आतां महाभारतांतील दुसरे उपकथानक पाहूया. हे कथानक कच, देवयानी, ययाति व शर्मिष्ठा यांचे आहे. या कथानकाने खाडिलकरांचे विद्याहरण व शिरवाडकरांचे ययाति-देवयानी हीं दोन नाटके व वि. स, खांडेकरांची गाजलेली ययाति कादंबरी या तीन प्रमुख व सुपरिचित साहित्य कृतीना जन्म दिला आहे. या लेखकानी महाभारतातील मूळ कथेमध्ये मोठे फेरफार केलेले दिसून येत नाहीत. या साहित्यकृतींमुळे ही कथा सुपरिचित आहे. त्यामुळे मूळ कथेची तपशीलवार उजळणी न करतां मला जाणवलेल्या काही खास गोष्टींचाच उल्लेख करणार आहे.
देवगुरु बृहस्पति व दैत्यगुरु शुक्राचार्य यांचेतील स्पर्धा कच-देवयानीच्या प्रेमाच्या आड आली असे विद्याहरण नाटकावरून वाटते. ब्रह्नदेवाचे अंगिरस व भृगु हे दोन पुत्र. बृहस्पती हा अंगिरसपुत्र व कवि हा भृगुपुत्र. शुक्राचार्य हा भृगुपुत्र व कच हा बृहस्पतिपुत्र म्हणजे कच व शुक्र हे एकाच कुळातील व नात्याने भाऊ. त्यामुळे, कच व देवयानी यांचे काका-पुतणीचे नाते होते. हे नाते त्यांच्या विवाहाच्या आड आले काय? देवयानीची विवाहाची याचना नाकारताना मात्र कचाने हे कारण सांगितलेले नाही. कचाने देवयानीची अभिलाषा धरू नये असे शुक्राचार्याने कधीच म्हटले नाही. कच व देवयानी समवयस्क होतीं व देवयानीचे प्रेम कचालाही हवे होते. देवांनी कचाला शुक्राचार्याकडे पाठवले तेव्हा त्यांचाहि तोच हेतु होता की कचाला देवयानी व संजीवनी विद्या दोन्ही मिळवतां येतील! देवयानीचे कचावर खरेखुरे प्रेम होते. त्यापोटी पित्याला गळ घालून तिने कचाला वारंवार जिवंत करविले. अखेर दैत्यांच्या अविचारामुळे कचाची राख शुक्राचार्याच्या पोटात गेल्यामुळे त्याला जिवंत केले तर शुक्र मरणार असा पेच पडल्यावरहि तिने अगतिकपणे, मला तुम्हीहि हवेत व कचहि हवा असा हट्ट धरला. नाइलाजाने, इच्छेविरुद्ध, शुक्राचार्याला कचाला संजीवनी विद्या द्यावी लागली. जिवंत झालेल्या कचाने शुक्राचार्याला जिवंत केले. विद्याहरण नाटकात दाखवल्याप्रमाणे तो लगेचच देवलोकाला गेला नाही तर दीर्घकाळ शुक्रापाशी राहून तपाचरण केले असे महाभारत म्हणते. त्यानंतर तो देवलोकी जाण्यास निघाला तेव्हा देवयानीने, आपल्याला वरावे अशी त्याला विनंति केली ती त्याने नाकारली. तपाचरणाच्या काळात त्याने देवयानीबद्दलचे आकर्षण मनातून काढून टाकले असावे. संसार हा आपला मार्ग नाही व आपण देवयानीला सुखी करू शकणार नाही हे त्याने ओळखले होते. तिचा उतावळा व रागीट स्वभावहि त्याने जाणला असणार. शुक्राचार्याने मला पुनर्जन्म दिल्याने आपले भावाबहिणीचे नाते झाले आहे हे त्याने पुढे केलेले कारण खरे नव्हते. त्यांचे खरे नाते काका-पुतणीचे होते. कचाने नाकारल्यावर रागीट देवयानीने ’संजीवनी विद्या तुझ्या कामास येणार नाही’ असा त्याला शाप दिला. त्यामुळे त्याचे काहीच अडणार नव्हते. आवश्यक तर त्याने ती विद्या देवलोकी इतर कोणाला दिली असती! त्यानेहि तिला उलट शाप दिला की कोणीहि ब्राह्मण तुला वरणार नाही. पुढे ययाति हा क्षत्रिय पतिच तिला लाभला.
