आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Monday, September 29, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ६

स्वयंवर होऊन पांडवाना द्रुपदाचा पाठिंबा मिळाला आहे हे लक्षात आल्यावर आता काय करावयाचे याबद्दल दुर्योधन, धृतराष्ट्र व कर्ण यांची चर्चा झाली. दुर्योधनाने अनेक कुटिल डावपेच धृतराष्ट्राला सुचवले. कर्णाने या प्रसंगीं मात्र या सर्व डावपेचांची निंदा केली. पांडव येथे तुमच्यापाशी असताना व त्याना कोणाचे सहाय्य नसताना तुम्ही त्यांचे काही वाकडे करू शकला नाही. आता त्याना पांचालांचे सहाय्य आहे. तेव्हां पोरकट उपायांचा विचारही करूं नका. उलट, त्यांनी पक्का पाय रोवण्यापूर्वीच आपण त्यांचेवर हल्ला करून त्याना पकडून आणू असा वीरोचित सल्ला त्याने दुर्योधनाला दिला. धृतराष्ट्राने त्याची वीरवृत्तीबद्दल पाठ थोपटली पण त्याच्यावर भरवसा ठेवला नाही! भीष्म, द्रोण व विदुरा बरोबर सल्लामसलत करण्यास सांगितले! त्या तिघांनी पांडवांना त्यांचा वाटा देण्याचा सल्ला दिला. कर्णाने त्या तिघांबद्दल संपूर्ण अनादर दाखवून त्यांची कुत्सित्पणे निंदा केली. त्यांना धृतराष्ट्राचे आश्रित ठरवले. विदुर व भीष्माने पुन्हा निक्षून सागितल्यावर धृतराष्ट्राला पांडवाना राज्याचा हिस्सा देणे भाग पडले. कर्णाचा युद्धबेत कोणीच स्वीकारला नाही. या प्रसंगी कर्णाचे वर्तन व बोलणे अतिशय अनुचित व माजोरीपणाचे झाले. वास्तविक, कुरुराज्याच्या अंतर्गत वादाशी त्याचा काही संबंध नव्हता. येथून पुढे, वेळोवेळी, कर्ण स्वत:ला भीष्मद्रोणांच्या बरोबरीचा मानून नेहेमीच त्यांचा अनादर करताना दिसतो. भीष्म स्वत: परशुरामशिष्य व कर्णहि, फसवणुकीने, पण परशुरामाचाच शिष्य. इतर कोणीहि समकालीन वीर परशुरामाचा शिष्य नव्हता. कदाचित या जोरावर कर्ण स्वत:ला भीष्माच्या बरोबरीचा मानताना दिसतो. परिणामी, भीष्माने कर्णाला नेहेमीच तुच्छतेने वागवले. त्याचे कारण तो सूतपुत्र हे नाही. तो खलप्रवृत्तीचा, पांडवांचा अकारण वैरी व दुर्योधनाला खलकृत्यात नेहेमी सहाय्यक म्हणून त्याचेवर भीष्माचा राग होता. कर्णाचे गुणदोष तो उत्तमपणे जाणत होता. कर्णाचा त्याने वेळोवेळी अपमान व तेजोभंग केला.
पांडवानी इंद्रप्रस्थ वसवले व राज्यविस्तार केला. अर्जुन राज्य सोडून, उलुपी, चित्रांगदा याचेबरोबर राहून अखेर द्वारकेहून सुभद्रेशी विवाह करून परतला. नंतर अभिमन्यु व इतर पांडवपुत्रांचा जन्म झाला, पांडवानी मयसभेची निर्मिति केली व राजसूय यज्ञ ठरवला. त्या निमित्ताने जरासंधवध झाला व मग पांडवांनी दिग्विजय केला. त्यावेळी भीमाचे व कर्णाचे युद्ध होऊन भीम जिंकला. मात्र हे युद्ध फारसे गांभीर्याने लढले गेले असे म्हणता येणार नाही. बहुतेक राजांनी नाममात्र युद्ध करून पांडवांच्या यज्ञाचे स्वागत केले तसेच कर्णानेहि केले असणार.
