आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Tuesday, March 10, 2015

कृष्ण आणि पांडवांचे आयुर्मान


भारतीय युद्धानंतर पांडव व कृष्ण ३६ वर्षे जगले असे महाभारत म्हणते. त्यावेळी त्यांचे किती वय झाले होते? ते स्पष्ट्पणे लिहिलेले मला आढळले नाही. पण अंदाज बांधता येतो. युद्धसमयी अभिमन्यूचे वय २५ वर्षे असावे असे मी पूर्वीच्या एका लेखात म्हटले आहे. अर्जुनाचे सुभद्रेशी लग्न झाले तोवर तो किमान ३५ वर्षांचा झाला होता. कारण, लाक्षागृहातून सुटल्यावर काही वर्षे वनात व एक वर्ष एकचक्रा नगरीत गेलीं. द्रौपदीशी विवाह झाल्यावर २-३ वर्षातच त्याला घराबाहेर पडावे लागले. उलुपी, चित्रांगदे बरोबर २-३ वर्षे घालवून मग तो द्वारकेला गेला. तोवर तो सहजच ३५ वर्षांचा झाला होता. युद्धसमयीं त्यामुळे त्याचे वय ६० असले पाहिजे. त्यावर ३६ अधिक मोजले कीं त्याचे आयुष्य ९६ ते १०० ठरते. कृष्ण अर्जुनापेक्षा थोडासाच मोठा कारण तो भीमाच्या वयाचा. कृष्ण पांडवांचे आधीच थोडा काळ मृत्यु पावला तेव्हा त्याचेहि आयुष्य १०० चे जवळपासच म्हटले पाहिजे. श्री निलेश ओक यानी ते ११६ वर्षे होते असे म्हटले आहे ते पटत नाही कारण ते मानले तर युद्धसमयी अर्जुन, भीम, कृष्ण, दुर्योधन सर्व जवळपास ८० वर्षांचे तर कर्ण ८७-८८ वर्षांचा होता असे ठरते. अभिमन्यूच्या जन्माचे वेळी अर्जुन ५५ वर्षांचा मानावा लागतो. हे सर्व अवास्तव वाटते. पटते का पहा!

Saturday, March 7, 2015

कर्णाचा रथ चिखलात कां रुतला?


भारतीय युद्धामध्ये दोन्ही पक्षांकडून अनेक रथी-महारथी लढले. सतराव्या दिवसापर्यंत कोणाच्याही रथाचे चाक चिखलात रुतले नाही. सतराव्या दिवशी संध्याकाळी कर्णाच्या रथाचे चाक चिखलात रुतले. त्यानंतर अर्जुनाने त्याचा वध केला. कृष्णाने शिष्टाईच्या दिवशी परत जाताना कर्णाला म्हटले होते कीं आता पावसाळा संपला आहे, चिखलाचे नावहि नाही तेव्हा युद्धाला अनुकूल काळ आहे. प्रत्यक्षातहि कर्णाच्या एका अपवादाव्यतिरिक्त कृष्णाचे म्हणणे खरेच ठरले. कर्णाचा रथ कां रुतला या बद्दल माझा तर्क असा – अर्जुनाचे सारथ्य कृष्ण करत होता तर कर्णाचे, शल्य. कृष्ण अर्जुनाचा रथ नेहमीच अतिशय कौशल्याने चालवत होता. उदा. जयद्रथवधाचे दिवशी, अर्जुन द्रोणाचार्याशी लढत न बसतां पुढे निघून गेला. दुर्योधनाने द्रोणाला विचारले कीं असे कसे झाले? द्रोणाने म्हटले कीं कृष्ण रथ एवढ्या जोराने चालवतो कीं तो जाऊं लागल्यावर माझे बाणच त्याचेपर्यंत पोचेनात! असे इतरहि उल्लेख आहेत. शल्याचे कौशल्य कदाचित तुलनेने कमी पडत होते. दोन दिवस कर्ण-अर्जुन दोघांचे रथयुद्ध चालू होते. शत्रूला आपल्या रथाच्या अनुकूल बाजूला घेण्यासाठी दोन्ही सारथ्यांच्या आपल्या रथाच्या विशिष्ट हालचाली, डाव, प्रतिडाव चालले असणार. कृष्णाने हळूहळू शल्याला कुरुक्षेत्रातील उताराच्या, पाणथळ भागाकडे खेचले व त्याची हालचालींची जागा (maneuvering space) कमी करत आणली, अखेर चिखलभागापासून शल्य दूर राहू शकला नाही. व कर्णाच्या रथाचे चाक रुतले! कृष्णाच्या सारथ्यकौशल्याचा हा परिणाम होता. कृष्णाला दैवी गुण चिकटवणे मला मुळीच मान्य नाही. पण त्याच्या सारथ्यकौशल्याला दाद देणे योग्यच आहे.