रुरु आणि प्रमद्वरा
महाभारताच्या आदिपर्वात सुरवातीला भृगुऋषींच्या कुळातील अनेक व्यक्तींच्या कथा आहेत. त्यांतील एक पुरुष म्हणजे रुरु. भृगूचा पुत्र च्यवन, त्याचा पुत्र प्रमति व त्याला घृताची नावाच्या अप्सरेपासून झालेला पुत्र म्हणजे रुरु. रुरुचा पुत्र शुनक व नातू शौनकऋषि. हा ऋषि व त्याचे सहकारी यांनी एक द्वादशवर्षीय यज्ञसत्र केले. त्या सत्रासाठी जमलेल्या अनेक ऋषिमुनींना, संध्याकाळच्या वेळी, सूत लोमहर्षण याचा पुत्र, सौति नावाचा पुराणिक, मनोरंजनासाठी अनेक कथा सांगत असे. पूर्वी व्यासांनी परीक्षितपुत्र जनमेजयाला त्याच्या पूर्वजांच्या कथा सांगितल्या होत्या. तो मूळ ’जय’ग्रंथ. (परीक्षित हा पांडवांचा नातू अभिमन्यूचा पुत्र. आपला मृत्यु समीप आल्यावर त्याला युधिष्ठिराने हस्तिनापुराच्या राज्यावर स्थापित केले होते.) त्या ’जय’ ग्रंथांतिल कथा सौतीने खूप विस्ताराने सांगितल्या व ’जय’चे महाभारत झाले. असा रुरूचा महाभारताशी दूरचा संबंध आहे.
रुरुला शुनक हा पुत्र प्रमद्वरा या त्याच्या पत्नीपासून झाला. रुरु आणि प्रमद्वरा यांची कथा ही एक प्रेमकहाणीच आहे.
विश्वावसु नावाच्या गंधर्वराजापासून मेनका अप्सरेला प्रमद्वरा ही कन्या झाली. मात्र जन्मत:च मेनकेने तिला स्थूलकेश नावाच्या ऋषीच्या आश्रमाजवळ नदीकाठी ठेवून दिले व ती ’निर्घृण व निर्लज्ज स्त्री’ (महाभारतकारांचे वर्णन) खुशाल चालती झाली. तीच ही मेनका, जिने शकुंतलेला असेच जन्मत:च कण्वमुनींच्या आश्रमापाशी सोडून दिले होते! यावेळींहि तिच्या कन्येला स्थूलकेश ऋषींनी उचलले व तिचा सांभाळ केला व लहानाची मोठी केली. ती रूपवान व गुणवान असल्यामुळे तिचे प्रमद्वरा असे नाव पडले.
रुरु हा एक विद्वान ऋषि होता. एकदा प्रमद्वरा काही कारणाने रुरूच्या नजरेला पडली व त्याचे तिच्यावर प्रेमच जडले. त्याने मित्रांतर्फे ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली. त्यांनी स्थूलकेशाकडे प्रमद्वरेसाठी रीतसर मागणी घातली व ती मान्य होऊन रुरु व प्रमद्वरा यांचा विवाह ठरला. मात्र विवाह होण्यापूर्वी काही दिवस आधी, प्रमद्वरा मैत्रिणींसह क्रीडा करत असताना चुकून तिचा पाय एका झोपलेल्या भुजंगावर पडला. त्याने तिला दंश केला व ती कोसळली. अनेक ऋषि व रुरु जमा झाले पण ती गतप्राणच झाली. सर्वजण शोकमग्न झाले. रुरु एकटाच वनात जाऊन आक्रोश करत बसला. तिची आठवण काढून तो स्वत:शी म्हणत राहिला कीं माझ्या हातून जर तपश्चर्या, दान व गुरुसेवा घडली असेल तर माझी प्रिया जिवंत होवो. बराच काळ त्याने असा विलाप केल्यावर एक देवदूत आला व त्याला समजावूं लागला कीं ’हिचे आयुष्यच संपले आहे त्याला काय करणार? तुझे आयुष्य तूं तिला देतोस काय?’ रुरूने म्हटले कीं ’माझ्या उरलेल्या आयुष्यातील अर्धे आयुष्य तिला मिळो व ती जिवंत होवो’ (सर्व आयुष्य देऊन काय उपयोग कारण मग रुरुच मरून जाणार!) मग तो देवदूत व गंधर्वांचा राजा यमधर्माकडे गेले व त्यांनी रुरूसाठी रदबदली केली. यमानेहि ते मान्य केले. रुरूच्या उरलेल्या दीर्घ आयुष्यातील अर्धे प्रमद्वरेला मिळाले व ती जिवंत झाली! मग रुरु आणि प्रमद्वरेचा विवाह झाला.
मात्र रुरूने सर्पांचा दीर्घद्वेष धरला व हातात दंड घेऊन, सापडेल त्या सर्पाला तो मारीत सुटला. एकदां एका निर्विष सर्पालाही तो मारूं पहात असताना त्या सर्पाने त्याला उपदेश केला कीं ’अशा तर्हेचे आचरण तुला ब्राह्मणाला शोभत नाही. तूं हे सोड. पूर्वी राजा जनमेजयाने पिता परीक्षित याचा मृत्यु तक्षक नागाच्या दंशामुळे झाला या रागापोटीं सर्पयज्ञ केला व अनेक सर्प यज्ञाग्नीत जळाले. सर्पकुल नष्ट होण्याची वेळ आली होती तेव्हां आस्तीक या ब्राह्मण ऋषीनेच त्याला थांबवले होते व सर्पकुल वांचवले होते. तसे वागणे हेच तुला शोभेल.’ त्याचे म्हणणे मानून रुरूने सर्प मारणे बंद केले. अशी ही रुरु-प्रमद्वरा यांची प्रेमकहाणी.
महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen