आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Friday, May 9, 2008

जरासंध वध भाग ३

कृष्णाच्या सूचनेवर बराच बेळ चर्चा चालून नंतर भीमाने मत दिले कीं आपण स्वत:, अर्जुन व कृष्ण यांनी जरासंधाच्या वधाचा प्रयत्न केला पाहिजे. कॄष्णाने पुन:पुन्हा जरासंधाचे बळ, त्याच्या अंगातील सम्राटाला शोभणारे सर्व गुण, त्याचबरोबर सर्व राजेलोकांचा त्याने चालवलेला छळ व कैदेतील राजांचे बळी द्यावयाचा त्याचा बेत वर्णन करून जो जरासंधाचा हा बेत हाणून पाडू शकेल तोच सम्राट म्हणविण्यास पात्र ठरेल असे सांगितले. या सर्व चर्चेच्या वेळी हे राजे कोण होते याचा काहीहि खुलासा महाभारतात नाही! भीम, अर्जुन व कृष्ण यांनी तिघानीच मिळून जरासंधाशी लढण्याचा भीमाचा बेत युधिष्ठिराला मुळीच पसंत झाला नाही. त्यापेक्षा तो राजसूय यज्ञ करण्याचा बेतच सोडून देण्यास तयार झाला. पण मग अर्जुनालाही जोर चढला. तोही भीमाच्या बेताला अनुकूल झाला. आपल्यासारख्या बलवानानी अन्याय्य गोष्टीचा प्रतिकार केलाच पाहिजे असे त्याने मत दिले. भीम व अर्जुन कृष्णाच्या मनातलेच बोलल्यामुळे आता कृष्णालाही जोर आला. जरासंधाबरोबर सरळ युद्ध करून जिंकणे अशक्य असल्यामुळे, गुप्तपणे त्याच्या वाड्यात प्रवेश करून त्याच्या वधाचा प्रयत्न करावा असाच बेत त्याने सुचवला. युधिष्ठिराच्या इच्छेप्रमाणे कृष्णाने पुन्हा एकदा त्याला जरासंधाच्या जन्माचा सर्व अद्भुत इतिहास सांगितला. तो महान बलवान व गुणी सम्राट आहे असेहि पुन्हापुन्हा सांगितले. असे असूनहि, कृष्णाने त्याचा जावई कंस याचा वध केल्यामुळे त्याचे यादवांशी व कृष्णाशी मोठे वैर होते व त्याच्या राजेलोकांना बळी देण्याच्या बेतामुळे कृष्णाला त्याचा वध हवा होता. कोण होते हे राजे? महाभारतात काही खुलासा नाही. कुरु, पांचाल, यादव सोडून इतर राजघराण्यानी जरासंधाचे वर्चस्व मान्य केले होते. कुरूंचा व जरासंधाचा झगडा झालेला नव्हता. यादव द्वारकेला गेल्यावर इतर कोणा राजाशी जरासंधाचे वितुष्ट आल्याचाही उल्लेख दिसत नाही. तेव्हा हे राजे म्हणजे, वृष्णी, अंधक, भोज या यादवांच्याच वेगवेगळ्या कुळांतील असले पाहिजेत. यादव व जरासंध यांच्यांतील अनेक युद्धांमध्ये हे कैदी झाले असावे व यादव द्वारकेला गेल्यामुळे आता याना कसे सोडवावे हा प्रष्नच