आदल्या दिवशी प्रचंड हानि होऊनहि या दिवशी पुन्हा एकदा त्रिगर्तांनी अर्जुनाला आव्हान दिले व यावेळी मात्र त्याला दिवसभर अडवून ठेवण्यात यशस्वी झाले. सर्व भारतीय युद्धाच्या वर्णनात अर्जुनाच्या अनेक पराक्रमांचे खुलासेवार वर्णन आहे. आदल्या दिवशी त्रिगर्तांचे अर्जुनाने केलेले हाल तसेच खुलासेवार वर्णिले आहेत. या दिवशीचे त्रिगर्त-अर्जुन युद्धवर्णन मात्र अतिशय त्रोटक आहे. हे एक नवल आहे. प्रत्यक्षांत अर्जुन या दिवशी थकव्यामुळे वा जखमांमुळे युद्धापासून दूरच राहिला होता कीं काय अशी मला शंका आहे! दुसरे नवल म्हणजे या दिवशी अर्जुन मुख्य युद्धापासून दूर असूनहि द्रोणाने युधिष्ठिराला पकडण्याचा प्रयत्न केलाच नाही! त्याने सैन्याचा चक्रव्यूह रचला. तो खरेतर बचावात्मक व्यूह होता. आक्रमण करण्यास अत्यंत कठीण असेच त्याचे वर्णन केलेले आहे. तो कसा तोडावा हे अर्जुन सोडून इतर कोणाला माहीत नव्हते. अर्जुनाशिवाय जो कोणी या व्यूहावर आक्रमण करील तो मारला जाईल ही द्रोणाची अपेक्षा असावी. त्यानुसारच त्यांची एकातरी प्रमुख वीराला मारण्याची प्रतिज्ञा होती. मात्र अर्धवट ज्ञानावर अभिमन्यूने प्रयत्न केला व व्यूह तोडल्यावर तो फारच अनावर झाला. एकटा असूनहि दिवसभर त्याने अतुल पराक्रम केला व कौरवसैन्याची अपरिमित हानि झाली. अनेक वीर मारले गेले. दिवस अखेरीला द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा, बृहत्बल व कृतवर्मा या सर्वांनी एकत्र येऊन त्याला घेरण्यात व त्याचे धनुष्य तोडण्यात यश मिळवले व मग कसाबसा त्याचा वध केला व सुटकेचा निश्वास टाकला! प्रत्यक्ष म्रूत्यु मात्र दु:शासनपुत्राबरोबर गदायुद्ध करताना झाला. व्यूहांत अभिमन्यु एकाकी पडण्याचे कारण असे की त्याने मोकळी करून दिलेल्या वाटेने व्यूहात शिरूं पाहणार्या सात्यकी, भीम व इतर पांडव वीरांना जयद्रथाने दिवसभर अडवून ठेवले. महाभारतामध्ये याचा खुलासा, एक दिवस अर्जुन सोडून इतर पांडवांना तू अजिंक्य होशील असा शंकराकडून त्याला वर मिळाला होता असा केला आहे. तेव्हां हा जयद्रथाचा दिवस होता असे म्हणावे लागते. मात्र अभिमन्यूच्या वधात त्याचा प्रत्यक्ष सहभाग मुळीच नव्हता. मृत्युमुखीं पडलेल्या अभिमन्यूला त्याने लाथ मारली अशी एक हरदासी कथा आहे पण त्याला महाभारतात आधार मुळीच नाही. एकूण या दिवसाचे लक्ष्य, युधिष्ठिराला पकडणे असे न राहता अभिमन्यूला मारणे हे ठरले व त्यांत मात्र कौरव यशस्वी झाले. त्याची भयंकर किंमत त्याना दुसरे दिवशी मोजावी लागली!
अभिमन्यूच्या मृत्यूबरोबरच या दिवशीचे युद्ध संपले. अर्जुन परत आल्यावर त्याला झालेला प्रकार समजला. अभिमन्यूला संरक्षण न दिल्याबद्दल त्याने सर्व पांडववीरांना दोष दिला. जयद्र्थाने सर्वांना अडवले असे कळल्यावर झाल्या अनर्थाला जयद्रथच व्यक्तिश: जबाबदार आहे असे ठरवून, उद्यां सूर्यास्तापूर्वी जर मी जयद्रथाला मारले नाही तर मी अग्निकाष्टे भक्षण करीन अशी घोर प्रतिज्ञा अर्जुनाने अचानक केली. पांडवपक्षाला ही प्रतिज्ञा अडचणीत टाकणारी होती. अर्जुनाने कृष्णाशी वा इतर पांडववीरांशी सल्लामसलतही केली नाही. रागाच्या भरात केलेल्या या प्रतिज्ञेचे युद्धावर फार निर्णायक परिणाम झाले. याबद्दल पुढील भागात सविस्तर वाचा!
महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
No comments:
Post a Comment