बर्याच काळानंतर आज पुन्हा या ब्लॉगवर काही लिहायला बसलो आहे. खरे तर बराच काथ्याकूट करून झाला आहे त्यामुळे पुनरुक्ति अनेकवार झाली आहे. नवल म्हणजे अजूनहि या ब्लॉगला वाचक भेटताहेत व पसंतीच्या ई-मेलहि येतात. हल्ली भारतात असल्यामुळे पुन्हा महाभारत हाताशी आहे.काही कारणामुळे पुन्हा थोडे वाचलेहि जात आहे. त्यात नजरेला आलेली एक शंका वाचकांसमोर ठेवत आहे.
कृष्ण हा पांडवांचा कैवारी, सल्लागार, आणि मित्र. द्रौपदी आणि कृष्ण यांचे भावा-बहिणीचे नाते आदर्श मानले जाते. असे असताना युद्धाच्या अखेरच्या दिवशी जो भीषण संहार अश्वत्थाम्याने पांचाल शिबिरात रात्री घडवून आणला त्याबद्दल एक शंका मनात येते.
अठराव्या दिवशी दुर्योधन भीमाच्या गदाप्रहाराने जखमी होऊन पडला व तो आता मरेलच याची खात्री वाटल्यामुळे त्याला तसेच टाकून पांडव, कृष्ण, सात्यकी व पांचालवीर शिबिराकडे परतले. युधिष्ठिराने कृष्णाला म्हटले कीं सर्व कौरवांचा निःपात झाला, दुर्योधनहि मरणासन्न आहे हे वर्तमान धृतराष्ट्राला कळवण्याचे काम तूच कर कारण त्याच्या रागाला तोंड द्यायची आमची तयारी नाही. कृष्णाने ते काम केले. परतल्यावर त्याने पांडव व सात्यकी याना सल्ला दिला की आजची रात्र तुम्ही शिबिरात राहू नका. असा सल्ला कां दिला याचा खुलासा महाभारतात नाही. अश्वत्थामा, कृप व कृतवर्मा वाचले आहेत व पळून गेले आहेत हे पांडव व कृष्ण याना ठाउक होते. असे मानले जाते कीं अश्वत्थामा पित्याच्या वधामुळे धृष्टद्युम्नावर फार रागावलेला आहे त्यामुळे तो काहीतरी आतताई कृत्य करील या भीतीने कृष्णाने पांडवाना तो सल्ला दिला आणि त्या सल्ल्यामुळे पांडव वांचले! सर्वच गोष्टींचे श्रेय कृष्णाला देणारे याचेहि श्रेय कृष्णाला देतात. मात्र यामुले अनेक प्रष्न उभे राहतात!
१. कितीहि थकले-भागले असले तरी, पाडव, सात्यकी, कृष्ण शिबिरात असते तर अश्वत्थाम्याची काहीहि करण्याची हिम्मतच झाली नसती. तो त्याना घाबरत होता असा उल्लेखच आहे! मग शिबिरात सावध राहाण्याचा सल्ला देण्याऐवजी बाहेर रहाण्याचा सल्ला कसा दिला गेला?
२. शिबिरात पांडव, कृष्ण, सात्यकी नाहीत हे अश्वत्थाम्याला कसे कळले?
३. पांडवाना बाहेर काढले पण द्रौपदीच्या पांच पुत्राना मात्र पांचालशिबिरातच राहूं दिले! त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटली नाही?
४. स्वतःच्या बहिणीचा पुत्र अभिमन्यु मारला गेला होता पण त्याची पत्नी गर्भवती होती. द्रौपदीपुत्र जिवंत राहिले असते तर पांडवांच्या पश्चात प्रतिविंध्याकडे राज्य गेले असते अभिमन्युपुत्राकडे नव्हे! हे कृष्णाला नको होते कीं काय? एक दुष्ट शंका!
५. सर्व वनवास-अज्ञातवासाचा काळ अभिमन्यु द्वारकेला होता पण द्रौपदीपुत्र द्रुपदापाशी होते. त्यांच्यावर पांचालांचे,धृष्टद्युम्नाचे संस्कार प्रबळ झाले होते. आता पांडव कुरुराज्याचे सत्ताधीश झाले असते पण त्यांच्यावरहि पांचालांचे वजन जास्त राहिले असते. कृष्णाला हे नको होते कीं काय?
६. कृष्ण हा पक्का राजकारणी आहे. पांचालांचा प्रभाव वाढू नये असा प्रयत्न त्याने करणे असंभव नाही.
प्रत्यक्षात, हस्तिनापुराचे राज्य पांडवांनंतर अभिमन्युपुत्र परिक्षिताकडे गेले व इंद्रप्रस्थाचे राज्य कृष्णाच्या नातवाकडे गेले असे महाभारत म्हणते!
वाचकाना काय वाटते ते त्यानी अवश्य कळवावे.