आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Friday, November 19, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५

पदरीं पडलें तें पवित्र मानून, इच्छा असो वा नसो, हे दोन्ही पुत्र मोठे होईपर्यंत भीष्माला राज्य संभाळावे लागले! धृतराष्ट्र आंधळा त्यामुळे राजा होण्यास लायक नव्हताच त्यामुळे पांडु पुरेसा मोठा झाल्यावर त्याला राज्यावर बसवून भीष्म मोकळा झाला. पांडूमध्ये कोणता जन्मदोष होता हे स्पष्ट नाही. तर्क करावयाचा तर बहुधा त्याच्या हृदयाला छिद्र वगैरे असावे त्यामुळे लहानपणी तो पांढराफटक असावा. बाल व तरुण वयात तो दोष काहीसा झाकला गेला असावा म्हणून त्याचा युद्धकलेचा अभ्यास झाला व तो वीरपुरुष बनला. पुढे वय वाढल्यावर तो दोष पुन्हा पुढे आला असावा व कोणताही ताण, राज्यकारभाराचा वा संसारसुखाचा, झेपणे त्याला शक्य राहिले नाही. त्यामुळे त्याला राज्यनिवृत्ति स्वीकारून वनवास व पुत्रासाठी कुरुकुळात पुन्हा एकदां नियोग स्वीकारावा लागला. पांडु वनात भार्यांसह गेला त्याला भीष्माने रोखले नाही. राजधानीतच राहून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घे असे सत्यवतीने वा भीष्माने त्याला म्हटले नाहीं. आधीच्या पिढीचा अनुभव लक्षात घेऊन ’तूं हिमालयाकडे जाऊन कुरुसमुदायांतील तिकडील एखाद्या योग्य पुरुषामार्फत नियोगमार्ग पत्कर’ असें भीष्मानेच त्याला सुचवले असा माझा तर्क आहे. (पांडवांचा जन्म देवांपासून हे एक रूपकच म्हटले पाहिजे. तें शब्दश: घेणे योग्य नाहीं )
पांडु राज्य सोडून वनांत गेल्यामुळे नाइलाजाने धृतराष्ट्राला राज्यावर बसवून कारभार भीष्म व विदुर यांना पहावा लागला. विवाह पांडूबरोबरच होऊनहि अद्याप धृतराष्ट्रालाहि अपत्यें झालीं नव्हतीं. कुंतीला वनात युधिष्ठिर पुत्र झाल्याचें गांधारीला कळले तेव्हां तीहि गरोदर होती असें महाभारत म्हणतें पण हे बरोबर वाटत नाहीं. तिचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन युधिष्ठिरापेक्षा लहान, भीमाच्याच वयाचा होता! कुंतीपुत्र आधीं जन्मल्यामुळे आपल्या पुत्राला पुढे राज्य मिळण्याची खात्री तिला व धृतराष्ट्राला राहिली नाहीं. कौरव-पांडव वैराची ही सुरवातच होती! कालांतराने पांडू व माद्री यांचा वनात मृत्यु झाला व कुंती पांच पुत्रांसह हस्तिनापुरास परत आली. कौरव पांडव दोघेंहि लहान असल्यामुळे राज्याची व्यवस्था कायम राहिली. मात्र दुर्योधनाला युधिष्ठिर हा आपला प्रतिस्पर्धी आहे हें लहानपणापासूनच स्पष्ट दिसूं लागलें.
कौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्था भीष्माने नीट लावली. आधी कृप व मग द्रोण यांचेपाशी ते युद्धकला उत्तम शिकले. सर्व राजपुत्र मोठे झाल्यावर अस्त्रदर्शनाचा प्रसंग घडला. त्यावेळी अचानक उपस्थित होऊन कर्णाने अर्जुनाची बरोबरी करून मग त्यांच्या द्वंद्वापर्यंत पाळी आली. ते थांबवण्याचे श्रेय कृप व भीमाला दिले पाहिजे. भीष्माने कुरुप्रमुख या नात्याने वेळीच हस्तक्षेप केला नाही. दुर्योधनाने आततायीपणे कर्णाला अंगराज्य देऊन टाकले व राज्याभिषेकहि केला. त्याला भीष्माने थांबवले नाही. कुलप्रमुख या नात्याने त्याच्या संमतीशिवाय हे कसे होऊ शकले? दुर्योधनाचा अधिकार येथून पुढे जणूं भीष्माने मान्यच केला! मात्र पुढे नवीनच पेंच उभा राहिला. राज्यावर धृतराष्ट्र पण यौवराज्य युधिष्ठिराला दिले. हा अर्थातच भीष्माचा निर्णय होता. यातून तिढाच निर्माण झाला. कौरव-पांडवांतील वाढता वैरभाव व दुर्योधनाला मिळालेली कर्णाची साथ हे दिसत असूनहि भीष्माने वेळीच राज्य वाटून देण्याचा उपाय योजला नाही. दुर्योधन सुखासुखी युधिष्ठिराला राज्य मिळू देणार नाही हे उघड होते व धृतराष्ट्र दुर्योधनाच्या आहारी जातो आहे हेहि दिसत होते तरीहि भीष्माने काही केले नाही. या वेळीं भीष्माचा सल्ला वा निर्णय धृतराष्ट्र वा दुर्योधन झिडकारूं शकले नसते. पण भीष्माने तसे केले नाही. अलिप्तपणा एवढेच कारण?

