आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Friday, June 27, 2008

महाभारतातील शकुंतला - भाग ४

महाभारत म्हणते, शकुंतला पुत्रासह निघाली तेव्हा अशरीरिणी वाणी झाली कीं ’दुष्यंता, हा तुझाच पुत्र आहे तेव्हां याचा स्वीकार करणे तुझे कर्तव्य आहे.’ तेव्हा दुष्यंताने मान्य केले व पुत्र व भार्या यांचा स्वीकार केला. अशरीरिणी वाणी झाली म्हणजे माझ्या मते, उपस्थित ऋत्विज, पुरोहित, आचार्य, व अमात्य यानी दुष्यंताची कान उघाडणी केली असेल, समजूत घातली असेल, तुझ्या आश्रमभेटीना आम्हीहि साक्षीदार आहोत असे बजावले असेल. स्वीकार केल्यावर मात्र आपल्या वर्तणुकीच्या समर्थनासाठी दुष्यंत शकुंतलेला म्हणाला कीं तुझा माझा संबंध नगरात कोणाला माहीत नव्हता. पुरुषाला मोहात पाडणे हा स्त्रियांचा स्वभाव असल्यामुळे तूं तसेच केले असशील व वर आपल्या पुत्राला राज्य मिळाले पाहिजे असा आग्रह धरून बसली आहेस असेंच सार्‍या लोकाना वाटले असते. म्हणून मी तुझा उतावळेपणाने स्वीकार केला नाही. तुला अनावर क्रोध यावा असे मी वागलो हे खरे आहे.’ हे सर्व म्हणून झाल्यावर मग त्याने उच्चारलेले वाक्य मात्र आश्चर्यकारक आहे! तो म्हणतो ’त्यानंतर तू मला जे कटु शब्द ऐकवलेस त्याबद्दल, लाडके, मी तुला क्षमा केली आहे.’ खासा न्याय! अपराध कोणाचा व क्षमा कोणाला!
महाभारतातील या मूळ कथेमध्ये दुष्यंताच्या चित्रणाला उजाळा देण्यासाठी कालिदासाने घुसवलेला दुर्वासाचा शाप, मेनकेने दुष्यंताच्या दरबारातून शकुंतला-भरत याना थेट स्वर्गात घेऊन जाणे, दुष्यंताला माशाच्या पोटातली अंगठी पाहून स्मृति येणे, त्याची विरहावस्था, दुष्यंताने इंद्राच्या मदतीसाठी स्वर्गात जाणे, तेथे भरताला अचानक पाहणे, मग शकुंतलेची भेट व स्वीकार, यातील काहीहि नाही! तेव्हा दुष्यंताचे कालिदासकृत उदात्तीकरण बाजूला ठेवून, त्याच्या वर्तणुकीचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे.
ज्याअर्थी, आपला पुत्र युवराज व्हावा ही शकुंतलेची मीलनापूर्वीची मागणी दुष्यंताने बेलाशक मान्य केली होती त्याअर्थी त्याला पत्नी असली/असल्या तरी पुत्रलाभ झालेला नसावा असे मानण्यास हरकत नाही. (भीष्मपिता शंतनु याला सत्यवतीची अशीच मागणी मान्य करता आली नाही.) भरताच्या जन्माआधी काही काळ दुष्यंताचे शकुंतलेला भेटणे बंद झाले असावे. त्यामुळे भरताच्या जन्माची त्याला कदाचित माहिती नसेल. त्याच्या प्रथम आश्रमभेटीला अनेक साक्षीदार होते. नंतरच्या भेटीहि गुप्त थोड्याच राहिल्या असणार? पण शकुंतला भरताला घेऊन दरबारात उपस्थित झाल्यावर, खुद्द दुष्यंत मान्य करीत नाही तोवर अमात्य वा पुरोहित स्वत:हून काय करणार? शकुंतलेने निकराच्या गोष्टी बोलल्यावर अखेर त्यानीच राजाला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली असणार व अन्यायापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असेल. दरबारातील मंडळींचे मत अनुकूल आहे असे दिसल्यावर मग दुष्यंतालाही शकुंतलेचा स्वीकार करण्याचा धीर आला! या सर्व प्रसंगवर्णनात, इतर राजस्त्रिया वा राजकुमारांचा उल्लेख कोठेहि नाही. दुष्यंतामागून भरताला निर्विघ्नपणे राज्य मिळाले, त्याअर्थी दरबारी राजकारणाचा वा वारसांचा प्रश्न नव्हता, तरीहि सुरवातीला दुष्यंताने शकुंतलेचा स्वीकार न करता उलट असभ्यपणे तिचा अपमान केला तो कां याचा खरेतर पुरेसा उलगडा होत नाही. दरबारी लोक वा जनमत यांचा कौल होईपर्यंत सत्य स्वीकारण्याचा त्याला धीर झाला नाही हे खरे.
या महाभारतातील मूळ कथेमध्ये शकुंतलेचे चित्रण अतिशय ठसठशीत व मनोज्ञ आहे. तिने पति व पिता यांची कर्तव्ये, पितृत्वाचे अवीट सुख व सत्याची असाधारण महति याचे केलेले वर्णन सुंदर आहे. स्वमनाची साक्ष असत्य भाषण करणाराला धुडकावून लावणे अशक्य असते हे प्रतिपादन अप्रतिम आहे. दुष्यंताचा दोष सौम्य करण्यासाठी कालिदासाने त्याला व शकुंतलेला दुर्दैवाची शिकार बनवले आहे यात तिच्यावर अन्यायच केला आहे असे मला वाटते.

