आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Saturday, September 25, 2010

नलदमयंतीकथा भाग ९

वडिलाच्या पदरीं असलेल्या काहीं ब्राह्मणांना तिने नलाचा शोध घेण्यासाठीं सर्व दिशांना पाठवलें. कोणा एका पतीने वनात पत्नीला एकटीला सोडून दिल्याचे व तिच्या झालेल्या हाल अपेष्टांचे वर्णन करणारे एक कवन त्याना शिकवून ’ते अनेकांना ऐकवा व कोणाचा काही प्रतिसाद मिळाला तर येऊन मला सांगा’ असे त्याना सांगितले. सर्व जण हात हलवीत परत आले पण पर्णाद नावाच्या एका ब्राह्मणाने मात्र म्हटले कीं मी राजा ऋतुपर्णाच्या राजधानीला गेलो होतो व तुमचे काव्य ऐकवले असतां राजाचा बाहुक नावाचा एक सारथी व्याकुळ होऊन त्याने उद्गार काढले कीं ’उच्चकुळांतील स्त्रिया संकटे कोसळलीं म्हणून धीर सोडत नाहीत वा पतीला दोष देत नाहीत. पत्नीला ज्याने एकटे सोडले त्या पतीला तसेच काही कारण झाले असेल. त्या पत्नीने पतीवर राग धरूं नये’ हे ऐकून दमयंतीला तो नल तर नव्हे अशी शंका आली पण त्या सारथ्याचे रूपगुण नलासारखे मुळीच नव्हते असे त्या ब्राह्मणाच्या वर्णनावरून दिसत होते. फक्त तो रथचालनात प्रवीण आहे व पाककलेतहि तज्ञ आहे एवढे वर्णन नलाशीं जुळते होते. तेव्हां खरें काय हे कळण्यासाठी आईशी विचारविनिमय करून पण वडिलांशी न बोलतां तिने एक नवीनच धाडसी युक्ति केली. सुदेव नावाच्या दुसर्‍या ब्राह्मणाला ऋतुपर्णाकडे निरोप देऊन पाठवलें कीं ’नलाचा शोध अजिबात लागत नसल्यने दमयंतीने पुन्हा स्वयंवर ठरवले आहे मात्र ते उद्यांच आहे तेव्हां वेळेत आमच्या राजधानीला पोचता येते का पहा.’ हा निरोप इतर कोणा राजाकडे अर्थातच पाठवलेला नव्हता. बाहुक हाच नल असेल तर त्याच्या रथचालनाच्या अद्वितीय कौशल्याने ऋतुपर्ण येऊन पोंचेल व बाहुकाला प्रत्यक्ष पाहतां येईल असा तिचा विचार होता.
सुदेव त्याप्रमाने ऋतुपर्णाच्या राजधानीला जाऊन त्याला भेटला व निरोप सांगितला. ऋतुपर्णाने बाहुकाला म्हटले कीं ’इतक्या थोड्या वेळांत इतके दूर कसें पोंचतां येईल?’ बाहुकाला दमयंतीचा पुन्हा स्वयंवराचा बेत ऐकून फार दु:ख झाले पण स्वत:च्या रथसंचालनाच्या अभिमानापोटीं त्याने ऋतुपर्णाला म्हटलें की तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला नेऊन पोंचवीन! ऋतुपर्ण बाहुक व वार्ष्णेय तिघेही निघाले. नलाने अश्वशाळेतील स्वत: पारख केलेले दिसायला हाडकुळे पण तेजस्वी घोडे रथाला जोडले. घोडे पाहून ऋतुपर्णाला शंका वाटली. नलाने म्हटलें कीं माझी निवड तुम्हाला पटत नसली तर तुमच्या पसंतीचे घोडे जोडा आणि वार्ष्णेयाला घ्या, तोहि उत्तम सारथ्य जाणतो. ऋतुपर्ण मुकाट बसला.
राजा ऋतुपर्ण हा द्यूतविद्येत व गणनाशास्त्रात प्रवीण होता. नल रथसंचालनात व अश्वपरीक्षेत तज्ञ होता. नलाचे द्यूतातील अज्ञान दूर झाल्याखेरीज त्याला आपले राज्य व वैभव पुष्कराकडून परत मिळवता येणार नव्हते. नलाच्या वेष पालटून ऋतुपर्णाच्या पदरीं नोकरी करण्यामागे त्याचेकडून अक्षविद्या प्राप्त करून घ्यावी हा हेतु असावा. कदाचित कर्कोटकानेच त्याला ही कल्पना सुचवली असावी असा तर्क सयुक्तिक वाटतो. प्रवासात वाटेतच हे विद्येचे आदानप्रदान झाले असे वर्णन महाभारतात आहे. कदाचित नलाच्या ऋतुपर्णाच्या सेवेत असण्याच्या काळात ते वेळोवेळी झाले असेल.

5 comments:

ओंकार शरद पारखी said...

काका,
तुमची महाभारतातील पात्रांना मानव मानून
तर्काने उकल करण्याची पद्धत आवडली.
मी कालच आपला ब्लॉग पहिल्यांदा वाचला.
मग एकाजागी बसून सगळ्या पोस्ट एकामागून एक
वाचून काढल्या. आता आज रामायणा वरचा
तुमचा ब्लॉग वाचेन.

कळावे,
ओंकार.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

धन्यवाद.
तरुण पिढीतील नवीन वाचकांनाहि माझे लेखन व विचार आवडतात याचा मला मोठाच आनंद आहे. अजूनहि काहीबाही लिहिणे सुरू ठेवले आहे याचे कारण नवीन वाचक अजूनहि मिळताहेत!

Asha Joglekar said...

Tarunana awadato tasach aamchya sarkhya vruddhana hee awadtay he aakhyan. Aata mage jaoon poorn wachayala lagel.

Asha Joglekar said...

Wachlya sarw post an Lahanpani wachleli Nal-Damayantichi gosht punha
Ekda wachayala milali. An waman panditanchi kawita pan athwali . Mahabharatacha sandarbh matr maheet navata to kalla. Khoopach chan chalal aahe he aakhyan.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

श्रीमती आशा जोगळेकर,
आपणाला आठवत असेल ते रघुनाथपंडिताचे ’नलदमयंतीस्वयंवराख्यान’, वामनपंडिताचे नव्हे! त्यातील तीं प्रत्येक कडव्याचीं वेगवेगळीं वृत्तें मला अजूनहि आठवतात. अजुन फणस समोर आला कीं ’उपरि सकंटक साचे परंतु साचे जयांत सुरसाचे, घोस असे फणसांचे षण्मासांचे कितेक वर्षांचे ...’ वगैरे आठवते! अमेरिकेतल्या नातीने ’aliteration'ची बढाई मारलीं कीं तिला ऐकवायला उपयोगी पडतात.