आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Wednesday, April 9, 2008

पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ६


अर्जुन व कौरव यांच्या युद्धप्रसंगाची तिथि व पक्ष स्पष्ट्पणे सांगितलेलीं नाहीत. दुर्योधनाने म्हटले की त्रिगर्ताच्या स्वारीची तिथि सप्तमी ठरली होती. कौरव दुसऱ्या दिवशी चालून आले म्हणजे त्या दिवशी अष्टमी होती. पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाने कृष्णपक्ष चालू होता. ऋतु ग्रीष्म होता. अर्जुनाने शमीच्या झाडावरून शस्त्रे काढून घेतली हे खरे पण काहींच्या समजुतीप्रमाणे ही विजयादशमी नव्हती! महिना दुसरा अधिकमास चालू होता. द्यूत अनुद्यूताच्या प्रसंगाची तिथिहि सांगितलेली नाही त्यामुळे या दिवशी तोच महिना व तीच तिथि नव्हतीच ही वस्तुस्थिति थोडीशी नजरेआड होते. पांडवांच्या दृष्टीने ही बाब अडचणीची होती म्हणून ती हेतुपूर्वक झाकली आहे काय असा प्रश्न पडतो. भीष्माने पांडवांनी केलेला हिशेब उलगडून दाखवला पण त्याचे उघडपणे समर्थन केव्हाच केलेले नाही. इतर कुणीहि नाही. दुर्योधनाने या प्रसंगी व नंतर अखेरपर्यंत पण पुरा झाल्याचे कधीच मान्य केले नाही.
युद्धापूर्वी अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्णाने कौरवदरबारात पांडवांची बाजू मांडली तेव्हा त्यानेहि ’पण पुरा केल्याचा पांडवांचा दावा आहे’ एवढेच म्हटले त्याचे समर्थन केले नाही. धृतराष्ट्र, गांधारी व इतर अनेकांनी दुर्योधनाला युद्ध टाळ असा उपदेश केला पण ’पांडवांचा पण पुरा झाला आहे तेव्हा त्यांचे राज्य परत दिलेच पाहिजे’ असे कोणीहि म्हटले नाही! युद्धात तुझा सर्वनाश होईल अशी भीति घातली. दुर्योधनाला माहीत होते कीं केव्हातरी पांडवांशी लढावे लागणारच आहे व त्यालाहि खुमखुमी होतीच. यावेळी पांडवांची बाजू कच्ची असल्यामुळे भीष्म-द्रोण-कृप-अश्वत्थामा उघडपणे त्यांची बाजू घेण्याची शक्यता कमी होती. इतर राजांना समजावून आपल्या बाजूला वळवण्याची शक्यता होती.
प्रत्यक्षात तसेच झाले. राजेलोकांनी जी बाजू पटली ती घेतली! भीष्माची पंचाईत झाली. पांडवांच्या बाजूला सरळ मिळणे कठीण होते. द्रुपद हा पांडवांचा प्रमुख पाठीराखा असल्यामुळे द्रोणाला कौरवांची बाजू घेणे प्राप्तच होते. कृप व अश्वत्थामा दुसरे काय करणार? बलरामाने कृष्णाला सरळच सांगितले की ’पांडवांच्या दुर्दशेला युधिष्ठिर स्वत:च जबाबदार आहे. आपल्याला दोन्ही पक्ष नातेसंबंधाने सारखेच आहेत तेव्हा आपण दूर राहणे योग्य!’ युद्ध अटळ आहे असे दिसल्यावर बलराम उद्विग्न होऊन यात्रेला निघून गेला. कृष्णाला बलरामाशी मतभेद नको असल्यामुळे पांडवांच्या बाजूने प्रत्यक्ष युद्धात उतरणे शक्यच नव्हते! ’ न धरी शस्त्र करी मी’ यामागचे खरे कारण हे आहे! अर्जुनाचे सारथ्य करण्यालाहि बलरामाने आक्षेप घेऊ नये यासाठी आपले सैन्य त्याने दुर्योधनाला दिले! कोणत्याही परिस्थितीत बलराम कौरवपक्षाला मिळणे परवडणारे नव्हते!
सौरमान की चांद्रमान या वादात शास्त्र पांडवांचे बाजूने होते असे आज आपणाला वाटेल. पण जनव्यवहार चांद्रमानानेच चालत होता. भारतात हिंदु सत्ता आजतागायत चालू राहिली असती तर आजही कदाचित चांद्रवर्ष मान्यताप्राप्त असते. रविवार ऐवजी चतुर्थी-एकादशीच्या सुट्या घेतल्या असत्या व दर २९ महिन्यानी आपण एक अधिक पगार घेतला असता! तेव्हा दुर्योधनाचा राज्य देण्यास नकार हा पूर्णपणे अन्यायाचा म्हणता येईल काय? प्रश्नच आहे!
पांडवांना शक्य झाले असते तर त्यानी सहा अधिक महिने पुरे केले असते हे नक्की. मात्र तरीहि दुर्योधनाने राज्य परत दिले नसतेच कारण तो त्याचा प्रथमपासूनचा ठाम बेत होता. मात्र मग कदाचित युद्ध एका बाजूस पांडव, पांचाल, विराट, कदाचित कृष्ण व यादव, शल्य व दुसऱ्या बाजूस कौरव, कर्ण, द्रोण, कृप, अश्वत्थामा व शकुनि असे झाले असते!
पहिल्या भागात उपस्थित केलेल्या काही प्रष्नांची उत्तरे याप्रकारे मिळतात असे म्हणतां येईल.

