महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
Saturday, May 4, 2013
कृष्ण-कर्ण संवाद - भाग ४
या सर्व घटनांचा सुसंगत व तर्कशुद्ध कालानुक्रम माझ्या मते असा आहे.
१ शिष्टाई संपल्यावर कृष्ण कुंतीला भेटून लगेच परत गेला.
२ पांडवांकडे सर्व युद्धबेत ठरून सैन्यासह ते पुष्य नक्षत्रावर वा आधी कुरुक्षेत्रावर गेले.
३ कौरव सैन्यहि दुर्योधनाच्या आदेशाप्रमाणे पुष्य नक्षत्रावर कुरुक्षेत्री गेले त्यापूर्वीच कुंतीने कर्णाची गुप्तपणे गाठ घेऊन त्याचे मन वळवण्याचा असफल प्रयत्न केला. कदाचित तिने कृष्णाला गुपित सांगून कर्णाचे मन वळवण्याची त्याला सूचना केलीहि असेल पण कृष्णाने मात्र लगेचच तसे केले नव्हते. ‘तूंच त्याला भेट, तेच जास्त उचित’ असेच त्याने कुंतीला म्हटले असावे. मात्र कर्ण कौरव शिबिरात उपस्थित झालेला असल्यामुळे कुंतीचा प्रयत्न असफल झाल्याचे उघड झाले.
४ त्यामुळे कृष्णाने अखेरच्या क्षणी (मघा वा पूर्वा नक्षत्रदिनी, शिष्टाईच्या दिवशीं नव्हे,) युद्ध टाळण्याचा निर्वाणीचा प्रयत्न म्हणून कर्णाची गुप्त भेट घेतली. मी कुंतीपुत्र आहे हे मला माहीत आहे’ असे या भेटीत कर्ण कृष्णाला म्हणाला असा स्पष्ट उल्लेख आहे. कुंती भेटली तेव्हां मात्र तो असे काही म्हणाला नव्हता!. कुंती त्याला कृष्णाचे आधीच भेटली असेल तर कर्णाने कृष्णापाशी केलेले ते विधान सुसंगत आहे. मात्र दुर्योधनाची बाजू सोडण्याचे कर्णाने मानले नाहीच. उलट,‘तुझी-माझी भेट व माझे जन्मरहस्य गुप्तच राहूदे’ असे त्याने कृष्णाला विनविले.
५ तेव्हा, हाही प्रयत्न विफल झाल्यावर मात्र, कृष्णाने त्याला ‘तर मग आठ दिवसानी अमावास्येला युद्ध सुरू करूं’असे म्हटले व त्याप्रमाणे ते झाले
६ त्यानंतर मात्र कुंती, कर्ण व कृष्ण यानी कुंतीचे गुपित अखेरपर्यंत सांभाळले. कौरवांना ते कधीच कळले नाही. कृष्णाने ‘हे मला माहीत होते’ असे कोणाही पांडवापाशी वा इतर कोणाशीं कधीहि म्हटले नाही व अखेर कुंतीलाच ते युधिष्ठिरापाशी उघड करावे लागले. त्यावेळीहि कृष्णाने ‘हे मला माहीत होते’ असे युधिष्ठिराला म्हटले नाही! नाहीतर युधिष्ठिराने कुंतीप्रमाणेच त्यालाही दोष दिला असता.
या घटनाक्रमामध्ये कोणतीहि अनैसर्गिक वा अतार्किक गोष्ट नाही.
या संदर्भातील उल्लेख केलेल्या विसंगति महाभारतात कालांतराने भर पडताना अनवधानाने आल्या असाव्या असे वाटते.