होता. कृष्ण सोडून इतर कुणा राजकुळाला याची चिंता पडलेली दिसत नाही. जरासंधाला विरोध करण्याची कोणाची हिंमत नव्हती हे त्याचे कारण असू शकेल. अन्याय करणाऱ्या इतर राजांना नारद वा इतर थोर ऋषि उपदेश करीत तसाहि जरासंधाला कोणी केलेला दिसत नाही. या राजांना युद्धात जिंकून घेतलेले असल्यामुळे त्याना जरासंधाने कैदेत ठेवणे कोणाला फारसे अनुचित वाटले नसावे. यज्ञात बळि देणे अनुचितच होते पण ती वेळ आलेली नव्हती व त्याची चिंता एकट्या कृष्णालाच पडली होती यावरून ते सर्व यादवच असावे या तर्काला पुष्टि मिळते.
कृष्णाचा बेत सरळ होता. कृष्ण अर्जुन व भीम जरासंधासमोर द्वंद्वासाठी उभे राहिले तर आपल्या बळाच्या अभिमानामुळे तो भीमाशी मल्लयुद्ध करणेच पसंत करील व भीमच त्याचा वध करूं शकेल हा त्याचा विचार होता! म्हणून त्याने अखेर युधिष्ठिराचे मन आपल्या बेताकडे वळवून घेतले. कृष्ण, अर्जुन व भीम यांनी लवकरच गुप्तपणे मगधाची राजधानी गिरिव्रज गाठली. स्नातक ब्राह्मणाच्या वेषात गिरिव्रजाला पोचलेल्या या तिघांनी शहरात काही दंगामस्ती करून नागरिकांमध्ये स्वत:बद्दल धाक, आश्चर्य अशा भावना निर्माण केल्या व अखेर ते जरासंधासमोर आले.त्यांच्या ब्राह्मणवेषाचा मान ठेवून पण त्यांना न ओळखून, जरासंधाने त्यांचा सत्कार केला. त्यांनी तो स्वीकारला नाही. तुम्ही कोण आहात असे जरासंधाने स्पष्टच विचारल्यावर कृष्णाने त्याला आपल्या तिघांची ओळख करून दिली व तुझ्या दुष्कृत्यांमुळे, विशेषत: राजेलोकांचे बळी देण्याच्या तुझ्या बेतामुळे तुला शासन करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे आव्हान त्याला दिले. जरासंधाने कृष्णाच्या आरोपांना समर्पक उत्तरे दिली. ’मी धर्मानेच राज्य करतॊ आहे व माझी प्रजा सुखी आहे. राजांना मी योग्य प्रकारे युद्ध करून जिंकले आहे व त्यांचे काहीहि करण्याचा मला अधिकार आहे. कुरुकुळाशी माझे मुळीच वैर नाही’ असे म्हटले. अखेर कृष्णाच्या मनांतील बेताप्रमाणेच, त्याने द्वंद्वयुद्धाचे आव्हान स्वीकारले व कृष्ण वा अर्जुन यांना झिडकारून, बलवान भीमालाच प्रतिस्पर्धी ठरवले. कृष्ण व बलराम दोघेही मल्लविद्येत प्रवीण असूनहि, अद्यापपर्यंत त्यांची जरासंधाशी एकास एक अशी गाठ पडलेली नव्हती. कृष्णाचा मामा कंस याचा जरासंध हा सासरा तेव्हा