Friday, June 20, 2008

महाभारतातील शकुंतला - भाग ३

दुष्यंतासमोर आल्यावर शकुंतलेने पूर्वी त्याने दिलेल्या वचनांची आठवण देऊन त्याप्रमाणे वाग अशी मागणी केली. (श्लोक१६-१८). पुढील श्लोकांत स्पष्ट उल्लेख आहे कीं राजाला सर्व गोष्टी चांगल्या आठवत होत्या! तरीहि राजाने शकुंतलेची ओळख व झालेला गांधर्वविवाह सरळसरळ (निर्लज्जपणे!) नाकारला!
शकुंतला ओशाळली, खजिल झाली, तिला भोवळ आली, दु:खाने ती सुन्न झाली. पण त्याचबरोबर संतापाने तिचे डोळे लालबुंद झाले, ओठ थरथरले, ती बेभान झाली. पण भावनांचा कल्लोळ बाहेर पडू न देतां, स्वत:चे तेज मलिन होऊ न देतां तिने दुष्यंताची सरळ खरडपट्टी काढली, निर्भर्त्सना केली. तिचे सर्व भाषण श्लोक २४ ते ७२ मध्ये येते. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. विस्तारभयास्तव ते सर्व उद्धृत करता येणार नाही. ही कालिदासाची असहाय अबला नाही,वाघीण आहे. ती शोक करीत नाही., स्वत:ला दोष देत नाही. तिने दुष्यंताला अनेक प्रकारे समजावले. ती म्हणाली – महाराज, आपणास सारे माहीत असतां आपण एख्याद्या असंस्कृत रासवट माणसाप्रमाणे मला काही माहीत नाही असे बेलाशक खोटे कसे बोलता? खरे काय व खोटे काय याला आपले मनच साक्षी असते. माझा मी एकटा आहे असे माणसास वाटत असते पण हृदयस्थ ईश्वराच्या नजरेतून कोणतेहि पाप सुटत नाही. दुसर्‍या कोणा साक्षीदाराची गरजच काय असा तिचा मुद्दा होता. नंतर तिने भार्या व पुत्र यांची महती अनेक प्रकारानी विशद करून सांगितली. मुंगीसारखा क्षुद्र प्राणीहि आपल्या संततीचे जतन करतो, तेव्हा पुत्राचा स्वीकार करून त्याचे जतन करणे हे तुझे कर्तव्य आहे असे दुष्यंताला बजावले. शेवटी असेहि म्हटले की तूं माझा त्याग केलास तर मी माझ्या आश्रमात परत जाईन पण तू तुझ्या पुत्राचा त्याग करू नकोस.
एवढे सर्व ऐकूनही दुष्यंताने मानले नाहीच. त्याने शकुंतलेची व तिच्या मातापित्यांची निंदानालस्ती केली. मुख्य शंका व्यक्त केली कीं हा मुलगा लहान वयाचा आहे म्हणतेस मग हा एवढा थोराड व दणकट कसा? हा माझा मुलगा नाहीच. तूं जें काही बोललीस त्यातले काहीहि मला मान्य नाही. मी तुला ओळखत नाही. तू वाटेल तिकडे निघून जा!
शकुंतलेने यावर पुन्हा त्याच्या वाकडे बोलण्य़ाबद्दल त्याची खरड काढली. पुत्रमहति पुन्हा वर्णन करून पुत्राचा त्याग करणे तुला शोभत नाही, स्वत:बरोबर सत्याचे रक्षण करणे तुझे कर्तव्य आहे असे म्हणून सत्याची महति नानाप्रकारे वर्णन केली. शंभर विहिरी बांधण्य़ापेक्षा एक तळे बांधणे श्रेष्ठ, शंभर तळ्य़ांपेक्षा एक यज्ञ चांगला, शभर यज्ञांपेक्षा एक पुत्र चांगला, पण शंभर पुत्रांपेक्षाहि सत्य श्रेष्ठ! हजार अश्वमेध व सर्व वेदांचे अध्ययन यांहूनही सत्य श्रेष्ठ ठरेल. एवढे बोलल्यावर तिने व्यक्त केलेला स्वाभिमान तर केवळ अजोड आहे. ती पुढे म्हणाली की तू जर असत्याचीच कास धरणार असशील तर तुझ्यासारख्याशी संबंधच नको! ही पहा मी निघाले. दुष्यंता, तुझ्याखेरीजही हा माझा पुत्र पृथीचे राज्य करीलच! एवढे बोलून ती पुत्रासह निघाली. यावेळी काय झाले? पुढील भागात वाचा.