Wednesday, May 1, 2013
कृष्ण-कर्ण संवाद - भाग ३
मुळात या तथाकथित कृष्ण-कर्ण संवादाचा उल्लेखहि महाभारतात सरळ निवेदन-रूपाने आलेला नाहीं. महाभारत म्हणते, कृष्णाने कर्णाला परत जाताना आपल्या रथावर घेतले होते वत्यांची दीर्घ चर्चा झाली हे कळल्यामुळे, (कदाचित काळजी वाटून), धृतराष्ट्राने 'त्यांचे काय बोलणे झाले?' असे संजयाला विचारले व मग संजयाने ते सर्व धृतराष्ट्राला सांगितले! हे अशक्यच वाटते! कुंतीने आयुष्यभर जपलेले गुपित तिने, नाइलाजाने, कृष्णाला आणि कृष्णाने ते कर्णाला सांगितले असे घटकाभर मानले तरी ते संजयाला कसे कळणार? आणि संजयाला कळून त्याने धृतराष्ट्राला सांगितले तर मग ते फुटलेच कीं व मग अर्थातच दुर्योधन-भीष्म-द्रोणापासून युयुत्सुपर्यंत सर्वच कौरवांना कळले म्हटले पाहिजे! एकट्या युधिष्ठिरापासूनच ते गुह्य राहिले? हे अतर्क्यच आहे. तेव्हां हा संजय-धृतराष्ट्र संवाद प्रक्षिप्त मानला पाहिजे. कृष्ण-कर्ण भेट होणे व कृष्णाने युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न करणे त्याच्या शिष्टाईच्या भूमिकेशी सुसंगत आहे. मात्र हा प्रसंग (मागाहून केव्हा तरी, कदाचित कृष्ण माहात्म्य वाढवण्यासाठी) महाभारतात शिरला तेव्हा तो सरळ निवेदन रूपाने न येता, गफलतीने, संजय-धृतराष्ट्र संवाद रूपाने शिरला! (शिष्टाई संपवून परत जाण्यापूर्वी कृष्ण कुंतीला भेटला तेव्हां तिने त्याचेबरोबर आपल्या मुलांना ‘आतां सर्व शक्तीनिशी युद्ध करा, तेच क्षत्रिय या नात्याने तुमचे कर्तव्य आहे’ असा स्पष्ट आदेश दिला. हा विदुराघरी झालेला संवादहि धृतराष्ट्राला कळला व त्याने पुन्हा एकदा दुर्योधनाला उपदेश केला असा उल्लेख आहे! हे धृतराष्ट्राला कसे कळले याचा मात्र काही खुलासा केलेला नाही.) मग खरोखर काय घडले?
Saturday, April 27, 2013
कृष्ण-कर्ण संवाद - भाग २
कृष्ण उपप्लव्याहून शिष्टाईसाठी निघाला त्यादिवशी ‘रेवती’ नक्षत्र होते असा उल्लेख आहे. मार्गात एकच रात्र कृष्णाने मुक्काम केला व दुसर्या दिवशी तो हस्तिनापुराला पोचला असे म्हटलेले आहे. त्या दिवशी दुर्योधनाचे आतिथ्य नाकारून तो विदुराकडे मुक्कामाला राहिला. तिसरे दिवशी कौरवदरबारात शिष्टाई झाली. संध्याकाळपर्यंत ती अयशस्वी ठरून कृष्ण विदुराकडे परत येऊन कुंतीला भेटला व मग पांडवांकडे परत निघाला. या दिवशी ‘भरणी’ नक्षत्र असणार कारण रोज एक नक्षत्रातून चंद्र पुढे जातो. हा कार्तिक मास होता हे गृहीत धरल्यास अमावास्येला चंद्र ‘ज्येष्ठा’नक्षत्रापर्यंत पोचणार होता. (पौर्णिमेला-शिष्टाईच्यादुसर्या दिवशी-तो कृत्तिका नक्षत्रात पोचणार होता कारण हा कार्तिकमास). ‘भरणी’ पासून ‘ज्येष्ठा’पंधरा नक्षत्रे पुढे आहे! तेव्हां शिष्टाईच्या या दिवसापासून आठच दिवसानी अमावास्या येणे शक्यच नाही! तेव्हां जर कृष्णाने ‘आठ दिवसांनी अमावास्या आहे त्या दिवशी युद्ध सुरू करूं’ असे कर्णाला म्हटले असेल तर हा संवाद झाला त्या दिवशी ‘मघा’ किंवा ‘पूर्वा’ नक्षत्र असले पाहिजे होते जे शिष्टाईच्या दिवशीच्या भरणी नक्षत्रानंतर ७-८ दिवसांनी येणार होतें! तोंवर कृष्ण हस्तिनापुरात होता कोठे? तो केव्हाच परत गेला होता!