राजसूय यज्ञ पार पडला. अग्रपूजेच्या वेळी शिशुपालाने बेताल वर्तन केले, कृष्णाने त्याचा वध केला. या प्रसंगात कर्णाची उपस्थिति विशेष जाणवत नाही. मात्र, उपस्थित राजांच्या नामावळीत त्याचे नाव आहे. शिशुपालाने कृष्णाच्या अग्रपूजेला विरोध करताना अनेकांबरोबर कृष्णाची तुलना करून त्याला अग्रपूजेला अपात्र ठरवले. त्यात कर्णाबरोबरहि त्याची तुलना केलेली होती व कर्णाला वरचढ ठरवले होते. मात्र, यांत शिशुपालाचा कॄष्णद्वेषच दिसून येतो. खुद्द कर्णानेहि कधी आपण कृष्णापेक्षा वरचढ असल्याचा दावा केलेला नाही. शिशुपालाच्या कृष्णाने केलेया अचानक वधाने अनेक राजे चवताळले व युद्धाचा बेत करू लागले. यात कर्णाचे वा दुर्योधनाचे नाव नाही. भीष्माचा शिशुपालाने फार अपमान केल्यावर मग त्याचा वध झाला त्यामुळे दुर्योधनाला गप्प बसणे भागच होते. परिणामी कर्णहि स्वस्थ बसला!
यापुढील द्यूतप्रसंगातील कर्णाचा सहभाग पुढील भागात पाहूया.

Tuesday, September 23, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ५

पांडवांचा उत्कर्ष सहन न होऊन व युधिष्ठिराला युवराजपद व कालांतराने राजपद मिळणार हे पाहून दुर्योधनाने धृतराष्ट्राला अनुकूल करून घेऊन त्याचे करवीं पाडवांना वारणावतास पाठवले व त्यांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा कट रचला. पांडव हस्तिनापुरांतून द्ज़ुर जाणे धृतराष्ट्राला नक्कीच हवे होते. पुढचा बेत त्याला कदाचित माहीत नसेल. या बेतांत कर्ण सामील होता काय? त्याचा या दुष्ट बेतात सहभाग नव्हता. त्याला बेत बहुधा माहीत नव्हता. असा बेत त्याला पसंत पडला असता असे वाटत नाही.
यानंतर महाभारतात कर्णाचा उल्लेख द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी येतो. पांडव लाक्षागृहातून वांचून, पुष्कळ हाल अपेष्टा सोसून, ब्राह्मणवेषात स्वयंवराला आले होते. स्वयंवराच्या सुरवातीलाच धृष्टद्युम्नाने फक्त मत्स्यवेधाचा पण जिंकणे पुरेसे नसून, उच्चकुल, आकर्षक व्यक्तिमत्त्व हींहि आवश्यक असल्याचे स्पष्ट्पणे सांगितले होते. स्वयंवराला अनेक राजे आले होते. पण जिंकण्याचा प्रयत्न करणारांच्यात कृष्ण, सात्यकी वा इतर यादव धनुर्धराचा समावेश नाही. इतर क्षत्रिय राजे पण जिंकू शकत नाहीत असे दिसून आल्यावर मगच, कर्ण पुढे झाला. द्रौपदीने ताबडतोब, ’मी सूतपुत्राला वरणार नाही’ असें म्हटले. यांत कर्णाचा अपमान झाला असे आजच्या दृष्टिकोनातून विचार करणार्‍या काहींना वाटले तरी ते खरे नाही. क्षत्रिय राजकन्या द्रौपदी आपणाला वरील काय याचा कर्णानेच प्रथम विचार करावयास हवा होता. एक प्रकारे त्याने हात दाखवून अवलक्षण करून घेतले असेच म्हणावे लागते. या प्रसंगी कोणीहि द्रौपदीला वा द्रुपदाला दोष दिलेला नाही. कर्ण हा कुंतीपुत्र आहे हे कोणाला माहीत नव्हते पण ते माहीत असते तरीहि त्याचा पिता ब्राह्मण वा क्षत्रिय असल्याशिवाय त्याला क्षत्रियांत स्थान मिळणे शक्य नव्हते. कर्ण ही एक वर्णसंकरातून निघालेली जात असा स्पष्ट उल्लेख अ. ११५, श्लोक ४०-४४ मध्ये आहे. (धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांच्या यादीत दुष्कर्ण, कर्ण व विकर्ण अशी तीन नावे आहेत. हे अर्थातच गांधारीचे पुत्र नव्हेत! बहुधा, दुर्योधन व दु:शासन हे दोघेच गांधारीचे पुत्र असावे. धृतराष्ट्राने ’तूं माझ्या सर्वात ज्येष्ठ राणीचा सर्वात ज्येष्ठ पुत्र आहेस’ असे दुर्योधनाला संबोधिलेले आढळते. धृतराष्ट्राच्या इतर स्त्रियांचा उल्लेख आहेच. युयुत्सु यालातर स्पष्टपणे दासीपुत्र म्हटलेले आहे. दु:शासन सोडून इतर कोणीहि भाऊ दुर्योधनाच्या फारसे खिसगणतीत नव्हते. यावरूनहि ते त्याचे सख्खे भाऊ नसावे असा तर्क निघतो.)
