यानंतर यथावकाश पांडव अज्ञातवासात गेले. त्यांच्या कथेत यानंतर कर्णाचा उल्लेख कौरवांनी विराटाच्या गायी हरण करण्याच्या प्रसंगात येतो. पांडवांच्या शोधार्थ पाठवलेले सेवक हात हलवीत दरबारात परत आले. तेव्हा कर्णाने पुन्हा जास्त हुशार माणसे शोधार्थ पाठवण्याचा सल्ला दिला. पांडव हुडकले गेले नाहीत तर लवकरच त्यांच्याशी युद्धप्रसंग उद्भवेल तेव्हा सैन्य, संपत्ति या साधनांचा विचार कर असा दुर्योधनाला कृपाने सल्ला दिला. पण तो सर्व विषय बाजूलाच राहून, त्रिगर्त राजा सुशर्मा याने सुचवले कीं कीचक मेल्यामुळे विराट आता दुबळा झाला आहे तेव्हां त्याचे गोधन लुटावे. कर्णाने मत दिले कीं पांडव आता दुबळे झाले आहेत तेव्हा त्यांची काळजी करण्याची जरुरी नाही, म्हणून त्रिगर्ताची सूचना मान्य करावी. त्रिगर्त व कौरव यांनी दोन्हीकडून विराटावर हल्ला केला. दक्षिणेकडून त्रिगर्ताने केलेल्या हल्ल्याचा विराटाने चार पांडवांच्या सहाय्याने यशस्वी प्रतिकार केला. मात्र रात्रीपर्यंत युद्ध चालल्यामुळे राजधानीला परत येतां आले नाही. त्यामुळे दुसर्या दिवशी उत्तरेकडून कौरवांनी केलेल्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याची पाळी विराटपुत्र उत्तरावर आली. बृहन्नला वेषांतील अर्जुनाने सारथ्य केले. प्रत्यक्ष युद्धक्षेत्रावर उत्तराचा निभाव लागणे शक्यच नसल्यामुळे त्याला सारथी बनवून, शमीवरील शस्त्रे घेऊन अर्जुन स्वत:च युद्धाला सज्ज झाला. हा अर्जुनच हे पाहून द्रोणाने त्याची स्तुति आरंभली. कर्णाने नेहेमीप्रमाणेच, अर्जुनाला आपली वा दुर्योधनाची सर येणार नाही अशी बढाई मारली! हा अर्जुन उघडकीस आला आहे तेव्हा माझे कामच झाले कारण तेरा वर्षे पुरी झालेली नाहीत असे दुर्योधनाने म्हटले. अर्जुन प्रगट झाल्यामुळे भीष्म, द्रोण विचारांत पडले. कर्णाने ’मी एकटाच अर्जुनाचा सामना करतों’ अशी फुशारकी मारली. कृप व अश्वत्थामा यांनी त्याला बजावले कीं ’तूं अर्जुनाप्रमाणे एकट्याने कधीहि पराक्रम गाजवलेला नाहीस. सर्वांनी मिळून एकजुटीने अर्जुनाशीं सामना केला नाही तर निभाव लागणार नाही.’ कर्णाला क्षमा करा असें त्यांना भीष्माने म्हटले. भीष्माने सौरमानाचे गणित मांडून आज सकाळीच अज्ञातवास पुरा झाला आहे असे म्हटले ते सपशेल नाकारून दुर्योधनाने युद्धाची तयारी केली. दुर्योधन एकटाच गोधन घेऊन ह्स्तिनापुराकडे वळला व सर्व कौरववीर अर्जुनाला अडवून युद्धाला उभे राहिले. अर्जुनाने प्रसंग ओळखून, प्रथम दुर्योधनावरच हल्ला करून व त्याला हरवून गोधन मुक्त केले. नंतर सर्व कौरववीरांशी धैर्याने व कौशल्याने युद्ध करून सर्वांस पराभूत केले. अर्जुनाने कर्णबंधु संग्रामजित याला कर्णाच्या उपस्थितीतच मारल्यावर कर्ण व अर्जुन यांचा सामना झाला. अत्यंत त्रस्त व भयभीत होऊन कर्णाने पळ काढला. सर्वांचा अर्जुनाने पुन्हापुन्हा पराभव केल्यावर, भीष्माने, ’गोधन तर गेलेच आहे, आतां आपण सर्वांनी जीव वांचवून परत फिरावे’ असा सल्ला दिला. कौरव परत जात आहेत हे पाहून अर्जुनानेहि युद्ध आवरते घेतले. या एकूण युद्धप्रसंगांत अर्जुनाच्या अस्त्रबळापुढे कोणाचेहि चालले नाही व कर्णाचा पूर्न तेजोभंग झाला. या प्रसंगानंतर कर्णाने कधीहि बढाया मारल्या कीं अश्वत्थामा, कृप व द्रोण त्याला या प्रसंगाची आठवण देत! कर्णाच्या बळाच्या मर्यादा याही प्रसंगी दुर्योधनाला स्पष्ट दिसून आल्या तरी त्याचा कर्णावर भरवसा कायम राहिला हे नवलच!
