> त्यामुळे तो आंधळा झाला व विहिरीत पडला. गुरूना कळल्यावर ’अश्विनीकुमारांची स्तुति कर’ असे त्याला सांगितले. त्याना प्रसन्न करून त्यांच्याही परीक्षेला उतरल्यावर त्याला पुन्हा दृष्टि मिळाली. मग प्रसन्न होऊन गुरूनेहि सर्व विद्या दिली.
तिसरा शिष्य वेद नांवाचा होता तो बुद्धीला कमी होता. त्याला गुरुशुश्रूषेचे काम मिळाले. इतर कामाबरोबर गुरु त्याला नित्य बैलाप्रमाणे जोखडालाहि जुंफत. बराच काळ असे कष्ट केल्यावर त्याचेवरहि गुरुकृपा झाली!
या कथेतील शेवटचा भाग लक्षणीय आहे. वेद हा शिष्य ज्ञानसंपन्न होऊन गृहस्थाश्रमी झाल्यावर त्यालही तीन शिष्य मिळाले. वेदाने मात्र त्यांना काहीहि काम सांगितले नाही! गुरुगृहीं वास म्हणजे केवढे विलक्षण कष्ट याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव होता. गुरुशिष्यपरंपरेने विद्या मिळवण्यासाठी गुरुगृहीं राहताना आजच्या युगात भीमसेन जोशी यांनी काढलेल्या अपार कष्टांची आठवण अपरिहार्यपणे येते.

Thursday, January 22, 2009

स्फुट प्रकरणे - भाग २

उपरिचर वसूची कथा :
उपरिचर नावाचा एक धर्मशील राजा होऊन गेला. आपल्या उग्र तपश्चर्येने हा एक दिवस इंद्रपदाला योग्य होईल या भीतीने देवांनी त्याला तपश्चर्येपासून परावृत्त केले. इंद्राने त्याला, ’तूं पृथ्वीवर नित्य तत्पर राहून धर्मपालन व धर्माचा प्रतिपाळ कर, चेदि देश जिंकून तूं त्याचा राजा हो’ असे सांगितले. आपलें स्फटिकाचे गगनविहारी विमान त्याला दिले व वैजयंती माळ दिली. आपली नित्य आठवण रहावी म्हणून सज्जनाम्चा प्रतिपाळ करणारी एक कळकाची काठी त्याला दिली. इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी उपरिचर राजाने ती काठी जमिनीत रोवली व तिची पूजा केली. दुसरे दिवशी या काठीवर शेल्यासारखे एक वस्त्र बांधीत व तिची पूजा करीत. ही काठीची पूजा म्हणजे इंद्राचीच पूजा होय.
या कथेतील रूपके मला उलगडली नाहीत पण यांत गुढीपाडव्याच्या प्रथेचे मूळ स्पष्ट दिसते. मात्र आजकाल गुढीपाडव्याच्या प्रथेच्या या मूळ कथेचे स्मरण फारसे कोणाला नाही! गुढीला आपण शालिवाहनाच्या विजयाचे प्रतीक मानतो. इंद्रपूजा मानत नाही.
व्यासांची माता सत्यवती ही या उपरिचर वसूची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होय. महाभारतात सत्यवती ही धीवरांना मत्स्यीच्या पोटांत मिळाली व त्यांनी तिला राजा उपरिचराकडे नेऊन दिले असे म्हटले आहे. मत्स्यीच्या पोटात एक बालकही मिळाला होता. मात्र राजाने मुलाला ठेवून घेतले व कन्येला धीवरालाच देऊन ’तूंच हिचा सांभाळ कर’ असे सांगितले! पुत्र पुढे मत्स्य देशाचा राजा झाला. ती मत्स्यी एक शापित अप्सरा होती असे महाभारत म्हणते व ती उपरिचराच्या वीर्यापासून गर्भवती झाली असेंहि म्हणतें! याचा सरळ अर्थ धीवर स्त्रीला राजापासून हीं दोन अपत्ये झाली असाच घेतला पाहिजे. राजाने कन्येला कां स्वीकारले नाही याबद्दल महाभारत गप्प आहे. राजा जनकाने व द्रुपदाने शेतात व यज्ञात मिळालेल्या (कोणापासून झालेल्या?) कन्या सीता व द्रौपदी यांचा स्वीकार केला व त्याना राजकन्या म्हणूनच वाढवले हे विषेश! ते भाग्य सत्यवतीला मिळाले नाही.