कर्णाला पण जिंकण्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागला. त्याला पण जिंकता आला असता काय? या प्रष्नाचे उत्तर अर्थातच देता येणार नाही! इतर अनेकांना यश आले नव्हते. ब्राह्मणवेषांतील अर्जुनाने पण जिंकला याचा इतर क्षत्रिय राजांना अपमान वाटला व त्यानी अर्जुनाला घेरले. याप्रसंगी इतर क्षत्रिय राजांबरोबर कर्णहि अर्जुनाविरुद्ध युद्धाला उभा राहिला. खरे तर क्षत्रिय राजांच्या मान-अपमानाशी कर्णाचा काय संबंध? त्याला आपले शौर्य दाखवण्याची खुमखुमी आली! पण जिंकणारा ब्राह्मण म्हणजे अर्जुन हेहि अजून उघड झाले नव्हते. अर्जुनाने भीमाच्या मदतीने सर्वांना भरपूर झोडपले. हें कर्णाचे व अर्जुनाचे प्रथमच प्रत्यक्ष युद्ध होते. कर्णाचे अर्जुनापुढे काही चालले नाही. हा आपल्या तोडीस तोड आहे अशी अ. १९०, श्लोक १६-१९ मध्ये कर्णाची स्पष्ट कबुली आहे! ब्रह्मतेजापुढे काही चालत नाही अशी लटकी सबब सांगून कर्ण स्वस्थ बसला! कर्णाला पूर्वीपासूनच पाडवांबद्दल अकारण असूया व द्वेष वाटत होता त्यात आतां द्रौपदीच्याहि द्वेषाची भर पडली.
आपण कुंतीपुत्र आहोत हें कर्णाला हा वेळ्पर्यन्त माहीत झाले होते असे महाभारत म्हणत नाही. मात्र खुद्द अधिरथ वा त्याचा कोणी जवळचा आप्तच माझ्या तर्काप्रमाणे कर्णाचा पिता असेल तर, केव्हांतरी, आपली माता कुंती हे त्याला कळणे शक्य आहे. अशा गोष्टी कोठून तरी फुटतातच! भारतीय युद्धापूर्वी प्रथम कृष्णाने व नंतर कुंतीने स्वत:च, तो कुंतीपुत्र असल्याचे त्याला सांगितले तेव्हा त्याने आश्चर्य व्यक्त केलेले नाही! मात्र पिता कोण हे रहस्य कुंतीने तेव्हाही उघड केलेले नाही. सूर्यापासून जन्म हीच कथा कायम ठेवली. देवापासून माणसाचा जन्म हे अमान्य केले तर तर्क करण्यावाचून पर्याय नाही. म्हणून कर्ण हा खरा सूतपुत्रच असा तर्क मी केलेला आहे.
या स्वयंवरप्रसंगात कर्णाचे व्यक्तिमत्त्व उजळून निघालेले म्हणता येत नाही. महाभारतकारानी अर्जुनापुढे त्याला डावाच ठरवला आहे.
यापुढील कर्णचित्रण पुढील भागात वाचा.

Wednesday, September 17, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ४

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, कर्णाचा खरा पिता कोण हे रहस्य कुंतीने अखेरपर्यंत जपले. पांडूशी विवाह होऊन पुष्कळ काळ विवाहसौख्य भोगूनहि तिला वा माद्रीला अपत्य झाले नाही. पुत्राशिवाय मोक्ष नाही या भावनेने पांडूने अखेर नियोग पत्करला व कुंतीला तसे सुचवले तेव्हाही कुंतीने आपल्या कानीन पुत्राच्या (कर्णाच्या) अस्तित्वाचा उल्लेख केला नाही. तो कोठे आहे हे तिला माहीत नसावें हे एक कारण असेल. त्याचा जन्म ब्राह्मण वा क्षत्रिय पित्यापासून झालेला नसल्यामुळे तो पांडूला मान्य होणार नाही हे कुंती जाणून होती हे जास्त सयुक्तिक कारण दिसतें. विचित्रवीर्याच्या मृत्यूच्या वेळी ही अडचण आली नव्हती. सत्यवतीचा कानीन पुत्र व्यास हा पराशर पुत्र होता. तो ऋषि असल्यामुळे स्वत: कुरुंचा राजा होणार नव्हता पण अंबिका-अंबालिका यांना पुत्रवती करण्य़ासाठी त्याला बोलावण्याचा सल्ला खुद्द भीष्मानेच सत्यवतीला दिला व तिलाही तो वावगा वाटला नाही.
