आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Sunday, August 31, 2008

जयद्रथवध - भाग ६

सर्व संरक्षकाना वारंवार हरवून व सैन्यसंहार करून अखेर अर्जुनाने जयद्रथाला गाठलेच. त्याने जयद्रथाचा सारथी मारला व ध्वज तोडला. तोंवर पुन्हा संरक्षकानी त्याला मध्ये घेऊन अर्जुनाला अडवले. अर्जुनाने कृप, कर्ण, शल्य, दुर्योधन या सर्वांवर बाणवृष्टि करून व जखमी करून पुन्हा जयद्रथाला गाठले. अखेर सर्व संरक्षकाना दाद न देतां त्याने जयद्रथाला ठार केले. हा वेळ पर्यंत संध्याकाळ झाली होती व सूर्य आहे कीं अस्ताला गेला हे कळत नव्हते. मात्र कृष्णाने अर्जुनाला बजावून सांगितले होते की तूं सूर्याकडे न पाहातां जयद्रथ तावडीत सापडला कीं त्याला मार. त्याप्रमाणे अर्जुनाने जयद्रथवध केल्यावर नंतर पुन्हा सूर्य स्पष्ट दिसूं लागला. त्यामुळे अर्जुनाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली याबद्दल शंकेला जागाच उरली नाही. त्यानंतरही प्रत्यक्ष सूर्यास्त होईपर्यंत अर्जुन विरुद्ध कृप/अश्व्त्थामा व सात्यकी विरुद्ध कर्ण अशी युद्धे काही काळ चालूच राहिलीं.
सूर्य काही काळ स्पष्ट न दिसणे व नंतर पुन्हा दिसू लागणे या नैसर्गिक घटना आहेत व त्याचे कर्तृत्व कृष्णाला देण्याचे काहीच कारण नाही. कृष्णाने योगमायेने सूर्य काही काळ अदृश्य केला अशी समजूत आहे त्याला काहीहि आधार नाही. महाभारतात तसे म्हटले आहे हे खरे पण तो मजकूर, कृष्णाला देवाचा अवतार मानू लागल्यानंतर, त्याचे महत्व वाढविण्यासाठी, मागाहून घुसडलेला स्प्ष्ट दिसून येतो. ते विशिष्ट श्लोक गाळले तर कोठेहि तुट्कपणा जाणवत नाही. सूर्य दिसत नव्हता असे अर्जुनाने वा कौरवपक्षाच्या कोणीहि म्हटलेले नाही. खुद्द जयद्रथही अखेरपर्यंत शर्थीने लढतच होता पण त्याचा अर्जुनापुढे टिकाव लागला नाही. ’हा सूर्य व हा जयद्रथ’ असे कृष्णाने म्हटले व मग अर्जुनाने समोर असलेल्या बेसावध जयद्रथाला मारले हे मुळीच खरे नाही. ती हरदासी कथाच! सूर्यास्ताला अजून काही काळ बाकी आहे याचा हिशेब कृष्णाने मनाशी बरोबर ठेवला होता व अर्जुनाचे चित्त त्याने विचलित होऊं दिले नाही हे खरे. ’सूर्य अस्ताला जाण्याची वेळ आली आहे तेव्हा आता वेळ न घालवता जयद्रथाला मार’ असे त्याने अखेरच्या क्षणी अर्जुनाला म्हटले व अर्जुनाने लगेच जयद्रथवध केला.
सूर्यास्त झाला व अर्जुनाची प्रतिज्ञा फोल झाली अशा समजुतीने कौरवांकडून जयद्रथाच्या रक्षणाच्या प्रयत्नात शिथिलता आली असे बिलकुल झाले नाही वा तसा दावा वा कांगावाही कौरवांकडील कोणी केला नाही. अखेरपर्यंत अर्जुनाला जोराचा प्रतिकार होतच होता व तो मोडूनच त्याला यश मिळाले. दिवसभर शर्थीचे प्रयत्न करूनहि सगळे संरक्षक अर्जुनापुढे टिकले नाहीत हेंच खरे. अर्जुनाचा स्वबळावरचा विश्वास सार्थ ठरला व कृष्णावर स्वत:ची प्रतिज्ञा मोडून युद्धात उतरण्याची वेळ आली नाही. अर्जुनाने दिवसभर केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाचे यश कृष्णाच्या पदरात घालण्याचे काहीच कारण नाही. त्याने दिवसभर उत्तम सारथ्य करून अर्जुनाला जयद्रथापर्यंत नेले हे त्याचे कार्य थोडे नव्हे! कृष्णाची खरी थोरवी, त्याने डोळसपणे जो, वेळ आली तर, युद्धात स्वत: उतरण्याचा निर्णय घेतला होता व सारथी दारुकाला दिवसभर आपल्या मागे रहावयास सांगितले होते, त्यात आहे. रथ तयारच होता व अखेरच्या पर्वात त्याचा उपयोग रथहीन झालेल्या सात्यकीला झाला.
जयद्रथवधामुळे दुर्योधन फार नाउमेद झाला. या एका दिवसात, अर्जुन, सात्यकी व भीम यानी सात अक्षौहिणी सैन्य मारले. (अ. १५०, श्लोक १४-१६) यातील अतिशयोक्ति सोडली तरी कौरवांचे सैन्यबळ हटले हे खरे. दुर्योधनाची खात्री पटली कीं आपल्या पक्षातील कोणीहि वीर अर्जुनाच्या तोडीचा नाही. दिवसभरात भीमाने व सात्यकीनेहि वारंवार कर्णाला हारविले त्यामुळे दुर्योधनाचा त्याच्यावरील विश्वासहि डळमळू लागला. यापुढील युद्धात द्रोण व कर्ण यानीहि पांडवसैन्य मोठ्या प्रमाणावर मारले पण सुरवातील ११ विरुद्ध ७ असे असलेले विषम प्रमाण या दिवशी जे उलट झाले व ते पुढे कायमच कौरवाना प्रतिकूल राहिले.
युधिष्ठिराने जिवाची पर्वा न करतां सात्यकी व भीम यांना अर्जुनाच्या मदतीला पाठवले तेहि निर्णायक क्षण होते. द्रोणानेहि कबुली दिली कीं दिवसभर अर्जुन आणि बराच काळ सात्यकी व भीम नसूनहि त्याला धृष्टद्युम्न व इतर पांचालांचा निर्णायक पराभव करता आला नाही व युधिष्ठिराला पकडता आले नाही. ’आता आपली धृष्टद्युम्नापासून सुटका नाही’ असे द्रोणाने म्हटले. (अ. १५१ श्लोक २४-२६). जयद्रथाला वाचवणे व युधिष्ठिराला पकडणे हे या दिवसाचे दोनही युद्धहेतु विफल झाले.
अशा प्रकारे कौरवांनी केलेला अभिमन्यूचा वध त्याना फार महागात पडला. एक दिवस अर्जुनाला अडवून धरले व जयद्रथाला वाचवले तर विजय आपलाच आहे अशी त्याना वाटलेली आशा फोल ठरली व येथून पुढे हे युद्ध पूर्णपणे त्यांचेविरुद्ध गेले.
एक काल्पनिक प्रश्न असा की दुर्दैवाने सूर्य अस्ताला जाईपर्यंत जयद्रथवध झाला नसता तर काय झाले असते? माझ्या मते, कृष्णाने अर्जुनाला ताबडतोब अग्निकाष्ठे भक्षण करू दिली नसतीं. ’तुझे युद्ध तू पूर्ण कर, सर्व कौरवांचा संहार तूं व भीम पुरा करा व मग पाहूं’ असा निर्वाणीचा सल्ला दिला असता व अर्जुनाने ऐकलेच नसते तर मात्र त्याची जागा स्वत: नक्कीच घेतली असती पण कौरवांना विजयी होऊ दिले नसते! त्याच्या प्रतिमेशी हे सुसंगत आहे.
हा विषय आता संपला. नवीन विषय पुढील लेखापासून सुरू होईल. वाचत रहा. धन्यवाद.

