आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Tuesday, May 27, 2008

शिशुपाल वध भाग २


मागील भागात लेखाची दोन पाने छापली होती. आता अखेरचा भाग वाचावयास मिळेल. पहिल्या भागावरील कॉमेंट वाचल्यास सुदर्शन चक्राबद्दल थोडा खुलासा केला आहे तो वाचता येईल. मी चमत्कारांना सामोरे जाण्यापेक्षा बगल देणे पत्करतो. कोणाच्या श्रद्धा दुखवणे टळते ( जो माझा मुळात हेतुच नाही) व कथेचे मूळ तपासताना ते महत्वाचेहि नसते. या कथेमध्ये, कृष्णाने आलेल्या संधीचा फायदा कसा करून घेतला ही गोष्ट मला जास्त महत्वाची वाटते. जरासंधवध व शिशुपालवध या दोन्ही कथांत हा समान धागा मला जाणवतो.

Monday, May 26, 2008

शिशुपालवध











जरासंधवधाची कथा व त्यावरील माझे मतप्रदर्शन आपण वाचलेत. जरासंधाच्या वधानंतर पांडवानी सर्व राजांकडे दूत पाठवून संमति मिळवून मग राजसूय यज्ञ केला. पांडवांच्या या राजसूययज्ञाच्या वेळी यज्ञ संपल्यावर सर्व राजेलोकांचा सन्मान व अहेर झाले. त्यांत प्रथम सन्मान कोणाचा करावा यावर खूप वादविवाद झाला. पांडवाना कृष्णाचा सन्मान प्रथम करावयाचा होता व शिशुपालाला हे मान्य नव्हते. यावरून झगडा होऊन कृष्णाने शिशुपाल या आपल्या दुसऱ्या वैऱ्याचा अचानक वध केला. ह्या कथेने महाकाव्यांना जन्म दिला आहे व कृष्णाला या कृत्याबद्दल महान मानले जाते. प्रत्यक्षात या कथेचा महाभारतातून चिकित्सकपणे मागोवा घेतला तर या कृत्याबद्दल कृष्णाला थोर म्हणणे अवघड आहे असे माझे मत बनले आहे. माझे या विषयावरील पूर्वीचे लेखन ट्रु-टाइप फॉन्ट मध्ये होते व तो लेख छापलेला माझेपाशी आहे त्यामुळे पुन्हा सर्व मजकूर युनिकोड मध्ये टाइप करण्याऐवजी त्या लेखाचे फोटो देत आहे. आवश्यक तर फोटोवर क्लिक करून वाचावे अशी विनंति आहे.
लेखाचा शेवटचा भाग पुढील पोस्टमध्ये वाचावा.




