आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Friday, December 31, 2010

’स्टार माझा’ स्पर्धा

आज महाभारत थोडे बाजूला ठेवावे म्हणतो. (एवीतेवी आता ते संपतच आले आहे!)
ठरल्याप्रमाणे रविवार दि. २५ डिसेंबरला ’स्टार माझा’च्या वरळी येथील स्टुडिओत स्पर्धेचा बक्षीससमारंभ पार पडला. सर्वच स्पर्धक उपस्थित राहिले नव्हते तरी उपस्थिति चांगली होती. माझ्या या ब्लॉगला बक्षीस असल्यामुळे मी उत्सुकतेने गेलो होतो. ’हे TV Channel चे शूटिंग म्हनजे काय असते रे भाऊ?’ अशी मुख्य उत्सुकता होती! कार्यक्रम मजेत पार पडला. बर्‍याच ब्लॉगलेखकांचा कमीजास्त परिचय झाला. अनेकांचे चेहेरे ब्लॉगांवर पाहिलेले होते. श्री. प्रमोद देवहि उपस्थित होते. त्यांचेशी अनेकवार बोललो होतो, ई-मेलची देवघेव झाली होती. त्याना प्रत्यक्ष भेटता आले. परीक्षकांशी गप्पा मारून त्यांचा दृष्टिकोन समजावून घेतां आला. श्री. प्रसन्न जोशी यानी नावाप्रमाणे प्रसन्नपणे कार्यक्रम नेटका घडवून आणला.
काही ब्लॉगलेखकानी आपाअपली प्रशस्तिपत्रे हौसेने ब्लॉगवर टाकलेली पाहिली तर म्हटले आपलेहि टाकूया! मला भेटवस्त म्हणून एक Speaker cum Mike मिळाला. तो म्हणे bluetooth वर चालतो! आता हे काय नवीन लचांड? माझ्याकडे त्यातला फोन किंवा इतर काही Gadget नाही. मग मला याचा काय उपयोग होणार असे वाटले. मग Manual वाचून पाहिले तेव्हा कळले कीं त्याचा साधा speaker म्हणूनहि उपयोग करतां येईल. मग सरळ Computerलाच जोडला आणि गाणे ऐकतां आले. म्हटले चला speaker तर speaker.
तेव्हा खालचे फोटो पहा.
प्र. के. फडणीस







Friday, December 24, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ८

पांडव वनवासाला गेले. त्यांची खबरबात हस्तिनापुराला कळत होतीच. पांडवांना हिणवण्यासाठीं दुर्योधन व कर्ण यांनी गायींचीं खिल्लारे तपासण्याच्या निमित्ताने वनांत त्यांच्या सन्निध जाऊन त्यांना आपल्या वैभवाचे प्रदर्शन घडवावे व त्यांची दैन्यावस्था पहावी म्हणून द्वैतवनात दौरा काढला. हा बेत धृतराष्ट्राला पसंत नव्हता आणि भीष्महि त्याला मान्यता देणार नाही असे त्याने दुर्योधनाला म्हटले. दुर्योधनाने बापाची समजूत काढली अन भीष्माला विचारलेच नाहीं! एव्हांना दुर्योधनाने व कर्णाने भीष्माला काडीइतकीहि किंमत द्यायची नाही असेच ठरवले होते! भीष्म तरीहि हस्तिनापुराला चिकटून राहिला ! कां कोण जाणे.
कौरव वनात गेले तेथे त्यांचा गंधर्वांशी झगडा होऊन सडकून मार मिळाला. कर्ण दुर्योधनाला सोडून जीव वाचवण्यासाठी पळून गेला. दुर्योधन गंधर्वांचा बंदी झाला. अखेर पांडवांनी दुर्योधनाला मुक्त केले. भयंकर अपमान सोसून सगळे हस्तिनापुराला परत आले. यावेळी मात्र भीष्माने ’कर्ण पांडवांच्या चौथ्या हिश्शानेहि नाही’ असें दुर्योधनाला ऐकवलें. दुर्योधन व कर्ण यांनी नेहमी प्रमाणे भीष्माकडे पूर्ण दुर्लक्ष केले. भीष्म तरीहि अपमान सोसत हस्तिनापुरातच राहिला!
पांडव अज्ञातवासात असताना त्याना शोधण्याच्या दुर्योधनाच्या प्रयत्नांमध्ये भीष्माने उत्साहाने भाग घेतला. जणूं पांडवांना शोधून काढून पुन्हा वनवासाला धाडण्यात त्याला स्वत:ला काहीच वावगे वाटत नव्हते आणि त्याला तेच हवे होते! एवढा तो पांडवांच्या विरोधात कां गेला असावा? विराटाचा सेनापति असलेल्या कीचकाच्या वधानंतर त्रिगर्त राजाच्या सूचनेप्रमाणे विराटावर हल्ला करून त्याचीं गायींचीं खिल्लारे लुटण्याच्या दुर्योधनाच्या बेतातहि तो सहभागी झाला. खरे तर कौरवांचे व विराटाचे काही पुराणे वैर नव्हते मग त्याने दुर्योधनाला विरोध कां केला नाहीं?
महाभारतात स्पष्टपणे म्हटलेले नाही पण सूचित केले आहे कीं कीचकाच्या वधाची बातमी ऐकून दुर्योधनाला वाटले कीं हा वध भीमाशिवाय दुसर्‍या कोणी केला असणे असंभव आहे. त्रिगर्तराजाची सूचना त्याने स्वीकारली यामागे विराटाच्या आसर्‍याला पांडव असतील तर विराटाच्या मदतीला ते युद्धात उतरतीलच व ओळखता येतील असा त्याचा विचार होता असे दिसते. भीष्म वा विदुराला अशी शंका आली असती तर विराटावर हल्ला करण्याचा बेत त्याना कदाचित मोडून काढतां आला असता. भीष्माने तसा प्रयत्न केला असता काय हा प्रष्नच आहे! कौरवांचा हल्ला पहिल्या दिवशी सप्तमीला झाला असता तर अर्जुन नव्हे तर भीम कौरवांशी युद्धाला आला असता व तोहि लगेच ओळखला गेला असताच. प्रत्यक्षात त्रिगर्तांचा हल्ला सप्तमीला दुपारी झाला. त्रिगर्तांच्या विरुद्ध भीम लढला व त्याने मोठा पराक्रम गाजवला पण सुदैवाने, त्रिगर्ताला त्याला ओळखता आले नाही. युधिष्ठिराने त्याला ’इतरांप्रमाणेच लढ, झाड उपटून घेण्यासारखे तुझे खास प्रकार करूं नको, नाहीतर ओळखला जाशील’ असे बजावले होते.
प्रत्यक्षात कौरवांचा हल्ला दुसर्‍या दिवशी अष्टमीला सकाळीच झाला. विराटाचे वतीने त्याचा पुत्र उत्तर व अर्जुन युद्धाला उभे राहिल्यावर कौरवांनी अर्जुनाला लगेच ओळखलें व ’तेरावे वर्ष पुरे होण्यापूर्वीच अर्जुन ओळखला गेला आहे’ असे दुर्योधनाने लगेच म्हटले. द्रोणाचार्यांनी, ’पांडवांनी असे कसे केले’ अशी शंका व्यक्त केल्यावर भीष्माने सौरवर्ष व चांद्रवर्ष यांचे गणित उलगडून ’आज सकाळीच, सौरमानाने पांडवांनी तेरा वर्षे पुरीं केलीं आहेत’ असें म्हटलें. (कौरवांचा हल्ला एक दिवस आधी झाला असता तर तेहि झाले नसते!) चांद्रमानाने आवश्यक तेवढे अधिक महिने मोजून तेरा वर्षे उघडच पुरीं झालेलीं नव्हती. मग पांडवांनी अनुद्यूताचा पण पुरा केला असे ठरते कीं नाहीं याबद्दल भीष्माने स्वत:चे नि:संदिग्ध मत, अनुकूल वा प्रतिकूल, तेव्हां (वा नंतर पुढे केव्हांहि, कृष्णशिष्टाईचे वेळीं देखील) दिलेच नाहीं! अर्जुनापासून कर्णाला व कौरवांना यावेळीं वांचवून हस्तिनापुराला परत नेण्याचें काम मात्र त्याने केलें.