कचाची कथा हे एक रूपक असावे असे मला वाटते. गुरु-शुक्र हे ग्रह, कच हा गुरूचा उपग्रह, त्याचे मृत्यु व पुनर्जन्म म्हणजे त्याची ग्रहणे, एक ग्रहण खुद्द शुक्राच्या मागे (शुक्राच्या उदरात) गेल्यामुळे झालेले, तो शुक्राच्या पाठीमागून बाहेर पडताना प्रथम शुक्र तेजोहीन (मृत) व नंतर पुन्हा तेजस्वी (जिवंत) होणे असा काही खगोलशास्त्रीय प्रकार या कथेमध्ये रूपक रूपाने सांगितलेला असावा अशी माझी कल्पना आहे. याला आधार काहीहि नाही! गुरु,शुक्र हे ग्रह आहेत, देवयानी, शर्मिष्ठा, ययाति,वृषपर्वा हे सर्व तारे-तारका आहेत. कचाचा तारा नाही. यावरून दुसरा तर्क म्हणजे कच हा गुरूचा उपग्रह नसून एखादा धूमकेतू असावा! तो प्रथम गुरूजवळ (म्हणून गुरुपुत्र), मग शुक्राजवळ, दिसणे, नंतर शुक्रामागे जाऊन न दिसणे, मग पुन्हा दिसू लागणे व दीर्घकाळ शुक्राच्या जवळपास दिसून मग दिसेनासा होणे असा काही घटनाक्रम या कथेने सुचवला आहे काय अशी कल्पना मला सुचते! याहि कल्पनेला आधार नाहीच!
देवयानीच्या कथेचा उत्तरार्ध पुढील भागात पाहू.
महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
6 comments:
छान विवेचन लिहित रहा .
कच हा एक विचारी/तत्वद्न्य होता असे चित्र 'ययाति' मध्ये आहे. महाभारत त्या बद्दल काय म्हणते ?
मुळ महाभाराथामध्ये संजीवनी विद्या, कच्चे मरने व पुन्हा जिवंत होने यांचे इतकेच विस्तृत वर्णन आहे काय?
महाभारतातील कथेत, कच एकदा देवयानीला झिडकारून निघून गेल्यावर त्याचा देवयानीच्या आयुष्याशी काहीहि संबंध आलेला नाही. ययाति कादंबरीत खांडेकरानी स्वातंत्र्य घेतलेले आहे. कचाचे मरणे व जिवंत होणे याचे एवढेच वर्णन आहे. विद्याहरण नाटकात खाडिलकरानी नाटक सजवण्यासाठी पुष्कळ प्रसंग व पात्रे कल्पिलेली आहेत. मी मूळ कथेचाच विचार प्रामुख्याने केला आहे.
विवेचन नेहमीप्रमाणे उत्तम. फक्त कच-देवयानीतील काका पुतणीचे नाते समजले नाही. अंगीरस आणि भृगु हे सख्खे भाऊ. त्यांची मुले बृहस्पती आणि शुक्राचार्य हे चुलत भाऊ या नात्याने कच-देवयानी ही एकमेकांची चुलत चुलत भावंडे (सेकंड कझिन्स) व्हायला हवीत. असो, अनेक संस्कृतीत भावंडांची लग्ने करण्याची प्रथा दिसून येते. भारतीय संस्कृतीत असे घडतानाही दिसून आले आहे त्यामुळे कचाने देवयानीला झिडकारण्याचे कारण ती त्याची बहिण असावी हे नाही हे मान्य.