कृष्ण शिष्टाईच्याच दिवशी परत गेला असला पाहिजे असे दुसर्या संदर्भावरूनहि निश्चित ठरते. पांडवांकडे तो परतल्यावर मग शिष्टाईबद्दल सर्व चर्चा झाली, युद्ध अटळ आहे हे स्पष्ट झाले, मग पांडवपक्षाच्या सर्व वीरांची बैठक झाली, चर्चेअंती धृष्टद्युम्नाला सेनापति नेमले गेले, पांडव वीर व सैन्य कुरुक्षेत्रावर पोचले, रुक्मीने येऊन सहाय्य देऊ केले ते पांडवानी उडवून लावले व तो निघून गेला वगैरे घटना घडल्या. मग बलराम शिबिरात आला व युद्ध होणारच हे कळल्यावर,‘मला हे युद्ध पहावयाचे नाही म्हणून मी तीर्थयात्रेला जातो’असे कृष्णाला व पांडवाना म्हणून लगेच शिबिर सोडून गेला. येथे नक्षत्राचा उल्लेख नाही. तो नंतर भीम-दुर्योधन गदायुद्ध १८व्या दिवशी झाले तेव्हां उपस्थित झाला. त्याने तेव्हां मात्र म्हटले कीं ‘मी पुष्य नक्षत्रावर निघालो होतो तो आज श्रवण नक्षत्रावर (४२ दिवसानी) परत येतो आहे.’अर्थ इतकाच कीं पुष्य नक्षत्राच्या बलराम-पांडव भेटीच्या व आधीच्या पांडवशिबिरातील वर वर्णन केलेल्या सर्व घटनांच्या दिवशीहि कृष्ण पांडवांच्या शिबिरात होता. ‘भरणी’ नक्षत्राच्या शिष्टाईच्या दिवसापासून या सर्व घटनांमध्ये ४-५ दिवस गेले होते. मग कृष्ण कर्णाला भेटला असेलच तर यानंतर दुसर्या वा तिसर्या दिवशी, मघा वा पूर्वा नक्षत्राच्या दिवशीं, गुप्तपणे भेटला काय?
Tuesday, April 23, 2013
कृष्ण – कर्ण संवाद.
बर्याच काळानंतर आज पुन्हा एकदा या ब्लॉगवर काही लिहिण्याचा विचार आहे.