नियोगांतून पांडव जन्मले. पांडू व माद्री यांचा मृत्यु झाला व कुंती पुत्रांसह हस्तिनापुराला आली. तोवर दुर्योधनादि कौरवांचाहि जन्म झालेला होता. दुर्योधन व भीम एका वयाचे होते. कौरव-पांडव मोठे झाले. प्रथम कृपाचार्य व मग द्रोणाचार्य यांनी त्यांचे युद्धकलेचें शिक्षण केले. या सर्व काळात एकदांहि कर्णाचा उल्लेख येत नाही. त्याचे बालपण व शिक्षण कोठे झाले याबद्दल काही उल्लेख नाही. कुंती पांडुपत्नी बनून हस्तिनापुराला येण्यापूर्वी कर्णाला अधिरथाने दूर पाठवले असले पाहिजे. त्या काळात त्याचे शिक्षण दुसर्‍या कोणा गुरूपाशी झाले व मग त्याने धनुर्वेदाचे उच्च शिक्षण परशुरामापाशी झाले. आपण ब्राह्मण असल्याचे त्याने म्हटले होते ते खरे नाही असे उघडकीस आल्यामुळे ’मी दिलेली विद्या तुला ऐनवेळी कामास येणार नाही’ असा शाप परशुरामाने त्याला दिला अशी कथा आहे. यांतहि कर्णावर अन्याय झाला असे काहीना वाटते. माझ्या मते कर्ण अनेक वेळा कसोटीच्या वेळी उणा पडलेला दिसतो त्याचे हे स्पष्टीकरण दिलेले असावे.
गुरु द्रोण, त्याचे कौरव, पांडव व इतर शिष्य, विशेषेकरून अर्जुन, यांची कीर्ति कर्णाच्या कानावर गेली असावी. कौरवपांडवांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांच्या कौशल्यप्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे हेहि त्याच्या कानावर गेले असणार. या कार्यक्रमाच्या वेळी, जन्मकथेनंतर प्रथमच महाभारतात कर्णाचा उल्लेख येतो. सर्व शिष्य व शेवटी अर्जुन याचे कौशल्यप्रदर्शन पार पडल्यानंतर अचानक कर्ण आपल्या कौशल्याचे प्रदर्शन दाखवण्यासाठी पुढे सरसावला. त्याला अर्जुनाचा वाटणारा मत्सर त्याच्या आव्हानात्मक भाषणातून स्पष्ट झाला. आव्हान दिल्याप्रमाणे त्याने अर्जुनाच्या बरोबरीने सर्व कौशल्याचे प्रदर्शन केले. अधिरथाला कर्ण असा अचानक रंगमंचावर येणार आहे याची बिलकुल कल्पना नव्हती, नाहीतर त्याने खचितच त्याचे अचानक कुंतीसमोर येणे टाळले असते! कर्णाच्या कौशल्याने भीष्म-द्रोण चकित झाले. हा परशुरामशिष्य आहे हे कोणाला माहीत नसावे. या प्रसंगाच्या वर्णनात तसा उल्लेख अजिबात नाही. कर्ण हा द्रोणाचा शिष्य होता अशी काहींची समजूत असते पण ते मुळीच खरे नाही. सूतपुत कर्णाचा द्रोणाने शिष्य म्हणून स्वीकार केला नसता. निषादराजपुत्र एकलव्य याचाही त्याने स्वीकार केला नव्हता! कर्णजन्मानंतर काही काळाने कुंतीचा विवाह, मग हस्तिनापुरात दीर्घकाळ वास्तव्य व संसारसुख भोगल्यावर वनात काही काळ संचार, अपत्यप्राप्तीबद्दल पांडूची पूर्ण निराशा झाल्यावर मग नियोगाचा स्वीकार, नंतर युधिष्ठिर, भीम व नंतर अर्जुन यांचा जन्म हा कालक्रम विचारांत घेतला तर, कर्ण हा अर्जुनापेक्षा १२-१४ वर्षांनी वडील असला पाहिजे! अर्जुन या प्रसंगी १६ वर्षांचा कोवळा तरुण असणार तर कर्ण २८-३० वर्षांचा होता! त्याने नवतरुण अर्जुनाबरोबर स्पर्धा करणे हास्यास्पदच म्हणावे लागेल! त्याने अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिल्यावर साहजिकच त्याच्या कुळशीलाची चौकशी झाली. याचवेळी अधिरथाने पुढे येऊन त्याला पुत्र म्हणून संबोधिल्यामुळे तो सूतपुत्र आहे हे उघड झाले. पूर्वी कधीहि न पाहिलेला कर्ण समोर आल्यावर कुंतीने त्याला ताबडतोब ओळ्खले व तिला भोवळ आली! विदुराच्या ते लगेच लक्षात आले व त्याने तिच्यावर उपचार करविले. कुंतीचे रहस्य उघड होऊ दिले नाही. कुंतीने जन्मजात कवचकुंडलांमुळे कर्णाला ओळखले असे महाभारत म्हणते. कवचकुंडले ही एक अद्भुत कथा आहे. ती दूर ठेवावयाची तर कवचकुंडले म्हणजे दागदागिने, सोनेनाणे असे मानले पाहिजे. तेव्हा कुंतीने कर्णाला ओळखण्याचे कारण, ओळखीचे दागिने किंवा, बहुधा, खर्‍या पित्याशी कर्णाचे असलेले साम्य हे असावे. कुंतीने अर्थातच कर्णाची ओळख दाखवली नाही. ते शक्यच नव्हते. ती अगतिक होती.