13 comments:

सागर बोरकर said...

काका, हाही भाग नेहेमीप्रमाणे उत्तमच.

काही शंका आहेत.

भीष्म कुरुकुलाचा सेवक या नात्याने राजसिंहासनाशी बांधला गेला असल्याने कौरव पांडवांमध्ये निर्णायक हस्तक्षेप करु शकला नसेल काय? जे जे होईल तैसेची पहावे म्हणूनही तो तटस्थ राहीला असेल काय?

भीष्म हा सर्ववेद पारंगत, सर्व युद्धकलाविशारद असतानाही कौरव पांडवांना सर्व शिक्षण देण्यासाठी कृप, द्रोण यांची गरज का भासावी? का राजकुळातील विद्यार्थ्यांनी बाहेरील गुरुकडूनच शिक्षण घ्यावे असा त्याकाळी दंडक होता. तसेच त्याकाळी गुरुगृही जाण्याची परंपरा असूनही कौरव पांडवाना हस्तिनापुरातच का प्रशिक्षण देण्यात आले असावे?

तसेच अंगराज्य हे दुर्योधनाने जिंकलेले एखादे मांडलिक राज्य असावे त्यामुळेही इतरांना त्यात हस्तक्षेप करता आला नसावा.

Shasha said...

प्रभाकर काका,
महाभारत हा विषय खरच फार गुंता-गुंतीचा, रहस्यमय आहे. तुम्ही तो फार सोप्या शब्दांत मांडत आहात. अधिक वाचायला विशेष आवडेल. काही वर्षांपूवी केवळ दूरदर्शनसारख्या माध्यमाद्वारे या कथेचा अनुभव घेता आला. त्यानंतर डॉ. प. वि. वर्तक यांच्या भीमावर लिहिलेल्या स्वयंभू या पुस्तकातून त्याचे वैदज्ञानिक पैलू वाचनात आले.
पुढील लिखाणाची वाट पहात आहे.

शोभा

प्रभाकर फडणीस said...

भीष्म कुरुकुलाचा सेवक नव्हे तर प्रमुख होता. त्याने आपले अधिकार वापरण्याचे सोडून दिल्यामुळे कुळाची अपरिमित हानि झाली असे माझे मत बनले आहे.
भीष्माने कौरव-पांडवच काय पण इतर कुणालाही शिकवलेले नाही. ’शिकवणे’ ही एक वेगळीच कला असते हे आजहि सत्य आहे. कृप-द्रोणांपेक्षा जास्त लायक गुरु कोठून मिळणार होते?

स्वप्निल देमापुरे said...

kharach khup dandaga abhyas aahe kaka tumacha Mahabharat ya wishayaa war...

Tumhala Star majha Compition madhe yash milalya baddal hardik Shubhecha.....

Salil Chaudhary said...

अभिनंदन!
असेच लिहत रहा.

वि वे क said...

विजेत्या ब्लाँगबद्द्ल आपले
अभिनदंन !! अभिनदंन !!

नरेंद्र गोळे said...

फडणीससाहेब,

तुमच्याइतके ज्येष्ठ असलेले, आणि स्वतः अनुदिनी लिहीणारे मराठी लोक खरोखरीच दुर्मिळ आहेत.

तुम्ही ज्या सातत्याने आणि साक्षेपाने लिहीत आहात त्याचा, स्टार माझाच्या निवडीमुळे सन्मान झाला आहे असे मला वाटते.

ह्या निवडीखातर आपले मनःपूर्वक अभिनंदन!

स्नेहांकित
नरेंद्र गोळे

अनघा said...

सर्वप्रथम आपले अभिनंदन. :) माझ्या असे वाचनात आले आहे की 'संपूर्ण महाभारत' हे एकाच लेखकाने लिहिलेले नाही. त्यामुळे त्यात कधी कधी विसंगती व काही व्यक्तिमत्वे अर्ध्यावर सोडलेली दिसून येतात.

gnachiket said...

आपला ब्लॉग हा इतका अभ्यासपूर्ण आहे की आपल्याला परीक्षक म्हणून घ्यायला हवे.

डिझर्व्हिंग ब्लॉगला बक्षीस मिळालं..खूप आनंद झाला.

अभिनंदन फडणीसकाका...!!!

..नचिकेत

प्रभाकर फडणीस said...

आपणा सर्वांच्या अभिनंदनाबद्दल मनापासून धन्यवाद. स्पर्धेतील यशापेक्षहि माझे साधेसुधे लेखन अनेक वाचकाना आवडत आले आहे याचा मला खरा आनंद आहे. वाचकाना आवडते म्हणून तर अजूनहि काहीबाही लिहितो आहे.

Vinayak Pandit said...

फडणीस काका! मन:पूर्वक अभिनंदन!

रोहन चौधरी ... said...

स्पर्धेतील यशासाठी खूप खूप अभिनंदन... :)

मीनल गद्रे. said...

महाभारतातील इतक्या गोष्टी माहिताही नव्हत्या. वाचायला हव्या शांतपणे.
कुणीतरी सांगितले की महाभारतातील ते श्री क्रुष्ण, आर्जुन यांचे रथावरील चित्र घरात लावू नये. तर दुसरा म्हणाला "कुठल्या घरात रामायन नसतं?"
खरे आहे नाही का?