भीमाच्या वा कृष्णाच्या मानाने तो खूपच वयस्क होता. तरीहि, स्वत: किंवा बलराम यांचेपेक्षाहि बक, हिडिंब याच्यासारख्या अमानुष बळ असलेल्या राक्षसाना मारू शकलेला भीम हाच एकटा जरासंधाशी लढू शकेल हे कृष्ण जाणून होता. महाभारतात, कृष्ण व बलराम यादवकुळातील असल्यामुळे, ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांना जरासंध अवध्य होता असा खुलासा केला आहे पण तो फुसका वाटतो. ब्रह्मदेवाने हा वर जरासंधाला कां व केव्हा दिला हे सांगितलेले नाही! खरे कारण, माझ्या मते, जरासंधाने त्यांना मल्लयुद्धाची संधिच दिली नसती. त्यांना तो गवळीच मानत होता, बरोबरीचे राजकुळातले नव्हे!
भीम-जरासंध युद्ध तेरा दिवस अखंड चालले. अतिशयोक्ति सोडून दिली तरी दीर्घकाळ चालले हे खरे. अखेर जरासंध दमला पण भीम तरीहि जोरात होता. अखेर त्याने जरासंधाच्या तंगड्या धरून उलटसुलट ओढून त्याला मारले. कृष्ण, बलराम,शल्य, कर्ण वगैरे इतर कोणाही मल्लविद्येत प्रवीण व्यक्तीने एवढा दीर्घकाळ मल्लयुद्ध केल्याचे महाभारतात वा इतरत्रहि वर्णन आढळत नाही. भीमाच्या अफाट ताकदीवर कृष्णाने टाकलेला विश्वास भीमाने सार्थ ठरवला. जरासंध मेल्यावर, बंदीतील राजांना सोडवून, व जरासंधपुत्र सहदेव याला राज्यावर बसवून कृष्ण, अर्जुन व भीम विजयी होऊन इंद्रप्रस्थास परत आले. कृष्णाने जे योजले होते ते पार पडले.
या साऱ्या कथेमध्ये कृष्णाच्या अंगचे सर्व मानवी पातळीवरील लोकोत्तर गुण दिसून येतात. स्वत:चे शरीरबळ कदाचित पुरणार नाही व सैन्यबळावर विजय अशक्य तेथे त्याने योग्य व्यक्तीचा उपयोग केला. त्यासाठी दीर्घकाळ संधीची वाट पाहिली. राजसूय यज्ञच्या बेतामुळे ती प्राप्त होतांच तिचा कौशल्याने उपयोग करून घेतला. शत्रूचे बलस्थान जे अफाट शरीरबळ त्याच्या अभिमानालाच त्याने डिंवचले. सर्व बेत काळ्जीपूर्वक आखला व तडीस नेला. त्यांत, मुख्य म्हणजे, युधीष्ठिर, अर्जुन, भीम यांना समाविष्ट करून घेताना, ते कृष्णाच्या वैऱ्याशी लढत नसून जणू स्वत:च्याच वैऱ्याशी लढत आहेत अशी त्यांची मनॊभूमिका करून घेतली व अखेर भीमाकरवी आपल्या कुळाच्या एका न आटपणाऱ्या वैऱ्याचा शेवट घडवून आणला. कृष्णाला अवतार मानणे हा श्रद्धेचा भाग आहे. मात्र लोकोत्तर पुरुष मानावेच लागते ते अशा प्रसंगांमुळे व कथांमुळे!