कर्ण सूतपुत्र ठरल्यामुळे द्वंद्वाचा विषय संपला. दुर्योधनाने कर्णाला लगेच जवळ केले, अंगदेशाचे राज्य दिले. हे कसे काय? वास्तविक दुर्योधन स्वत: राजा वा युवराजहि नव्हता. वयानेहि दुर्योधन अर्जुनापेक्षा किंचित मोठा, तरीहि विशीतलाच होता. अंगदेश कुरूंच्या राज्यात समाविष्ट होता काय? त्याची राजधानी कोठे होती? महाभारत म्हणते तेव्हा राज्य दिले हे खरे मानले पाहिजे. कर्णाने तेथे जाऊन राज्य चालवले असे दिसत नाही. तो कायम दुर्योधनापाशीच दिसतो. अंगदेशाचे राज्य या वेळेपर्यंत ज्या कोणाकडे होते त्यांनी कर्णाचे स्वामित्व मान्य केले काय व कां? महाभारतांत खुलासा नाही. अंगदेशाचे राज्य हा जणू एक नाममात्र सन्मान होता! किंवा अंगराज्याकडून कौरवांना मिळणारी खंडणी यापुढे कर्णाला मिळणार होती. अर्थात राज्य दिले तरी दुर्योधन कर्णाला क्षत्रिय करू शकत नव्हता. अखेरपर्यंत कर्णाला सूत म्हणूनच जन्म घालवावा लागला. मात्र कर्णाने या प्रसंगी दुर्योधनाची बाजू घेतली ती अखेरपर्यंत कधीहि सोडली नाही. दुर्योधनानेहि दु:शासनाएवढेच प्रेम व सन्मान कर्णाला नेहेमीच दिला. मैत्रीचे असे उज्वल उदाहरण क्वचितच सापडेल. अर्जुनाबद्दल असूया व स्पर्धेची भावनाहि कर्णाने कायमच बाळगली. वयाचा फरक लक्षात घेतला तर या प्रसंगात कर्ण अर्जुनापेक्षा उजवा ठरला असे म्हणता येत नाही.
यानंतर लगेचच, पूर्वीच्या अपमानाची भरपाई करून घेण्यासाठी द्रोणाच्या मागणीप्रमाणे प्रथम कौरवांनी व नंतर पांडवांनी द्रुपदावर हल्ला केला. यावेळी कर्ण दुर्योधनाबरोबर होता. मात्र कर्णाच्या धनुर्विद्येचा द्रुपदावर काहीहि प्रभाव पडला नाही! कर्णाचा पराभव झाला याचे दुर्योधनाला फारसे वैषम्य वाटलेले दिसत नाही. द्रोण हा काही कर्णाचा गुरु नसल्यामुळे त्याच्या अपमानाशी त्याला काही देणेघेणे नव्हते त्यामुळे तो पूर्ण बळाने लढला नाही असे फार तर त्याच्या समर्थनासाठी म्हणता येईल. कौरव व द्रोण हरल्यावर मात्र, पांडवांनी द्रुपदाचा पूर्ण पराभव करून द्रोणाच्या अपमानाची भरपाई केली. यात मुख्य पराक्रम अर्थातच अर्जुनाचा होता. या प्रसंगात त्यामुळे अर्जुन कर्णापेक्षा निश्चितच उजवा ठरला.
यापुढील कर्णकथेचा मागोवा पुढील भागात वाचा.