Saturday, June 14, 2008

महाभारतातील शकुंतला - भाग २

दुष्यंत शिकारीसाठी ससैन्य व सेवक, मंत्री यांसह आला होता. आश्रमाशी पोचल्यावर सैन्य व सेनापति यांना बाहेर ठेवून अमात्य व पुरोहितासह तॊ आश्रमात शिरला. त्याच्या व शकुंतलेच्या प्रथम भेटीला त्यामुळे अनेक साक्षीदार होते. दुष्यंताची भेट झाल्यावर त्याचे स्वागत करून मग शकुंतलेने आपला सर्व पूर्ववृत्तान्त त्याला सांगितला. दुष्यंताला शकुंतलेचे आकर्षण वाटून त्याने तिला मागणी घातली व कण्वाच्या परत येण्याची वाट न पाहता तिला वश करून घेतली. यावेळी दुष्यंताने अनेक मतलबी युक्तिवाद केले पण ’आपणच आपले बंधु-आप्तेष्ट असतो व आपल्या आयुष्याचा मार्ग आपणच ठरवायचा असतो’ हे एक महान सत्यहि तिला सांगितले! कण्वाची वाट न बघता तुझा निर्णय तूच घे असे तिला सुचवले. शकुंतला अल्लड होती म्हणून ती दुष्यंताच्या शब्दजालात फसली अशी आपली समजूत असते पण महाभारत तसे म्हणत नाही! तिने गांधर्वविधीने दुष्यंताला वरण्याचा निर्णय विचारपूर्वकच घेतला. दुसरा कोणी आपल्या भेटीला साक्षी नाही याची तिने दुष्यंताला स्पष्टपणे जाणीव करून दिली. तुझा अंतरात्माच साक्ष आहे असे बजावून तिने आपली अट त्याला स्पष्टपणे सांगितली कीं ’मला होणारा पुत्र युवराज व तुझ्या पश्चात राजा झाला पाहिजे.’ दुष्यंताने ही अट कसलाही विचार न करता खुशाल मान्य केली व मी तुला नगरांत घेऊन जाईन असे स्पष्ट आश्वासनही दिले. कार्यभाग झाल्यावर मात्र, कण्व काय म्हणेल या भीतीने तो एकटाच आपल्या नगराला परत गेला. कण्वाने परत आल्यावर मात्र रागावण्याऐवजी शकुंतलेला दुष्यंत हा योग्यच वर आहे हे मान्य केले. शकुंतलेला, तिच्या इच्छेप्रमाणे, ’पुरुवंशातील राजे नित्य धर्मशील रहावे’ असा वर दिला.
भरताचा जन्म, दुष्यंताच्या (प्रथम) आश्रमभेटीनंतर तीन वर्षांनी झाला. कण्वाने हा दुष्यंताचा पुत्र आहे असे नि:शंकपणे मानले व त्याचे सर्व संस्कार केले त्याअर्थी या तीन वर्षांच्या काळात दुष्यंत वरचेवर आश्रमात येत-जात असला पाहिजे हे उघड आहे. प्रत्यक्ष पुत्रजन्मापूर्वी तो, काही कारणामुळे, यायचा थांबला असावा व त्याने भरताला पाहिले नसावे वा त्याच्या जन्माची त्याला कदाचित वार्ता नसावी. महाभारतात स्पष्टपणे सांगितलेले नाही. भरत सहा वर्षांचा झाला. कण्वाने त्याचे संस्कार केले. तो कांतिमान व सामर्थ्यवान झाला. अद्याप दुष्यंताकडून शकुंतलेला, कबूल केल्याप्रमाणे, बोलावणे आले नव्हते.दुष्यंत शांतपणे शकुंतलेला विसरून गेला होता! आतां या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे या कारणास्तव कण्वाने शकुंतलेला व भरताला दुष्यंताकडे पाठवून दिले! नित्याच्या परिचयाच्या वनातून शकुंतला जात होती. (अ.७४-श्लोक १४-१६). बहुधा, दुष्यंताबरोबर अनेकवार हिंडून हा परिचय झाला असणार. दुष्यंताच्या दरबारात शकुंतला व भरत उपस्थित झाल्यावर काय झाले? महाभारतातील या भेटीचे वर्णन खूपच सुंदर आहे. ते पुढील भागात पाहू.