यापुढील कर्णचित्रण पुढील भागांत वाचा.
महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
Friday, October 24, 2008
Monday, October 13, 2008
महाभारतातील कर्णकथा - भाग ८
पांडव बारा वर्षांच्या वनवासासाठी गेले. या काळात कर्णाची कसोटी लागण्याचा प्रसंग उद्भवला. मात्र कसोटीच्या वेळी तो पूर्णपणे उणाच ठरला. वनात गोधनाच्या पाहणीच्या निमित्ताने जावयाचे व आपले वैभव दाखवून पांडवाना खिजवायचे हा बेत दुर्योधनाला शकुनि व कर्ण यानीच सुचवला. दुर्दैवाने द्वैतवनात दुर्योधनाची गाठ चित्रसेन गंधर्वाशी पडली व युद्धप्रसंग उभा राहिला. कर्णाच्या नेतृत्वाखाली कौरवांनी गंधर्वाचा सामना केला. मात्र गंधर्वांपुढे मात्रा न चालून, कर्णाला जीव वांचवण्यासाठी विकर्णाच्या रथावर बसून पळून जावे लागले. गंधर्वांनी दुर्योधनावर मात करून त्याला बंदी बनवले. सैनिकांनी पळून जाऊन पांडवांना हकीगत कळवली तेव्हां कुरुकुळाचा अभिमान धरून, वयं पंचाधिकं शतं असे भीमार्जुनाना समजावून त्याना गंधर्वांशी सामना करावयास पाठवले. त्यांनी दारुण युद्ध करून गंधर्वांचा पराभव करून दुर्योधनाला सोडवले. युधिष्ठिराने दुर्योधनाची समजून घालून, ’पुन्हा असे साहस करू नको’ असे सांगून हस्तिनापुरास परत जाण्यास सांगितले. अपमानाने व अपरिमित लाजेने दुर्योधन विमनस्क होऊन, परतीच्या वाटेवर बसूनच राहिला. पराजित होऊन पळून गेलेला कर्ण खूप दूर गेलेला असावा. कारण येवढा वेळ गेल्यावर मग सावकाश तो दुर्योधनापाशी परत आला व त्याला बांधवांसह सुखरूप पाहून, दुर्योधनानेच गंधर्वांवर विजय मिळवला असे वाटून, त्याने दुर्योधनाचे अभिनंदन केले! दुर्योधनाने कर्णावर राग न धरता, त्याला सत्य परिस्थिति सांगितली. कर्ण हतबुद्धच झाला! दुर्योधनाने हाय खाऊन ’आपण हे अपेशी मुख घेऊन हस्तिनापुराला येणार नाही व भीष्मद्रोणविदुरांना भेटू शकत नाही’ असे म्हणून बैठक मारली. दु:शासन शोकाकुल झाला. कर्णाने व शकुनीने कशीबशी दुर्योधनाची समजूत घातली. पांडवांच्या पराक्रमाची, ’ते कुरुराज्याचे नागरिक, तेव्हा तुझे रक्षण करणे त्यांचे कर्तव्यच होते, ते त्यानी केले, त्याचे काय येवढे मोठेसे?’ अशी वासलात लावली! त्यानंतर नेहेमीप्रमाणेच कर्णाने ’तेरा वर्षांनंतर युद्धात मी अर्जुनाला मारीन’ अशी प्रतिज्ञा केली. कर्णावरच्या दुर्योधनाच्या भरंवशाला अजूनहि तडा गेला नव्हता हे नवलच! सर्वजण तोंडे लपवीत हस्तिनापुराला परत गेले. सर्व हकिगत कळल्यावर भीष्माने, ’धनुर्वेद, शौर्य व धर्माचरण यांत कर्ण हा पांडवांच्या चतुर्थांशहि योग्यतेचा नाही’ असे दुर्योधनाला स्पष्ट सांगितले. या निंदेने राग येऊन कर्णाने दुर्योधनाच्या वतीने दिग्विजय केला व दुर्योधनाला एक खास यज्ञ करण्याचा अधिकार मिळवून दिला. कर्णाच्या पराक्रमाचे हे एकुलते एक उदाहरण म्हणावे लागेल. कर्णाच्या खालावलेल्या प्रतिमेला उजाळा देण्यासाठी हे प्रकरण मागाहून घुसडलेले असावे असे माझे मत आहे. अध्याय २५४ मध्ये ३१ श्लोकांमध्ये हे प्रकरण उरकले आहे! सर्व राजेलोकाना भेटून त्याना दुर्योधनाच्या पक्षाला वळवण्यासाठी या सदिच्छाभेटी असाव्या असे वाटते.
यानंतर अज्ञातवासाच्या अखेरीला पुन्हा कर्णाची कसोटी लागली त्याबद्दल पुढील भागात वाचा.
यानंतर अज्ञातवासाच्या अखेरीला पुन्हा कर्णाची कसोटी लागली त्याबद्दल पुढील भागात वाचा.
Sunday, October 5, 2008
महाभारतातील कर्णकथा - भाग ७
राजसूय यज्ञ आटपल्यावर काही काळ कॊरव इंद्रप्रस्थात राहून मग हस्तिनापुराला परत आले. पांडवांचा उत्कर्ष व वैभव सहन न होऊन, त्यांचा नाश करण्यासाठी दुर्योधनाने शकुनीच्या सल्ल्याने द्यूताचा बेत ठरवला व बर्याच प्रयत्नांनी व युक्तिवादाने तो धृतराष्ट्राच्या गळी उतरवला. हा बेत ठरवण्यात कर्णाचा काही सहभाग नव्हता. युधिष्ठिर पांडवांसह द्यूतासाठी हस्तिनापुराला आल्यावर ज्यांना भेटला त्यांच्या नामावळीत कर्णाचे नाव येते. द्यूतसभेत अर्थातच तो उपस्थित होताच. द्यूतामध्ये युधिष्ठिर सर्वस्व हरून भावांना व नंतर स्वत:लाही पणाला लावून हरला. नंतर शकुनीच्या चिथावणीने त्याने द्रौपदीला पणाला लावली. त्यावेळी दु:शासनाला व कर्णाला अपार आनंद झाला असा त्याचा प्रथम उल्लेख द्यूतप्रकरणात येतो. हाही पण युधिष्ठिर हरला. दुर्योधनाने प्रथम दूत प्रातिकामीला द्रौपदीला दरबारात घेऊन येण्यास पाठवले. तिने प्रश्न उभा केला कीं युधिष्ठिर प्रथम स्वत:ला पणाला लावून हरला व मग मला पणाला लावले काय? तिने प्रातिकामीला दाद दिली नाही तेव्हा दु:शासन स्वत:च गेला व त्याने तिला बळाने ओढून आणले. दरबारातहि तिने तोच प्रश्न पुन्हा विचारला. पांडव काहीच बोलूं वा करूं शकत नव्हते. दु:शासनाने तिला जोरात हिसडले व ’दासी’ असे संबोधिलें. तें ऐकून कर्ण आनंदाने बेहोष झाला! (शब्दयोजना माझी नव्हे, महाभारताची!) त्याने दु:शासनाला शाबासकी दिली. या प्रसंगी, येथपासून, कर्णाचे सर्व वर्तन अति अनुचित व बेतालपणाचे झाले.