16 comments:

Vivek said...

Prabhakarji,

What is the new topic? No posts for some days?

I am also trying to think of some topics to suggest to you... I will post them as soon as I get some ideas.

Till then waiting for your new post!

P K Phadnis said...

आपण नवीन पोस्टची वाट पाहात आहात म्हणजे हा लेख आपणास आवडला असे समजतो. पुढील विषयाची तयारी चालू आहे!

Priyabhashini said...

तुम्ही माझ्या ब्लॉगवर दिलेल्या प्रतिसादाने येथे येणे झाले. अतिशय उपयुक्त लेखन आहे. सवडीने वाचत जाईन.

धन्यवाद

Vinay said...

kaka... eklavya baddal aaple kaay mat aahe? mhanje dronacharyannchya putalyat dev shirle aani tya devanni ekalavyala margadarshan kele. he mat tumhala patate ka? aani nahi, tar hyala kaay explanation aahe?

P K Phadnis said...

एकलव्याबद्दल अनेक मते वाचावयास मिळ्तात. अलिकडेच तो कृष्णाचा चुलतभाऊ होता व कृष्णाच्याच प्रेरणेने द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा कापून मागितला असेहि एक मत वाचले. मी फक्त महाभारतात काय आहे एवढेच वाचले आहे. तेथे असे काही नाही. थोडाफार तर्क चालवला तर मला असे वाटते - एकलव्य हा निषाद राजाचा पुत्र होता. हा राजा, जरासंध, शिशुपाल, शाल्व अशी एक राजघराण्यांची जूट होती. जरासंध सम्राट होता. ही जूट इतर राजघराण्याना पसंत नसावी. एकलव्याला द्रोणाचार्यांनी यामुळेच शिष्य केले नसावे. तो इतर निषाद वीरांकडून व स्वत:च प्रयत्नाने व मन एकाग्र करून धनुर्विद्याप्रवीण झाला असणार. द्रोणाचा पुतळा हे एकाग्रतेचे साधन असावे. याच मार्गाने तो अस्त्रविद्या प्रवीणहि झाला होता काय याबद्दल मला शंका आहे. त्याचे कौशल्य दिसल्यावर द्रोणाला चिंता वाटली असेल कीं जरासंधपक्षाचे यामुळे बळ वाढणार त्यामुळे त्याने अंगठा कापून घेऊन त्याची विद्या विफल केली. मात्र हा वेळपर्यंत कृष्ण व पांडव यांची भेटच झालेली नव्हती व कृष्ण द्रोणालाहि भेटलेला नव्हता, यावेळी तो फारतर १८-२० वर्षांचा असेल तेव्हा यांत कृष्णाचा काही हात होता असे म्हणण्याला खरेतर काही आधार नाही.
पुढे कालांतराने कृष्णाने जरासंधाला भीमाकडून मारविले व शिशुपालाचा स्वत: वध केला पुढे द्यूत झाले त्या सुमारास शाल्वाशीहि त्याचे युद्ध झाले व तोहि मारला गेला. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी हाहि त्यांच्या गटातला होता पण पूर्वीच रुक्मिणीस्वयंवरप्रसंगी कृष्णापुढे काही न चालल्यामुळे तोही निष्प्रभ झाला होता. अप्रसिद्ध प्रसंग असा की कृष्णाचे एकलव्याशीहि युद्ध होऊन त्याला कृष्णानेच मारले.

Priyabhashini said...

काका, महाभारतात तुम्हाला कोठे सरस्वती नदीचा उल्लेख सापडला का? विशेषत: द्वारकेजवळ सरस्वती नदी समुद्राला मिळत होती किंवा प्रभासक्षेत्री मिळत होती असे काही उल्लेख येतात का?

कळावे

P K Phadnis said...

महाभारतात सरस्वती नदीचा उल्लेख आहे. कौरव-पांडव युद्ध सुरू होण्यापूर्वी बलराम युद्ध पाहणे नको म्हणून बलराम सरस्वतीच्या किनाऱ्यावरील तीर्थांच्या यात्रेला निघून गेला. मात्र ती समुद्राला कोठे मिळत होती ते माहीत नाही. सौराष्ट्राचा नकाशा पाहिला तर मद्ध्यावरील उंच पर्वतामुळे प्रभास, जे दक्षिण टोकाला आहे व द्वारका जी पष्चिम टोकाला आहे ती दोन्ही स्थळे योग्य वाटत नाहीत. मात्र हे वरवरचे मत आहे.

P K Phadnis said...

सरस्वतीचे उल्लेख ऋग्वेदापासून आहेत. www.wikipedia.com या वेबसाइटवर सरस्वतीबद्दल आपणास वाचावयास मिळेल. सरस्वती प्रभास वा द्वारकेपर्यंत कधीच वहात नव्हती हे मात्र नक्की. बलराम द्वारकेपासून सरस्वतीच्या काठाने गेलेला नव्हता. तो प्रथम पांडवांच्या शिबिरात, कुरुक्षेत्राला आला व तेथून सरस्वतीच्या काठावरील तीर्थांची यात्रा करावयास गेला. हल्लीची पंजाबातली घग्घर नदी ही मूळची सरस्वती असे साधारणपणे मानण्यात येते. ही थरच्या वाळवंटापर्यंत वाहते व तेथेच संपते.

pradeep said...

मला आपला महाभारतातील व्यक्तिरेखांबाबत वेगळ्या पद्धतीने विचार मांडणारा लेख फारच आवडला.