Thursday, January 15, 2009

महाभारतातील स्फुट प्रकरणे - भाग १

या लेखात आता काही स्फुट प्रकरणांचा परामर्ष घ्यावयाचा आहे. यांत काही नवीन वा आजच्या काळाला सुसंगत अशा गोष्टी नजरेला आल्या त्याबद्दल लिहावयाचे आहे.
अक्षौहिणी :
भारतीय युद्धात अठरा अक्षौहिणी सैन्य दोन्ही पक्ष मिळून लढले. बहुतेक सर्व राजांनी एकेक अक्षौहिणी सैन्य आणले होते. कृष्णाने आपले तीन कोटि गोपालांचे सैन्य दुर्योधनाला दिले होते. मात्र कौरवांच्या अकरा अक्षोहिणी सैन्याच्या मोजदादीत हे कृष्णाचे सैन्य अजिबात मोजलेले दिसत नाही.

एक अक्षौहिणी म्हणजे काय याचा पूर्ण खुलासा दिलेला आहे. १ रथ, १ हत्ती, ३ घोडे व ५ पायदळ सैनिक मिळून १ पत्ति होते. ३ पत्ति म्हणजे एक सेनामुख व त्यानंतर ३-३ च्या पटीत गुल्म, गण, वाहिनी, पृतना, चमू, अनीकिनि व अक्षौहिणि असे कोष्टक दिलेले आहे. एकूण एका अक्षौहिणीत २१८७० रथ, तितकेच हत्ती, ६५६१० घोडे व १,०९,३५० पायदळ समाविष्ट होत. नवल म्हणजे, आजहि ३ सैनिक म्हणजे एक ग्रूप, ३/४ ग्रूपचा एक सेक्शन, मग त्याच पटीत प्लॅटून, कंपनी, बटालियन, ब्रिगेड, डिविजन, कोअर अशीच व्यवस्था असते! मधल्या काळात, युरोपियन, मुघल, मराठे वा इतरांच्या सैन्याचीहि अशीच व्यवस्था असे काय?
अक्षौहिणीतील रथ व हत्ती यांची तुलना टॅंक, आर्टिलरी (तोफखाना) यांच्याशी होईल. घोडदळाची जागा आता चिलखती वाहनानी घेतली आहे. काही पायदळाच्या डिव्हिजन्स, आर्टिलरी डिविजन्स, आर्मर्ड डिव्हिजन्स एकत्र करून बनणार्‍या आर्मीची अक्षौहिणीशी तुलना करता येईल. अशा कित्येक आर्मी ग्रूप दुसर्‍या महायुद्धात दोन्ही पक्षांतर्फे लढले. एकेका राजाचे एक अक्षौहिणी सैन्य चतुरंग व स्वयंपूर्ण होते.
अठरा अक्षौहिणी सैन्य म्हणजे एकूण २५ लाख माणसे एवढ्याशा कुरुक्षेत्रावर कशीं लढलीं असतील? दुसर्‍या महायुद्धात काही शहरांसाठी झालेल्या युद्धात, उदाहरणार्थ स्टालिनग्राड, मॉस्को वगैरे, दोन्ही पक्षांकडून सात आठ लाख सैन्य लढले पण तीं युद्धक्षेत्रे खूप विस्तृत होतीं. भारतीय इतिहासातील मोठ्या लढायांत, उदा. तालिकोट, पानिपत वगैरेत ४-५ लाखांवर मजल गेली नव्हती. तेव्हां महाभारतांतील आकडेवारी खूप अतिशयोक्त म्हटली पाहिजे.

Saturday, January 3, 2009

विराम

प्रिय वाचक,
या ब्लॉगवर महाभारतातील काही विषयांवर मी लेखन केले ते आपणास साधारणपणे पसंत पडले असे दिसले. माझ्या मनात असलेले सर्व विषय पुरे झालेले असल्यामुळे या ब्लॉगवरील लेखन मी (सध्यातरी) थांबवत आहे. पुढे कधी काही नवीन सुचले तर पुन्हा लिहीन. आपल्या प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
अशाच प्रकारचे काही लेखन रामायणावर करण्याचा विचार आहे व त्यासाठी नवीन ब्लॉग लवकरच सुरू करणार आहे. आपण वाचाल अशी आशा आहे. ब्लॉग सुरू झाला की ’मराठी ब्लॉग विश्व’ वर दिसेलच
प्र. के. फडणीस.