6 comments:

Unknown said...

इतर लेखांप्रमाणे खूपच सुंदर लेख. फक्त एक प्रश्न आहे. काही ठिकाणी सूर्य ग्रहणचा उल्लेख आहे. ग्रहण मोक्षा नंतर जयद्रथवध झाला. कृपया ह्या विषयी आपले काय मत आहे ते लिहावे. धन्यवाद.

आकाश

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

या दिवशी सूर्यग्रहण असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारतीय युद्ध कृष्णाने कौरवांना दिलेल्या निरोपाप्रमाणे कार्तिक अमावास्येला सुरू झाले. या दिवसापर्यंत महिना पुरा होऊन अमावास्या आलेली नव्हती. सूर्यग्रहण फक्त अमावास्येलाच येते हे आपणास माहीत असेलच. ग्रहण, कृष्णाची माया ह्या सर्व हरदासी कथा आहेत.

vijay said...

Nice description.Can you give me name of book which you use to write this blog.. Thanks in advance.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

माझे महाभारताचे वाचन, विदर्भ-मराठवाडा प्रकाशन कंपनीने प्रसिद्ध केलेल्या भाषांतर खडांपुरतेच सीमित आहे. हे विद्वान व्यक्तीनी केलेले भाषांतर विस्तृत व मेहेनत घेऊन केलेले आहे.

Who Cares said...

Nice blog on Mahabharata.
I appreciate your effort.
Keep writing blog.

Feelings.... said...

Kaka, tumhi mhanta tya pramane, jar Suryasatadhi Arjun vadh karu shakla nasta, tari hi tya tun Krishna ni kahi tari marg/ yuktivad nakkich shodhun kadhla asta.. karan Sambhashan Chatury he tar Krishnache kaushaly hotech..ase mala vatate..