Friday, May 9, 2008

जरासंध वध भाग ३

कृष्णाच्या सूचनेवर बराच बेळ चर्चा चालून नंतर भीमाने मत दिले कीं आपण स्वत:, अर्जुन व कृष्ण यांनी जरासंधाच्या वधाचा प्रयत्न केला पाहिजे. कॄष्णाने पुन:पुन्हा जरासंधाचे बळ, त्याच्या अंगातील सम्राटाला शोभणारे सर्व गुण, त्याचबरोबर सर्व राजेलोकांचा त्याने चालवलेला छळ व कैदेतील राजांचे बळी द्यावयाचा त्याचा बेत वर्णन करून जो जरासंधाचा हा बेत हाणून पाडू शकेल तोच सम्राट म्हणविण्यास पात्र ठरेल असे सांगितले. या सर्व चर्चेच्या वेळी हे राजे कोण होते याचा काहीहि खुलासा महाभारतात नाही! भीम, अर्जुन व कृष्ण यांनी तिघानीच मिळून जरासंधाशी लढण्याचा भीमाचा बेत युधिष्ठिराला मुळीच पसंत झाला नाही. त्यापेक्षा तो राजसूय यज्ञ करण्याचा बेतच सोडून देण्यास तयार झाला. पण मग अर्जुनालाही जोर चढला. तोही भीमाच्या बेताला अनुकूल झाला. आपल्यासारख्या बलवानानी अन्याय्य गोष्टीचा प्रतिकार केलाच पाहिजे असे त्याने मत दिले. भीम व अर्जुन कृष्णाच्या मनातलेच बोलल्यामुळे आता कृष्णालाही जोर आला. जरासंधाबरोबर सरळ युद्ध करून जिंकणे अशक्य असल्यामुळे, गुप्तपणे त्याच्या वाड्यात प्रवेश करून त्याच्या वधाचा प्रयत्न करावा असाच बेत त्याने सुचवला. युधिष्ठिराच्या इच्छेप्रमाणे कृष्णाने पुन्हा एकदा त्याला जरासंधाच्या जन्माचा सर्व अद्भुत इतिहास सांगितला. तो महान बलवान व गुणी सम्राट आहे असेहि पुन्हापुन्हा सांगितले. असे असूनहि, कृष्णाने त्याचा जावई कंस याचा वध केल्यामुळे त्याचे यादवांशी व कृष्णाशी मोठे वैर होते व त्याच्या राजेलोकांना बळी देण्याच्या बेतामुळे कृष्णाला त्याचा वध हवा होता. कोण होते हे राजे? महाभारतात काही खुलासा नाही. कुरु, पांचाल, यादव सोडून इतर राजघराण्यानी जरासंधाचे वर्चस्व मान्य केले होते. कुरूंचा व जरासंधाचा झगडा झालेला नव्हता. यादव द्वारकेला गेल्यावर इतर कोणा राजाशी जरासंधाचे वितुष्ट आल्याचाही उल्लेख दिसत नाही. तेव्हा हे राजे म्हणजे, वृष्णी, अंधक, भोज या यादवांच्याच वेगवेगळ्या कुळांतील असले पाहिजेत. यादव व जरासंध यांच्यांतील अनेक युद्धांमध्ये हे कैदी झाले असावे व यादव द्वारकेला गेल्यामुळे आता याना कसे सोडवावे हा प्रष्नच होता. कृष्ण सोडून इतर कुणा राजकुळाला याची चिंता पडलेली दिसत नाही. जरासंधाला विरोध करण्याची कोणाची हिंमत नव्हती हे त्याचे कारण असू शकेल. अन्याय करणाऱ्या इतर राजांना नारद वा इतर थोर ऋषि उपदेश करीत तसाहि जरासंधाला कोणी केलेला दिसत नाही. या राजांना युद्धात जिंकून घेतलेले असल्यामुळे त्याना जरासंधाने कैदेत ठेवणे कोणाला फारसे अनुचित वाटले नसावे. यज्ञात बळि देणे अनुचितच होते पण ती वेळ आलेली नव्हती व त्याची चिंता एकट्या कृष्णालाच पडली होती यावरून ते सर्व यादवच असावे या तर्काला पुष्टि मिळते.
कृष्णाचा बेत सरळ होता. कृष्ण अर्जुन व भीम जरासंधासमोर द्वंद्वासाठी उभे राहिले तर आपल्या बळाच्या अभिमानामुळे तो भीमाशी मल्लयुद्ध करणेच पसंत करील व भीमच त्याचा वध करूं शकेल हा त्याचा विचार होता! म्हणून त्याने अखेर युधिष्ठिराचे मन आपल्या बेताकडे वळवून घेतले. कृष्ण, अर्जुन व भीम यांनी लवकरच गुप्तपणे मगधाची राजधानी गिरिव्रज गाठली. स्नातक ब्राह्मणाच्या वेषात गिरिव्रजाला पोचलेल्या या तिघांनी शहरात काही दंगामस्ती करून नागरिकांमध्ये स्वत:बद्दल धाक, आश्चर्य अशा भावना निर्माण केल्या व अखेर ते जरासंधासमोर आले.