दुष्यंतासमोर आल्यावर शकुंतलेने पूर्वी त्याने दिलेल्या वचनांची आठवण देऊन त्याप्रमाणे वाग अशी मागणी केली. (श्लोक१६-१८). पुढील श्लोकांत स्पष्ट उल्लेख आहे कीं राजाला सर्व गोष्टी चांगल्या आठवत होत्या! तरीहि राजाने शकुंतलेची ओळख व झालेला गांधर्वविवाह सरळसरळ (निर्लज्जपणे!) नाकारला!
शकुंतला ओशाळली, खजिल झाली, तिला भोवळ आली, दु:खाने ती सुन्न झाली. पण त्याचबरोबर संतापाने तिचे डोळे लालबुंद झाले, ओठ थरथरले, ती बेभान झाली. पण भावनांचा कल्लोळ बाहेर पडू न देतां, स्वत:चे तेज मलिन होऊ न देतां तिने दुष्यंताची सरळ खरडपट्टी काढली, निर्भर्त्सना केली. तिचे सर्व भाषण श्लोक २४ ते ७२ मध्ये येते. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. विस्तारभयास्तव ते सर्व उद्धृत करता येणार नाही. ही कालिदासाची असहाय अबला नाही,वाघीण आहे. ती शोक करीत नाही., स्वत:ला दोष देत नाही. तिने दुष्यंताला अनेक प्रकारे समजावले. ती म्हणाली – महाराज, आपणास सारे माहीत असतां आपण एख्याद्या असंस्कृत रासवट माणसाप्रमाणे मला काही माहीत नाही असे बेलाशक खोटे कसे बोलता? खरे काय व खोटे काय याला आपले मनच साक्षी असते. माझा मी एकटा आहे असे माणसास वाटत असते पण हृदयस्थ ईश्वराच्या नजरेतून कोणतेहि पाप सुटत नाही. दुसर्या कोणा साक्षीदाराची गरजच काय असा तिचा मुद्दा होता. नंतर तिने भार्या व पुत्र यांची महती अनेक प्रकारानी विशद करून सांगितली. मुंगीसारखा क्षुद्र प्राणीहि आपल्या संततीचे जतन करतो, तेव्हा पुत्राचा स्वीकार करून त्याचे जतन करणे हे तुझे कर्तव्य आहे असे दुष्यंताला बजावले. शेवटी असेहि म्हटले की तूं माझा त्याग केलास तर मी माझ्या आश्रमात परत जाईन पण तू तुझ्या पुत्राचा त्याग करू नकोस.
एवढे सर्व ऐकूनही दुष्यंताने मानले नाहीच. त्याने शकुंतलेची व तिच्या मातापित्यांची निंदानालस्ती केली. मुख्य शंका व्यक्त केली कीं हा मुलगा लहान वयाचा आहे म्हणतेस मग हा एवढा थोराड व दणकट कसा? हा माझा मुलगा नाहीच. तूं जें काही बोललीस त्यातले काहीहि मला मान्य नाही. मी तुला ओळखत नाही. तू वाटेल तिकडे निघून जा!
शकुंतलेने यावर पुन्हा त्याच्या वाकडे बोलण्य़ाबद्दल त्याची खरड काढली. पुत्रमहति पुन्हा वर्णन करून पुत्राचा त्याग करणे तुला शोभत नाही, स्वत:बरोबर सत्याचे रक्षण करणे तुझे कर्तव्य आहे असे म्हणून सत्याची महति नानाप्रकारे वर्णन केली. शंभर विहिरी बांधण्य़ापेक्षा एक तळे बांधणे श्रेष्ठ, शंभर तळ्य़ांपेक्षा एक यज्ञ चांगला, शभर यज्ञांपेक्षा एक पुत्र चांगला, पण शंभर पुत्रांपेक्षाहि सत्य श्रेष्ठ! हजार अश्वमेध व सर्व वेदांचे अध्ययन यांहूनही सत्य श्रेष्ठ ठरेल. एवढे बोलल्यावर तिने व्यक्त केलेला स्वाभिमान तर केवळ अजोड आहे. ती पुढे म्हणाली की तू जर असत्याचीच कास धरणार असशील तर तुझ्यासारख्याशी संबंधच नको! ही पहा मी निघाले. दुष्यंता, तुझ्याखेरीजही हा माझा पुत्र पृथीचे राज्य करीलच! एवढे बोलून ती पुत्रासह निघाली. यावेळी काय झाले? पुढील भागात वाचा.
महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
3 comments:
वा! काका, शकुंतलेवरील सर्व भाग वाचले. शकुंतलेने दुष्यंताला नेमके काय सांगितले यावर वेगळा भाग टाका ना. विस्तारभयास्तव टाळू नका. त्यातून तत्कालिन स्त्रियांची विचारक्षमता कळून येईल. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
काका, आपण महाभारताच्या खंडांचे वर फोटो लावले आहेत. हे महाभारत कोणाचे? या खंडांबद्दल थोडी माहिती द्याल का?
समग्र महाभारताचे भाषांतर विदर्भ-मराठवाडा कंपनीने बर्याच वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले. त्याच्या नंतरही आवृत्या निघाल्या आहेत. माझ्याकडे कपाटात असलेल्या खंडांचा फोटो दिला आहे.
Post a Comment