द्रौपदीच्या प्रश्नावर भीष्मही काही उत्तर देऊ शकले नाहीत. ’शकुनीने आपली वंचना केली असे युधिष्ठिर म्हणत नाही’ एवढेच त्यानी दाखवून दिले. भीमाने युधिष्ठिराची कठोर निंदा केली व त्याचे हातच जाळून टाकण्याची इच्छा व्यक्त केली. अर्जुनाने त्याला आवरून धरले. द्रौपदीने पुन्हापुन्हा आपला प्रश्न विचारला. कोणीहि उत्तर देईना. अखेर विकर्णाने तिच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला, सर्व उपस्थितांची निंदा केली व युधिष्ठिर प्रथम स्वत:ला पणाला लावून हरला व नंतर शकुनीच्या चिथावणीने त्याने द्रौपदीला पणाला लावली. ती पांचांची पत्नी, तिला पणाला लावण्याचा युधिष्ठिराला काय अधिकार होता? त्यामुळे ती जिंकली गेलेली नाहीच असे स्पष्ट मत दिले. यावर इतर कोणी काही बोलण्याआधीच, कर्णाने क्रोधाने खवळून जाऊन, त्याचा प्रतिवाद केला. ’द्रौपदीने पुन्हापुन्हा डिंवचूनहि पांडव काहीच बोलत नाहीत. द्रौपदीला आम्ही धर्मानेच जिंकिले आहे. तूं लहान आहेस, तुला कळत नाही, युधिष्ठिर सर्वस्व हरला त्यात द्रौपदीचा समावेश नाही काय? द्रौपदी आम्ही जिंकली असे शकुनि ओरडून म्हणाला त्यालाहि पांडवांनी कसलाहि विरोध केला नाही मग ती जिंकली गेली नाही असे तुला कसे काय वाटते?’ अशी त्याची कर्णाने हेटाळणी केली. द्रौपदीला एकवस्त्रा असताना सभेत ओढून आणली याचेहि त्याने, निर्लज्जपणे समर्थन केले व ते करताना त्याच्या मनातील सर्व विखार बाहेर पडला. ’द्रौपदी ही पांचाची पत्नी तेव्हां ती वेश्येसमानच आहे व आतां तिला आम्ही जिंकले आहे तेव्हां ती एकवस्त्रा असली काय वा विवस्त्रा असली काय सारखेच,’ असे म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. ’हा विकर्ण पोरकट आहे, त्याच्याकडे लक्ष देऊं नको, दु:शासना, तूं खुशाल पांडवांची व द्रौपदीची वस्त्रे हिसकावून घे’ अशी त्याने दु:शासनाला चिथावणी दिली. कर्णाबद्दल प्रेम वा आदर वाटणार्या लेखकांनाही त्याच्या या प्रसंगीच्या सर्वस्वी असभ्य व अनुचित वर्तनाचे समर्थन करणे शक्य नाही. वास्तविक हा कुरुकुळाचा अंतर्गत प्रश्न होता व पांचालांच्या कन्येच्या प्रतिष्ठेचाहि होता. याचे परिणाम फार दूरवर पोचू शकणार होते. दुर्योधनाचा मित्र व हितकर्ता या नात्यानेहि त्याला संयम बाळगण्यास सांगणे हे कर्णाला शोभून दिसले असते. पण त्याचा तोल पूर्णपणे सुटला. द्रौपदीचा प्रश्न भीष्माने व खुद्द दुर्योधनानेहि पांडवांवरच सोपवला व पांडव म्हणतील ते मी मान्य करीन असे त्याने म्हटले. दुर्योधन थोडातरी ताळ्यावर होता! कर्णाने पुन्हा, पांडवांच्या उत्तरासाठी न थांबतां, खुद्द द्रौपदीलाच ऐकवले की ’तूं दासी झालीस, आतां दुर्योधनाच्या अंत:पुरात जा व त्याच्या परिवाराची सेवा कर!’