Wednesday, December 15, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ७

पांडवानी इंद्रप्रस्थ राजधानी वसवली. राजसूय यज्ञाचा बेत केला. त्यासाठी जरासंधाला मारले. दिग्विजय केला. यज्ञाच्या वेळी सर्व कौरव उपस्थित होते. यज्ञानंतर अग्रपूजेचा मान कृष्णाला देण्याचा सल्ला भीष्माचा. तो पांडवांना मानवला. शिशुपालाने कडाडून विरोध केला. भीष्मालाहि दुरुत्तरे केलीं. भीष्माने त्याला अतिशय तुच्छतेने झिडकारले. अखेर कृष्णाने त्याला मारले. भीष्माला हा अतिरेक टाळतां आला असता काय? या अतिप्रसंगाच्या छायेखाली यज्ञ पुरा झाला.
पांडवांच्या दरार्‍याचा व वैभवाचा हेवा वाटून शकुनीच्या सल्ल्यावरून दुर्योधनाने द्यूताचा बेत ठरवला व धृतराष्ट्राच्या गळीं उतरवला. भीष्माला विचारले नाही पण कळले असणारच. द्यूत होऊं नये यासाठी त्याने कांहींहि केलेले नाहीं. त्याने स्पष्टपणे धृतराष्ट्राला निक्षून सांगितले असते तर बहुधा द्यूत टळले असते पण भीष्म स्वस्थ बसला. पांडव हस्तिनापुरात आल्यावर सर्वांना भेटले व द्यूत दुसर्‍या दिवशीं झालें. तोंवर वेळ मिळाला होता मात्र भीष्माने युधिष्ठिरालाहि ’द्यूत खेळूं नको’ असा निकराचा सल्ला दिला नाही. ’खेळताना संयम पाळ’ येवढेहि निक्षून सांगितले नाहीं! कुटुंबप्रमुख असलेल्या भीष्माला हा नाकर्तेपणा कां ग्रासून राहिला हे उलगडत नाही.
द्यूत झालेच. युधिष्ठिर कायम हरतच राहिला. पांडव सर्व संपत्ति हरेपर्यंत द्यूत चालले. मग त्याने सहदेवास पणास लावले. हीच वेळ होती, खरे तर द्यूत संपवण्याची! येथून पुढील युधिष्ठिराचा सर्व अतिरेक दरबारातील सर्वांनी चालूं दिला. भीष्माने, पहिल्या पांडवाला पणाला लावण्याच्या वेळेसच, निर्धाराने हा गैरप्रकार कां थांबवला नाहीं? ’राज्य वैभव तुम्हा नालायकांना राखतां आले नाहीं, आतां निघा आणि भीक मागा किंवा पुन्हा पराक्रम गाजवून नवीन राज्य व वैभव कमवा. तुमच्या दुर्दशेला युधिष्ठिरच कारण आहे, तेव्हां कौरवांना दोष देऊं नका’ असें म्हणून त्याने पांडवांना हांकलून कां दिलें नाहीं? द्यूत तेव्हांच थांबवले असते तर पुढील घोर अपमान, द्रौपदीचा छळ व अनावर वैर टळलें असतें. महाभारतात याचे उत्तर मिळत नाहीं.
युधिष्ठिर चारी भावांनंतर स्वत:ला पणाला लावून हरला. सर्व पांडव दास झाले. शकुनीने द्रौपदीला पणाला लावण्याची सर्वथैव अनुचित सूचना केली. तिलाहि भीष्माने काडीचाहि विरोध केला नाहीं! हा पणहि हरल्यावर द्रुपदकुळाची राजकन्या असलेल्या द्रौपदीची सर्व प्रकारे होणारी अप्रतिष्ठा भीष्मानेहि निमूट पाहिली. यांतून उद्भवणारे पांचाल-कौरव घोर वैर त्याला दिसत नव्हतें काय? कुरुकुळाचा प्रमुख या नात्याने त्याने तें टाळावयास हवें होतें. द्रौपदीने विचारलेल्या,’मी दासी झाले कीं नाहीं?’ या प्रष्नाचे उत्तरहि भीष्माने दिलेच नाहीं. ’मला उत्तर समजत नाहीं ’ असा जबाब त्याने दिला. अखेर धृतराष्ट्रानेच तिला वर देऊन पांडवांना दास्यांतून मुक्त केले व जिंकलेले सर्व धनहि परत दिले व ’सर्व प्रकार विसरून परत जा’ असा युधिष्ठिराला निरोप दिला. पांडव परत गेले. या सर्व प्रसंगानंतरहि भीष्म, विदुर, धृतराष्ट्र, द्रोण, कृप वा इतर कुरुवृद्धांनी युधिष्ठिराची अतिरेकी द्यूताबद्दल खरडपट्टी काढली नाही.
पांडवांच्या झालेल्या अपमानांमुळे लगेचच युद्ध उभे राहील या धास्तीने, माझ्या मते, ते भय दूर सारण्यासाठी अनुद्यूत झाले. कोणताही पक्ष जिंकला तरी युद्ध तेरा वर्षे टळणार होते. मात्र युधिष्ठिर जिंकला असता तर कौरवांतर्फे कोणकोण वनात जाणार होते हे स्पष्ट सांगितलेले नाही. अनुद्यूताचा बेत मुळात कोणाचा हे महाभारतात स्पष्ट नाही. या बेतालाहि भीष्माने विरोध केला नाहीं. पांडव पुन्हा हरून १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासासाठी वनात गेले. या सर्व अनर्थपरंपरेचा भीष्म निव्वळ साक्षीदार राहिला. तो इतका निष्क्रिय कां झाला याचे उत्तर महाभारतात नाहीं.

Thursday, December 2, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ६

पांडवांना वारणावतास पाठवण्याच्या दुर्योधनाच्या बेतामागील कारस्थान भीष्माला उमगले नाहीं. विदुराला उमगले व आपल्यापरीने त्याने पांडवांना वांचवण्यासाठी साह्य केलें (वाड्यातून पळून जाण्यासाठी भुयार खणण्यासाठी आपला विश्वासू माणूस युधिष्ठिराकडे पाठवला), मात्र नवल म्हणजे त्याने आपला संशय भीष्माच्या कानावर मुळीच घातला नाहीं वा वारणावतास पांडवांना पाठवूं नये असें त्याने भीष्माला मुळीच विनवले नाहीं! असें कां झालें? भीष्म कांहीहि करणार नाहीं असें विदुराला वाटलें काय? महाभारत याबद्दल गप्प आहे! शेवटी वारणावतास जे व्हायचे ते झाले. वाड्याला लागलेल्या आगीतून पांडव व कुंती कसेबसे वांचले व परागंदा झाले. तीं वांचल्याची कुणकूण विदुराला लागलीच असणार पण त्याने तेहि भीष्माला कळूं दिले नाही. कौरवांनी पांडव व कुंती यांचे और्ध्वदैहिकहि केले असे महाभारत म्हणते. सत्य परिस्थितीबाबत भीष्म पूर्ण अंधारात राहिला.
द्रौपदीच्या स्वयंवराच्या मंडपांत वारणावतांतून वांचून परागंदा झालेले पांच पांडव ब्राह्मणवेषांत प्रगट झाले होते. अनेक वर्षांचा सहवास असूनहि, कौरवांपैकीं कोणीहि, भीष्मानेदेखील, त्यांना अजिबात ओळखले नाहीं. अर्जुनाने दुष्कर पण जिंकला तरीहि ’हा अर्जुन तर नव्हे’ अशी शंका कोणालाहि आली नाहीं. नंतर ’पण अखेर एका ब्राह्मणाने जिंकला’ म्हणून रागावलेल्या क्षत्रिय राजांबरोबर अर्जुन व भीम यांचे जोरदार युद्ध झाले त्यांत भीमाचे अफाट बळहि प्रगट झाले तरीहि युद्ध संपल्यावर इतरांप्रमाणे कौरव तसेंच भीष्महि पांडवांना अखेरपर्यंत न ओळखतां हस्तिनापुरास निघून गेले. पांडवद्रौपदी विवाहालाहि कौरवांकडून कोणी आलें नाहीं. काही काळ गेल्यावर पांडव-द्रौपदी–कुंती हस्तिनापुराला परत आल्यावर मग अखेर भीष्माने राज्याचा वांटा पांडवांना द्यावा असा सल्ला दिला. यावेळीं त्याने म्हटलें कीं ’वारणावत प्रकरणीं लोक मलाच दोष देतात’ ! खरे तर युधिष्ठिराला पूर्वीच यौवराज्याभिषेक केलेला होता तर मग आतां तो जिवंत परत आल्यावर धृतराष्ट्राचे जागीं त्यालाच हस्तिनापुरचे राज्य मिळावयास हवे होते. भीष्माने तसे केले नाहीच. राज्याचा वाटाहि खरे तर दिला नाही. ’खांडवप्रस्थास जाऊन तुम्ही राज्य करा’ असे पांडवांना म्हटले. तेथे खांडववन जाळून, नवीन प्रदेश वस्तीखाली आणून, नवीन इंद्रप्रस्थ राजधानी बनवून, नवेच राज्य पांडवांना मिळवावे लागले. या सर्व घटनांमध्ये भीष्माची न्यायबुद्धि दिसत नाही. आपला निर्णय धृतराष्ट्रावर वा दुर्योधनावर लादण्याची त्याची इच्छा वा तयारी नव्हती असे म्हणावे लागते. येथून पुढे त्याने दुर्योधनाच्या कुटिल बेताना कधीच प्रखर प्रतिकार केलेला नाही. दुर्योधनाचा सर्वाधिकार त्याने जणू मान्यच केलेला दिसतो.