त्यांच्या ब्राह्मणवेषाचा मान ठेवून पण त्यांना न ओळखून, जरासंधाने त्यांचा सत्कार केला. त्यांनी तो स्वीकारला नाही. तुम्ही कोण आहात असे जरासंधाने स्पष्टच विचारल्यावर कृष्णाने त्याला आपल्या तिघांची ओळख करून दिली व तुझ्या दुष्कृत्यांमुळे, विशेषत: राजेलोकांचे बळी देण्याच्या तुझ्या बेतामुळे तुला शासन करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे आव्हान त्याला दिले. जरासंधाने कृष्णाच्या आरोपांना समर्पक उत्तरे दिली. ’मी धर्मानेच राज्य करतॊ आहे व माझी प्रजा सुखी आहे. राजांना मी योग्य प्रकारे युद्ध करून जिंकले आहे व त्यांचे काहीहि करण्याचा मला अधिकार आहे. कुरुकुळाशी माझे मुळीच वैर नाही’ असे म्हटले. अखेर कृष्णाच्या मनांतील बेताप्रमाणेच, त्याने द्वंद्वयुद्धाचे आव्हान स्वीकारले व कृष्ण वा अर्जुन यांना झिडकारून, बलवान भीमालाच प्रतिस्पर्धी ठरवले. कृष्ण व बलराम दोघेही मल्लविद्येत प्रवीण असूनहि, अद्यापपर्यंत त्यांची जरासंधाशी एकास एक अशी गाठ पडलेली नव्हती. कृष्णाचा मामा कंस याचा जरासंध हा सासरा तेव्हा भीमाच्या वा कृष्णाच्या मानाने तो खूपच वयस्क होता. तरीहि, स्वत: किंवा बलराम यांचेपेक्षाहि बक, हिडिंब याच्यासारख्या अमानुष बळ असलेल्या राक्षसाना मारू शकलेला भीम हाच एकटा जरासंधाशी लढू शकेल हे कृष्ण जाणून होता. महाभारतात, कृष्ण व बलराम यादवकुळातील असल्यामुळे, ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांना जरासंध अवध्य होता असा खुलासा केला आहे पण तो फुसका वाटतो. ब्रह्मदेवाने हा वर जरासंधाला कां व केव्हा दिला हे सांगितलेले नाही! खरे कारण, माझ्या मते, जरासंधाने त्यांना मल्लयुद्धाची संधिच दिली नसती. त्यांना तो गवळीच मानत होता, बरोबरीचे राजकुळातले नव्हे!
भीम-जरासंध युद्ध तेरा दिवस अखंड चालले. अतिशयोक्ति सोडून दिली तरी दीर्घकाळ चालले हे खरे. अखेर जरासंध दमला पण भीम तरीहि जोरात होता. अखेर त्याने जरासंधाच्या तंगड्या धरून उलटसुलट ओढून त्याला मारले. कृष्ण, बलराम,शल्य, कर्ण वगैरे इतर कोणाही मल्लविद्येत प्रवीण व्यक्तीने एवढा दीर्घकाळ मल्लयुद्ध केल्याचे महाभारतात वा इतरत्रहि वर्णन आढळत नाही. भीमाच्या अफाट ताकदीवर कृष्णाने टाकलेला विश्वास भीमाने सार्थ ठरवला. जरासंध मेल्यावर, बंदीतील राजांना सोडवून, व जरासंधपुत्र सहदेव याला राज्यावर बसवून कृष्ण, अर्जुन व भीम विजयी होऊन इंद्रप्रस्थास परत आले. कृष्णाने जे योजले होते ते पार पडले.
या साऱ्या कथेमध्ये कृष्णाच्या अंगचे सर्व मानवी पातळीवरील लोकोत्तर गुण दिसून येतात. स्वत:चे शरीरबळ कदाचित पुरणार नाही व सैन्यबळावर विजय अशक्य तेथे त्याने योग्य व्यक्तीचा उपयोग केला. त्यासाठी दीर्घकाळ संधीची वाट पाहिली. राजसूय यज्ञच्या बेतामुळे ती प्राप्त होतांच तिचा कौशल्याने उपयोग करून घेतला. शत्रूचे बलस्थान जे अफाट शरीरबळ त्याच्या अभिमानालाच त्याने डिंवचले. सर्व बेत काळ्जीपूर्वक आखला व तडीस नेला. त्यांत, मुख्य म्हणजे, युधीष्ठिर, अर्जुन, भीम यांना समाविष्ट करून घेताना, ते कृष्णाच्या वैऱ्याशी लढत नसून जणू स्वत:च्याच वैऱ्याशी लढत आहेत अशी त्यांची मनॊभूमिका करून घेतली व अखेर भीमाकरवी आपल्या कुळाच्या एका न आटपणाऱ्या वैऱ्याचा शेवट घडवून आणला. कृष्णाला अवतार मानणे हा श्रद्धेचा भाग आहे. मात्र लोकोत्तर पुरुष मानावेच लागते ते अशा प्रसंगांमुळे व कथांमुळे!

