आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Monday, October 13, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ८

पांडव बारा वर्षांच्या वनवासासाठी गेले. या काळात कर्णाची कसोटी लागण्याचा प्रसंग उद्भवला. मात्र कसोटीच्या वेळी तो पूर्णपणे उणाच ठरला. वनात गोधनाच्या पाहणीच्या निमित्ताने जावयाचे व आपले वैभव दाखवून पांडवाना खिजवायचे हा बेत दुर्योधनाला शकुनि व कर्ण यानीच सुचवला. दुर्दैवाने द्वैतवनात दुर्योधनाची गाठ चित्रसेन गंधर्वाशी पडली व युद्धप्रसंग उभा राहिला. कर्णाच्या नेतृत्वाखाली कौरवांनी गंधर्वाचा सामना केला. मात्र गंधर्वांपुढे मात्रा न चालून, कर्णाला जीव वांचवण्यासाठी विकर्णाच्या रथावर बसून पळून जावे लागले. गंधर्वांनी दुर्योधनावर मात करून त्याला बंदी बनवले. सैनिकांनी पळून जाऊन पांडवांना हकीगत कळवली तेव्हां कुरुकुळाचा अभिमान धरून, वयं पंचाधिकं शतं असे भीमार्जुनाना समजावून त्याना गंधर्वांशी सामना करावयास पाठवले. त्यांनी दारुण युद्ध करून गंधर्वांचा पराभव करून दुर्योधनाला सोडवले. युधिष्ठिराने दुर्योधनाची समजून घालून, ’पुन्हा असे साहस करू नको’ असे सांगून हस्तिनापुरास परत जाण्यास सांगितले. अपमानाने व अपरिमित लाजेने दुर्योधन विमनस्क होऊन, परतीच्या वाटेवर बसूनच राहिला. पराजित होऊन पळून गेलेला कर्ण खूप दूर गेलेला असावा. कारण येवढा वेळ गेल्यावर मग सावकाश तो दुर्योधनापाशी परत आला व त्याला बांधवांसह सुखरूप पाहून, दुर्योधनानेच गंधर्वांवर विजय मिळवला असे वाटून, त्याने दुर्योधनाचे अभिनंदन केले! दुर्योधनाने कर्णावर राग न धरता, त्याला सत्य परिस्थिति सांगितली. कर्ण हतबुद्धच झाला! दुर्योधनाने हाय खाऊन ’आपण हे अपेशी मुख घेऊन हस्तिनापुराला येणार नाही व भीष्मद्रोणविदुरांना भेटू शकत नाही’ असे म्हणून बैठक मारली. दु:शासन शोकाकुल झाला. कर्णाने व शकुनीने कशीबशी दुर्योधनाची समजूत घातली. पांडवांच्या पराक्रमाची, ’ते कुरुराज्याचे नागरिक, तेव्हा तुझे रक्षण करणे त्यांचे कर्तव्यच होते, ते त्यानी केले, त्याचे काय येवढे मोठेसे?’ अशी वासलात लावली! त्यानंतर नेहेमीप्रमाणेच कर्णाने ’तेरा वर्षांनंतर युद्धात मी अर्जुनाला मारीन’ अशी प्रतिज्ञा केली. कर्णावरच्या दुर्योधनाच्या भरंवशाला अजूनहि तडा गेला नव्हता हे नवलच! सर्वजण तोंडे लपवीत हस्तिनापुराला परत गेले. सर्व हकिगत कळल्यावर भीष्माने, ’धनुर्वेद, शौर्य व धर्माचरण यांत कर्ण हा पांडवांच्या चतुर्थांशहि योग्यतेचा नाही’ असे दुर्योधनाला स्पष्ट सांगितले. या निंदेने राग येऊन कर्णाने दुर्योधनाच्या वतीने दिग्विजय केला व दुर्योधनाला एक खास यज्ञ करण्याचा अधिकार मिळवून दिला. कर्णाच्या पराक्रमाचे हे एकुलते एक उदाहरण म्हणावे लागेल. कर्णाच्या खालावलेल्या प्रतिमेला उजाळा देण्यासाठी हे प्रकरण मागाहून घुसडलेले असावे असे माझे मत आहे. अध्याय २५४ मध्ये ३१ श्लोकांमध्ये हे प्रकरण उरकले आहे! सर्व राजेलोकाना भेटून त्याना दुर्योधनाच्या पक्षाला वळवण्यासाठी या सदिच्छाभेटी असाव्या असे वाटते.
यानंतर अज्ञातवासाच्या अखेरीला पुन्हा कर्णाची कसोटी लागली त्याबद्दल पुढील भागात वाचा.

5 comments:

koustubh kulkarni said...

uttam .... swatantra vichar karun kelela lekhan faar manoranjak ahe !!

kaka, tumhi P.V.Vartakancha "Swayambhoo" vachala ahe ka ? tumacha lekhan purna zalyavar te dekhil jaroor vacha ....

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

आपल्या प्रतिक्रियेबद्दल व सूचनेबद्दल धन्यवाद. आपण प्रतिक्रिया देण्यासाठी मराठीचा वापर कां करत नाही? www.baraha.com वरून barahaIME हे सॉफ्टवेअर उतरवून घ्या व जरूर वापरा. मराठीचा वापर आपण मराठी माणसानी केला नाही तर इतर कोण करणार? आता देवनागरीत लिहायची उत्तम सोय झाली आहे तर अजूनहि कुरूप रोमन मराठीत लिहावेसे आपणाला कां वाटते? कृपया राग मानू नये!

koustubh kulkarni said...

तुम्ही पुण्याचे का हो ?
"आता देवनागरीत लिहायची उत्तम सोय झाली आहे तर अजूनहि कुरूप रोमन मराठीत लिहावेसे आपणाला कां वाटते?"
या वक्यावरून वाटले :)

असो ... इथून पुढच्या प्रतिक्रिया देवनागरीमध्ये!!

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

माझी सूचना तत्परतेने मान्य केल्याबद्दल धन्यवाद. मी कोठला ते माझ्या नावाखाली स्पष्टच लिहिले आहे.
येवढी वर्षे संगणकावर मराठीचा वापर करण्यामध्ये अडचणी होत्या. लोकसत्ता फॉंट-फ्रीडम किंवा सीडॅक चा वापर केला तरी वाचणाराकडे फॉंट असल्याशिवाय वाचतां वा छापतां येत नसे. आता युनिकोड मुळे खूप सोय झाली आहे याचा माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाला फार आनंद आहे. म्हणून मला असे प्रामाणिकपणे वाटते कीं आपण मराठी माणसांनी आतां, पूर्वी नाइलाजाने पत्करलेल्या रोमन मराठीचा वापर सोडून द्यावा. (असे काही वाटण्याचा हक्क फक्त पुणेकरानाच आहे का?)

Unknown said...

बरहा नंतर आता, खुद्द गूगल transliteration ची सोय उपलब्ध झाली आहे, ते वापरण्यास बरहा पेक्षा सोप्पे आहे, असे माझे वैयक्तिक मत.

मी आपली लेखमाला सुरुवातीपासून वाचावयास घेतली आहे, स्वतःच्या या विषयातील अज्ञानाने कुठेही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र वाचन चालू आहे...

आपण लिहित राहावे. अतिशय चांगले कार्य करत आहात, माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !