जयद्रथवधाच्या दिवशी झालेल्या युद्धप्रसंगांचे खुलासेवार वर्णन माझ्या त्या विषयावरील लेखांत पूर्वीच आलेले आहे. त्या दिवशी सहा महारथींना अर्जुनाने वारंवार हरवले, प्रचंड सैन्यसंहार केला व अखेर जयद्रथालाहि मारले. याउलट, अकराव्या दिवसापासूनच्या युद्धांत कर्णाला अभिमन्यु, सात्यकी, भीम, धृष्टद्युम्न, घटोत्कच या सर्वांनी वारंवार हरवले. भीम हा महाधनुर्धर असे त्याचे वर्णन नाही. तो गदायुद्ध व शरीरबळाच्या सर्व प्रकारच्या युद्धात प्रवीण! मात्र जयद्रथवधाच्या दिवशीं रथयुद्धात त्याने सतरा वेळा कर्णाचे धनुष्य तोडून कर्णाला सळो कीं पळो करून सोडले. भीमाने मला फार मार दिला आहे व केवळ आज युद्धाला उभे राहिलेच पाहिजे म्हणून मी उभा आहे असे त्याने स्वत:च दुर्योधनापाशी म्हटले! भीमार्जुनांनी क्वचितच जीव वांचवण्यासाठी युद्धातून पळ काढला असेल. कर्णाने तसे वारंवार केले. अनावर झालेल्या घटोत्कचाला मारण्यासाठी कर्णाला अखेर अर्जुनावर वापरण्यासाठी खास राखून ठेवलेली शक्ति वापरावी लागली. इतर बळाने वा अस्त्रविद्येने भागले नाही. द्रोणाला धृष्टद्युम्नापासून कर्ण वांचवूं शकला नाही. दुर्योधनाचे भाऊ रोज भीमाकडून मारले जात होते. कर्ण त्यांना, दु:शासनालाहि, वांचवू शकला नाही.
कर्ण सेनापति होईपर्यंत खरे तर युद्ध दुर्योधनाच्या हाताबाहेर गेलेले होते. दोन दिवसपर्यंत कर्णाने कडवा प्रतिकार केला. अर्जुनाचे व त्याचे अनेक वेळा संग्राम झाले. अर्जुनासमोर हे मोठे आव्हान होते. पण तो त्या कसोटीला पुरेपूर उतरला. अर्जुन उपस्थित नसताना झालेल्या अभिमन्युवधामध्ये कर्णाचा सहभाग होता म्हणून अर्जुनाने चिडून कर्णाला आव्हान दिले होते कीं अभिमन्यूला वांचवायला मी नव्हतो. पण तुझ्या पुत्राला मी तुझ्यासमक्षच मारीन. कर्णपुत्र वृषसेन हाही अभिमन्यूप्रमाणेच महारथी होता. कर्णाला डांबून ठेवून, तो हजर असतानाच, अर्जुनाने वृषसेनाचा वध केला व आपला शब्द खरा केला. कर्ण आपल्या पुत्रालाहि वांचवूं शकला नाही. सतरा दिवसांच्या अखंड परिश्रमांनंतर कर्णाचे रथचक्र रुतून बसले असताना, त्याला पुन्हापुन्हा निसटून जाण्याची संधि न देतां, अर्जुनाने अखेर कर्णाचा वध केला व वैराची अखेर केली. यांत अर्जुनाच्या पराक्रमाला कोठेतरी उणेपणा आला असे काहीना निव्वळ कर्णप्रेमामुळे वाटते पण माझ्या मते त्यांत काडीचाहि अर्थ नाही. युद्धामध्ये आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही तर संधि पुन्हापुन्हा येत नाही. या दोन दिवसांत कर्णालाहि अर्जुनवधाची संधि आली होती पण ती त्याला साधतां आली नाही. शल्याने त्याचे सारथ्य कौशल्याने केले पण युद्धाला उभे राहाण्यापूर्वी बढाईखोर व उद्धट स्वभावाच्या कर्णाने त्याचेबरोबर वितंडवाद घालून त्याचे संपूर्ण सहकार्य मिळण्याची संधि घालवली. शल्याने रुतलेले चाक काढण्याचे माझे काम नाही असे म्हणून सहकार्य नाकारले पण त्याला प्रसंग न ओळखणारा कर्णच स्वत: जबाबदार नाही काय? कर्णाने पराक्रमाची शर्थ करूनहि अखेर तो उणाच पडला व अपयशी झाला.