Wednesday, May 7, 2008

जरासंध वध - भाग २

कृष्णाने राजसूय यज्ञ करण्याची कल्पना उचलून धरली. पण पांडवांना जरासंधाच्या सम्राट पदाची माहिती सांगून त्याला हरवल्याशिवाय युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करण्याचा अधिकार नाही असे दाखवून दिले. जरासंध व यादव यांच्यामधील वैराचा सर्व इतिहास सांगितला. जरासंधाच्या बाजूने असलेल्या राजांची नामावळी सांगितली. एक युधिष्ठिराचा मामा पुरुजित कुंतिभोज सोडला तर इतर सर्व राजे, त्यांत पांडूचा मित्र असलेला राजा भगदत्त, कृष्णाचा सासरा भीष्मक, शिशुपाल वगैरे सर्व, जरासंधालाच सम्राट मानतात ही वस्तुस्थिति ऎकवली. ’थोडादेखील विसावा न घेता घोर अस्त्रांनी तीनशे वर्षे लढलो तरी जरासंधाचा पराभव करणे शक्य नाही’ या कारणास्तव भोजांच्या अठरा घराण्यांनी व नंतर इतर यादव घराण्यांनीहि, मथुरा सोडून द्वारकेला नवीन शहर वसवून, बंदोबस्तात राहणे पसंत केले हा इतिहास सांगितला. जरासंध व त्याचे दोन सेनापति हंस व डिंभक यांच्या पराक्रमामुळे त्याने अनेक राजे युद्धात हरवून, त्याना तुरुंगात टाकले आहे व शंभर राजे पकडल्यावर त्यांचा यज्ञात बळि देण्याचा त्याचा विचार आहे, तेव्हा त्याला हारवल्याशिवाय वा मारल्याशिवाय तुम्ही राजसूय यज्ञ कसा करणार असा प्रष्न उपस्थित केला. वास्तविक, यादवांबरोबरच्या युद्धात हंस व डिंभक मरण पावले होते. तरीहि युद्धामध्ये जरासंधाला हरवण्याची उमेद यादवांना राहिली नव्हती. तेव्हा, द्वंद्वामध्ये गाठून जरासंधाला एखाद्या महान वीराने मारले तरच त्याचे पारिपत्य शक्य होते. यासाठी अर्थातच भीमाशिवाय दुसरा कोण समर्थ होता? वास्तविक कुरूंचे व जरासंधाचे वैर नव्हते. भीष्माशी वैर वा युद्ध जरासंधालाहि परवडले नसते! युधिष्ठिराने सरळ दूत पाठवून राजसूय यज्ञ करण्याचा प्रस्ताव जरासंधासमोर मांडला असता तर युधिष्ठिराबद्दलच्या आदरापोटी व भीष्माच्या धाकाने जरासंधाने कदाचित त्याला मान्यता दिलीहि असती. पण या पर्यायात कृष्णाला रस नव्हता! त्याला या निमित्ताने जरासंधाचा काटा काढावयाचा होता व त्याच्या कैदेत पडलेले आपले बांधव सोडवावयाचे होते! कृष्णाने हा हेतु कसा साध्य केला हे अखेरच्या भागात पाहू.

