आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Sunday, February 22, 2009

स्फुट प्रकरणे - भाग ५

परशुराम कथा
महाभारतांतील परशुरामकथा ही देखील आपल्या समजुतीपेक्षा थोडी निराळी आहे.
परशुरामाचा पिता जमदग्नि. हा भृगुचा नातू व ऋचीकाचा पुत्र. तो वेदवेत्ता व सर्व शास्त्रांचा व शस्त्रांचाहि जाणकार होता. मात्र जमदग्नि म्हणजे शीघ्रकोपि अशी आपली समजूत असते तसा तो नव्हता! परशुरामाची माता रेणुका ही राजा प्रसेनजित याची कन्या म्हणजे क्षत्रियकन्या. रेणुका व जमदग्नि यांचे चार पुत्र, त्यांत परशुराम सर्वात लहान. स्नानासाठी नदीवर गेलेली असताना जलक्रीडा करीत असलेल्या राजा चित्ररथावर, ( कार्तवीर्यावर नव्हे!) क्षणभरासाठी कां होईना, रेणुकेचे मन गेले. त्या मानसिक व्यभिचाराने रेणुका निश्चेष्ट होऊन पाण्यात पडली. आश्रमात परत आली तेव्हां तिची अवस्था जमदग्नीने ओळखली व तिचा धि:कार केला. चारही पुत्र क्रमाने आश्रमांत आले तसतसे जमदग्नीने प्रत्येकाला आईला मारून टाकावयास सांगितले. मोठ्या तिघांनीहि नकार दिला. त्यांना पित्याने रागाने शाप दिले. चौथ्या परशुरामाने मात्र आज्ञेप्रमाणे परशूने आईचे मस्तक तोडले. जमदग्नीचा क्रोध एकदम शमला व त्याने परशुरामाला ’वर माग’ असे म्हटले. परशुरामाने मागितलेले वर लक्षणीय आहेत. ’आई जिवंत व्हावी, मी मारल्याची तिला स्मृति राहूं नये, मानसिक पापाचा स्पर्श तिला न व्हावा, भावांचे शाप परत घ्यावे, आणि स्वत: युद्धात अजिंक्य व दीर्घायुषी व्हावे’ असे ते वर होते. व ते सर्व पित्याने त्याला दिले.
जमदग्नीचे सर्व पुत्र आश्रमाबाहेर गेले असताना एकदां राजा कार्तवीर्य सहस्रार्जुन आश्रमांत आला. रेणुकेने त्याचे योग्य ते स्वागत केले तरीहि त्याने आश्रमाचा विध्वंस केला. (जमदग्नीला मारले नाही!) परशुरामाने परत आल्यावर ते पाहून रागावून कार्तवीर्यावर चाल करून त्याचा वध केला. पुढे एकदा परशुराम आश्रमात नसताना पुन्हा कार्तवीर्याच्या पुत्रांनी आश्रमांत येऊन, जमदग्नीवर हल्ला करून त्याला मारून टाकले. परशुराम परत आल्यावर पितृहत्या पाहून त्याने फार विलाप केला व युद्ध करून त्याने सर्व कार्तवीर्य पुत्राना व त्यांच्या मदतनीस सर्व क्षत्रिय राजाना मारले. वारंवार झालेल्या युद्धांमुळे एकवीस वेळां पृथ्वी नि:क्षत्रिय झाली. नंतर यज्ञ करून परशुरामाने सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली. कश्यपाने त्याला आपल्याला दान केलेल्या भूमीवर वसती करण्यास मनाई केली. त्यामुळे परशुराम महेद्रपर्वतावर वसती करूं लागला. परशुरामाने नवीन वसवलेल्या कोकण भूप्रदेशात हा महेंद्रपर्वत असल्याचे मानले जाते. नंतर कधीहि परशुराम रात्री इतर कोठे राहत नसे. याचा इतरत्रहि उल्लेख आहे. रामाने शिवधनुष्य तोडले तेव्हां व भीष्माने अंबेचा स्वीकार करण्याचे नाकारले तेव्हां त्याने त्या दोघांना शिक्षा करण्याचा त्याने प्रयत्न केला पण दोन्ही प्रसंगी तो हरला. त्याचे बळ संपले होते व क्षत्रिय राजे पुन्हा प्रबळ झाले होते. या कथेप्रमाणे जमदग्नीच्या वधाचा दोष कार्तवीर्याला नव्हे तर त्याच्या पुत्रांना दिलेला आहे. तेव्हां ’सहस्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला’ हे दशावतार आरतीतील वर्णन बरोबर नाही!

6 comments:

साधक said...

परशुरामाने परत आल्यावर ते पाहून रागावून परशुरामावर चाल करून त्याचा वध केला

या वाक्यात सुधारणा व्हाव्ही.