अर्जुनाने बोलावयास सुरवात केली कीं युधिष्ठिर स्वत:ला पणाला लावून हरल्यावर तो कोणाचा स्वामी उरला?
आता द्रौपदी जिंकली गेलेली नाही असे दुर्योधनाला मान्य करावे लागणार होते. पण एव्हाना धृतराष्ट्राला बहुधा, द्रौपदीच्या झालेल्या घोर अपमानाचे दुरगामी परिणाम ’दिसू’ लागले असावे. त्याने अधिक वाट न पाहतां द्रौपदीला वर माग म्हटले, तिने फक्त, सर्व पांडवाना त्यांच्या शस्त्रास्त्रांसह मुक्त करून घेतले पण स्वत:ला मुक्त करण्याची मागणी केलीच नाही! ती दासी झाली कीं नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहिला व कर्णासकट कोणीच तो पुन्हा उपस्थित केला नाही! कर्णाने अखेर द्रौपदीची स्तुति केली कीं पांडवांना संकटसागरातून तारून नेणारी ती नौकाच ठरली!
युधिष्ठिराने इंद्रप्रस्थाला परत जाण्याची परवानगी मागितली तेव्हा मात्र धृतराष्ट्राने द्यूताचा सर्व व्यावहारिक परिणाम पुसून टाकून त्याला सर्व वैभवासह परत जाण्यास सांगितले. पांडव व द्रौपदी निघून गेल्यावर दुर्योधन, दु:शासन व कर्ण यांचे डोळे उघडले. पांडव आपला सूड उगवतील या भीतीने त्यांची गाळण उडाली! त्यांनी पुन्हा नवीन बेत ठरवून धृतराष्ट्राच्या तो गळीं उतरवला व वाटेतूनच पांडवाना परत बोलावले व पुन्हा एकच पण लावून द्यूत खेळण्यास बसवले.
वनवास-अद्न्यातवासाचा पण उच्चारताना आम्ही हरलो तर आम्ही वनात जाऊ असे शकुनि म्हणाला. कौरव हरते तर शकुनि व कर्ण दुर्योधनाबरोबर वनात जाणार होते काय? हरण्याची त्याना शंकाच नव्हती! जर हरले असते तर कर्ण वनात गेला असता काय याबद्दल मला मात्र शंका आहे. ’मी काही कौरव नाही, मी फक्त प्रेक्षक आहे.’ असेच तो बहुधा म्हणाला असता!
युधिष्ठिर हरलाच, त्यामुळे प्रश्नच सरला.
पांडव वनात जाताना त्यानी व्यक्त केलेला त्वेष, केलेल्या सूड उगवण्याच्या प्रतिद्न्या यामुळे कौरवांबरोबरच कर्णाचीहि घाबरगुंडी उडाली. कोणतेहि धैर्य वा स्वाभिमान न दाखवता वा दुर्योधनाला धीर न देता, तो, दुर्योधन व दु:शासनाबरोबर, ज्याची तो नित्य हेटाळणी वा कुचेष्टा करी, त्या द्रोणाला शरण गेला! द्रोणाने मी पूर्णत: तुमच्या पक्षाला राहीन असे आश्वासन दिले.
या सर्व प्रसंगात कर्णाचे वर्णन महाभारतकारानी खलपुरुष असेच केले आहे व ते नजरेआड करणे वा पुसून टाकणे वा त्याच्या वर्तनाचे समर्थन करणे अशक्य आहे.
यापुढील कर्णकथा पुढील भागात.

Subscribe to:
Posts (Atom)