कृष्णशिष्टाई या विषयावर पूर्वी या ब्लॉगवर दीर्घ लेखन केले आहे. त्यातील अखेरचा भाग म्हणजे कृष्ण-कर्ण संवाद. संक्षिप्तपणे हकिगत अशी -
कौरव-पांडव युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्णाने कौरवदरबारात जाऊन पांडवांची बाजू मांडून आटोकाट प्रयत्न केले. दुर्योधनाने अज्ञातवास पुरा केल्याचा पांडवांचा दावा सपशेल फेटाळून लावला व राज्य पाहिजे तर आणखी बारा वर्षे वनवास करा असा जबाब दिला. शिष्टाई असफल झाल्यानंतर परत जाताना कृष्णाने कर्णाला आपल्याबरोबर आपल्या रथावर घेऊन वाटेत त्याला ‘तूं कुंतीपुत्र आहेस म्हणून दुर्योधनाची बाजू सोडून दे व पांडवपक्षात ये’ असे आवाहन केले. मात्र ते कर्णाने नाकारले. अखेर त्याचा निरोप घेताना कृष्णाने ‘ आठ दिवसानी अमावास्या आहे, त्या दिवशी कुरुक्षेत्रावर भेटूं व युद्ध सुरू करूं’असा कौरवांसाठी निरोप दिला व मग कृष्ण पांडवांकडे परतला असा कथाभाग महाभारतात आहे. तो सर्वसाधारणपणे खरा मानला जातो व मलाहि तसे पूर्वी वाटत होते. मला एकच प्रश्न पडला होता कीं कर्णाचे जन्मरहस्य कृष्णाला कसे माहीत असणार? त्यावर मलाच सुचलेले उत्तर असे होते कीं शिष्टाई विफल झाल्यावर संध्याकाळी, परत जाण्यापूर्वी कृष्ण कुंतीला भेटला होता तेव्हां खुद्द कुंतीनेच हे रहस्य कृष्णाला सांगून ‘अवश्य तर हे तूं कर्णाला सांग पण कर्ण व पांडव या भावांचा युद्धप्रसंग टाळ’असे त्याला म्हटले असेल! (कर्णाने कृष्णाला दाद दिली नाही असे कळल्यावर मग तिने अखेरचा प्रयत्न म्हणून स्वतःच कर्णाची भेट घेतली व ‘तूं माझा पुत्र आहेस तेव्हां कौरवांची बाजू सोड’असे विनवले, तेहि कर्णाने मानले नाहीच.) या कृष्ण-कर्ण भेटीनंतर आठ दिवसानी कार्तिक अमावास्या होती व त्या दिवशी युद्ध सुरू झाले असे मानले जाते पण हा कालानुक्रम व घटनाक्रम खरा आहे काय? कित्येक उल्लेख याचेशी विसंगत आहेत.
Wednesday, January 23, 2013
द्रोणाचार्याचे वय.
द्रोणाचार्याचा उल्लेख नेहेमी भीष्माचे जोडीने, भीष्म-द्रोण असा होत असल्यामुळे ते वयाने वरोबरीचे असावे असा चटकन समज होतो. मात्र तसे नव्हते. भीष्म हे कौरवपांडवांचे नात्याने आजोबा, पण प्रत्यक्षात पणजोबा शोभतील एवढे मोठे होते. कारण सत्यवतीने शंतनूशी विवाह केला तेव्हा देवव्रत, म्हणजे भीष्म, स्वतःच तरुण वयाचा होता. त्यामुळे कोरवपांडवांचा आजोबा, विचित्रवीर्य हा भीष्माचा, नात्याने भाऊ खरा,पण वयाने मुलगा शोभला असता.
द्रोणाचार्य हे कौरवपांडवांचे गुरु. त्यांचा पुत्र अश्वत्थामा हा कोरवपांडवांच्याच वयाचा होता व त्यांच्याबरोबरच पित्यापाशी धनुर्वेद शिकला. तेव्हां द्रोणाचार्य हे कौरवपांडवांचे वडील शोभतील अशाच वयाचे होते. धृतराष्ट्र, विदुर, द्रोण, कृप (अश्वत्थाम्याचा मामा) व द्रुपद – हा तर द्रोणाचा सहाध्यायी - हे साधारण एकाच वयाचे म्हणतां येतील. त्यामुळे भीष्म या सर्वांच्या दोन पिढ्या आधीचा व म्हणून त्यांचेपेक्षा ४५-५० वर्षानी मोठा असला पाहिजे. भारतीय युद्धाचे वेळी दुर्योधन, दुःशासन, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, कृष्ण, अश्वत्थामा हे साधारण ५० ते ५५ वयाचे, कर्ण त्यांचेपेक्षा ७-८ वर्षांनी मोठा, द्रोण, द्रुपद कृप हे ७० ते ८० वयाचे तर भीष्म १२५ वर्षांचा असावा असा तर्क करतां येतो.