Friday, November 19, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५

पदरीं पडलें तें पवित्र मानून, इच्छा असो वा नसो, हे दोन्ही पुत्र मोठे होईपर्यंत भीष्माला राज्य संभाळावे लागले! धृतराष्ट्र आंधळा त्यामुळे राजा होण्यास लायक नव्हताच त्यामुळे पांडु पुरेसा मोठा झाल्यावर त्याला राज्यावर बसवून भीष्म मोकळा झाला. पांडूमध्ये कोणता जन्मदोष होता हे स्पष्ट नाही. तर्क करावयाचा तर बहुधा त्याच्या हृदयाला छिद्र वगैरे असावे त्यामुळे लहानपणी तो पांढराफटक असावा. बाल व तरुण वयात तो दोष काहीसा झाकला गेला असावा म्हणून त्याचा युद्धकलेचा अभ्यास झाला व तो वीरपुरुष बनला. पुढे वय वाढल्यावर तो दोष पुन्हा पुढे आला असावा व कोणताही ताण, राज्यकारभाराचा वा संसारसुखाचा, झेपणे त्याला शक्य राहिले नाही. त्यामुळे त्याला राज्यनिवृत्ति स्वीकारून वनवास व पुत्रासाठी कुरुकुळात पुन्हा एकदां नियोग स्वीकारावा लागला. पांडु वनात भार्यांसह गेला त्याला भीष्माने रोखले नाही. राजधानीतच राहून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घे असे सत्यवतीने वा भीष्माने त्याला म्हटले नाहीं. आधीच्या पिढीचा अनुभव लक्षात घेऊन ’तूं हिमालयाकडे जाऊन कुरुसमुदायांतील तिकडील एखाद्या योग्य पुरुषामार्फत नियोगमार्ग पत्कर’ असें भीष्मानेच त्याला सुचवले असा माझा तर्क आहे. (पांडवांचा जन्म देवांपासून हे एक रूपकच म्हटले पाहिजे. तें शब्दश: घेणे योग्य नाहीं )
पांडु राज्य सोडून वनांत गेल्यामुळे नाइलाजाने धृतराष्ट्राला राज्यावर बसवून कारभार भीष्म व विदुर यांना पहावा लागला. विवाह पांडूबरोबरच होऊनहि अद्याप धृतराष्ट्रालाहि अपत्यें झालीं नव्हतीं. कुंतीला वनात युधिष्ठिर पुत्र झाल्याचें गांधारीला कळले तेव्हां तीहि गरोदर होती असें महाभारत म्हणतें पण हे बरोबर वाटत नाहीं. तिचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन युधिष्ठिरापेक्षा लहान, भीमाच्याच वयाचा होता! कुंतीपुत्र आधीं जन्मल्यामुळे आपल्या पुत्राला पुढे राज्य मिळण्याची खात्री तिला व धृतराष्ट्राला राहिली नाहीं. कौरव-पांडव वैराची ही सुरवातच होती! कालांतराने पांडू व माद्री यांचा वनात मृत्यु झाला व कुंती पांच पुत्रांसह हस्तिनापुरास परत आली. कौरव पांडव दोघेंहि लहान असल्यामुळे राज्याची व्यवस्था कायम राहिली. मात्र दुर्योधनाला युधिष्ठिर हा आपला प्रतिस्पर्धी आहे हें लहानपणापासूनच स्पष्ट दिसूं लागलें.
कौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्था भीष्माने नीट लावली. आधी कृप व मग द्रोण यांचेपाशी ते युद्धकला उत्तम शिकले. सर्व राजपुत्र मोठे झाल्यावर अस्त्रदर्शनाचा प्रसंग घडला. त्यावेळी अचानक उपस्थित होऊन कर्णाने अर्जुनाची बरोबरी करून मग त्यांच्या द्वंद्वापर्यंत पाळी आली. ते थांबवण्याचे श्रेय कृप व भीमाला दिले पाहिजे. भीष्माने कुरुप्रमुख या नात्याने वेळीच हस्तक्षेप केला नाही. दुर्योधनाने आततायीपणे कर्णाला अंगराज्य देऊन टाकले व राज्याभिषेकहि केला. त्याला भीष्माने थांबवले नाही. कुलप्रमुख या नात्याने त्याच्या संमतीशिवाय हे कसे होऊ शकले? दुर्योधनाचा अधिकार येथून पुढे जणूं भीष्माने मान्यच केला! मात्र पुढे नवीनच पेंच उभा राहिला. राज्यावर धृतराष्ट्र पण यौवराज्य युधिष्ठिराला दिले. हा अर्थातच भीष्माचा निर्णय होता. यातून तिढाच निर्माण झाला. कौरव-पांडवांतील वाढता वैरभाव व दुर्योधनाला मिळालेली कर्णाची साथ हे दिसत असूनहि भीष्माने वेळीच राज्य वाटून देण्याचा उपाय योजला नाही. दुर्योधन सुखासुखी युधिष्ठिराला राज्य मिळू देणार नाही हे उघड होते व धृतराष्ट्र दुर्योधनाच्या आहारी जातो आहे हेहि दिसत होते तरीहि भीष्माने काही केले नाही. या वेळीं भीष्माचा सल्ला वा निर्णय धृतराष्ट्र वा दुर्योधन झिडकारूं शकले नसते. पण भीष्माने तसे केले नाही. अलिप्तपणा एवढेच कारण?

Friday, November 12, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ४

विचित्रवीर्याने दोन्ही भार्यांसह संसारसुख काही वर्षे उपभोगले. मात्र त्याला अपत्य झाले नाही. त्याच्यात काय दोष होता ते महाभारतात सांगितलेले नाही. विचित्रवीर्य या नावावरून तर्क करावा. ऐन तारुण्यातच तो मरून गेला. शांतनूने ज्या हेतूने सत्यवतीशी विवाह केला तो वंशवृद्धीचा हेतु निष्फळ ठरला. वंश टिकवण्यासाठी सत्यवतीने भीष्माला त्याच्या प्रतिज्ञेतून मुक्त करून ’तूं विवाह कर’ असे सुचवले ते त्याने अर्थातच नाकारले. ’वडील दीर या नात्याने अंबालिका, अंबिका यांना तूं अपत्य मिळवून दे’ असे विनवले तेहि नाकारले. मात्र वंश टिकवण्यासाठी पूर्वीं, परशुरामाने क्षत्रिय घराणीं नामशेष केलीं होतीं तेव्हां, अनेक क्षत्रिय स्त्रियांनी श्रेष्ठ ब्राह्मणांपासून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घेऊन वंशविस्तार केला, याचा दाखला देऊन, अंबालिका व अंबिका यांनीहि तसेंच करावे असें सुचवलें. तेव्हां सत्यवतीने आपल्याला ऋषि पराशरापासून झालेल्या व्यास या पुत्राचे नाव नियोगासाठी सुचवले ते भीष्मानेहि मान्य केले. यावेळीं कुरुकुळांतीलच दुसर्‍या कोणा पुरुषाचा विचार दोघांनीहि कां केला नाही हे एक कोडेच आहे. ज्या बाल्हीकाचे नाव वरचेवर येते, त्याच्या वंशातला कोणी योग्य पुरुष कसा सुचला नाहीं? (बाल्हीक सोमदत्त व त्याचा पुत्र भूरिश्रवा याचे नाव पुढे कथेत अनेकदां येते. भूरिश्रवा साधारण कौरव-पांडवांचा समवयस्कच दिसतो तेव्हां सोमदत्त वा त्याचा पिता हा नियोगासाठी कदाचित योग्य वयाचा ठरला असता!)
सासूची सूचना दोन्ही सुनांनी अनिच्छेनेच मान्य केली असणार कारण व्यासाचे ओंगळ ऋषिरूप. खुद्द व्यासालाहि त्याची जाणीव होतीच. व्यासाला शुक नावाचा एक पुत्र होता तेव्हां सत्यवतीने विनवले तरीहि या भानगडीत आपण पडूं नये असें व्यासाला कां वाटलें नाहीं? अंबालिका व अंबिका दोघीनाहि जन्मदोष असलेले पुत्र झाले. त्याचें दिलेले कारण (अंबालिकेने डोळे मिटून घेणे व अंबिकेने भीतीने पांढरीफटक पडणे) निव्वळ हास्यास्पद आहे. इच्छेविरुद्ध (उदा. बलात्काराने) मातृत्व लादले गेले तरीदेखील स्त्रीला अनेकदां सुदृढ अपत्य होतें! येथे तर मातृत्व हवेच होते! जणू व्यासावर पुत्रांच्या व्यंगांचा दोष नको म्हणून तो त्या दोघींवर ढकललेला वाटतो! मात्र धृतराष्ट्र आंधळा निपजल्यावर तरी व्यासाचा नाद सोडून देऊन दुसरा कोणी शोधावा असें सत्यवतीला वाटले नाही वा भीष्मालाहि सुचले नाही. यांतहि भीष्माचा अति अलिप्तपणाच जाणवतो. तिसरा प्रयोग अंबालिका-अंबिका यांनी युक्तीने टाळला. आपल्या जागीं दासीलाच पाठवले! व्यासांना कळले होतेच कीं यावेळी आपल्यासमोर दासी आली आहे पण व्यासानी सत्यवती वा भीष्माकडे तक्रार केली नाही वा माघार घेतली नाही! दासीचे पोटीं विदुर जन्माला आला.

Wednesday, November 3, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग 3

शांतनूला व सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. त्यानंतर थोड्या काळानेच शांतनूचा मृत्यु झाला. ठरल्याप्रमाणे चित्रांगद राजा झाला. हा शूर होता. भीष्माला त्याने सत्तेपासून दूर ठेवले असावे. त्याचा विवाह झाल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे पत्नी वा अपत्याचे नाव नाहीच. त्याचे व चित्रांगद याच नावाच्या गंधर्वाचे कुरुक्षेत्रात युद्ध झाले. तीन वर्षे एवढा दीर्घ काळ चाललेल्या या युद्धात भीष्माने कोणताही भाग घेतला नाही. असें कां झालें असावें? एक तर चित्रांगदाने भीष्माला खड्यासारखे दूर ठेवले असावे किंवा भीष्म कुरुकुळांत राहत असूनहि पूर्ण अलिप्त झाला असावा. महाभारत याबाबत काहीच सांगत नाहीं. युद्धात चित्रांगद मारला गेला एवढेच म्हणतें. त्याला मदत न केल्याबद्दल सत्यवतीनेहि भीष्माला दोष दिलेला नाही! हे प्रकरण जरासे धूसरच आहे!
चित्रांगदानंतर विचित्रवीर्य राजा झाला. (असे ’विचित्र’ नाव त्याला कां दिले असावे?). त्या वेळेला तो वयाने लहान असावा. तो मात्र भीष्माच्या कलाने वागत होता असे दिसते. काही काळानंतर त्याला भार्या मिळवून देण्यासाठी भीष्म काशिराजाच्या तीन मुलींच्या स्वयंवराला गेला. मात्र एकटाच! विचित्रवीर्याला बरोबर नेलेच नाही! ब्रह्मचर्याचा गाजावाजा झालेल्या भीष्माला स्वयंवरमंडपात एकटाच पाहून साहजिकच त्याची बरीच टिंगल झाली. तिन्ही मुलींना पळवून आणावयाचे असाच भीष्माचा बेत होता म्हणूनच बहुधा विचित्रवीर्याचे लोढणे त्याने बरोबर बाळगले नसावे. विचित्रवीर्यामध्ये काहीतरी जन्मदोष असावा व त्यामुळे त्याला सुखासुखी योग्य भार्या मिळण्यात अडचण पडेल असे दिसल्यामुळेच असा आडमार्ग भीष्माला पत्करावा लागला असावा. ठरवलेल्या बेताप्रमाणे भीष्माने केले. सर्व चिडलेल्या राजांशी यशस्वी सामना केला. एकट्या शाल्वाने अंबेला सोडवण्यासाठी निकराचे युद्ध केले पण त्याचाहि निभाव लागला नाही. मात्र भीष्माने त्याला न मारतां जिवंत सोडले. या प्रसंगात भीष्माने शौर्य प्रगट केले. शाल्व हेहि एक कुळ असावे व त्यातील पुरुषांना शाल्व म्हणत असावे कारण पुढे खूप दीर्घ काळानंतर, कृष्ण व शाल्व यांचे वैर व युद्ध झाले. तेव्हा तो शाल्व हा या कथेतील शाल्वाचा वंशज असला पाहिजे. अंबेच्या इच्छेप्रमाणे भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले पण त्याने तिला स्वीकारले नाही. ती भीष्माकडे परत आली व ‘तुम्ही माझा हात धरलात म्हणून शाल्व मला स्वीकारीत नाही तेव्हा आता तुम्हीच माझा स्वीकार करा’ असे विनवले पण भीष्मानेहि प्रतिज्ञेमुळे तिला स्वीकारले नाहीच. तिची परवड झाली. अंबेने परशुरामाकडे तक्रार नेली आणि तिच्या वतीने खुद्द परशुरामाने आव्हान दिल्यामुळे त्याच्याशी झालेल्या युद्धात परशुरामालाही भीष्माने दाद दिली नाही. परशुरामाने अंबेला सांगितले कीं ’तुझ्यासाठी मी आणखी काही करूं शकत नाहीं, तुझे तूं पहा!’ या युद्धानंतर भारतीय युद्धापर्यंत एकाही प्रसंगात भीष्माचे शौर्य विशेषत्वाने प्रगट झालेले नाही! कौरव राज्याच्या वतीने त्याने अश्वमेध वगैरे केला नाही वा कोणा राजाचे पारिपत्य करून राज्य विस्तारहि केलेला नाही.