प्रभाकर फडणीस said...

सुधारणा लगेच केली. धन्यवाद!

Sachin_Gandhul said...

परशुरामांना राग येन्याचे कारन "कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व वासरू पळवून नेले," असेही नमुद केलेले आहे.... परशुराम हे स्वतः विष्णू अवतार असुनही धनुष्यबाण मोडले म्हणून ते " श्री रामांवर" आक्रमन करन्यास का आले असावेत हे मला अजुनही समजत नाही .. ते इतके शीघ्र्कोपी होते काय?
.क्रुपया समजावावे

प्रभाकर फडणीस said...

कामधेनु वसिष्ठांच्या आश्रमांतून विश्वामित्राने पळवण्याचा प्रयत्न केला. कार्तवीर्याने नव्हे.
अवतार कल्पना बाजूला ठेवून विचार केला तर असे वाटते कीं आपण क्षत्रियांचा नायनाट केला आतां त्यांच्यांत असा कोण बलिष्ठ पुरुष नवीन पुढे आला आहे कीं ज्याने शिवधनुष्य मोडले, या कुतूहलापायी, कोण हा राम हे पाहण्यासाठी परशुराम आला होता. म्हणून तर त्याने रामाला दुसरे विष्णुधनुष्य देऊन ’आतां तुझा पराक्रम दाखव व हे तूं सिद्ध करूं शकलास तर मग माझ्याशी युद्ध कर’ असे आव्हान दिले.

D D said...

परशुराम आणि विश्वामित्र यांच्या संदर्भात वाचलेली एक कथा आठवते, पण ती रामायणात वाचली होती, की महाभारतात ते आठवत नाही. त्या कथेनुसार जमदग्नी ऋषींची आई ही एक क्षत्रियकन्या होती, आणि तिच्या आईला नंतर "विश्वामित्र" हा पुत्र झाला.

विश्वामित्राच्या जन्माच्या आधी जमदग्नीच्या वडिलांनी जमदग्नीची आई व त्यांची क्षत्रिय सासू ह्या दोघीही कर्तृत्ववान पुत्र व्हावेत म्हणून आशिर्वाद मागायला आल्या असतांना, त्यांना प्रसाद म्हणून दोन वेगवेगळे चरू दिले व ते रात्रभर तसेच ठेवून दुसर्‍या दिवशी सकाळी भक्षण करण्यास सांगितले.

त्यावेळी जावयाने त्याचा पुत्र जास्त कर्तृत्ववान व्हावा म्हणून त्याच्यासाठी खास चरू बनवला असावा असा संशय आल्याने सासूने चरूची अदलाबदल केली व दोघींनी बदललेले चरू भक्षण केले.

ही गोष्ट जावयाला कळली तेव्हा त्यांनी सांगितले, की क्षत्रिय सासूचा पुत्र पराक्रमी, तेजस्वी बनावा व स्वतःचा पुत्र उत्तम तपस्वी, सात्विक ब्राह्मण बनावा म्हणून त्यांनी मुद्दाम वेगळे चरू बनवले होते. आता क्षत्रिय सासूच्या पोटी ब्राह्मणासारखा तपस्वी व सात्विक प्रवृत्तीचा पुत्र जन्माला येईल. मात्र त्यांच्या बायकोच्या पोटी क्षत्रियासारखा तेजस्वी, पराक्रमी, क्रोधिष्ट पुत्र जन्माला येईल.

मात्र जमदग्नीच्या आईची यात काही चूक नसल्याने तिच्या पतीने त्यांच्या तपःश्चर्येच्या प्रभावाने क्षत्रियाचे गुण स्वतःच्या पुत्रात न उतरता ते त्याच्या पुत्रात (स्वतःच्या नातवात) उतरतील असा आशिर्वाद दिला.

म्हणू्नच नंतर क्षत्रिय सासूचा जन्मलेला पुत्र "विश्वामित्र" ब्राह्मण होण्याच्या ध्येयाने पछाडून ब्रह्मर्षी बनला. तर ब्राह्मण पित्याचा पुत्र जमदग्नी पित्याच्या आशिर्वादामुळे तपस्वी पण स्वभावाने थोडा क्रोधाविष्ट बनला, पण जमदग्नीचा पुत्र परशुराम मात्र क्षत्रिंयासारखा तेजस्वी, पराक्रमी, शीघ्रकोपी बनला व क्षत्रियांसारखेच शस्त्र हाती धरून त्याने क्षत्रियांचे निर्दालन केले.

कांचन कराई said...

ही नवीनच माहिती मिळाली. काका, धन्यवाद. आता तुमचा ब्लॉग वाचत जाईन.