महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
Saturday, April 27, 2013
कृष्ण-कर्ण संवाद - भाग २
कृष्ण उपप्लव्याहून शिष्टाईसाठी निघाला त्यादिवशी ‘रेवती’ नक्षत्र होते असा उल्लेख आहे. मार्गात एकच रात्र कृष्णाने मुक्काम केला व दुसर्या दिवशी तो हस्तिनापुराला पोचला असे म्हटलेले आहे. त्या दिवशी दुर्योधनाचे आतिथ्य नाकारून तो विदुराकडे मुक्कामाला राहिला. तिसरे दिवशी कौरवदरबारात शिष्टाई झाली. संध्याकाळपर्यंत ती अयशस्वी ठरून कृष्ण विदुराकडे परत येऊन कुंतीला भेटला व मग पांडवांकडे परत निघाला. या दिवशी ‘भरणी’ नक्षत्र असणार कारण रोज एक नक्षत्रातून चंद्र पुढे जातो. हा कार्तिक मास होता हे गृहीत धरल्यास अमावास्येला चंद्र ‘ज्येष्ठा’नक्षत्रापर्यंत पोचणार होता. (पौर्णिमेला-शिष्टाईच्यादुसर्या दिवशी-तो कृत्तिका नक्षत्रात पोचणार होता कारण हा कार्तिकमास). ‘भरणी’ पासून ‘ज्येष्ठा’पंधरा नक्षत्रे पुढे आहे! तेव्हां शिष्टाईच्या या दिवसापासून आठच दिवसानी अमावास्या येणे शक्यच नाही! तेव्हां जर कृष्णाने ‘आठ दिवसांनी अमावास्या आहे त्या दिवशी युद्ध सुरू करूं’ असे कर्णाला म्हटले असेल तर हा संवाद झाला त्या दिवशी ‘मघा’ किंवा ‘पूर्वा’ नक्षत्र असले पाहिजे होते जे शिष्टाईच्या दिवशीच्या भरणी नक्षत्रानंतर ७-८ दिवसांनी येणार होतें! तोंवर कृष्ण हस्तिनापुरात होता कोठे? तो केव्हाच परत गेला होता!
कृष्ण शिष्टाईच्याच दिवशी परत गेला असला पाहिजे असे दुसर्या संदर्भावरूनहि निश्चित ठरते. पांडवांकडे तो परतल्यावर मग शिष्टाईबद्दल सर्व चर्चा झाली, युद्ध अटळ आहे हे स्पष्ट झाले, मग पांडवपक्षाच्या सर्व वीरांची बैठक झाली, चर्चेअंती धृष्टद्युम्नाला सेनापति नेमले गेले, पांडव वीर व सैन्य कुरुक्षेत्रावर पोचले, रुक्मीने येऊन सहाय्य देऊ केले ते पांडवानी उडवून लावले व तो निघून गेला वगैरे घटना घडल्या. मग बलराम शिबिरात आला व युद्ध होणारच हे कळल्यावर,‘मला हे युद्ध पहावयाचे नाही म्हणून मी तीर्थयात्रेला जातो’असे कृष्णाला व पांडवाना म्हणून लगेच शिबिर सोडून गेला. येथे नक्षत्राचा उल्लेख नाही. तो नंतर भीम-दुर्योधन गदायुद्ध १८व्या दिवशी झाले तेव्हां उपस्थित झाला. त्याने तेव्हां मात्र म्हटले कीं ‘मी पुष्य नक्षत्रावर निघालो होतो तो आज श्रवण नक्षत्रावर (४२ दिवसानी) परत येतो आहे.’अर्थ इतकाच कीं पुष्य नक्षत्राच्या बलराम-पांडव भेटीच्या व आधीच्या पांडवशिबिरातील वर वर्णन केलेल्या सर्व घटनांच्या दिवशीहि कृष्ण पांडवांच्या शिबिरात होता. ‘भरणी’ नक्षत्राच्या शिष्टाईच्या दिवसापासून या सर्व घटनांमध्ये ४-५ दिवस गेले होते. मग कृष्ण कर्णाला भेटला असेलच तर यानंतर दुसर्या वा तिसर्या दिवशी, मघा वा पूर्वा नक्षत्राच्या दिवशीं, गुप्तपणे भेटला काय?
Tuesday, April 23, 2013
कृष्ण – कर्ण संवाद.
बर्याच काळानंतर आज पुन्हा एकदा या ब्लॉगवर काही लिहिण्याचा विचार आहे.
कृष्णशिष्टाई या विषयावर पूर्वी या ब्लॉगवर दीर्घ लेखन केले आहे. त्यातील अखेरचा भाग म्हणजे कृष्ण-कर्ण संवाद. संक्षिप्तपणे हकिगत अशी -
कौरव-पांडव युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्णाने कौरवदरबारात जाऊन पांडवांची बाजू मांडून आटोकाट प्रयत्न केले. दुर्योधनाने अज्ञातवास पुरा केल्याचा पांडवांचा दावा सपशेल फेटाळून लावला व राज्य पाहिजे तर आणखी बारा वर्षे वनवास करा असा जबाब दिला. शिष्टाई असफल झाल्यानंतर परत जाताना कृष्णाने कर्णाला आपल्याबरोबर आपल्या रथावर घेऊन वाटेत त्याला ‘तूं कुंतीपुत्र आहेस म्हणून दुर्योधनाची बाजू सोडून दे व पांडवपक्षात ये’ असे आवाहन केले. मात्र ते कर्णाने नाकारले. अखेर त्याचा निरोप घेताना कृष्णाने ‘ आठ दिवसानी अमावास्या आहे, त्या दिवशी कुरुक्षेत्रावर भेटूं व युद्ध सुरू करूं’असा कौरवांसाठी निरोप दिला व मग कृष्ण पांडवांकडे परतला असा कथाभाग महाभारतात आहे. तो सर्वसाधारणपणे खरा मानला जातो व मलाहि तसे पूर्वी वाटत होते. मला एकच प्रश्न पडला होता कीं कर्णाचे जन्मरहस्य कृष्णाला कसे माहीत असणार? त्यावर मलाच सुचलेले उत्तर असे होते कीं शिष्टाई विफल झाल्यावर संध्याकाळी, परत जाण्यापूर्वी कृष्ण कुंतीला भेटला होता तेव्हां खुद्द कुंतीनेच हे रहस्य कृष्णाला सांगून ‘अवश्य तर हे तूं कर्णाला सांग पण कर्ण व पांडव या भावांचा युद्धप्रसंग टाळ’असे त्याला म्हटले असेल! (कर्णाने कृष्णाला दाद दिली नाही असे कळल्यावर मग तिने अखेरचा प्रयत्न म्हणून स्वतःच कर्णाची भेट घेतली व ‘तूं माझा पुत्र आहेस तेव्हां कौरवांची बाजू सोड’असे विनवले, तेहि कर्णाने मानले नाहीच.) या कृष्ण-कर्ण भेटीनंतर आठ दिवसानी कार्तिक अमावास्या होती व त्या दिवशी युद्ध सुरू झाले असे मानले जाते पण हा कालानुक्रम व घटनाक्रम खरा आहे काय? कित्येक उल्लेख याचेशी विसंगत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)