Thursday, October 28, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग २

देवव्रत (भीष्माचे खरे नाव)तरुण झाला, पित्याने त्याला यौवराज्याभिषेकहि केला अन मग, चार वर्षे गेल्यावर, उतारवयाच्या पित्याची सत्यवतीशीं विवाह करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याने सर्वस्वाचाच त्याग केला. आपण विवाह व संसाराच्या बंधनात अडकून पडावयाचे नाही असे त्याचे आधीच ठरले असावे अशी मला शंका येते कारण त्याच्या विवाहाचा विचारहि शांतनूने अद्याप केला नव्हता. त्याच्या या विचारांची शांतनूला बहुधा कल्पना आली असावी आणि त्यामुळे याचेकडून आपला वंश चालू राहण्याची त्याला उमेद राहिली नसावी. सत्यवतीशीं उतार वय असूनहि विवाह करावा असें आपल्याला कां वाटते याचे त्याने पुत्राशी केलेले स्पष्टीकरण वाचले म्हणजे ही शंका बळावते. सर्वच क्षत्रिय राजांना शिकारीचा नाद असताना ’तुला शिकारीचा फार नाद आहे आणि तूं नेहमीं शस्त्र घेऊन फिरत असतोस त्यामुळे तुझ्या जीवनाची शाश्वति नाही’ असे तो देवव्रताला म्हणतो हे नवलाचे नव्हे काय? आपल्याकडून वंश टिकण्याची पित्याला उमेद नाही तेव्हां त्याला पुन्हा विवाह करून वंशवृद्धि करावयाची आहे तर ते होऊ द्यावे, आपण त्याआड येऊ नये उलट सत्यवतीला व तिच्या पित्याला हवे असलेले आश्वासन द्यावे असे देवव्रताला वाटले काय? महाभारतात वर्णन केलेल्या घटनांचे असेहि एक स्पष्टीकरण असूं शकतें! मला तें जास्त नैसर्गिक वाटते.
सत्यवती ही उपरिचर या क्षत्रिय राजाची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होती. (महाभारतातील वर्णन, उपरिचराच्या वीर्यापासून एका मत्स्यीला झालेली कन्या, असें आहे तें अर्थातच रूपकात्मक आहे.) मात्र राजकुळात न वाढता ती धीवर कुळात वाढली होती. ऋषि पराशराने तिची अभिलाषा धरून तिच्या पदरांत एक पुत्र टाकून मग तिला सोडून तपश्चर्येचा मार्ग धरला होता. पुत्र व्यास याला सत्यवतीने धीवरकुळांतच वाढवले. व्यास ’मोठा झाल्यावर’ मातेची अनुज्ञा घेऊन आपल्या मार्गाने गेला असा उल्लेख आहे. शांतनू सत्यवतीच्या प्रेमात पडला तोवर तीहि लहान राहिलेली नव्हती असे त्यामुळे म्हणावे लागते. तिचा विवाह कोणातरी थोर क्षत्रियाशींच व्हावा असा तिच्या धीवर पालक पित्याचा हेतु होता. म्हणून त्याने एका थोर ऋषीला नकारहि दिला होता. राजा उपरिचर व सत्यवतीचा धीवर पालक यांची भेट होत असे असें महाभारत म्हणतें व शांतनूशीं सत्यवतीचा विवाह व्हावा अशी उपरिचराचीहि इच्छा होती. प्रष्न फक्त तिच्या पुत्राला राज्य कसें मिळणार हा होता! तो देवव्रताने पूर्णपणे सोडवला व भीष्म ही पदवी वा नाम मिळवले. धीवराला हवे असलेले, राज्यावर हक्क न सांगण्याचे आणि स्वत: ब्रह्मचर्यहि पाळण्याचे आश्वासनहि भीष्माने दिले व अखेरपर्यंत पाळले. जन्मभर कुरुकुळातच राहण्याचे व कुळाचे हित जपण्याचे वचन काही सत्यवतीच्या पित्याने मागितलेले नव्हते व भीष्माने दिलेले नव्हते. मात्र तो हस्तिनापुर सोडून कोठेच गेला नाही. स्वत: संसारात न पडूनहि सर्व सांसारिक सुखे व अनेक दु:खेहि त्याला भोगावी लागलीच!

Monday, October 25, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग १

आज नव्या विषयाला आरंभ करीत आहे.
महाभारतात आरंभापासून अखेरपर्यंत वावरलेले एक प्रमुख पात्र म्हणजे भीष्म. आपल्या मनात भीष्माबद्दल फार आदरभाव असतो. तो अयोग्य वा अकारण आहे असे मुळीच म्हणतां येणार नाही. मात्र सर्व कथेमध्ये ज्या ज्या प्रसंगांत त्याची उपस्थिति आहे त्या अनेक प्रसंगांतील त्याचे वर्तन काही वेळा अनाकलनीय वाटते, त्याची संगति लागत नाही. अर्थात कल्पनारम्य वर्णने वा अद्भुतरस बाजूला ठेवून या विविध प्रसंगांकडे मानवी पातळीवरून पाहिले म्हणजे काही प्रष्नचिन्हे उभी रहातात. या दृष्टिकोनातून भीष्मकथेचा विस्ताराने आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
भीष्माची जन्मकथा महाभारतात खूप विस्ताराने सांगितलेली आहे. ती शब्दश: घेतली तर काही प्रश्न नाही पण अद्भुतरस बाजूला ठेवला व तर्क वापरावयाचे म्हटले म्हणजे काही प्रश्न पडतातच. भीष्माचा पिता शांतनु, प्रतीप या त्याच्या पित्यानंतर राजा झाला. त्याचा जन्म त्याचा पिता प्रतीप खूप वृद्ध झाल्यावर झाला होता. प्रतीपाला देवापि व बाल्हीक असे दुसरे दोन पुत्र होते असेहि म्हटलेले आहे. देवापि राज्याचा लोभ सोडून तपश्चर्येला गेला होता. बाल्हीक व शांतनु दोघेहि राजे झाले असेहि एके ठिकाणी म्हटले आहे. मात्र बाल्हीक हस्तिनापुराचा राजा झाला नाही. त्याचे राज्य कोठे होते हे स्पष्ट नाहीं. बाल्हीक या नावाचा महाभारतात अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगी उल्लेख आहे. कुरूंच्या दरबारात त्याचे अस्तित्व वेळोवेळी जाणवते ते थेट भारतीय युद्धापर्यंत. खुद्द भीष्मच युद्धापर्यंत खूप वृद्ध झाला होता मग त्याचा काका युद्धात होता? बहुधा त्याच्या वंशातील सर्वच पुरुषांचा ’बाल्हीक’ असाच उल्लेख होत असावा. (बाल्हीक म्हणजे अफगाणिस्तानातील ’बल्ख’ शहर असे एक मत वाचलेले आहे.)
शांतनूने राजा झाल्यावर छत्तीस वर्षे स्त्रीसुखाचा अनुभव घेतला पण त्याला तेव्हां अपत्य झाल्याचा उल्लेख नाही. त्याची पत्नी मृत झाली असे मात्र म्हटलेले नाही. त्यानंतर गंगा ही नदी मानव शांतनूची पत्नी झाली. ती ’नदी’ हे शब्दश: घेतले नाही तर ती गंगाकिनारच्या एखाद्या कुळातील मानव स्त्री मानावी लागते. गंगेने स्वत:चे व शांतनूचे सात पुत्र जन्मत:च मारून टाकले. कां? तिचे कुळ मातृसत्ताक असल्याने अपत्य पुरुष असेल तर नष्ट करणे हा तिच्या कुळाचा रिवाज होता कीं काय? श्री. विश्वास दांडेकर यांनी ’धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ मध्ये असाच तर्क केला आहे व मला तो सयुक्तिक वाटतो. तिने शांतनूला वरताना अटच घातली होती कीं ’मी करीन त्या कोणत्याही कृत्याला विरोध करावयाचा नाही, तसे केल्यास मी तुला सोडून जाईन’ त्यामागे हेच कारण असावे. गंगेला, राजा महाभिषाला (शांतनु हा त्याचा अवतार) व अष्टवसूंना स्वर्गांत मिळालेल्या शापांची कथा हे एक रूपकच आहे. ही कथा या अपत्यनाशांचे (लंगडे) समर्थन करण्यासाठी उघडच रचलेली दिसते. पूर्वीचे अपत्य नसूनहि सात पुत्रांचा मृत्यु शांतनूने सहन केला हे नवलच. आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी मात्र, गंगा आपल्याला सोडून जाईल याची पर्वा न करतां, शांतनूने तिला ’एक पुत्र तरी राहूंदे’ असे विनवले म्हणून गंगेने त्याला न मारतां आपल्याबरोबर नेले पण ती शांतनूला सोडून गेलीच. कुमार वयाचा झाल्यावर तिने हा पुत्र देवव्रत पुन्हा शांतनूच्या स्वाधीन केला. त्याने वेदाभ्यास केला आहे व तो ज्ञानी आणि शूर आहे असे गंगा म्हणाली. मात्र परशुरामापाशी त्याने धनुर्विद्या शिकल्याचा येथे उल्लेख नाही. पण तो परशुरामशिष्य म्हणून मानला जातो. मग तो केव्हां परशुरामापाशी शिकला याचा उलगडा होत नाहीं. शांतनूकडे आल्यावर शिकला असावा. गंगेच्या मातृसत्ताक कुटुंबियांत तो वाढला याचा त्याच्या मनोवृत्तीवर काही परिणाम झाला काय? त्याने आमरण ब्रह्मचर्य पत्करले त्या मागे त्याच्या बालवयातील काही संस्कार कारण होते काय? प्रत्यक्ष मातेने केलेले पुत्रघात त्याला कळले असणारच शिवाय आईच्या जनसमुदायांत असे इतरहि प्रसंग घडले असतील ते पाहून आपल्याला गृहस्थाश्रम नकोच अशी त्याची मनोभूमिका झाली होती कीं काय अशी शंका येते.

