आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Tuesday, August 5, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ८

कौरव दरबारातील सर्व प्रयत्न असफल झाल्यावर पांडवांकडे परत जाण्यापूर्वी कृष्णाने दुसरे दिवशी सकाळी कर्णाची एकांतात भेट घेतली. त्यावेळी त्याने कर्णाला तूं कुंतीपुत्र या नात्याने पांडवांचाच वडील भाऊ आहेस असे सांगितले. त्यांचेविरुद्ध तू दुर्योधनाची बाजू घेणे उचित नाही. पांडव सत्य कळल्यावर तुला वडील भावाचा सर्व सन्मान देतील, तू दुर्योधनाची बाजू सोडलीस तर अजूनहि शम होईल व पांडवाना मिळणार्‍या राज्यभागाचा तूच मालक होशील, द्रौपदी ही सर्व पांडवांची पत्नी या नात्याने तुझीहि पत्नी होईल असे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व जन्म सूतपुत्र म्हणून काढल्यावर आता मला यातून काय मिळणार? दुर्योधनाने मला सर्व सन्मान, वैभव दिले आहे. त्याची बाजू अशी आयत्या वेळी मी सोडली तर ती अर्जुनाला भिऊन, असेच सर्व जग म्हणेल व माझी छीथू होईल. आता वेळ गेली आहे व मला असे करणे मुळीच उचित नाही असे म्हणून कृष्णाच्या सूचनेला त्याने स्पष्ट नकार दिला. तेव्हा कृष्णाने नाइलाज होऊन त्याचेजवळ दुर्योधनाला निरोप दिला की आजपासून सात दिवसानी कार्तिक अमावास्या आहे त्या दिवशी कुरुक्षेत्रावर आपली रणांगणावर गाठ पडू द्या. त्यानंतर कृष्ण रथात बसून सरळ उपप्लव्याला पांडवांकडे गेला.दुसरी महत्वाची घटना म्हणजे कृष्ण परत गेला व अमावास्येला युद्ध सुरू करण्याचे ठरले असे कळल्यावर खुद्द कुंतीने भल्या सकाळी सूर्याला अर्घ्य देत असताना कर्णाला गाठून ’तू माझाच पुत्र आहेस व पांडवांचा वडील भाऊ आहेस तेव्हा त्यांच्या विरुद्ध जाऊ नको असे विनवले. कर्णाने तिलाही स्पष्ट नकारच दिला. फक्त एकच गोष्ट कबूल केली कीं ’मी अर्जुन सोडून इतर चारांशी लढताना त्यांचा वध करणार नाही. माझे व अर्जुनाचे युद्ध मात्र अटळ आहे व आमच्यापैकी कोणीहि एक जगला तरी तुझे पांच पुत्र जिवंत राहतील.’ कुंतीला एवढ्याच आश्वासनावर समाधान मानावे लागले.या दोन घटनांमध्ये कर्णाचे वर्तन धीरोदात्त झाले असे म्हणावे लागते. कृष्ण वा कुंती दोघानीहि कर्णाचा खरा पिता कोण हे सांगितले नाही. सूर्यापासून जन्म याचेवर श्रद्धा असेल तर प्रश्न उरत नाही पण सर्व कथा माणसांची आहे व माणसापासूनच सर्वांचे जन्म आहेत हे मान्य केले तर हा प्रश्न उरतो. कर्णाचा खरा पिता ब्राह्मण वा क्षत्रिय असता तर ते यावेळी सांगावयास प्रत्यवाय नव्हता. त्यामुळे माझ्यामते कर्ण हा (बहुधा) खरोखर सूतपुत्रच असावा! याबद्दल मी कर्णावर लेखन करीन तेव्हा जास्त विस्ताराने लिहिणार आहे. दुसरी नवलाची गोष्ट म्हणजे कर्ण हा कुंतीपुत्र आहे हे कृष्णाला कसे माहीत होते? तो देवाचा अवतार तेव्हा त्याला सर्वच ज्ञात असे मानले तर प्रश्न उरत नाही! पण तो मानवच असे मानणारांसाठी शंका उरते! माझे मते शिष्टाई असफल होऊन कृष्ण विदुराकडे परत आला व कुंतीला भेटून तिला सर्व हकीगत सांगितली तेव्हा पुत्रस्नेहाने कुंतीनेच आपले एवढा दीर्घकाळ जपलेले गुपित स्वत:च कृष्णाला सांगून ’तू हे कर्णाला सांग व त्याला वळवण्याचा अखेरचा प्रयत्न कर’ असे म्हटले असले पाहिजे. तो प्रयत्नहि असफळ झाला व युद्ध होणार हे कळल्यावर मात्र सर्व भीडभाड बाजूला ठेवून तिने स्वत:च कर्णाला भेटून व त्याचे जन्मरहस्य स्वमुखाने सांगून अखेरची विनवणी केली. तीहि असफळ झाली ते एकप्रकारे अटळच होते.अशा प्रकारे सर्व प्रयत्न संपून अखेर कौरव-पांडवाची गाठ नियतीने ठरवल्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर पडली. कृष्णशिष्टाईची कथा येथे संपली. या प्रकरणामध्ये कॄष्णाचे मानवी पातळीवरील सर्व अलौकिक गुण प्रगट झालेले दिसून येतात. त्याला अवतार मानण्याची मला त्यामुळेच गरज वाटत नाही! तो एक थोर व आदर्श मानव म्हणूनच आपल्याला प्रिय व्हावा हेच योग्य.