अद्यापपर्यंतचे १२ भागांमध्ये मी केलेले सर्व कर्णचित्रण महाभारतावरच आधारित आहे. कर्णाचा जन्म सूर्यापासून नव्हे तर मग कोणापासून याबद्दलचा माझा सप्रमाण तर्क मी वाचकांसमोर ठेवला आहे. सर्व चित्रणाचे समालोचन अखेरच्या भागात वाचा.
महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
5 comments:
फ़डणीस काका,
तुमच्या पहिल्या post पासुन आजपर्यंत एकही post वाचायची सोडलेली नाहीये मी. आणि नेहमी प्रमाणे आजही हेच म्हणेन की तुमचा महाभारताकडे पहाण्याचा दृष्टीकोन ह्या ब्लॉगला खुप interesting बनवतो. माझे वडील मला ब-याचदा ह्याच पद्धतीनं महाभारत आणि रामायण ऊलगडून सांगायचे, आज काल तशा गप्पा मारायला वेळच मिळत नाही. पण तुमचा ब्लॉग सुरु झाल्यावर मात्र खुप आनंद झाला आणि आता मला त्या गप्पागोष्टींना मुकावं लागणार नाही याची खात्रीच पटली. :)
आणि हो, मला नाही वाटत की महाभारता सारखी महान कथा कधीही जुनी होवू शकते. आपण जितक्या वेळा त्याकडे बघतो, प्रत्येक वेळेस काहीतरी नविन सापडतच... आणि तसेही कथा कितीही चांगली असली, नविन असली तरी ती कोण आणि कशी सांगतय यावर ठरतं की ती लोकांना आवडेल की नाही [उदा. बी. आर. चोप्रांचं महाभारत आणि केकता sorry एकताचं महाभारत]. :)
पुढल्या posts साठी शुभेच्छा... [तुमच्या ब्लॉगच्या English version वर नव्या post ची वाट बघतोय, आणि जमलं तर हिंदी पण सुरु करा ना एक, माझ्या ब-याच मित्रांना इच्छा आहे वाचायची, पण त्यासाठी त्यांना सारखा मला मस्का मारावा लागतो. :)]
आपला अभिप्राय वाचून फार आनंद झाला. महाभारतांतील विषयांवर मी काही वर्षांपूर्वी प्रथम आमच्या ’सोबती’ या ज्येष्ठ नागरिक संघटनेत व्याख्याने दिली. मग त्यासाठी लिहिलेल्या लेखांचे एक छोटे पुस्तक छापून मित्रांना वाटले. इतरत्रहि व्याख्याने दिली. नंतर हे विषय डोक्यातून निघून गेले होते. मार्च महिन्यात मराठी ब्लॉग या प्रकाराशी ओळख झाली व विचार आला की आपण एक ब्लॉग या विषयांसाठी सुरू करावा. वाचक कितपत मिळ्तील याबद्दल शंकाच होती. पण ब्लॉग सुरू झाला आणि नवल म्हणजे तो नवीन पिढीने उचलून धरला. गेले ७-८ महिने पुन्हा एकदा मी त्याच जुन्या विषयांत अडकलो आहे. मात्र वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे भारावलो आहे. आपणा सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. नकाशावरील खुणांमुळे मी आता जगप्रसिद्ध लेखक झालो आहे अशी मित्रांमध्ये शेखी मिरवतो आहे. आपल्यासारख्याच एका चाहत्याच्या सूचनेवरून मी english ब्लॉग सुरू केला. त्यालाही थोडाफार प्रतिसाद मिळाला. पण चालू ठेवण्याचा उत्साह राहिलेला नाही. माझे हिंदी म्हणजे ’ऊपरसे धाडकन पड्या’ या धर्तीचे असल्यामुळे हिंदीत लिहिण्याचे धाडस करवत नाही. (एकदा अमेरिकेत हिंदी भाषेतून एक व्याख्यान दिले होते!) व्याख्याने मात्र अजूनहि कोणी बोलावले तर देईन.(फुकट!)
पुन्हा एकदां धन्यवाद.
नमस्कार फडणीस काका,
तुमचा हा Blog मला वाचायला खुप आवडतो,तुमची नविन पोस्ट कधी वाचायला मिळेल याची मी चातकासारखी वाट पहात असते.कर्णाविषयी तुम्ही दिलेली माहिती चांगली आहे.परंतु कधी कधी माझ्या मनात विचार येतो की कर्णाचे कर्तुत्व व पुरुषार्थ मोजण्यात आपण कमी पडत आहोत.कारण इतर सर्व कौरव पांडव हे राजघराण्यातील होते व हस्तिनापुराचे भावी राज्यकर्ते म्हणुन त्यांचा सर्वप्रकारचा विद्याअभ्यास हा उत्तमोत्तम गुरुंच्या मार्गदर्शनाखाली झाला.पांडवांना तर कुंतीसारखी सत्वशील,सन्मार्गी व राजघराण्यातील स्त्री माता म्हणून लाभली.त्यामुळे तिचा प्रभाव व उत्तम संस्कार त्यांना जन्मापासून लाभले.त्यामुळे पांडव हे कर्तबगार,पराक्रमी व सदाचारी पुरुष बनले यात त्यांच्या स्वत:च्या कर्तुत्वाबरोबर त्यांच्या थोर मातेचा व उत्तम गुरूजनांचाहि वाटा आहे.परंतु कर्ण हा लहानपणापासून एक सारथीपुत्र म्हणून मोठा झाला.त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचे आइ वडिल हे देखिल सामान्य स्त्री-पुरूष असणार.त्यामुळे ते आपल्या मुलाच्या विद्याअभ्यासासाठी उत्तम गुरूंची सोय कधीहि करु शकले नसते.त्यामुळे कर्णाने महाभारतात स्वत:चे एखादया तेजस्वी क्षत्रिय राजपुरुषासारखे सिद्घ केलेले कर्तुत्व हे त्याचे स्वत:च्या स्वअभ्यासाचे,श्रेष्ठ होण्याच्या उत्तुंग महत्वाकांशेचे फळ आहे.साधारण कुळात जन्म लादला जाउन पण स्वता:च्या लायकीने दुर्योधनासारख्या गर्विष्ठ राजकुमाराची मैत्री व विश्वास संपादन करणे व शेवटपर्यंत ती मैत्री व विश्वास सार्थ ठरवणे यातही कर्णाचे मोठेपण आहे.साधारण सारथ्याच्या मुलाने एखाद्या घरंदाज राजपुरुषाच्या तोलामोलाचा दानशुरपणा अंगी बाणवने यालाही अंगी तेवढेच तेजसामर्थ्य लागते.कर्णाच्या सुदैवाने त्याला कुंती माता म्हणुन लाभली असती व हस्तिनापुर राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ राजकुमार म्हणुन जर तो मान्यता पावला असता तर कदाचित आज आपण वाचत व एकत असलेले महाभारत थोडे वेगळे असते.त्यामुळे कर्णाची सतत अर्जुनाबरोबर तुलना करण्यात काय अर्थ आहे.दोघेहि वीर वेगवेगळ्या परिस्थितीत जगले व मोठे झाले.दोघांनाही वेगवेगळ्या लोकांचा सहवास व संस्कार लाभले.त्यामुळे दोघेही आपआपल्याठायी मोठेच आहेत.
खुप दिवस हे मनात होते म्हणुन लिहीले.आपले काय मत आहे याबद्द्ल.क्रुपया typing व grammer mistake बद्द्ल क्षमस्व.काही मराठी अक्षरे english typing board वापरून कशी टाइप करावी याबद्द्ल अजुनही R&D चालु आहे.
वर्षा :-
तुमचा विस्तृत अभिप्राय वाचून बरे वाटले. माझे कर्णाबद्दल मतप्रदर्शन हे महाभारतातील वेगवेगळ्या प्रसंगी कर्णाचा जो सहभाग विस्तृतपणे वर्णन केला आहे त्याच्या परिशीलनावर आधारलेला आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे केले जाणारे उदात्तीकरण मला पटत नाही. त्याचे Victim असे चित्रण केले जाते. पण माझ्यामते तो एक Faulted Character आहे. यावर १३ लेखात लिहिले त्यापेक्षा जास्त काही लिहिण्यासारखे नाही. आपल्या थोड्याशा वेगळ्या दृष्टिकोनाबद्दल मी आदर बाळगतो.
रामायणात रामाने सुग्रीवाला साथ देऊन वालीला मारलं. इथे राम हा विष्णूचा अवतार, सुग्रीव हा सूर्याचा अंश, तर वाली हा इंद्राचा अंश होता. आपल्या पुत्राला अन्यायानं मारल्याचा राग इंद्रानं मनात ठेवला असावा. म्हणूनच की काय, राम-सुग्रीव-वाली हे त्रिकूट पुढे महाभारतात अनुक्रमे कृष्ण, कर्ण (सूर्यपुत्र) आणि अर्जुन (कुंतीला इंद्राकडून मंत्रानं प्राप्त झालेला पुत्र) असं प्रकट झालं आणि शेवटच्या युद्धात अर्जुनानं कर्णाला कृष्णाच्या आदेशावरून कृष्णाच्याच समक्ष ठार मारलं ! tumhala kay vatta kaka?
Post a Comment