Monday, October 11, 2010

नलदमयंतीकथा भाग ११

तिने आपल्या दासींना सांगितले कीं बाहुकाला पाणी वा विस्तव देऊं नका व तो स्वत:साठी अन्न कसे शिजवतो तें नीट पाहून मला सांगा. त्याने मांस शिजवले तर जमल्यास त्याचा नमुना माझ्यासाठी आणा. नलराजाला अग्नि व वरुण यांनी वर दिलेले असल्यामुळे जर बाहुक हाच नल असेल तर त्याचे पाणी वा अग्नि यावांचून अडणार नाहीं तसेंच नल पाकक्रियेत खास प्रवीण असल्यामुळे बाहुकाने मांस शिजवले तर त्याला नलाच्या हातची चव असेल अशा तिच्या अपेक्षा होत्या. त्याप्रमाणेच झाले. दासींनी येऊन सांगितले कीं त्याच्या चुलीत अग्नि आपोआप प्रगट झाला व कलशामध्ये जळहि आपोआप भरले! याचा तारतम्याने इतकाच अर्थ घ्यावयाचा कीं स्वयंपाकघरांतील सर्व क्रियांमध्ये नल प्रवीण होता व ही गोष्ट सर्वसामान्य पुरुषांना (त्याकाळींहि) सहजसाध्य नसल्याने बाहुकाचे नलाशीं साम्य दिसून आले. अजूनहि खात्री करण्य़ासाठी दमयंतीने आपल्या दोन्ही लहान मुलांना बाहुकाकडे पाठवलें व दासींना लक्ष ठेवण्यास सांगितले. मुलें दृष्टीस पडल्यावर बाहुकाला म्हणजे नलाला मन आवरतां आलें नाहीं व तो त्यांना कवटाळून रडूं लागला. हे ऐकून दमयंतीची जवळपास खात्री झाली पण रूप मुळीच जुळत नव्हते. नलाचे वेषांतर उत्तम जमले होते. अखेर दमयंतीने आईला विश्वासात घेऊन म्हटले कीं बाहुक हाच नल असला पाहिजे तेव्हां खात्री करण्यासाठी मला त्याची एकांतात भेट घेऊंदे. पित्याला काही न सांगतां आपल्या जबाबदारीवर तिने हे धाडस केले. प्रत्यक्ष भेटीत दमयंतीने स्पष्टच विचारल्यावर नलाचा नाइलाज झाला व त्याने मीच नल असें मान्य केलें. ’वनात तुला एकटीला टाकून गेलो कारण नाहींतर तूं मला सोडून माहेरीं गेली नसतीस व तूं हरप्रयत्नाने माहेरीं पोंचशीलच असा मला भरवसा होता’ असा खुलासा केला. मग वेषांतर टाकून स्वरूप धारण केले. ’तूं पुन्हा स्वयंवर करणार आहेस हे ऐकून मला काही सुचेना’ असे नल म्हणाला तेव्हां अर्थातच दमयंतीने खुलासा केला कीं ’हा सर्व, पित्यालाही न कळवतां, माझाच बेत होता आणि त्याचा हेतु फक्त एकच होता कीं तुम्हीच बाहुकरूपाने ऋतुपर्णापाशीं असाल तर फक्त तुम्हीच एक दिवसात येथे येऊन पोंचाल दुसर्‍या कोणासही हे शक्य होणार नाही हें मी खात्रीने जाणत होतें’ पतिपत्नींतील परस्पर विश्वासाचे हे एक उत्तम उदाहरण म्हटले पाहिजे.
नलाने व दमयंतीने एकेकट्याने सोसलेल्या संकटांची हकीगत एकमेकांना सर्व सांगितली. दुसर्‍या दिवशीं नलदमयंतीने वडील माणसांस व ऋतुपर्णासहि सर्व हकिगत सांगितली. स्वयंवराबाबत फसवणूक झाल्याबद्दल बिलकुल राग न धरतां ऋतुपर्णाने दोघांचे अभिनंदन केले व ’नला मी तुला न ओळखून नोकराप्रमाणे वागवले याचे वाईट वाटते’ असे म्हटले. नलाकडून रथसंचालनात प्रावीण्य मिळवून ऋतुपर्ण परत गेला. दमयंतीच्या पित्यानेहि कन्या व जावई पुन्हा एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त केला व नलाचा आदरसत्कार केला.
यथावकाश, द्यूतविद्येत नव्याने प्रावीण्य मिळवलेल्या नलाने आपल्या राजधानीला परत जाऊन पुष्कराला आव्हान दिले व द्यूतामध्ये विजय मिळवून सर्व गतवैभव जिंकून घेतले. मात्र पुष्कराला शासन न करतां क्षमा करुन राज्याबाहेर घालवले.
येथे नलदमयंती कथा संपली. संकटपरंपरा कोसळली तरी कुलीन व गुणवंत व्यक्ति धैर्य न सोडतां योग्य कालाची वाट पाहून दीर्घ प्रयत्नाने पुन्हा गतवैभव प्राप्त करून घेऊं शकतात हा मथितार्थ युधिष्ठिराला पटवण्यासाठी बृहदश्वाने ही कथा त्याला सांगितली. त्या पासून योग्य तो बोधहि युधिष्ठिराने घेतला असे म्हणतां येईल.

Monday, October 4, 2010

नलदमयंतीकथा भाग १०

प्रवासामध्ये ऋतुपर्णाच्या आणखी एका विषयांतील प्रावीण्याचे प्रदर्शन झाले. तो गणनशास्त्रातहि प्रवीण होता. रथ भरवेगाने चालला असतां ऋतुपर्णाचे एक उपवस्त्र वार्‍याने उडाले तेव्हां तो बाहुकाला रथ थांबव असें म्हणाला. बाहुकाने म्हटलें कीं रथाच्या वेगामुळे ते आता फार मागे पडले आहे व पुन्हा मागे वळून जाण्यात फार वेळ जाईल. ऋतुपर्णाला गप्प बसणे भाग झाले. मग पुढे एक भलामोठा वृक्ष दिसल्यावर ऋतुपर्णाने ’या वृक्षावर अमुक इतकीं पानें आहेत’ असें म्हटलें. विश्वास न बसून, नलाने म्हणजे बाहुकाने रथ थांबवला व ’मी पानें मोजून पाहणार’ असें म्हणाला. ’यांत वेळ घालवला तर पोंचणार कसें’ असें ऋतुपर्णाने म्हटल्यावर एका फांदीची पाने मोजून पहावी असे ठरले. तीं ऋतुपर्णाच्या अंदाजाप्रमाणे बरोबर निघालीं! नल चाट झाला. हे वर्णन मजेशीर आहे. ही Sampling ची विद्या असावी, म्हणजे एका फांदीच्या पानांचा काळजीपूर्वक अंदाज घेऊन व एकूण वृक्षाचा विस्तार विचारात घेऊन सर्व पानांचा अंदाज घेणे असा कांहीतरी प्रकार असावा. एकमेकांना एकमेकांच्या विद्या देऊन रथ दमयंतीच्या गावी संध्याकाळपर्यंत पोंचला. तेथे स्वयंवर असल्याचा काही मागमूस दिसत नव्हता त्यामुळे ऋतुपर्ण चक्रावून गेला. दमयंतीव्या पित्याशी भेट झाल्यावर त्यालाही कळेना कीं राजा ऋतुपर्ण अचानक कशासाठीं आला आहे! त्याने ऋतुपर्णाला विचारल्यावर काय उत्तर द्यावे हा त्यालाही पेच पडला. ’मी निव्वळ आपणाला भेटण्यासाठी आलो आहे’ असे उत्तर देऊन त्याने वेळ मारून नेली. काय प्रकार आहे तें कळेलच असा विचार करून दमयंतीच्या पित्याने त्याला ’आज तुमचा प्रवास फार झाला आहे तेव्हां आराम करा, मग उद्यां बोलूं’ असे म्हटले. राजाची सोय लागली व वार्ष्णेय-बाहुक या जोडीचीहि रथशालेत व्यवस्था लागली.
अपेक्षेप्रमाणे ऋतुपर्ण तातडीने येऊन पोंचला त्यामुळे दमयंतीची आशा बळावली. वार्ष्णेय तिला माहीतच होता पण बाहुक हाच नलराजा काय याची शहानिशा करणे आवश्यक होते. त्याचे बाह्यरूप तर नलासारखे मुळीच नव्हते. दमयंतीने त्यासाठी अनेक युक्त्या केल्या.