Wednesday, September 10, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ३

कर्णजन्माबद्दल माझा तर्क असा आहे. कुंती माता होणार हे दिसून आल्यावर तिच्या दत्तक मातापित्यानी म्हणजे कुंतिभोज व पत्नी यानी, तिचे पुढील जीवन नासून जाऊं नये यासाठी तिच्या बालकाला जन्मानंतर लगेचच दूर पाठवून देण्याची व्यवस्था केली व तिच्या चुकीवर पांघरूण घातले असावे असा तर्क सहजच सुचतो. आईबापाना काहीहि कळू न देतां एकट्या अल्पवयीन कुंतीने स्वत:च्या विचाराने व सेविकेच्या मदतीने, स्वत:चे पूर्ण गर्भारपण व बाळंतपण पार पाडले व कर्णाला पेटीत घालून नदीत सोडून दिले असे महाभारतात म्हटले आहे खरे पण ते कसे शक्य आहे? ती व्यवस्था आईवडिलानी केली असे मानणे जास्त सयुक्तिक आहे. काही काळ गेल्यावर हिचे स्वयंवर करावे असा त्यांनी विचार केला असेल. पण कुंतीच्या आईनेहि मूल पेटीत घालून नदीत सोडले हे खरे वाटत नाही. पण मग काय केले असेल? कर्ण अधिरथापर्यंत कसा पोचला?
अधिरथ हा हस्तिनापुरातील सूत म्हणजे सारथी पण तो खुद्द पांडू, भीष्म, धृतराष्ट्र वा दुर्योधनाचा वा इतर कुणा नामवंताचा सारथी असल्याचा उल्लेख नाही. तसा तो नगण्यच आहे. खुद्द त्याचा वा त्याच्या कुणा आप्ताचा कुंतिभोजाशी काही सेवा-संबंध असणे शक्य आहे. अधिरथ स्वत: वा त्याचा कोणी आप्त कर्णाचा खरा पिता होता काय? असा काही संबंध असेल तर कदाचित बालकाच्या जन्मानंतर लगेच, सोनेनाणे, दागदागिने (जन्मजात कवचकुंडले!) बरोबर देऊन त्याला अधिरथाकडे गुपचुप पाठवून दिले असणे नैसर्गिक वाटते. अधिरथ व राधा याना अपत्य नसल्यामुळे त्यांनी ही व्यवस्था मान्य केली व कर्णाला लहानाचा मोठा केला. अधिरथाचा वा त्याच्या कुणा आप्ताचा कर्णजन्माशी संबंध असल्यामुळे त्यानी ही जबाबदारी पत्करली असेल हा माझा तर्क आहे. मात्र याला महाभारतात काहीहि आधार नाही.
सूत हे क्षत्रियांच्या बरॊबरीचे नव्हे पण फारसे खालच्या दर्जाचे मानले जात नव्हते. सारथ्यकर्म हे त्यांचे मुख्य काम. मात्र सारथ्यकौशल्याची महति क्षत्रिय जाणून होते. स्वत:च्या सारथ्यकौशल्याचा त्यांना अभिमानहि असे. खुद्द श्रीकृष्ण, शल्य, अर्जुन, सुभद्रा, विराटपुत्र उत्तर, नलराजा, ऋतुपर्ण राजा, रामायणकाळात कैकेयी, या क्षत्रियांची सारथ्यकौशल्याबद्दल ख्याति होती. धृतराष्ट्राला युद्धवर्णन ऐकवणारा संजय आणि विराटाचा मेहुणा कीचक हे सूत होते. (क्षत्रियकन्येने सूताला वरल्याचे मात्र उदाहरण नाही!). यावरून सूतांचे सामाजिक स्थान क्षत्रियांच्या खालोखाल होते असे दिसते. कर्ण हा माझ्या तर्काप्रमाणे अधिरथ वा त्याचा आप्त, कुंतिभोजाचा सारथी, याचा पुत्र असेल तर जन्मानंतर त्याला अधिरथाकडे पाठवून देण्यात आपण त्याच्यावर काही अन्याय करतो आहोत असें कुंतिभोजाला व त्याच्या पत्नीला वाटण्याचे काही कारण नव्हते. मातापित्यानी कर्णाची काय व्यवस्था केली वा त्याला कोठे पाठवले हे कदाचित कुंतीला माहीतहि नसेल! कुंतिभोजाने कुंतीचे स्वयंवर थोड्या काळाने योजिले तेव्हां तिने पांडूला वरले. कर्ण हस्तिनापुरातच वाढतो आहे हें तिला माहीत असतें तर पांडूला वरण्याचा धोका तिने कदाचित टाळला असता. मात्र कुंती हस्तिनापुराची राणी होणार म्हटल्यावर कुंतिभोजाने वेळीच अधिरथाला कळवून कर्णाला हस्तिनापुरापासून दूर केले असावें. त्यामुळे विवाहानंतरच्या हस्तिनापुरातील सुरवातीच्या वास्तव्यात कर्ण तिच्या नजरेला येऊन तिने त्याला ओळखण्याची वेळ आली नाही. विदुर हा अतिशय दक्ष असा मंत्री असल्यामुळे व त्याचे हेरखाते कार्यक्षम असल्यामुळे कुंतीचा पुत्र हस्तिनापुरात अधिरथाकडे वाढतो आहे हे माहीत होते. कर्णाला हस्तिनापुरातून दूर पाठवण्याचे काम कदाचित त्यानेच केले असेल!
