आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Monday, July 14, 2008

कृष्णशिष्टाई - भाग १

महाभारताच्या मुख्य कथेशी बहुसंख्य भारतीय परिचित असतात. पांडव व कौरवांमध्ये द्यूत व अनुद्यूत होऊन पांडव दोन्हीत हरले व आपले राज्य कौरवांच्या हवाली करून त्याना बारा वर्षे वनवास अ एक वर्ष अज्ञातवास सोसावा लागला. त्यानंतर कौरवानी त्यांचे राज्य परत देण्याचे नाकारले त्यामुळे अखेर दोन्हीमध्ये भीषण युद्ध झाले व कुळाचा संहार झाला. हे युद्ध टाळण्यासाठी पांडव अज्ञातवासातून प्रगट झाल्यापासून पुढील काही महिने समेटाचे अनेक प्रयत्न झाले. कृष्णाने कौरव दरबारात पांडवांचे बाजूने शिष्टाई केली ती त्यातील अखेरची घटना. त्या प्रयत्नांची ही कथा आहे.
अर्जुन गायी लुटण्यासाठी आलेल्या कौरवांच्या प्रतिकारासाठी युद्धाला उभा राहिला व ओळखला गेला तेव्हाच अज्ञातवास संपला. पांडव त्यानंतर तीन दिवसानी विराटासमोर स्वरूपात उभे राहिले. विराटाने आपली कन्या अर्जुनाला देऊ केली पण अर्जुनाने तिचा सून म्हणून स्वीकार केला. अर्थातच ती अभिमन्यूलाच वयाने जुळणारी होती. त्या विवाहाच्या निमित्ताने पांडवपक्षाचे अभिमानी व समर्थक असे सारे यादव व पांचाल वीर एकत्र जमले होते. विवाह आटोपल्यावर आता पांडवाना त्यांचे राज्य कसे परत मिळवून द्यावयाचे याचा विचार सुरू झाला. त्यानिमित्ताने झालेल्या चर्चा, विचारविनिमय, दूतांची देवेघेव, राजकारणाचे डावपेच यात काही महिन्यांचा काळ गेला. तो दोन्ही पक्षानी सैन्याची जमवाजमव व इतरांचे सहाय्य मिळवण्यासाठी वापरला. या दीर्घ राजकीय घडामोडींमध्ये बुद्धिकौशल्य, डावपेच, राजकारण याचे अनेक चित्तवेधक नमुने पहावयास मिळतात. यांचा आता तपशीलवार परामर्ष घ्यावयाचा आहे.
विराटाच्या दरबारातील चर्चेने या घडामोडीना सुरवात झाली. पांडवांचे वतीने प्रथम भाषण करून कृष्णाने त्यानी भोगलेल्या हाल अपेष्टांचे वर्णन केले व त्यानी स्वपराक्रमाने कौरवांच्या राज्यात जी इंद्रप्रस्थाची भर घातली ते राज्य परत मिळवण्यासाठी एखादा धर्मशील, कुलीन, दक्ष असा दूत कौरवांकडे पाठवावा असा प्रस्ताव मांडला. यावेळी कृष्णाने असा स्पष्ट दावा केला कीं पांडवानी वनवास व अज्ञातवासाची अट पुरी केली आहे. यावर, प्रचलित चांद्रवर्ष गणनेप्रमाणे तेरावे वर्ष पांडवानी पुरे केलेले नाही असे कोणी म्हटले नाही. बलरामाने मात्र दूत पाठवण्यास अनुमोदन दिले पण कौरवानी अन्याय केल्याचा आरोप धुडकावून लावला. द्यूताचे वेळी पांडवाच्या झालेल्या अपमानाना त्याने युधिष्ठिरालाच जबाबदार धरले कारण शकुनीसारख्या कुटिल द्यूतप्रवीणाशी तो स्वत:हून बेफामपणे द्यूत खेळला होता. यादववीर व अर्जुनाचा मित्र व शिष्य असलेल्या सात्यकीने प्रत्युत्तरात, अज्ञातवास पुरा झाल्याचे कौरवाना मान्य नाही याची दखल घेतली व अखेर युद्ध करावे लागेलच असे म्हटले. द्रुपदाने सात्यकीला अनुमोदन दिले व दुर्योधनाशी मृदु भाषणाचा उपयोग नाही तेव्हा सरळ सैन्य जमवण्यास सुरवात करावी व राजेलोकांकडे दूत पाठवून सहाय्य मागावे असा युद्धबेत सुचवला. मात्र उपचार पाळण्यासाठी स्वत:चा पुरोहित दूत म्हणून पाठवावा असे सुचवले. कृष्णाने दूताला काय कार्य सांगावयाचे ते द्रुपद व विराट यानी ठरवावे, सख्य न झाल्यास मग राजांकडे दूत पाठवावे, आम्हा यादवांचा दोन्ही पक्षांशी नातेसंबंध असल्यामुळे ( बलरामाची कन्या दुर्योधनाची सून होती) आमच्याकडे शेवटी यावे असा उपसंहार केला. आपण व बलराम यांच्यात मतभेद होऊन वितुष्ट येण्याची भीति एव्हाना कृष्णाला स्पष्ट दिसूं लागली होती व ते कृष्णाला टाळणे भाग होते त्यामुळे त्याने सुरवातीला थोडे दूर राहण्याचे ठरवले असे दिसते!
सख्य प्रयत्नातील पहिली पायरी म्हणून द्रुपदाने आपल्या पुरोहिताला कौरवांकडे पाठवले. त्याला त्याचे काम काय हे द्रुपदाने समजाविले. त्याने त्याला स्पष्टच सांगितले की कौरव पांडवांचे राज्य परत देण्याची मुळीच शक्यता नाही. तुझ्या बोलणी करण्यामुळे निदान काही कौरव योदध्यांचे मन आपल्या बाजूला वळवणे, भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा व दुर्योधन यांच्यात काही मतभेद निर्माण होणे, कौरवांच्या सैन्यसंघटनास बिलंब घडवणे हे तुझ्या जाण्याचे खरे हेतु आहेत! द्रुपदाची राजकीय परिपक्वता यात स्पष्ट दिसते. यापुढील घटना पुढील भागात पाहूंया.

3 comments:

Priyabhashini said...

अनुद्यूत म्हणजे काय?

Nile said...

mahabharatatil ithun pudhil bhag maza aavadata aahe. Ata krishnache khare samarthya disun yete. Raj-shistai, rajkaran, rajakiya paristhiti sagalyanche varnan yeu det.
dhanyavad.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

प्रथम द्यूत होऊन पांडव संपूर्ण हरले. द्रौपदीला पणाला लावले गेले व तिचे भयंकर अपमान झाले. नंतर धृतराष्ट्राने तिला वर देऊन पांडवाना मुक्त केले व नंतर हरलेले सर्व वैभवही परत दिले व निरोप दिला. पांडव परत जात असताना कौरवाना भीति वाटली की आता ते चालून येतील व अपमानाचा बदला घेतील. म्हणून निरोप पाठवून त्याना वाटेतूनच परत बोलावले गेले व एकच द्यूताचा डाव पुन्हा खेळला गेला. पण होता की हरणार्‍या पक्षाने बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासात काढावे व अज्ञातवासात असताना ओळखले गेल्यास पुन्हा बारा वर्षे वनवास सोसावा. या एका डावाच्या द्यूताला अनुद्यूत असे महाभारतात म्हटले आहे. माझे पूर्वीचे लेखही पहावे.