Saturday, September 25, 2010

नलदमयंतीकथा भाग ९

वडिलाच्या पदरीं असलेल्या काहीं ब्राह्मणांना तिने नलाचा शोध घेण्यासाठीं सर्व दिशांना पाठवलें. कोणा एका पतीने वनात पत्नीला एकटीला सोडून दिल्याचे व तिच्या झालेल्या हाल अपेष्टांचे वर्णन करणारे एक कवन त्याना शिकवून ’ते अनेकांना ऐकवा व कोणाचा काही प्रतिसाद मिळाला तर येऊन मला सांगा’ असे त्याना सांगितले. सर्व जण हात हलवीत परत आले पण पर्णाद नावाच्या एका ब्राह्मणाने मात्र म्हटले कीं मी राजा ऋतुपर्णाच्या राजधानीला गेलो होतो व तुमचे काव्य ऐकवले असतां राजाचा बाहुक नावाचा एक सारथी व्याकुळ होऊन त्याने उद्गार काढले कीं ’उच्चकुळांतील स्त्रिया संकटे कोसळलीं म्हणून धीर सोडत नाहीत वा पतीला दोष देत नाहीत. पत्नीला ज्याने एकटे सोडले त्या पतीला तसेच काही कारण झाले असेल. त्या पत्नीने पतीवर राग धरूं नये’ हे ऐकून दमयंतीला तो नल तर नव्हे अशी शंका आली पण त्या सारथ्याचे रूपगुण नलासारखे मुळीच नव्हते असे त्या ब्राह्मणाच्या वर्णनावरून दिसत होते. फक्त तो रथचालनात प्रवीण आहे व पाककलेतहि तज्ञ आहे एवढे वर्णन नलाशीं जुळते होते. तेव्हां खरें काय हे कळण्यासाठी आईशी विचारविनिमय करून पण वडिलांशी न बोलतां तिने एक नवीनच धाडसी युक्ति केली. सुदेव नावाच्या दुसर्‍या ब्राह्मणाला ऋतुपर्णाकडे निरोप देऊन पाठवलें कीं ’नलाचा शोध अजिबात लागत नसल्यने दमयंतीने पुन्हा स्वयंवर ठरवले आहे मात्र ते उद्यांच आहे तेव्हां वेळेत आमच्या राजधानीला पोचता येते का पहा.’ हा निरोप इतर कोणा राजाकडे अर्थातच पाठवलेला नव्हता. बाहुक हाच नल असेल तर त्याच्या रथचालनाच्या अद्वितीय कौशल्याने ऋतुपर्ण येऊन पोंचेल व बाहुकाला प्रत्यक्ष पाहतां येईल असा तिचा विचार होता.
सुदेव त्याप्रमाने ऋतुपर्णाच्या राजधानीला जाऊन त्याला भेटला व निरोप सांगितला. ऋतुपर्णाने बाहुकाला म्हटले कीं ’इतक्या थोड्या वेळांत इतके दूर कसें पोंचतां येईल?’ बाहुकाला दमयंतीचा पुन्हा स्वयंवराचा बेत ऐकून फार दु:ख झाले पण स्वत:च्या रथसंचालनाच्या अभिमानापोटीं त्याने ऋतुपर्णाला म्हटलें की तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला नेऊन पोंचवीन! ऋतुपर्ण बाहुक व वार्ष्णेय तिघेही निघाले. नलाने अश्वशाळेतील स्वत: पारख केलेले दिसायला हाडकुळे पण तेजस्वी घोडे रथाला जोडले. घोडे पाहून ऋतुपर्णाला शंका वाटली. नलाने म्हटलें कीं माझी निवड तुम्हाला पटत नसली तर तुमच्या पसंतीचे घोडे जोडा आणि वार्ष्णेयाला घ्या, तोहि उत्तम सारथ्य जाणतो. ऋतुपर्ण मुकाट बसला.
राजा ऋतुपर्ण हा द्यूतविद्येत व गणनाशास्त्रात प्रवीण होता. नल रथसंचालनात व अश्वपरीक्षेत तज्ञ होता. नलाचे द्यूतातील अज्ञान दूर झाल्याखेरीज त्याला आपले राज्य व वैभव पुष्कराकडून परत मिळवता येणार नव्हते. नलाच्या वेष पालटून ऋतुपर्णाच्या पदरीं नोकरी करण्यामागे त्याचेकडून अक्षविद्या प्राप्त करून घ्यावी हा हेतु असावा. कदाचित कर्कोटकानेच त्याला ही कल्पना सुचवली असावी असा तर्क सयुक्तिक वाटतो. प्रवासात वाटेतच हे विद्येचे आदानप्रदान झाले असे वर्णन महाभारतात आहे. कदाचित नलाच्या ऋतुपर्णाच्या सेवेत असण्याच्या काळात ते वेळोवेळी झाले असेल.

Tuesday, September 21, 2010

नलदमयंतीकथा भाग ८

नल व दमयंती वेगळ्या मार्गाला लागलीं. नल आपल्याला एकटी सोडून गेला हे कळल्यावर, हिंम्मत न सोडतां, अरण्यांतून अनेकानेक संकटांना तोंड देत प्रवास करून दमयंती अखेर आपल्या पित्याच्या घरीं पोंचली. या सर्व संकट परंपरेचे मी वर्णन करीत नाहीं. मात्र हे सर्व होऊनहि दमयंतीचे नलावरचे प्रेम कणभरहि कमी झाले नाहीं! त्याचे काय झाले असेल व तो आपल्याला पुन्हा कसा भेटेल याचीच चिंता तिला लागून राहिली. इकडे नलाचीहि पाठ संकटांनी सोडली नाहीं. अर्ध्या वस्त्राने वनात फिरताना त्याला कर्कोटक नाग डसला व त्याचे सुंदर रूपच क्षणात नष्ट झाले. मात्र कर्कोटकाने त्याला म्हटलें ’ मी मुद्दामच असे केले कारण काही काळ तरी तुला विजनवासात काढावा लागणार आहे तर निदान तुझी ओळख कुणाला पटूं नये. योग्य वेळीं माझ्या कृपेने तुला तुझे मूळ रूप प्राप्त होईल.’ कर्कोटक नागाचा दंश हेहि माझ्या मते एक रूपकच आहे. खुद्द नलालाच आपण काळ अनुकूल येईपर्यंत अज्ञात रहाणे आवश्यक आहे हे लक्षात येऊन त्याने रूप व वेष पालटला असावा. (वनातील कर्कोटक नावाच्या नागकुळातील पुरुषाने त्याला साह्य केले.) तसे करून नलहि वनातून भटकत अखेर त्याच ऋतुपर्ण राजापर्यंत पोचला. त्याच्या दीर्घकाळच्या सारथ्याने, वार्ष्णेयाने, त्याला ओळखले नाही. स्वत: नलहि रथसंचालनाच्या कामात महान तज्ञ होता. त्याने ऋतुपर्णापाशीं सारथ्याची नोकरी धरली व तो व वार्ष्णेय दोघेहि जोडीने ते काम करत राहिले. नल अज्ञातवासात दु:खाने कालक्रमणा करीत होता व दमयंतीचे काय झाले असेल याची चिंता करत होता पण त्याला आशा वाटत होती कीं दमयंतीने हर प्रयत्नाने माहेर गाठले असेल. तसे झाले असेल तर ती आपल्या काळजीने चूर झाली असेल असेच त्याला वाटत होते. इकडे दमयंती पित्याच्या घरीं तुलनेने सुखात होती दोन्ही मुलेंहि तिच्या पाशीं सुखरूप होतीं पण नलाचे काय झालें असेल व पुन्हा त्याची भेट कशी होणार हा विचार तिला स्वस्थ बसूं देत नव्हता. तिने आपल्या परीने नलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले.