शुक्राचार्य हा भृगुचा पुत्र नव्हे. भृगुचा पुत्र कवि व कविचा पुत्र शुक्र. आपण कवीला विसरल्यामुळे थोडा घोटाळा झाला! आता कळले ना की कच व देवयानीचे नाते काय होते?
कॉमेंट १
खांडेकरांनी त्यांच्या कादंबरीच्या प्रस्तावनेत स्पष्टच म्हंटले आहे, की कादंबरीतील व्यक्तीरेखा (विशेषतः देवयानी) ह्या महाभारतातील व्यक्तीरेखांपेक्षा त्यांनी वेगळ्या रंगवलेल्या आहेत व तसे लेखनस्वातंत्र्य त्यांनी घेतले आहे. नाटकाबाबतीतही तसेच म्हणता येईल.
मूळ महाभारतातील देवयानी हट्टी आहे, पण संतापी, क्रोधी, गर्विष्ठ स्वभावाची नाही. तिचे कचावर मनापासून प्रेम होते आणि त्यासाठीच तो मरण पावल्यानंतर शुक्राचार्यांच्या पोटात असतांनाही त्याला जिवंत करण्याचा आग्रह तिने धरला.
तत्कालिन स्त्रियांवर एक दृष्टीक्षेप टाकला असता असे दिसून येते, की रामाबरोबर सीताही हट्ट करून वनवासाला गेली. स्वतःच्या पतीचे प्राण वाचवण्य़ासाठी सावित्री मृत्युचे भय दाखवणार्या यमापाठोपाठ गेली. एकंदरीत पतीसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याची व त्यासाठी कोणताही त्याग करण्याची तत्कालीन स्त्रियांची रीत होती. देवयानीनेही त्याच रीतीने कचाला (ज्याला ती आपला भावी पती मानत होती) जिवंत करण्यासाठी पित्याचे तात्पुरते मरणही दृष्टीआड केले.
मात्र कचाने मरणाआधी किंवा पुनर्जन्मानंतरही देवयानीशी विवाह करण्याबद्दल त्याच्या काय भावना आहेत हे कधीही स्वतःहून स्पष्ट केले नाही. कदाचित त्याचे देवयानीवर प्रेम नसेलही पण संजीवनी विद्या मिळवण्यासाठी त्याने देवयानीच्या प्रेमाचा वापर केला असे म्हणता येईल. देवयानीने अनेक प्रसंगात त्याच्यावरील प्रेम उघडपणे व्यक्त केलेले आढळते, पण त्यावेळी कचाने सोयिस्कर मौन पाळलेले दिसते. किंवा देवदैत्यांच्या आपापसातील राजकारणामुळे त्या दोघांचा विवाह यशस्वी होणार नाही असे वाटल्यामुळे त्याने विवाहाला नकार दिला असावा, पण हीच गोष्ट तो आधीही सांगू शकला असता. पण तसे न करता त्याने देवयानीच्या विशुद्ध प्रेमाची फ़सवणूक केली आहे, असेच म्हणावे लागते. त्याकाळात एकूणच लोकसंख्या कमी असल्याने नात्यांमध्येही सर्रास विवाह होत होते, त्यामुळे नात्याचे कारणही तकलादू वाटते.
कच निघून गेल्यानंतर शुक्राचार्य आणि दैत्य यांच्यात दुरावा निर्माण व्हावा म्हणून इंद्राने वायूच्या मदतीने देवयानी व शर्मिष्ठा स्नान करत असतांना त्यांच्या वस्त्रांची जाणीवपूर्वक सरमिसळ करून त्यांच्यात भांडण लावून दिले. शर्मिष्ठेने चुकून देवयानीची वस्त्रे धारण केलीच, पण देवयानीने तिची झालेली चूक लक्षात आणून दिल्यावर, "इतकी मौल्यवान वस्त्रे तुझ्यासारख्या एका दैत्यराजाच्या आश्रयाने राहणार्या ब्राह्मणाच्या कन्येकडे कुठून येणार?" असा अपमानास्पद प्रश्न विचारून देवयानीला विहिरीत ढकलून दिले. वास्तविक शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येच्या आधारामुळेच वृषपर्वा राजाचे राज्य सुखरूप चालू होते. त्यावरून हे स्पष्टच दिसते, की शर्मिष्ठा ही राजकुमारी असल्याने तीच जास्त अहंकारी, क्रोधी व गर्विष्ठ होती.