पुढ़ील लेखाची उत्सुकता आहे.

प्रदीप

Priyabhashini said...

माहितीबद्दल अनेक धन्यवाद.

पंजाबातली घग्घर नदी ही मूळची सरस्वती असे साधारणपणे मानण्यात येते हे मीही विकीवर वाचले आहे पण त्याच्या विश्वासार्हतेबद्दल नेमके माहित नाही.

सरस्वती नदी कधीच सागराला मिळत नव्हती, पर्यायाने ती द्वारके किंवा प्रभास क्षेत्री वाहत नव्हती ही मात्र नवी माहिती मिळाली. याबद्दल अधिक माहिती किंवा स्रोत देता येईल का?

P K Phadnis said...

सरस्वती समुद्राला कधीच मिळत नव्हती असे मी म्हटलेले नाही! आपण सौराष्ट्राचा नकाशा पाहिलात तर ती राजस्थानातून वा पंजाबातून वाहत येऊन द्वारकेला किंवा प्रभासपट्टण वा वेरावळ/सोमनाथ या दिशेने जाणे शक्य नाही असे सहज लक्षात येईल. ती समुद्राला मिळाली तर खंबायतच्या आखाताला वा कच्छच्या पूर्वेला मिळू शकेल. कदाचित प्राचीन काळी तशी ती मिळतही असेल. कालांतराने पंजाबातील नद्यांची पात्रे व प्रवाह यांच्यात बदल होत जाऊन तिचे पाणी कमी झाले व ती वाळवंटातच लुप्त होऊ लागली. हे वर्णन घग्गरला जुळते. सरस्वतीबाबत पूर्ण माहिती wikipedia वर मिळेल.

गिरिराज said...

http://www.archaeologyonline.net/artifacts/aryan-harappan-myth.html

वरील साईटवर सरस्वति नदीबद्दल उहापोह केलेला आहे.
आपले मत जरूर सांगावे!

Nile said...

ShriKrishna baddalache apale vivechan mala aavadale, Krishna baddal manavi patali var yeun vichar karne mala jast yogya vatate, kimbahuna taSE KELE TARACH TYACHI MAHANATA LAKSHYAT yete ase maze mat ahe. Tyala dev banaun lokani tyachi kuthalihi gost chamatkar samajalyane, Krishnache kartutva kami hote.

Sagar Bane said...

mala Shree krushna jarasandh sanvaad navachi ek kavita havi ahe. Ti 10th chya marathi chya pustakat hoti ani tichi suruvaat hi ashi ahe.

" kansari sansaar gaj kesari,
hasouni bole shree krushna shouri.
Pandu putra he nirdhari,
Bhimaarjun jaan paa."

सौरभ वैशंपायन. said...

नमस्कार काका, स्टार माझ्याच्या कार्यालयात आपण भेटलो होतो.

आपला ब्लॉग अतिशय उत्तम आहे :-)

सावकाशपणे एक एक करुन वाचिनच.

तुम्ही श्री विश्वास दांडेकर यांचे "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" वाचले आहे का? महाभारताचा केवळ राजकिय विचार करुन लिहिलेले इतके उत्तम पुस्तक निदान माझ्या वाचनात तरी दुसरे नाहीये.

शिवाय आर्य/सरस्वती नदी यावर देखिल दुसर्‍या भागात बराच सचित्र/नकशांसकट प्रकाश टाकला आहे. वाचले नसल्यास जरुर वाचावे.

सौरभ वैशंपायन. said...

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे बद्दल या करीता विचारलं त्यात त्यांनी जरासंध वध हा तो झोपला असताना कपटाने केला होता. तसेच महालात शिरताना काळे कपडे व रक्तवर्णी फुलांच्या माला असा मृत्यू सूचक वेष परीधान केला होता असे महाभारतात लिहिल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यांनी भांडारकर संपादित ग्रंथावरुन आपले पुस्तक लिहिले आहे.