भीष्म-द्रोण असा जोडीने उल्लेख नेहेमी होत असल्यामुळे ते समकालीन असल्याचा उगीचच गैरसमज होतो. पण ते खरे नाही!
Wednesday, January 16, 2013
सुईच्या अग्रावर - आणखी एक गैरसमजूत - छोटीसी!
Saturday, January 12, 2013
महाभारताबाबत काही गैरसमजुती - भाग ७ -कर्ण व शल्य
नवीन लिखाणाला सुरवात, जेथे थांबलो होतो तेथूनच करतो आहे. कर्ण-शल्य परस्पर संबंधाबद्दल काही गैरसमज आहे तो तपासून पाहूं. शल्य हा महारथी, मोठ्या मान्यवर घराण्याचा राजा व त्याचा एक वेगळाच लौकिक म्हणजे तो सारथ्यकर्मामध्ये अतिशय कुशल होता व त्याचा त्याला फार अभिमान होता. सारथ्य हे सूतांचे काम पण अनेक क्षत्रिय राजे त्यात तरबेज होते. नलराजा, ऋतुपर्ण, ही नावे पूर्वीच्या काळची पण खुद्द श्रीकृष्ण व अर्जुन हेहि प्रख्यात होते.
दुर्योधन जेव्हा शल्याला युद्धापूर्वी भेटला व त्याला आपल्या पक्षाला वळवून घेतले तेव्हा शल्याने त्याला विचारले कीं तुझी काय अपेक्षा आहे. नवल म्हणजे दुर्योधनाने त्याला म्हटले कीं 'तूं माझा सेनापति हो!’ आपल्या पक्षात भीष्म, द्रोण, कर्ण असताना त्याना बाजूला सारून शल्याला तो सेनापति कसा करणार होता? कदाचित भीष्मद्रोण युद्धनिवृत्त तर राहणार नाहीत ना अशी त्याला शंका असावी. तसे झालेच तर सेनापतिपदाचा भार शल्यावर ठेवून कर्णाला अर्जुनाशी टक्कर देण्यासाठी मोकळे ठेवावे असा त्याचा विचार असेल! पांडवानी, धृष्टद्युम्नाला सेनापति केले आणि भीम-सात्यकी-अर्जुनाला मोकळे ठेवले होते.
प्रत्यक्षात भीष्म व द्रोण यानी १५ दिवस सेनापतिपद सांभाळले. १६ व्या दिवशी शल्याने सेनापतिपदाचा आग्रह न धरता, उदार मनाने ‘कर्णाला सेनापति कर, तोच आपली ढासळती बाजू सावरू शकेल’ असा सल्ला दुर्योधनाला दिला. कर्णाने एक अवघड पेच दुर्योधनापुढे टाकला. ‘अर्जुनाचे सारथ्य खुद्द कृष्ण करतो आहे, तेवढ्या लायकीचा सारथी मला नसल्यामुले माझी बाजू लंगडी पडते तेव्हा कृष्णाच्या बरोबरीचा सारथी आपल्या पक्षात एकच आहे तो म्हणजे शल्य. त्याला तू गळ घाल!’ खरे तर शल्य हा स्वतः महारथी होता त्याला सारथ्य करावयास सांगण्याने एक महारथी प्रत्यक्ष युद्धातून बाजूला पडणार होता. कौरव पक्षाचे अनेक जण मारले गेल्यामुळे हे योग्य नव्हते. तरीहि कर्णावर विसंबून, दुर्योधनाने शल्याला विनंति केली! शल्याच्या वाट्याला सेनापतिपदाऐवजी सारथ्य आले! तरीहि ‘कर्णा, तूं मला कृष्णाच्या बरोबरीचा सारथ्यकुशल मानतोस हा माझा मोठाच सन्मान आहे’ असे म्हणून त्याने संमति दिली! मात्र मी क्षत्रिय राजा व कर्ण हा अखेर सूतपुत्रच तेव्हां सारथ्य करताना मी काहीहि बोललो तरी कर्णाने ते मुकाट्याने ऐकले पाहिजे एवढीच अट घातली व नाइलाजाने दुर्योधन-कर्णाने ती मानली!