Thursday, September 16, 2010

नलदमयंतीकथा भाग ७

पुष्कर व नल यांचे द्यूत अनेक दिवस चालले. कौरव-पांडवांच्या द्यूताप्रमाणे तें अर्ध्या दिवसांत संपले नाही. मात्र युधिष्ठिराप्रमाणेच नलही कायम हरतच होता पण द्यूत संपवीत नव्हता. राज्याच्या मंत्र्यांना भेटावयासहि त्याला सवड नव्हती. दमयंतीला काय करावे हे काहीच सुचत नव्हते. तिने नलाला निरोप पाठवले कीं ’इतकें धन गेलें व इतकेच शिल्लक आहे.’ परिणाम शून्य! शेवटीं तिने वार्ष्णेय नावाच्या विश्वासू सारथ्याला बोलावून घेऊन त्याच्या बरोबर आपल्या दोन्ही मुलांना माहेरीं पाठवून दिलें. वार्ष्णेयाला सांगितले ’मुलांना पोंचवून व रथ तेथेच सोडून तूं निघून जा कारण राजाला आतां तुझा उपयोग होईल असे दिवस राहिलेले नाहीत.’ वार्ष्णेयाने त्याप्रमाणे केलें. तो दुसर्‍या ऋतुपर्ण नावाच्या राजाचे पदरीं नोकरीला राहिला. इकडे दमयंतीने येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची मनाची तयारी केली. सर्व धन संपत्ति हरून नल निष्कांचन झाला. पुष्कराने, नलाला (शकुनिप्रमाणेच)) ’दमयंतीला पणाला लाव’ असें सुचवलें. मात्र नलाने ती मर्यादा ओलांडली नाहीं. सर्वस्व हरल्यामुळे नल व दमयंती नेसत्या वस्त्रानिशी नगराबाहेर पडलीं. पाठोपाठ आलेल्या नगरजनाना परत पाठवून दोघें वनांत शिरलीं. नलाची दुर्दशा होऊनहि ’कली’चे समाधान झालेले नव्हते असे महाभारत म्हणते.
रात्रीं उपाशींपोटीं वनात भटकत असताना दमयंतीला ग्लानि येऊन झोपली असताना नलाला तीन सोनेरी पक्षी जमिनीवर दाणे टिपताना दिसले. त्यांना पकडावे म्हणून नलाने नेसते वस्त्र सोडून त्यांच्यावर टाकले पण ते वस्त्रच घेऊन ते पक्षी उडून गेले. दमयंतीच्याच वस्त्राचा थोडा भाग फाडून घेउन नलाने तो कमरेला गुंडाळला. त्याने आधी दमयंतीला ’तूं माहेरीं या अमुक रस्त्याने जा’ असें दाखवले होतें पण अशा आपत्काळीं त्याला सोडून जायचे तिने साफ नाकारले होते. आतां अर्ध्या वस्त्रावर पाळी आली तेव्हां नलाने विचार केला कीं आपण हिला झोपेत असताना सोडून गेलो तर ही नाइलाजाने माहेरीं जाईल, आता दुसरा इलाजच नाहीं. म्हणून अतिशय दु:खी अंत:करणाने दमयंतीला तशीच एकटी, अर्ध्या वस्त्रांत व निद्रित अवस्थेत सोडून नल वेगळ्या रस्त्याने निघून गेला. ’कली’ने नलाला म्हटलें ’तुम्ही दोघें वस्त्रांत होतांत तेंहि मला पाहवलें नाहीं म्हणून द्यूताचे तीन फासेच मी पक्षीरूपाने तुझ्याकडे पाठवले होते, आतां माझे कार्य झाले तुझी पुरती दुर्दशा झाली.’ याचा अर्थ असा विचार नलाच्या मनात आला एवढाच घ्यावयाचा असे मला वाटते.

Friday, September 3, 2010

नलदमयंतीकथा भाग ६

विवाहानंतर सर्व राजे आणि देवहि परत निघाले. देवांना वाटेत ’कलि आणि द्वापर’ असे दोघे भेटले. हे देव वा मानव कोणीच नव्हते. या कोणी दैवी शक्ति होत्या. मात्र देवांना टाकून दमयंतीने मानव नलाला वरिलें याचे कलीला वैषम्य वाटलें व त्याने जाहीर केले कीं मी नलाला धडा शिकवीन. पुढे नल-दमयंतीवर जी अनर्थपरंपरा कोसळली त्याचे कारण खरेतर नलाचे आत्यंतिक द्यूतप्रेम होते पण त्या जबाबदारीतून त्याला मुक्त करण्यासाठी ’तो सर्व कलीचा प्रभाव होता’ असे त्याचे कारण दर्शविले गेले आहे. ’कलीचा प्रभाव’ म्हणजे काही काळपर्यंत स्वत:ची विवेकबुद्धि हरवून बसणे एवढेच म्हणावयाचे.
नलदमयंतीचा संसार सुखाने चालला होता. त्याना दोन मुले झालीं. बराच काळ पर्यंत ’कली’ला आपला बेत साध्य करतां आला नाही. पण अखेर काळ नलाला प्रतिकूल झाला अन मग कलीने दावा साधला. नलाचा एक भाऊ होता. त्याचे नाव पुष्कर. तो नलाच्या राज्यात राहत होता असे म्हटलेले नाही. त्याचा व नलाचा काही झगडा झाला होता वा नलाने त्याचा अपमान करून त्याला राज्यातून हाकलून दिले होते असे म्हटलेले नाही आणि पुष्कराचे वेगळे राज्य होते असेहि म्हटलेले नाही. मग या पुष्कराने नलाशी वैर कां धरावें? ’कलीचा प्रभाव!’ एक दिवस अचानक हा पुष्कर नलाकडे आला आणि त्याने नलाला द्यूताचे आव्हान दिले. ते नलाने राजेलोकांच्या स्वभावाप्रमाणे स्वीकारले आणि मग ’कलीच्या प्रभावामुळे’ नलाची विवेकबुद्धि त्याला सोडून गेली. तो बेभानपणे द्यूताच्या संपूर्ण आहारीं गेला अन मग अनर्थपरंपरा सुरू झाली.

Thursday, August 19, 2010

नलदमयंतीकथा भाग ५

स्वयंवर मंडपात सर्व राजे, राजपुत्र जमले. नलहीं त्यांत होताच. चारी देवांनी त्याच्या शेजारचींच आसने पकडलीं एवढेच नव्हे तर चारी देवांनी नलाचेच रूप धारण केले! मंडपांत एका ओळीत पांच नल बसलेले दिसत होते. दमयंती स्वयंवर मंडपांत आली. तिला नलालाच माळ घालावयची असल्याने इतर राजांकडे न पाहतां ती सरळ नल बसला होता तेथेच आली. पाहते तों पांच नल! तिला काही सुचेना. तिला अर्थातच कळले कीं चारी देवांनी नलाचें रूप घेतले आहे. खरा नल ओळखल्याशिवाय माळ घालतां येईना. मग तिने मनांतल्या मनांत देवांची प्रार्थना केली कीं मी मनाने नलालाच वरले आहे तेव्हां आतां दुसर्‍या कोणाला माळ घातली तर ती प्रतारण होईल तेव्हां देवांनो तुम्हीच मला खरा नल कसा ओळखावा तें सांगा. देवांना तिच्या शुद्ध प्रेमाची खात्री पटली व मग नलाचें रूप त्यानी टाकलें नाहीं पण अशीं लक्षणे प्रगट केलीं कीं त्यायोगें नलरूपी देव ओळखूं यावे आणि तिलाच तीं लक्षणे ओळखण्याचीहि प्रेरणा दिली. तीं लक्षणे अशीं कीं न्यांचे नेत्र स्थिर होते म्हणजे पापण्या व बुबुळे हलत नव्हतीं, त्यांच्या गळ्यांतील हारांचीं फुले एकजात सारखीच टवटवीत व धुळीचा कणहि न उडालेलीं होतीं, एकहि किंचितहि सुकलेले नव्हतें, त्यांचे पाय जमिनीला न टेकतां अधांतरी होते. त्यांचे चेहेर्‍यावर किंचितहि घाम नव्हता. खर्‍या नलराजाचे ठायीं अशीं लक्षणे अर्थातच नव्हतीं. सूक्ष्म निरीक्षणाने दमयंतीला खरा नल ओळखता आला व तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. लगेचच देवांनीहि नलाचें रूप टाकून ते स्वत:च्या नित्य रूपांत दिसूं लागले. सर्व उपस्थितांनाहि हा सर्व प्रकार पाहून आश्चर्य व आनंद वाटला. देवांनी नलाचे अभिनंदन केले व त्याला अनेक वर दिले. त्यांत मुख्य म्हणजे अग्नीने ’तुला पाहिजे तेव्हा व तेथे मी लगेच प्रगट होईन’ असा वर दिला व वरुणाने ’पाहिजे तेव्हां तुला जल प्राप्त होईल’ असा वर दिला. स्वयंवर संपून नल-दमयंतीचा यथासांग विवाह झाला.

Saturday, August 14, 2010

नलदमयंतीकथा भाग ४

दमयंतीच्या रूपगुणांचे वर्णन ऐकून चार देव तिच्या प्रेमांत पडून तिच्या स्वयंवराला चालले होते ते नलाला वाटेत भेटले. मानव स्त्रीच्या प्राप्तीसाठी प्रत्यक्ष देवच स्पर्धेत उतरले होते ही मोठी रमणीय कल्पना आहे. इंद्र, अग्नि, यम व वरुण हे ते चार देव. नलाला पाहून त्याचे रूप व गुण लक्षात आल्यावर आपल्याला काही चान्स नाही असेंच त्याना वाटले! मात्र प्रयत्न न सोडतां त्यांनी एक डाव टाकला! त्यांनी खुद्द नलालाच आपला दूत बनवलें व सांगितलें कीं तूं दमयंतीला निरोप दे कीं आम्ही चौघे स्वयंवराला येणार आहों व आमच्या पैकींच एकाला तूं पसंत कर! देवांची आज्ञा त्यामुळे नलाला हे एक धर्मसंकट उभें राहिलें राहिलें! आपल्यापरीने त्याने ते टाळण्यासाठी सबब सांगितली कीं दमयंतीला मी एकांतात कसा भेटणार व निरोप सांगणार तेव्हां माफ करा. पण देवांना त्याची परीक्षाच पहावयाची होती. त्यांनी म्हटलें कीं आमच्या प्रभावाने तुला तिला भेटतां येईल. नाइलाजाने नलाला कबूल करावें लागलें. त्याप्रमाणे नल नगरांत गेल्यावर दमयंतीला भेटला व त्याने मन घट्ट करून देवांचा निरोप तिला सांगितला. दमयंती म्हणाली कीं मी तुम्हालाच वरण्याचा निश्चय केला आहे. नलाने पुन्हा म्हटलें कीं प्रत्यक्ष देवांना सोडून तूं एका य:कश्चित मानवाला कसें वरण्याची इच्छा करतेस? दमयंतीने सांगितलें कीं मी तुमच्या रूपगुणांवर लुब्ध होऊन तुम्हाला वरण्यासाठीच स्वयंवर मांडले आहे. नल पुन्हा म्हणाला कीं मी देवांच्या आज्ञेवरून दूत म्हणून तुला भेटतो आहें तेव्हां मला यश देण्यासाठीं तूं त्यांच्या इच्छेप्रमाणे कर. त्यांची अवकृपा न होतां तूं मला कसें वरणार? दमयंती म्हणाली कीं हे स्वयंवर आहे आणि मंडपात देवांच्या उपस्थितीतच मी तुम्हाला माळ घालीन म्हणजे तुम्हाला दोष येणार नाहीं. नल परत गेला व 'मी तुमचा निरोप दमयंतीला दिला पण तिने मलाच वरण्याचे ठरवले आहे! तेव्हा माझा नाइलाज झाला’ असें त्यांना म्हणाला.देवांनी दोघांचीहि परीक्षाच पहायचे ठरवले होते त्यामुळे त्यांनी नलाला माफ केले पण स्वयंवर मंडपात एक नवीनच युक्ति केली. ती पुढल्या भागात.