कर्णजन्माची कथा आदिपर्वात प्रथम आली आहे. तिचे स्वरूप वर वर्णिल्याप्रमाणे आहे. महाभारतात पुढे प्रत्यक्ष युद्धापूर्वी सूर्य कर्णाला भेटला व इंद्र तुझ्याकडे येऊन तुझी कवचकुंडले मागेल ती तूं देऊ नको असे त्याने कर्णाला सांगितले असा एक प्रसंग आहे. याठिकाणी कर्णजन्माची कथा जास्त विस्ताराने सांगितली आहे व ती आदिपर्वांतील कथेपेक्षा काहीशी वेगळी आहे. येथे कुंतीला वर देणारा ब्राह्मण दुर्वास असे म्हटलेले नाही. अधिरथाचा उल्लेख धृतराष्ट्राचा मित्र असा केलेला आहे. अधिरथ व राधा अंगदेश या सूतांच्या राज्यात गेलेली असताना गंगाकिनारी राधेला कर्णाची पेटी मिळाली असे वर्णन आहे. (कुंतिभोजाचे राज्य कोठे होते, गंगाकिनारी वा तिच्या एखाद्या उपनदीच्या किनारी? अंगदेश हा त्या राज्याच्या शेजारी होता काय?) येथील कथेप्रमाणे वर मिळाले तेव्हा कुंती अजाण कुमारी होती. वयात आल्यावर उत्सुकतेपोटी तिने मंत्राचा वापर करून सूर्याला बोलावले. प्रथम घाबरून तिने सूर्याला नकार दिला पण नंतर तो आपल्या कुळाला शाप देईल या भीतीने त्याची मागणी मान्य केली असे म्हटले आहे. बालक पेटीत ठेवून नदीत सोडण्याचे काम तिनेच स्वत: दासीच्या मदतीने केले असे वर्णन आहे. त्यानंतर अर्ध्या रात्रीपर्यंत नदीकाठी शोक करून मग पित्याला कळेल या भीतीने ती राजवाड्यात परत आली. पुढे स्वत:चे दूत पाठवून आपला पुत्र हस्तिनापुरात कसाकाय वाढतो आहे याचीहि बातमी तिने काढली होती असे वर्णन आहे. हें सर्व वर्णन असंभव वाटते. त्यापेक्षा वर वर्णिलेला माझा तर्क जास्त सयुक्तिक वाटतो. मात्र या प्रसंगीहि सूर्याने कर्णाला तू माझा पुत्र आहेस असे म्हटलेले नाहीच! कर्णाचा खरा पिता कोण हे रहस्य कुंतीने अखेरपर्यंत जपले. कर्णाच्या जन्माबद्दल व पितृत्वाबद्दल याहून जास्त काही सांगण्यासारखे नाही. त्याच्या पुढील आयुष्याचा आढावा पुढील लेखात घेऊंया. वाचत रहा.

Monday, September 8, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग २

कर्णाची माता कुंती याबद्दल कोणताही संदेह नाही. कुंती ही वसुदेवाचा पिता शूर याची कन्या. वसुदेवाची सख्खी भगिनी कीं सावत्र हें स्पष्ट नाही. शूराचा मित्र कुंतिभोज याला अपत्य नव्हते म्हणून शूराने आपली कन्या त्याला देऊन टाकली. कन्या दत्तक देण्याचे हे एक अपवादात्मक उदाहरण म्हणावे लागेल! शिशुपालाची माता ही पण कृष्णाची आत्या म्हणजे वसुदेवाची बहीणच पण सख्खी नव्हे. कुंती व शिशुपालाची माता वा कुंती व वसुदेव यांच्या भेटीगाठी वर्णन करणारा एकही प्रसंग महाभारतात नाही. जणू कुंतीला कुंतिभोजाकडे देऊन टाकल्यावर तिचे आईबाप व भावंडे तिला विसरलीच! दत्तक दिली तेव्हा तिचे वय काय होते, तिचा प्रतिपाळ कुंतिभोज व त्याच्या पत्नीने कसाकाय केला हे अज्ञात आहे. कुमारी वयात असताना तिला दुर्वासाच्या सेवेला ठेवले गेले हे एक नवलच. त्याने तिला खुशाल वशीकरण मंत्र शिकविले हे आणखी एक नवल! कुंतीच्या (गैर)वर्तनाचे समर्थन करण्यासाठी ही कथा मागाहून घुसडली कीं काय असा मला संशय येतो. कुंतिभोजाला मागाहून इतर कोणी अपत्ये झाली होती काय हे माहीत नाही. भारतीय युद्धात पांडवांकडून लढलेल्या वीरांमध्ये ’पुरुजित कुंतिभोज’ असा उल्लेख येतो. हा खुद्द कुंतिभोजच कीं त्याचा पुत्र हे उलगडलेले नाही. त्याच्या कुळातील इतर कोणा वीराचा उल्लेख नाही.