5 comments:

Priyabhashini said...

वाह! कर्ण सूतपुत्रच असल्याबद्दल तुमची मीमांसा वाचायला आवडेल परंतु कर्णाचे वर्णन ज्याप्रकारे येते त्याप्रकारे तो सूतपुत्र असावा का हा प्रश्न पडतो. परशुरामांनाही तो ब्राह्मण असल्याबद्दल सहज धोका देऊ शकला.

परंतु, कर्ण-पांडव हे देवपुत्र नाहीत याबद्दल शंका नाही. धर्मराज हा विदुरपुत्र असल्याची शंका माझ्यामते इरावती कर्व्यांनी युगांतात व्यक्त केली आहे. भागवत पुराणात विदूर हा यमाचा अवतार असल्याचे म्हटले आहे तर युधिष्ठीर हा यमपुत्र. कुठेतरी सांगड घालता येते असे वाटते.

पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

अमावास्येचा मुहुर्त युद्धासाठी का निवडला याचे काही कारण आहे का?

P. K. Phadnis said...

पांडव वा कर्ण हे देवपुत्र नाहीत हे मान्य केले म्हणजे मग युधिष्ठिर हा यमपुत्र मानण्याचे कारण नाही. विदुर हा यमाचा अवतार एवढ्यावरूनच इरावतीनी त्याला युधिष्ठिराचा पिता ठरवलेले दिसते. माझ्या पांडव-विवाहाच्या लेखनात पांडवांच्या पितृत्वाबद्दलचे माझे अनुमान विस्ताराने दिले आहे. ते अवश्य पहावे.
अमावास्याच मुद्दामहून निवडली असे दिसत नाही. त्या सात दिवसात सैन्याच्या हालचाली सुरू करण्यासाठी अनुकूल असे पुष्य़ नक्षत्र येत होते. त्याचा फायदा दोन्ही पक्षानी हवातर घ्यावा येवढाच हेतु मला दिसतो. त्याप्रमाणे त्यानी केलेहि.
कर्णाबद्दल सविस्तर खुलासा पुढे वाचावयास मिळेल.(तोवर माझे लेखन वाचण्याचा कंटाळा न आल्यास!)

Priyabhashini said...

युधिष्ठीर आणि विदूर हे यमाचे अवतार ही माहिती माझी. इरावती कर्व्यांनी ते पिता-पुत्र असल्याचे गृहितक कसे मांडले याचे युगांत न वाचल्याने फारशी कल्पना नाही.

असो, युधिष्ठीराने बाकीचे पांडव गारद झाल्यावर यक्षाच्या प्रश्नांना जी उत्तरे दिली ती प्रश्नोत्तरे आपल्याकडील महाभारतात असल्यास कधी येथे त्याबद्दल लिहाल का?

मध्यंतरी माझ्या एका स्नेह्यांचे म्हणणे होते की महाभारतात त्या प्रश्नांचे अनेक पाठभेद आढळतात त्यामुळे नेमके प्रश्न कोणते होते ते कळत नाही.

P. K. Phadnis said...

मीहि युगांत वाचल्याला बरींच वर्षे झालीं. इरावती कर्वे यानी महाभारतातील काही सूचक उल्लेख उद्ध्रृत केले आहेत असे आठवते. प्रत्यक्षात युधिष्ठिराचा जन्म पांडु कुंती माद्री वनात निघून गेल्यानंतरचा आहे. विदुराचे त्याना भेटण्यासाठी जाणेयेणे असल्याचा उल्लेख नाही त्यामुळे विदुराचे पितृत्व संभवत नाही असे मला वाटते. मात्र विदुराचा कायम पांडवांकडे ओढा म्हटला तर सूचक आहे!
यक्षप्रश्न अनेक आहेत व त्यात फालतू कोड्यांपासून तात्विक विषयांपर्यंत सगळे विषय येतात. कधी त्याबद्दल लिहिले तर पाहूं.

Anonymous said...

I read in some article (don't remember it now) that Kunti told Vidur about the birth story of Karna. Bhishma, Vidur and Krishna are three characters in Mahabharata who knows the birth-story of Karna.

In ancient traditions, son/daughter is categorized as "Before marriage to the person" and "after marriage to the person"; in this respect although Karna was "Before marriage" he still holds all responsibilities towards the state.

If you believe in holy spirits, then it could be an arrangement by god to save the people from whimsical Duryodhan-shakuni (combination) until pandava's complete their fight for the state. Because, I believe that Karna did everything for his people to be happy -- something that a king needs to do.