कर्णाबद्दलचे हे लेखन फार विस्तारले. या लेखनात कर्ण व अर्जुन यांची तुलना वेळोवेळी करणे आवश्यकच होते. अर्जुन हा महाभारताचा एक नायक तर कर्ण हा प्रतिनायक, भीम नायक तर दुर्योधन प्रतिनायक असे म्हणता येईल. मी खलनायक असा शब्दप्रयोग मुद्दामच केलेला नाही. कर्ण व दुर्योधन या दोघांमध्येहि अनेक उत्तम गुणहि महाभारतकारांनी मुक्तपणे वर्णिले आहेत. कर्णाचे शौर्य व दातृत्वगुण निर्विवाद आहेत. दुर्योधनाबद्दलहि तसेच म्हणावे लागते. मात्र अखेर, महाभारतकारांना कर्ण हे गुणांपेक्षां दोष जास्त असलेले व्यक्तिमत्त्व रंगवावयाचे आहे याबद्दल शंका नाहीं. कर्णातील उणेपणा हा त्याच्या (माझ्या तर्काप्रमाणे ) सूताचा पुत्र म्हणून झालेल्या जन्मामुळे वा सूतपुत्र म्हणून आयुष्य व्यतीत करावे लागल्यामुळे आला असें खरे तर म्हणतां येणार नाहीं. सूत सर्व प्रकारच्या मानसन्मानापासून वंचित होते असे दिसत नाही. सूतांचे स्वत:चे स्वतंत्र राज्य होते. त्या राज्यात गेलेले असताना अधिरथ व राधा यांना कर्ण मिळाला असे म्हटले आहे. विराटाची पत्नी सुदेष्णा ही सूतकुळातील होती व तिचा भाऊ कीचक हा विराटाच्या राज्यात सर्वेसर्वा होता. तेव्हा सूतांचे स्थान क्षत्रियाच्या किंचित खालचे मानले जात असावे. कर्णाचे सुरवातीचे (धनुर्विद्येचे ) शिक्षण कोठे झाले याचा काही उल्लेख नाही पण परशुरामाकडे जाण्यापूर्वी बरीच प्रगति झालीच असणार.
कर्णाला आपण कुंतीपुत्र आहोत हे कळण्याचा काही मार्ग नव्हता. (कृष्ण वा कुंती यांनी सांगेपर्यंत). त्याने कौरवदरबारात आपली धनुर्विद्या प्रगट केली तेव्हा लगेचच दुर्योधनाने त्याला आयुष्यभरासाठी जवळ केले. सर्व मानसन्मान व वैभव त्याला प्राप्त झाले होते. त्यापुढील त्याचे आयुष्य सुखाने जाण्यास काही हरकत नव्हती. पण दुर्योधनाची मैत्री त्याला तशी महागच पडली म्हणावे लागते कारण नंतर आयुष्यभर दुर्योधनाच्या सर्व कुटिल बेतांमध्ये त्याला सामील व्हावे लागले. त्याने ते स्वखुषीनेच केले असे दिसते. घमेंडखोर व उद्धट स्वभावामुळे त्याला बढाया मारण्याची खोड जडली. परशुरामाकडून मिळवलेल्या विद्येवर तो संतुष्ट राहिला. उलट अर्जुनाने द्रोणापासून मिळवलेल्या विद्येवर संतुष्ट न राहातां अधिक कौशल्य मिळवण्यासाठी धडपड केली. अखेरच्या युद्धापूर्वी तो असे साधार म्हणू शकला की आज माझ्याकडे जी अस्त्रे आहेत त्यांचे ज्ञान द्रोणाला वा भीष्मालाहि नाही! सर्व दृष्टीने विचार करतां असे म्हणावे लागते कीं कर्णाच्या दोषांनी अखेर त्याच्यातल्या गुणांवर मात केली. हा विषय मी येथेच संपवीत आहे. या लेखनाला उदंड वाचक लाभले व प्रतिसाद मिळाला. मतभेद हे असणारच. तुमच्या सर्वांच्या मतांचा मी आदर करतो. धन्यवाद.
महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
9 comments:
काका कर्नाबद्धल मज़े विचार वेगले आहेत. पण तुमच लिखाण अवदल. पुढे लिहा की. Wat baghtoy. sorry for spell error.
काका, बर्याच दिवसांत लिहिले नाहीत. मीही कामांत इतकी गुंतलेली आहे की वाचायला फारसा वेळ नसतो. तरी बरेचसे भाग वाचले आहेत. तुम्ही कृपया लिहित जा.
कर्णाचा पिता सूर्य, अर्जुनाचा पिता इंद्र, विविध नागांची नावे असे जे काही उल्लेख महाभारतात आहेत त्यावरून असे अनुमान काढता येईल, की त्याकाळी विशिष्ट आराध्य देवतांची पूजा करणार्या किंवा विशिष्ट प्राण्यांची चिन्हे ध्वजावर धारण करणार्या जाती अस्तित्वात होत्या. कर्णाचा पिता "सूर्य" हा अशाच एका सूर्यपूजक जमातीचा प्रमुख असावा व देवतेच्या नावाने म्हणून त्याला सूर्य संबोधले जात असावे. तसेच इंद्र हा इंद्रपूजक जमातीचा प्रमुख असावा. तर महाभारतात उल्लेख असलेले नाग हे लोक नागपूजक असावेत (ह्ल्लीचे नागा जमातीचे लोक) व त्याकाळचे क्षत्रिय लोक नविन राज्ये वसवण्यासाठी जंगले (उदा, खांडववन) नष्ट करत होते, त्यात ते इतर प्राण्यांबरोबरच सापांनाही नष्ट करत होते. म्हणूनच नागपूजक "नाग" लोकांचे आणि क्षत्रियांचे वैर निर्माण झाले असावे.