Tuesday, June 3, 2008

महाभारतातील शकुंतला भाग १

महाभारतात, मूळ कौरव-पांडवांच्या वैरकथेच्या जोडीला इतर अनेक लहानमोठी उपकथानके आहेत. यांतील काही कथानके स्वतंत्र महाकाव्ये शोभावीत एवढी विस्तृत आहेत. शकुंतला दुष्यंत यांची कथा ही एक प्रमुख उपकथा आहे. या कथेतील काव्यगुणांनी महाकवींना भुलवले व महाकाव्ये व नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले. कालिदासाच्या शाकुंतल नाटकाने जगातील थोरथोर रसिकांकडून मानाचे मुजरे मिळवले व जर्मन महाकवि गटे ते डोक्यावर घेऊन नाचला हे सर्वश्रुत आहे. महाकवीनी काव्ये-नाटके लिहिताना मूळ महाभारतातील कथेमध्ये काही फेरफार करण्याचे स्वातंत्र्य घेतलेले दिसून येते. महाकाव्ये-नाटके थोरच पण मला काही वेळा मूळ महाभारतातील व्यक्तिचित्रण जास्तच रुचते. यामध्ये मी शकुंतलेच्या कथेचा समावेश करीन. शकुंतलेची मूळ महाभारतातील कथा आपण पाहूं या.
शकुंतला-दुष्यंत-भरत याची कथा आपणाला बरीचशी परिचित आहे. संस्कृत नाटकांच्या प्रथेप्रमाणे नायकाला अवगुण शोभा देत नाही म्हणून कालिदासाने दुष्यंत व शकुंतला यांच्या चित्रणात भरपूर स्वातंत्र्य घेतले आहे. त्यासाठी मुळात नसलेली दुर्वासाच्या शापाची कथा कल्पनेने रचिली आहे! इतरही महत्वाचे फरक आहेत.
शकुंतला ही मेनका व विश्वामित्र यांची कन्या हे आपणास ठाऊक आहे. मेनका ही अप्सरा व विश्वामित्र हा क्षत्रिय राजा व मागाहून ऋषिपदाला पोचलेला. मेनकेला विश्वावसु नावाच्या गंधर्व राजापासून एक कन्या झाली तिचे नाव प्रमद्वरा. मेनकेने जन्मत:च तिला स्थूलकेश नावाच्या ऋषीच्या आश्रमाजवळ नदीकाठी टाकून दिले व मग तिला त्या ऋषीने वाढवली. मात्र ती शकुंतलेच्या आधीची नव्हे. दोघींच्या कथेतील साम्य सहज लक्षात येईल.
विश्वामित्र व मेनकेची कथा शकुंतलेने प्रथम भेटीत दुष्यंताला सांगितली. विश्वामित्र मेनकेच्या मोहात पडल्यावर तो व मेनका दीर्घकाळ सुखोपभोगात रममाण झाली. हे विश्वामित्राचे क्षणिक पतन म्हणता येणार नाही. काही काळासाठी विश्वामित्राने तप:श्चर्या बाजूला ठेवली होती! (रामायणातहि विश्वामित्रकथा आहे. तेथे विश्वामित्र व मेनका यांनी दहा वर्षे एकत्र काढली असे म्हटले आहे. तसेच मेनका स्वत:च पुष्करतीर्थात स्नानाला आली होती तेव्हा विश्वामित्राने तिला पाहिले. तिला इंद्राने विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी पाठवले होते असे रामायण म्हणत नाही पण महाभारत म्हणते!) शकुंतलेच्या जन्मानंतर मेनका तिला टाकून निघून गेली हे खरेच पण विश्वामित्रानेहि तेच केले. बहुधा जन्म होईपर्यंतहि तो थांबला नसेल! शकुंतला कण्वाच्या आश्रमात लहानाची मोठी झाली. राजा दुष्यंत शिकारीसाठी ससैन्य व सेवक मंत्री यांसह वनात आला होता व त्यावेळी तो कण्वाच्या आश्रमात आला व कण्व उपस्थित नसताना त्याची शकुंतलेशी गाठ पडली. त्यावेळी काय झाले याचे महाभारतातील वर्णन पुढील भागात पाहू.