१६व्या युद्धदिवशी सारथ्याला सुरवात करताना शल्य-कर्णामध्ये बरीच अश्लाघ्य वादावादी झाली. ती प्रक्षिप्त आहे असेहि मानले जाते. उलट शल्याने कर्णाची उदार मनाने भरपूर स्तुति करून ‘दुर्योधनाचे मनोरथ तूंच पूर्ण करू शकतोस तर तें तूं कर’असे म्हटले. दोन दिवस उत्तम सारथ्य करून कर्णाला अपेक्षित असलेले कौशल्य दाखवले. दुसर्या दिवशी सायंकाळी अर्जुन-कर्ण आमनेसामने येऊन जोरदार युद्ध सुरू असताना. कर्णाच्या रथाचे चाक भूमीत रुतले.
गैरसमज असा आहे कीं कर्णाने शल्याला म्हटले कीं ‘तूं खालीं उतरून खटपट करून ते सोडव.’ मात्र 'मी मूर्धाभिषिक्त राजा आहे तेव्हां मी हे करणार नाहीं, तूंच खालीं उतर.’ असे शल्याने त्याला झिडकारले. त्यामुळे कर्णाला धनुष्य टाकून खालीं उतरावे लागले. मात्र प्रत्यक्षात, कर्णाने शल्याला असे म्हटल्याचा व शल्याने नाकारल्याचा उल्लेख महाभारतात मुळीच नाही. हा एक गैरसमजच आहे.
मात्र कर्ण शल्याला विनवण्याच्या वा नकार ऐकण्याच्या भानगडीत पडलाच नाही. चाक बाहेर काढण्याची खटपट कर्णाला स्वतःच खाली उतरून करावी लागली. कृष्णाने अर्जुनाला स्पष्टपणे म्हटले कीं 'प्रबळ शत्रु अडचणीत आलेला असताना त्याला सवलत देण्याचा अडाणीपणा करूं नको! शहाणे लोक असे करीत नाहीत.' अर्जुनाने ते ऐकले व जमेल तसा प्रतिकार अखेरपर्यंत करतच असलेल्या कर्णाचा वध केला.
Friday, January 11, 2013
पुन्हा सुरवात.
सर्व वाचक मित्राना नम्र अभिवादन करून या ब्लॉगवर पुन्हा काही लिहिण्यास सुरवात करीत आहे. एक वर्ष अमेरिकेत होतो व महाभारत येथे कपाटबंद होते. लिहिण्यासारखे बहुतेक सर्व लिहून झाले होते. त्यामुळे नवीन लिखाण बंद झाले होते. मात्र तरीहि वाचकांच्या ब्लॉगला भेटी होतच आहेत असे दिसून येई. कधीमधी पसंतीच्या इमेलहि मिळत होत्या. काही कॉमेंट्सही लिहिल्या जात होत्या. अमेरिकेतहि हा ब्लॉग वाचणारे अनपेक्षितपणे भेटत.
हल्लीच काही थोड्या काळापुरता पुन्हा मुंबईस आलो आहे. कपाटातील महाभारत खुणावत आहे. (त्याला आणखीहि एक कारण झाले आहे. तो एक स्वतंत्र विषय आहे.) तेव्हां या ब्लॉगवर पुन्हा काही नवीन लिहिण्याचा विचार आहे. वाचक पूर्वीप्रमाणेच लाभतील अशी आशा आहे.
Subscribe to:
Posts (Atom)