कुंतिभोजपत्नीचे कुंतीकडे पुरेसे लक्ष नव्हते असे म्हणावे लागते. कुंतीला कौमार्यावस्थेत पुत्र कर्ण झाला. सूर्यापासून नव्हे तर मग कोणापासून? येथे प्रत्यक्ष माहितीच्या अभावी तर्काचा आश्रय घेणे आवश्यक आहे. कुंतीला कोणा उच्च कुळातील राजपुत्राचा वा राजपुरुषाचा सहवास घडलेला असता तर त्यांच्या विवाहाला कोणतीहि अडचण आली नसती. क्षत्रियांसाठी गांधर्व वा राक्षसविवाहहि(कन्येला पळवून नेणे) सर्वमान्य होता. ज्या अर्थीं कुंतीला पुत्राचा त्याग करावा लागला त्या अर्थी कर्णाचा पिता उच्च कुळातील असण्याची शक्यता वाटत नाही. ऋषींपासून क्षत्रियकन्यांना पुत्र होणे व पित्याने अल्पकालीन मोह सोडून देऊन, संसाराच्या पाशात न अडकतां, अपत्याची जबाबदारी मातेवर सोडून देऊन, स्वत: निघून जाणे, असा प्रकार अनेक उपकथानकांतून दिसून येतो. तेव्हा तर्कच करावयाचा तर खुद्द दुर्वासच कर्णाचा पिता होता काय? पण दुर्वास ब्राह्मण व कुंती क्षत्रियकन्या तेव्हा त्यांचे मीलन अनुचित मानले गेले नसते व पुत्राचा त्याग करण्याची कुंतीवर पाळी आली नसती. यावरून कर्णाचे पितृत्व इतर कोणाचे तरी म्हणावे लागते. बालक पेटीत घालून नदीत सोडून दिले ही अद्भुत कथा बाजूला ठेवली तर प्रत्यक्षात काय घडले असावे याचा तर्क केला पाहिजे. त्याबद्दल पुढील भागात वाचा. धन्यवाद.

Saturday, September 6, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग १

महारथी म्हणून गाजलेला कर्ण ही व्यक्तिरेखा अनेक लेखकांची आवडती आहे. मराठीत त्याचेवर विपुल लेखन झाले आहे. कर्ण हा प्रत्यक्षात कुंतीपुत्र असूनहि त्याला राधेय, सूतपुत्र म्हणून सर्व जन्म घालवावा लागला हा त्याचेवर फार मोठा अन्याय झाला या दृष्टिकोनातून या बहुतेक लेखनामध्ये एक सहानुभूतीचा सूर सर्वत्र ऐकू येतो. जातिभेद, अनौरस संतति, या विषयांवर आजच्या काळातील विचारांच्या पार्श्वभूमीवर योग्यच असले तरी ज्या काळातील ही कथा आहे त्या वेळच्या समाजधारणांशी हे फारसे सुसंगत नाही. महाभारतकथेमध्ये कर्ण हे एक महत्वाचे पात्र आहे. काही प्रसंगात त्याची प्रमुख भूमिकाहि आहे. महाभारतातील या प्रसंगांतील कर्णाच्या चित्रणाचा विचार करून खुद्द महाभारतकारांना कर्ण कसा दिसत होता, इतर समकालीनांना कसा वाटत होता हे पाहाणे उद्बोधक होईल. यासाठी कर्णजन्माच्या कथेपासून सुरवात करून पूर्ण मागोवा घेण्याचा विचार आहे. अद्भुतता बाजूला ठेवून, ही सर्व माणसांची कथा आहे या भूमिकेतून मी माझे विचार मांडणार आहे. पांडवांचे काय किंवा कर्णाचा काय, जन्म देवांपासून झाले ही कल्पना वा श्रद्धा दूर सारून, विचार करावयाचा व काही ठिकाणी तर्क चालवावयाचा आहे. पुढील लेखापासून माझ्या प्रतिपादनाला सुरवात होईल. आपण वाचत रहालच असे वाटते. धन्यवाद.