पांडवानी इंद्रप्रस्थ राजधानी वसवली. राजसूय यज्ञाचा बेत केला. त्यासाठी जरासंधाला मारले. दिग्विजय केला. यज्ञाच्या वेळी सर्व कौरव उपस्थित होते. यज्ञानंतर अग्रपूजेचा मान कृष्णाला देण्याचा सल्ला भीष्माचा. तो पांडवांना मानवला. शिशुपालाने कडाडून विरोध केला. भीष्मालाहि दुरुत्तरे केलीं. भीष्माने त्याला अतिशय तुच्छतेने झिडकारले. अखेर कृष्णाने त्याला मारले. भीष्माला हा अतिरेक टाळतां आला असता काय? या अतिप्रसंगाच्या छायेखाली यज्ञ पुरा झाला.
पांडवांच्या दरार्याचा व वैभवाचा हेवा वाटून शकुनीच्या सल्ल्यावरून दुर्योधनाने द्यूताचा बेत ठरवला व धृतराष्ट्राच्या गळीं उतरवला. भीष्माला विचारले नाही पण कळले असणारच. द्यूत होऊं नये यासाठी त्याने कांहींहि केलेले नाहीं. त्याने स्पष्टपणे धृतराष्ट्राला निक्षून सांगितले असते तर बहुधा द्यूत टळले असते पण भीष्म स्वस्थ बसला. पांडव हस्तिनापुरात आल्यावर सर्वांना भेटले व द्यूत दुसर्या दिवशीं झालें. तोंवर वेळ मिळाला होता मात्र भीष्माने युधिष्ठिरालाहि ’द्यूत खेळूं नको’ असा निकराचा सल्ला दिला नाही. ’खेळताना संयम पाळ’ येवढेहि निक्षून सांगितले नाहीं! कुटुंबप्रमुख असलेल्या भीष्माला हा नाकर्तेपणा कां ग्रासून राहिला हे उलगडत नाही.
द्यूत झालेच. युधिष्ठिर कायम हरतच राहिला. पांडव सर्व संपत्ति हरेपर्यंत द्यूत चालले. मग त्याने सहदेवास पणास लावले. हीच वेळ होती, खरे तर द्यूत संपवण्याची! येथून पुढील युधिष्ठिराचा सर्व अतिरेक दरबारातील सर्वांनी चालूं दिला. भीष्माने, पहिल्या पांडवाला पणाला लावण्याच्या वेळेसच, निर्धाराने हा गैरप्रकार कां थांबवला नाहीं? ’राज्य वैभव तुम्हा नालायकांना राखतां आले नाहीं, आतां निघा आणि भीक मागा किंवा पुन्हा पराक्रम गाजवून नवीन राज्य व वैभव कमवा. तुमच्या दुर्दशेला युधिष्ठिरच कारण आहे, तेव्हां कौरवांना दोष देऊं नका’ असें म्हणून त्याने पांडवांना हांकलून कां दिलें नाहीं? द्यूत तेव्हांच थांबवले असते तर पुढील घोर अपमान, द्रौपदीचा छळ व अनावर वैर टळलें असतें. महाभारतात याचे उत्तर मिळत नाहीं.
युधिष्ठिर चारी भावांनंतर स्वत:ला पणाला लावून हरला. सर्व पांडव दास झाले. शकुनीने द्रौपदीला पणाला लावण्याची सर्वथैव अनुचित सूचना केली. तिलाहि भीष्माने काडीचाहि विरोध केला नाहीं! हा पणहि हरल्यावर द्रुपदकुळाची राजकन्या असलेल्या द्रौपदीची सर्व प्रकारे होणारी अप्रतिष्ठा भीष्मानेहि निमूट पाहिली. यांतून उद्भवणारे पांचाल-कौरव घोर वैर त्याला दिसत नव्हतें काय? कुरुकुळाचा प्रमुख या नात्याने त्याने तें टाळावयास हवें होतें. द्रौपदीने विचारलेल्या,’मी दासी झाले कीं नाहीं?’ या प्रष्नाचे उत्तरहि भीष्माने दिलेच नाहीं. ’मला उत्तर समजत नाहीं ’ असा जबाब त्याने दिला. अखेर धृतराष्ट्रानेच तिला वर देऊन पांडवांना दास्यांतून मुक्त केले व जिंकलेले सर्व धनहि परत दिले व ’सर्व प्रकार विसरून परत जा’ असा युधिष्ठिराला निरोप दिला. पांडव परत गेले. या सर्व प्रसंगानंतरहि भीष्म, विदुर, धृतराष्ट्र, द्रोण, कृप वा इतर कुरुवृद्धांनी युधिष्ठिराची अतिरेकी द्यूताबद्दल खरडपट्टी काढली नाही.
पांडवांच्या झालेल्या अपमानांमुळे लगेचच युद्ध उभे राहील या धास्तीने, माझ्या मते, ते भय दूर सारण्यासाठी अनुद्यूत झाले. कोणताही पक्ष जिंकला तरी युद्ध तेरा वर्षे टळणार होते. मात्र युधिष्ठिर जिंकला असता तर कौरवांतर्फे कोणकोण वनात जाणार होते हे स्पष्ट सांगितलेले नाही. अनुद्यूताचा बेत मुळात कोणाचा हे महाभारतात स्पष्ट नाही. या बेतालाहि भीष्माने विरोध केला नाहीं. पांडव पुन्हा हरून १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासासाठी वनात गेले. या सर्व अनर्थपरंपरेचा भीष्म निव्वळ साक्षीदार राहिला. तो इतका निष्क्रिय कां झाला याचे उत्तर महाभारतात नाहीं.
महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
1 comment:
I have been keeping your present series in my PC. It's an encouragement to young ones to read this great epic.
Mangesh Nabar
Post a Comment