त्या काळातील प्रस्थापित रूढींप्रमाणे जसा कर्णाला १६ वर्षाच्या अर्जुनाला आव्हान देण्याचा अधिकार नव्हता किंवा द्रौपदीस्वयंवरात त्याला तसा अधिकार नसल्याचे सांगण्यात आले....... अगदी तसेच त्या काळाच्या रूढीप्रमाणे द्रौपदीलासुद्धा हे विचारण्याचा हक्कच नव्हता की, "द्युतात तिला पणाला लावायचा हक्क युधिष्टिराला आहे की नाही?" एक स्त्री म्हणून तिचे हे विचारणे पूर्णपणे अप्रस्तुतच होते. पण द्रौपदी काय किंवा कर्ण काय दोघांनीही स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या मर्यादेपलिकडल्या क्षेत्रात शिरकाव केला होता. त्या काळाशी सुसंगत नसलेलं त्यांचं त्या त्या प्रसंगातलं वागणं हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल म्हणता येईल.
चुकांच्या बाबतीत पाहू गेलं, तर फ़क्त कर्णच नव्हे, तर महाभारतातल्या जवळजवळ सर्वच व्यक्तिरेखांनी कधीनाकधी त्यांच्या आयुष्यात काहीना काहीतरी चुका केलेल्या आहेत. प्रत्येकजण कधीतरी दोषयुक्त वागलेला आहेच. पण तरिही प्रत्येकात काही चांगले गुणही आहेतच. कोणतीही व्यक्तिरेखा ही संपूर्णपणे नकारात्मक नसून त्या प्रत्येक व्यक्तिरेखेत चांगल्या आणि वाईटाच्या विविध छटा आढळतात हेच महाभारताचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
रूढ अर्थाने कर्णाला चांगले शिक्षण आणि संस्कार लाभले नसतांनाही त्याने स्वतःच्या परिने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ही काही फ़ार छोटी गोष्ट नाही. म्हणूनच बर्याच जणांना कर्ण हा फ़ॉल्टी न वाटता, व्हिक्टीम वाटतो. आणि माझेही प्रामाणिक मत तेच आहे.
कर्णाला जी जन्मजात कवचकुंडले मिळाली होती, तशा प्रकारचे विशिष्ट चिन्हांकित दागिने अधिरथासारख्या एका सामान्य सूताकडे असणे हे असंभवनीय वाटते. ती आभूषणे निश्चितच कोणीतरी उच्चकुलीन पुरूषाची असणार आणि कर्णालाही त्याच आभूषणांमुळे तो कोणी सामान्य सूतपुत्र नसून कोणा उच्चकुलीन मातापित्यांचा पुत्र आहे याची सुप्त जाणीव सतत मनात धगधगत असावी. म्हणूनच १६ वर्षांच्या अर्जुनाला स्पर्धेसाठी आव्हान देण्याचे धाडस त्याने केले असावे हे उघड आहे.
कर्णाचे पाय हुबेहुब कुंतीच्या पायांसारखे दिसतात असे युधिष्ठिराने बोलून दाखवल्याचाही महाभारतात उल्लेख आहे. कदाचित कर्णालाही या गोष्टीची जाणीव असावी म्हणूनच त्याचे जन्मरहस्य कळल्यावर त्याने आश्चर्य व्यक्त केलेले दिसत नाही.
ऋतं वच्मि। सत्यं वच्मि। म्हणजे योग्य तेच बोलेन. सत्य तेच बोलेन. असेच जर तुम्ही लिहीत आहात तर त्यात काहीही वावगे नाही. वाचक व प्रतिसाद मोजून लिहावे असे हे माध्यम नाही. आपण भविष्यातल्या वाचकांकरताही लिहीत आहोत ह्याचे भान असू द्यावे. ब्लॊग बंद करणार म्हणजे नक्की काय करणार. नाहीसा तर करणार नाही ना? म्हणजे केवल प्रतिपादन परिपूर्ण झाले आहे हे उमजून लेखन सीमा घालून घेणार. तर तसे करणे योग्यच आहे. मात्र तरीही ब्लॊग वाचकांस आहे त्या मजकुरासह वाचनीय राहीलच.
जे तुम्ही लिहीलेले आहे ते सुजाण वाचकांस इतिहासाचा खराखुरा अन्वयार्थ लावण्याकरता भावार्थदर्शन करू शकेल या योग्यतेचेच आहे. त्या विचारांना योग्य प्रकाश मिळवून दिल्याखातर तुमचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या बव्हंशी विचारांशी मी सहमत आहे.
मात्र भविष्यकाळ घडवत असतांना, इतिहासात हारलेल्या व्यक्ती व सामर्थ्ये यांच्यातील खर्या योग्यतेची यथार्थ जाणीव राखण्याची पात्रता अंगी बाणवण्याची शक्ती तुमच्या वाचकांना तुमच्या लिखाणातून लाभण्याची शक्यता आहे. आणि तेच त्या लिखानाचे खरे यश आहे.
वाचतो aahe काका तुमचा bolg!
khoop chan...
khoop chan...
मला वाटते लिखाण एका बाजूला झुकलेले आहे.साक्षात भगवान श्री.कृष्णाने कर्ण हा सर्व योध्या मध्ये श्रेष्ठ होता हे सांगितले आहे.लिखाणात फक्त कर्ण द्वेष दिसून येतो.
Post a Comment