Monday, May 5, 2008

जरासंध वध

महाभारतातील दोन विषय संपवून मी आता तिसरा विषय सुरू करीत आहे.
महाभारतातील श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा दुहेरी आहे. श्रीकृष्णाचे मानवी पातळीवरील लोकोत्तर गुणावगुणांचे चित्रण व दैवी पातळीवरील चित्रण. मानवी पातळीवर तो वीर पुरुष, राजनीतिज्ञ, मुत्सद्दी, विचारी, तत्त्वज्ञ असा वर्णिला आहे तर दैवी पातळीवर प्रत्यक्ष अवतार व अनेक अद्भुत कृत्ये करणारा! ’जय’ चे ’महाभारत’ होत गेले तसे लोकोत्तर पुरुष म्हणून असलेले महत्त्व कमी होत जाऊन ईश्वराचा अवतार या कल्पनेला जास्त उजाळा मिळत गेला असावा. त्याचे मानवी पातळीवरील चित्रण हे माझ्या मते जास्त मनोहारी आहे!
जरासंध हा कृष्णाचा शत्रू, पांडवांचा नव्हे! पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या निमित्ताने कृष्णाने त्याचा भीमाकडून वध घडवून आणला. या घटनेमध्ये कृष्णाचे मानवी पातळीवरील लोकोत्तर गुणावगुण प्रगट झालेले दिसतात.
कृष्ण व पांडव यांची प्रथम भेट द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी झाली हे आपण पाहिलेच आहे. बाळपणापासून भीम हा महाबलवान असल्याच्या कथा सर्वश्रुत झाल्या होत्या. अनेक कौरवांना तो एकटाच भारी पडे. यामुळे दुर्योधन त्याचा द्वेष करीत असे. ही पार्श्वभूमि कृष्णाला ऐकून माहिती असणारच. वारणावतातून सुटून गेल्यावर वनांत हिंडताना हिडिंब व बकासुर या दोन महाबलवानांचा त्याने निव्वळ शरीरबळावर वध केला होता. हे वध कोणी केले हे आधी नक्की कळलेले नसले तरी पांडवांचा परिचय झाल्यावर ते कृष्णाला कळले होते. अर्जुनाने पण जिकल्यावर इतर राजांशी युद्ध करावे लागले तेव्हा एक झाड उपटून घेऊन भीमाने सर्वांना झोडपलेले कृष्णाने स्वत:च पाहिले होते. या साऱ्या गोष्टीतून कॄष्णाने मनाशी काही आडाखे बांधले असावे पण तो योग्य संधीची वाट पाहात होता. त्याच्यापुढे एक मोठा प्रष्ण होता!
कृष्णाने कंसवध करून आजोबा उग्रसेन याला मथुरेच्या राज्यावर स्थापन केले. कंस हा जरासंधाचा जावई. जावयाच्या वधाने चिडलेल्या जरासंधाने तेव्हापासून वारंवार मथुरेवर हल्ले करून यादवांना सतावले होते. अठरावेळा युद्ध होऊनहि कोणालाच निर्णायक विजय मिळाला नव्हता. मात्र यादवांची खात्री झाली की आपण सुखाने मथुरेत राहू शकत नाही वा जरासंधाला मारूहि शकत नाही. नाइलाजाने वृष्णी, अंधक व भोज या तिन्ही यादवकुळानी, सर्व संपत्ति, गुरेढोरे यासह देशत्याग करून शेकडो मैल दूर पश्चिम समुद्रकिनारी नवीन द्वारकानगरी वसवून मजबूत राजधानी बनवली. यानंतर पुन्हा यादव व जरासंध यांचे युद्ध उद्भवले नाही. या अठरा युद्धांमध्ये, बहुधा, अनेक यादववीर कैदी झाले असावे. द्वारकेला दूर निघून गेल्यामुळे त्यांना सोडवण्याचा कोणताच मार्ग, यादवांना वा कृष्णाला उपलब्ध राहिला नव्हता. हा कृष्णापुढील जटिल प्रष्न होता.
द्रौपदी स्वयंवरानंतर कृष्ण व पांडव याची मैत्री उत्तरोत्तर दृढ होत गेली. भीष्माने निक्षून सांगितल्यामुळे अखेर धृतराष्ट्राने पांडवाना अर्धे राज्य देऊन इंद्रप्रस्थाला पाठवले. इंद्रप्रस्थ वसवण्यास कृष्णाने पांडवांना सर्व मदत केली. दीर्घकाळ इंद्रप्रस्थात राहून कृष्ण द्वारकेला परत गेला. नंतर त्याची व अर्जुनाची पुन्हा भेट अर्जुन तीर्थयात्रा करीत द्वारकेला पोचला तेव्हा झाली. तेव्हाही अर्जुनाला आवडलेल्या सुभद्रेशी त्याचा विवाह होण्यासाठी कृष्णाने सर्व मदत केली. त्याच्या सांगण्यावरूनच यादवानी अर्जुनाशी लढण्यापेक्षा अर्जुनाशी सख्य करणे श्रेयस्कर मानले! अर्जुन-सुभद्रा इंद्रप्रस्थाला परत गेलीं, मग अभिमन्यूचा व पांच पांडवपुत्रांचा जन्म झाला. या सर्व सुखाच्या काळातील पांडव व कृष्ण यांची मैत्री व परस्पर आदरभाव वाढत गेला. कृष्णार्जुनांनी मिळून खांडव वन जाळणे ही यातील अखेरची पायरी म्हणता येईल. त्यानंतर कृष्ण द्वारकेला परत गेला. आगीतून वांचलेल्या मयासुराकडून पांडवांनी मयसभा बनवून घेतली. मग त्यांना राजसूय यज्ञाची कल्पना सुचवली गेली. त्यानी अर्थातच लगेच कृष्णाला सल्लामसलतीसाठी बोलावून घेतले. आपला जटिल प्रष्न सोडवण्यासाठी कृष्ण बराच काळ ज्या संधीची वाट पहात होता ती आता आयतीच चालून आली! तिचा कॄष्णाने कसा फायदा करून घेतला हे पुढील भागात पाहू!