आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Sunday, August 3, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ७

दुर्योधनाच्या या जबाबानंतर कृष्णाचाहि तोल सुटला व त्याने रागारागाने त्याला त्याच्या सर्व कुटिल कृत्यांची यादी ऐकविली व ’तुझे मातापिता व सर्व हितकर्ते तुला शम करावयास सांगत असून तू शम करूं इच्छित नाहीस तर मग तुला हवी असलेली वीरगति तुला लवकरच मिळेल’ अशी तंबी दिली. दु:शासन त्यावर दुर्योधनाला म्हणाला कीं ’तूं सख्य न करशील तर तूं, मी व कर्ण यांना बांधून भीष्म, द्रोण व धृतराष्ट्र पांडवांचे स्वाधीन करतील असा रंग दिसतो आहे.’ यावर क्रुद्ध होऊन दुर्योधन व त्याचे समर्थक सभा सोडून गेले. भीष्म यावर कृष्णाला म्हणाला कीं हे सर्व लोक कालवश झालेले दिसतात. हें ऐकून, क्रुद्ध होऊन, कृष्ण भीष्मद्रोणांचीहि निंदा करून म्हणाला कीं दुर्योधनाला तुम्ही थोपवत नाही हा तुम्हा कुरुवृद्धांचा अपराध आहे. आम्ही यादवानी जुलमी कंसाला मारून, उग्रसेनाला पुन्हा सत्तेवर आणले, आता आम्ही सर्व यादव सुखात आहोत. कुळाच्या हितासाठी (कु)पुत्राचा त्याग करणेच योग्य होय. यावर धृतराष्ट्राने विदुराकरवी दुर्योधनाला परत बोलावले व गांधारीकडून त्याला उपदेश करविला. तिने सांगितले की ’परस्परांतील भेदाला भिऊनच भीष्म, युझा पिता व बाल्हीक यानी पांडवाना राज्यभाग दिला होता. तुला अर्धे राज्य पुरेसे आहे. मूर्खा, तुला दिसत नाही का की भीष्म, द्रोण व कृप सर्व शक्तीनिशी तुझ्यातर्फे लढणार नाहीत? तुझा व पांडवांचा राज्यावर सारखाच हक्क आहे हे ते जाणतात.’
पालथ्या घड्यावर पाणी पडून, उलट, दुर्योधनाने शकुनीबरोबर कॄष्णालाच पकडण्याची चर्चा चालवली! ते लक्षांत येताच सात्यकी व कृतवर्मा बाहेर गेले व त्यानी सैन्य सज्ज केले. सात्यकीने परत येऊन कृष्णालाहि सावध केले. कृष्णाने धृतराष्ट्राला म्हटले की दुर्योधनाला खुशाल मला पकडण्याचा प्रयत्न करूं दे!. धृतराष्ट्राने पुन्हा दुर्योधनाला बोलावून उपदेश केला कीं हे बरे नाही. कृष्णाने त्याला सरळ दम दिला कीं तूं मला पकडण्य़ाचा प्रयत्न करच व मग माझा प्रताप पहा! कृष्णाने यावेळी विश्वरूप दर्शन दाखवले काय? हा श्रद्धेचा भाग आहे. महाभारत तसे म्हणते. माझ्या मते त्याची आवश्यकताच नव्हती. सात्यकी, कृतवर्मा यांची तयारी व कृष्णाचा आविर्भाव पाहून दुर्योधनाला वेळीच भान आले की आपला बेत तर सफळ होणार नाहीच पण उलट कृष्ण उघडच पांडवांच्या वतीने युद्धाला उभा रहावयास मोकळा होईल. बलरामहि मग त्याला थांबवू शकणार नाही. हे जाणून त्याने आपला बेत सोडून दिला.
धृतराष्ट्राने कृष्णापाशी सरळच कबूल केले कीं माझी दुर्योधनावर सत्ता चालत नाही. यावर बोलण्यासारखे काही न उरल्यामुळे कृष्णाने भीष्म-द्रोणाना म्हटले की धृतराष्ट्र काय म्हणाला ते तुम्ही ऐकले आहे. आता मी तुमचा निरोप घेऊन परत जातो. माझे प्रयत्न हरले. त्यानंतर सात्यकी व कृतवर्मा यांच्यासह बाहेर पडून तो कुंतीकडे गेला.
कृष्णशिष्टाई अशा प्रकारे असफळ झाली. मात्र पांडवांचा व कृष्णाचा आपणावर बोल येऊ नये हा उद्देश सफळ झाला.
यानंतर प्रत्यक्ष युद्धापूर्वी दोन महत्वाच्या घटना घडल्या त्यांबद्दल पुढील भागात.

2 comments:

Priyabhashini said...

महाभारतात इतरत्र कृष्णाचे वर्णन कसे येते? हा प्रश्न विचारायचे कारण असे की - महाभारतात सर्वत्र कृष्णाचे वर्णन मानवी वाटते का दैवी? वाल्मिकिंचा राम हा मानवी आहे तर तुलसीदासाचा दैवी. जयचे महाभारत होताना कृष्ण दैवी होत गेला आणि त्याचा परिपाक म्हणून विश्वरूप दर्शन झाले असे काही असावे का?

असो, युद्धापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे वाचण्यास उत्सुक आहे.

हातात माईक घेतलेला आपला फोटो पाहिला. महाभारतावर काही कार्यक्रम वगैरेही करता का तुम्ही?

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

माझे मत असेच आहे की जय चे महाभारत होईपर्यंत कृष्णाला अवतार मानले जाऊ लागल्यामुळे, विश्वरूपदर्शनासारखे प्रसंग मागाहून घातले गेले आहेत. पण हा श्रद्धेचा विषय आहे.
मी महाभारतातील जे विषय या ब्लॉगच्या माध्यमातून मांडतो आहे त्या विषयांवर मी ’सोबती’ या ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या साप्ताहिक कार्यक्रमात व क्वचित इतरत्रहि व्याख्याने दिली आहेत व अजूनहि देण्याची इच्छा आहे!. व्याख्यानांच्या आधारभूत लेखांचा एक छोटासा संग्रहहि छापून (अर्थात स्वखर्चाने) मित्रांस वाटला आहे. माझ्या मुलाने तेव्हा सुचवले होते की माझे हे लेखन एखाद्या वेबसाइट वर ठेवले जावे. काही वर्षांनंतर, मराठी ब्लॉगच्या स्वरूपात, ते मला साध्य झाले व वाचकाना ते आवडत आहे याचे मला समाधान आहे.