Wednesday, June 16, 2010

नलदमयंती कथा - भाग 3

नल हा निषध देशाचा राजा. त्याच्या अनेक गुणांचे ऋषि बृहदश्व यांनी वर्णन केले त्यांत तो सुंदर, अश्ववेत्ता, द्यूतप्रेमी, शूर, प्रजाहितदक्ष असल्याचे म्हटले आहे. दमयंती ही विदर्भ देशाची राजकन्या रूपवान व गुणवान होती. एकमेकांचे गुण कर्णोपकर्णी एकमेकांना कळून, प्रत्यक्ष न पाहतांच ती एकमेकांच्या प्रेमांत पडलीं होतीं. प्रेमविव्हल होऊन उपवनांत बसला असतां नलाने एका सोनेरी पंखांच्या हंसाला पकडले. त्याने विनवले कीं मला जिवंत सोडलेस तर मी दमयंतीला भेटून तिच्यापाशी तुझे गुणवर्णन करीन. नलाने त्याला सोडले व हंसाने देशांतराला जाऊन दमयंतीला भेटून नलाच्या रूपगुणांचे वर्णन तिला ऐकविले. ते ऐकून दमयंतीने ’तूं नलापाशी माझे वर्णन कर’ असे हंसाला म्हटले. त्याप्रमाणे हंसाने नलाकडे परत येऊन झालेली हकीगत त्याला सांगितली. हंस हा प्रेमदूत ही कल्पना कालिदासाच्या मेघदूतासारखीच आहे. महाभारत आधीचे, तेव्हां कालिदासाने नलदमयंतीच्या कथेवरून यक्षाने मेघाला दूत करण्याची कल्पना उचलली काय़? कसेहि असले तरी दोन्ही कल्पना रम्यच हे खरे.
नलाचें हंसकृत वर्णन ऐकून दमयंतीचा प्रेमरोग बळावला! एकंदर लक्षणे पाहून तिच्या पित्याने तिचें स्वयंवर ठरवलें व सर्व राजेलोकांना आमंत्रणे धाडलीं त्यांत नलहि होताच. स्वयंवर आहे म्हटल्यावर मोठ्या आशेने नल स्वयंवराला निघाला. वाटेत काय झाले ती कथा फारच मजेशीर आहे. ती पुढल्या भागांत.

Friday, June 4, 2010

नलदमयंती कथा - भाग २

बृहदश्वाने ही कथा युधिष्ठिराला कां ऐकविली याचे कारण असे कीं बृहदश्वापाशी युधिष्ठिराने गार्‍हाणे गाइले की ’फासे खेळण्यात पटाईत असलेल्या धूर्त जुगार्‍यांनी मला बोलावून माझे सर्व धन व राज्य हरण केले, मी अत्यंत दु:खी होऊन कष्टाने वनवास भोगीत आहे. माझ्या दु:खाने पीडित झालेल्या मित्रांचीं संतापजनक भाषणे माझ्या हृदयात आहेत. अस्त्रविद्या मिळवण्यासाठी मी अर्जुनाला दूर पाठवले आहे पण त्याच्या विरहाने आम्ही हवालदिल आहोत. माझ्यासारखा दुसरा कोणी भाग्यहीन राजा या पृथ्वीवर असेल काय? आपण अशा कोणाला पाहिले आहे काय? माझ्यापेक्षा दु:खी दुसरा कोणी नसेल.’
त्यावर बृहदश्वाने म्हटले कीं ’तुला वाटते तसे नाहीं. तुझ्याहूनहि भाग्यहीन आणि दु:खी राजाची कथा तुला सांगतो. निषध देशाच्या वीरसेन राजाचा पुत्र नला, जो धर्मार्थवेत्ता होता, तो बंधु पुष्कराकडून द्यूतांत जिंकला गेला आणि त्याने पत्नीसह वनवासाचे दु:ख भोगले. त्याच्या बरोबर सेवक, रथ, बंधुबांधव नव्हते. त्याच्याजवळ यापैकीं कांहींच राहिले नव्हते. तूं तर वीरबंधूंनी युक्त असून श्रेष्ठ व विद्वान ब्राह्मणांनीहि वेढलेला आहेस तेव्हां तूं शोक करणे योग्य नाहीं’
आपली विपत्ति ज्यालात्याला असह्य वाटते पण आपल्याहूनहि अधिक विपत्ति भोगलेले व भोगत असलेले अनेक असतातच त्यांचेकडे पाहून विवेकाचा आश्रय करणे हेच उचित हे चिरंतन सत्य येथे या संवादानिमित्ताने समॊर मांडलेले आहे. महाभारतात असा वैचारिक अनुभव जागोजागीं येतो. त्यासाठी श्रद्धेवांचून अडत नाहीं.

Tuesday, June 1, 2010

नलदमयंती कथा - भाग १

पुन्हा सुरवात करताना काय लिहावे असा विचार करताना नल-दमयंतीची कथा नजरेसमोर आली. या कथेत अद्भुत भाग पुष्कळ आहे मात्र तरीहि काही नवीन दृषिकोनातून लिहिता येईल असे वाटल्यामुळे सुरवात करीत आहे. आपल्या प्रतिसादांची प्रतीक्षा आहेच.
महाभारतातील हे एक अप्रतिम उपाख्यान आहे. यातील अद्भुत भाग सोडून जर कोणी पटकथा लिहिली तर एक सुंदर सिनेमा बनेल. अद्याप माझ्या माहितीप्रमाणे कोणी केलेला नाही.
पांडव द्यूतात हरून बारा वर्षांच्या वनवासात गेल्यावर कौरवांवर सूड उगवण्यासाठी द्रौपदी व भीम उतावळे झाले होते. तेरा वर्षे फुकट न घालवतां लगेच कौरवांवर चाल करावी असा त्यांचा आग्रह होता. द्यूताचा कैफ उतरल्यावर युधिष्ठिराला मात्र परिस्थितीचे उत्तम भान होते. भीम, द्रौपदी, कृष्ण, यादव, पांचाल यांनी कितीहि भरीस घातले तरी १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास हा पण मोडून ताबडतोब युद्धाला उभे राहण्यास तो मुळीच तयार नव्हता. मात्र वचन मोडावयाचे नाही या विचाराबरोबरच दुसरे मुख्य कारण म्हणजे लगेच युद्ध उभे केले तर भीष्म-द्रोण पूर्ण ताकदीने कौरवांची बाजू घेतील, इतर अनेक महावीर (त्यांत प्रमुख कर्ण, अश्वत्थामा, भूरिश्रवा) दुर्योधनाच्या मदतीला आहेत व विजय सहजीं मिळणार नाही हे तो जाणून होता. आरण्यकपर्वातील अध्याय ३६ मध्ये श्लोक १ ते २० मध्ये त्याने हे भीमाच्या गळीं उतरवले आहे ते मुळातून वाचण्यासारखे आहे. आपली बाजू बळकट करण्यासाठी, व्यासांच्या सांगण्याप्रमाणे, अर्जुनाला अस्त्रविद्येतील पुढील शिक्षणासाठी व तपाचरण करून देवांना संतुष्ट करण्यासाठी त्याने दूर पाठवले व ’तुझ्यावर आमचा सर्व भार आहे आणि भीष्म-द्रोणांच्यापेक्षा जास्त अस्त्रज्ञान तुझ्यापाशी आल्याशिवाय आपला विजय होणार नाही’ याची त्याला स्पष्ट कल्पना दिली. अर्जुनाने प्रत्यक्ष महादेव व इंद्र यांचकडून नवीन अस्त्रविद्या संपादन केली. (माझ्या मतें त्याने ती वनातील अनार्य - किरात - योद्ध्यांकडून मिळवली! मात्र युद्धाचे प्रारंभीं ’माझ्यापाशीं जी अस्त्रे आहेत त्यांचे ज्ञान भीष्माला वा द्रोणालाहि नाहीं’ असें तो अभिमानाने त्यामुळेच म्हणूं शकला.) नंतर तो स्वर्गात इंद्रापाशी आहे असे व्यासांकडून पांडवांना कळले व ते त्याच्या परत येण्याची वाट पाहात होते. अशा काळात एकदां बृहदश्व नावाचे एक ऋषि पाडवांकडे आले. त्यांनी नल-दमयंतीची कथा पांडवांना ऐकवली. ती पुढील भागांत पाहूं.

Tuesday, April 27, 2010

पुन्हा सुरवात?

मित्रानो नमस्कार.
अमेरिकेतून भारतात परत आलो आहे. महाभारतातील बर्‍याच विषयांवर लिहून झाले. नवीन लेखन केव्हांच बंद झाले. नवल म्हणजे अजूनहि हा ब्लॉग उघडून वाचला जातो आहे. तेव्हां पुन्हा सुरवात करून काही लिहावे असे वाटते पण थोडी तयारी झाल्याशिवाय काय लिहिणार? प्रयत्न करणार आहे पण थोडी वाट पहाल अशी आशा आहे.
प्र. के. फडणीस