आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Monday, September 8, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग २

कर्णाची माता कुंती याबद्दल कोणताही संदेह नाही. कुंती ही वसुदेवाचा पिता शूर याची कन्या. वसुदेवाची सख्खी भगिनी कीं सावत्र हें स्पष्ट नाही. शूराचा मित्र कुंतिभोज याला अपत्य नव्हते म्हणून शूराने आपली कन्या त्याला देऊन टाकली. कन्या दत्तक देण्याचे हे एक अपवादात्मक उदाहरण म्हणावे लागेल! शिशुपालाची माता ही पण कृष्णाची आत्या म्हणजे वसुदेवाची बहीणच पण सख्खी नव्हे. कुंती व शिशुपालाची माता वा कुंती व वसुदेव यांच्या भेटीगाठी वर्णन करणारा एकही प्रसंग महाभारतात नाही. जणू कुंतीला कुंतिभोजाकडे देऊन टाकल्यावर तिचे आईबाप व भावंडे तिला विसरलीच! दत्तक दिली तेव्हा तिचे वय काय होते, तिचा प्रतिपाळ कुंतिभोज व त्याच्या पत्नीने कसाकाय केला हे अज्ञात आहे. कुमारी वयात असताना तिला दुर्वासाच्या सेवेला ठेवले गेले हे एक नवलच. त्याने तिला खुशाल वशीकरण मंत्र शिकविले हे आणखी एक नवल! कुंतीच्या (गैर)वर्तनाचे समर्थन करण्यासाठी ही कथा मागाहून घुसडली कीं काय असा मला संशय येतो. कुंतिभोजाला मागाहून इतर कोणी अपत्ये झाली होती काय हे माहीत नाही. भारतीय युद्धात पांडवांकडून लढलेल्या वीरांमध्ये ’पुरुजित कुंतिभोज’ असा उल्लेख येतो. हा खुद्द कुंतिभोजच कीं त्याचा पुत्र हे उलगडलेले नाही. त्याच्या कुळातील इतर कोणा वीराचा उल्लेख नाही.
कुंतिभोजपत्नीचे कुंतीकडे पुरेसे लक्ष नव्हते असे म्हणावे लागते. कुंतीला कौमार्यावस्थेत पुत्र कर्ण झाला. सूर्यापासून नव्हे तर मग कोणापासून? येथे प्रत्यक्ष माहितीच्या अभावी तर्काचा आश्रय घेणे आवश्यक आहे. कुंतीला कोणा उच्च कुळातील राजपुत्राचा वा राजपुरुषाचा सहवास घडलेला असता तर त्यांच्या विवाहाला कोणतीहि अडचण आली नसती. क्षत्रियांसाठी गांधर्व वा राक्षसविवाहहि(कन्येला पळवून नेणे) सर्वमान्य होता. ज्या अर्थीं कुंतीला पुत्राचा त्याग करावा लागला त्या अर्थी कर्णाचा पिता उच्च कुळातील असण्याची शक्यता वाटत नाही. ऋषींपासून क्षत्रियकन्यांना पुत्र होणे व पित्याने अल्पकालीन मोह सोडून देऊन, संसाराच्या पाशात न अडकतां, अपत्याची जबाबदारी मातेवर सोडून देऊन, स्वत: निघून जाणे, असा प्रकार अनेक उपकथानकांतून दिसून येतो. तेव्हा तर्कच करावयाचा तर खुद्द दुर्वासच कर्णाचा पिता होता काय? पण दुर्वास ब्राह्मण व कुंती क्षत्रियकन्या तेव्हा त्यांचे मीलन अनुचित मानले गेले नसते व पुत्राचा त्याग करण्याची कुंतीवर पाळी आली नसती. यावरून कर्णाचे पितृत्व इतर कोणाचे तरी म्हणावे लागते. बालक पेटीत घालून नदीत सोडून दिले ही अद्भुत कथा बाजूला ठेवली तर प्रत्यक्षात काय घडले असावे याचा तर्क केला पाहिजे. त्याबद्दल पुढील भागात वाचा. धन्यवाद.

4 comments:

TheKing said...

puDhachaa bhaag kadhee yeto aahe?

Priyabhashini said...

दुर्वास हाच कर्णाचा पिता मानावा काय? हा विचार माझ्याही मनात पूर्वी येऊन गेला होता परंतु तसे वाटत नाही. कर्णाचा पिता मनुष्य गणातील नसावा असे वाटते. ज्याप्रमाणे अप्सरांना किंवा गंधर्वांना मर्त्यमानवांचे नितीनियम लागू नाहीत त्याप्रमाणेच कर्णाच्या पित्यालाही ते लागू नसावेत. पर्यायाने कर्णाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर येत नाही.

कदाचित, त्यामुळे कुमारीमाता हा कलंक कुंतीला लागत असावा असे वाटते.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

मनुष्य सोडून इतर कोणी कर्ण वा पांडवांचा पिता मानणे मला पटत नाही. मग सूर्य हाच कर्णाचा पिता मानला की काही प्रष्नच उरत नाहीत! देव, अप्सरा, गंधर्व याना बाजूला ठेवून मी विचार मांडत आहे. पुढील भाग पहावा.

vaibhav sant said...

दुर्वासऋषीचं कदाचित कर्णाचे पिता असतील . कारण कुंती, दुर्वासऋषी ची सेवा करत होती . ती राजकन्या होती . म्हणजे तिला मदत करणारे सेवक पण तिथे असणार .त्यामूळे बाहेरचे कोणी तिथे येईल असे वाटत नाही. आणि बुद्धी आणि गुण ( जे वास्तविक पाहता बर्याचौशी आई आणि वडिलान कडून येतात) कर्णाची बुद्धी आणि गुण हि सामान्य माणसा पेक्षा खूपच वरची होती . दुर्वासऋषीची बौद्धिक पातळीहि खूपच वरती होती . आणि कुंती त्यांची सेवा करताना जर दोघानची इच्छा झाली असेल आणि त्यापासून कर्ण झाला असेल तर ???? . दुर्वासऋषी हे महाभयंकर तापत होते . कुंतीला ते माहित होते . तसेच कुन्तिभोजाला देखील माहिती होते . त्यामूळे दुर्वासऋषीनकडून जर कुंतीला बाळ होणार आहे .हे जेव्हा कळले असेल तेव्हा त्यांचा कोप होऊ असे वाटून ती माहिती गुप्त ठेवली असण्याची शक्यता वाटते. जर कर्णाला बाळपाणीच टोपलीत ठेऊन पाण्यात सोडले होते . आणि जर तो बुडून गेला आसता तर हि गुप्त वार्ता कोणालाच कळली नसती. वरील लिहिलेले वाक्ये कदाचित चुकीचे असेल किंवा जर कोणाच्या भावना दुखावल्या आसतील तर मी माझे वाक्य मागे घेतो आणि मला त्यांनी माफं करावे अशी मी त्यांना विनंती करतो