देवयानीला विहिरीतून बाहेर काढणार्या ययातीचे देवयानीवर प्रेम नव्हते, पण शर्मिष्ठेने केलेल्या अपमानामुळे व कदाचित शर्मिष्ठेवर मात करण्याच्या इर्ष्येने तिने ययातीला विवाहाबद्दल विचारले. तसेच शुक्राचार्यांतर्फ़े दबाव आणून तिने शर्मिष्ठेला दासी बनवले ते केवळ तिला "शुक्राचार्यांमुळेच दैत्यराज्य सुरक्षित आहे. म्हणूनच शुक्राचार्य व देवयानीला योग्य सन्मानाने वागवले जावे," हा धडा देण्यासाठीच!
नंतरही देवयानीने तिला कधी अपमानस्पद वागवले नाही किंवा ययातीने शर्मिष्ठेशी विवाह केला आहे हे समजल्यानंतरही तिने शर्मिष्ठेला ययातीच्या जीवनातून हाकलण्याचा प्रयत्न केल नाही. पण हा विवाह करतांनाही शर्मिष्ठेने तिला दुसर्यांदा फ़सवून, अंधारात ठेवून विवाह करून तिचा विश्वासघात केला होताच. पण ययातीनेही देवयानीला अंधारात ठेवून हा विवाह केला होता. शर्मिष्ठेला तीन पुत्र होते याचाच अर्थ राजाचा कल तिच्याकडे जास्त होता. पुन्हा एकदा फ़सवणूक करून शर्मिष्ठा देवयानीच्या दोन पुत्रांकडून राजगादी हिसकावून घेऊ शकत होती. हा संभाव्य धोका ओळखूनच देवयानीने शुक्राचार्यांकडे धाव घेतली होती. देवयानीला पतीचे प्रेमही हवे होते आणि पुत्रांचे अधिकारही सुरक्षित ठेवायचे होते.
म्हणूनच शुक्राचार्यांनी दिलेल्या शापानंतर देवयानीने ययातीसाठी त्यांच्याकडे क्षमायाचना केली, शर्मिष्ठेने नव्हे! शर्मिष्ठापुत्र पुरूने तारूण्य दिल्य़ाच्या बदल्यात जरी ययातीने त्याच्याकडे राजगादी सोपवली होती, तरी ती देण्यापूर्वी त्याला त्याच्या "यदु," "द्रुह्यु," "अनु," तुर्वसु" या चारही पुत्रांना राज्याच्या इतर भागाचे स्वतंत्र राज्य देऊन राज्य़ाची वाटणी करावी लागली होती. देवयानीने धोरणीपणे शुक्राचार्यांकडे धाव घेतल्यामुळेच तिच्या पुत्रांचा किमान हक्क सुरक्षित राहिल होता व शर्मिष्ठा तो हिसकावून घेऊ शकली नाही.
पुढे वाचा कॉमेंट २...
कॉमेंट २ ...कॉमेंट १ वरून पुढे वाचावे....
जसा शर्मिष्ठापुत्र पुरू याचा वंश "पौरव वंश" म्हणून प्रसिद्ध झाला व त्या वंशात पुढे कौरव पांडवांचा जन्म झाला, तसाच देवयानीचा ज्येष्ठ पुत्र यदु याचा वंश "यादव वंश" म्हणून प्रसिद्ध झाला व त्याच वंशात श्रीकृष्णाचा जन्म झाला.
तर अशा प्रकारे महाभारतातील मूळ कथा ही खांडेकरांच्या कादंबरीपेक्षा व खाडिलकरांच्य़ा नाटकापेक्षा खूपच वेगळी आहे.
Post a Comment