10 comments:

प्रशांत said...

तुम्ही केलेलं विश्लेषण विचार करायला लावणारं आहे यात शंका नाही. महाभारतावरील इतरही विषयांवर तुम्ही केलेला अभ्यास वाचायला उत्सुक आहे. विशेषत: पांडूच्या मरणोत्तर पांडवांना घेऊन कुंती हस्तिनापुरात परतते तेव्हाच्या घटनांवर तुमचं भाष्य ऐकायला आवडेल.
सौरमानाने १३ वर्षे होतात तेव्हा त्यात अधिक मास येतात. मग चांद्रमानाने १३ वर्षे लवकर संपायला हवीत. माझ्या समजण्यात काहीतरी घोटाळा होतोय. कृपया सौरमानाने आणि चांद्रमानाने १३ वर्ष होण्याबद्दल अधिक माहिती द्यावी.

माझ्या आईच्या कवितांचा ब्लॉग मी सुरू केला हे खरं आहे, परंतु आता आई स्वत: तिथे कविता प्रकाशित करते.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

तुमच्या शंकेचा खुलासा करण्याचा प्रयत्न करतो. सौरवर्ष म्हणजे ३६५ दिवस. १३ सौरवर्षे म्हणजे ३६५x१३ = ४७४५ दिवस. तीन लीप इयरचे तीन जादा दिवस मिळून ४७४८ दिवस होतील. चांद्रवर्ष साधारण ३५४ दिवसांचे म्हणजे १३ वर्षांचे १३ x ३५४ = ४६०२ दिवस होतील. पण त्याकाळी भीष्माने म्हटल्याप्रमाणे दर ५८ महिन्यानी दोन अधिक महिने घेत असत. तेरा वर्षात असे तीन वेळा झाले तर सहा अधिकमहिने किंवा १७५-१७६ अधिक दिवस घ्यावे लागणार. ते मिळवले कीं १३ चांद्रवर्षांचा काळ ४६०२ + १७५ = ४७७७ दिवस होईल. हा काळ तेरा सौरवर्षांहून मोठा येतो. पांडवांनी सहा अधिक महिन्यांऎवजी फक्त पांच महिने व बारा रात्रीच अधिक मोजल्या. ५८ चांद्र महिन्यांवर दोन अधिक महिने या प्रमाणात १३ वर्षांच्या १३ x १२ = १५६ चांद्र महिन्यांवर पांच महिने व ११ १/२ दिवस एवढा अधिक काळ येतो. ११ १/२ दिवसांच्या बारा रात्री कां धरल्या याचा खुलासा केलेला आहेच.
महाभारतावरचे माझे लिखाण पसंत पडते असे दिसले तर पुष्कळ विषयांवर लिहिण्याचे मनात आहे.
मीहि माझ्या मामाच्या कवितांसाठी एक ब्लॉग सुरू केला आहे www.mamachyakavita.blogspot.com तो पहावा.

Vivek said...

This is an excellent analysis. I am interested to read your further posts and will follow this blog. Kindly keep it up. I am a great admirer of critical and rational analysis of our epics, which excludes myths and impossible events which can not take place in an ordinary world. This is because I believe that Mahabharat is our history, and not simply epic.

Regarding the Yadava Sena joining Kouravas, I feel there were many fissures in Yadava clans, and Krishna was not popular and accepted leader of all Yadavas, since the days of Mathura and migration to Dwaraka. When Arjun hijacked Subhadra, Yadavas were planning to attack Arjun.

I think it was Duryodhana's diplomacy which enabled him to obtain support of Yadava Army, and Krishna could not convience then to take Pandavas' side. The story of Arjun and Duryodhana sitting at the bed of Krishna and Krishna offering Yadava Army to one and himself to the other, is improbable and clearly a later addition.

Can you throw some light on this episode?

Similarly, can you throw some light on Amba-Shikhandi episode?

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

Dear Vivek.
Your observation that Krishna was not popular among all Yadavas is acute. Krishna said to Duryodhana that I will 'my own army' to you. It was described by him as very large and valourous. Surprizingly when later an account of the 11 Akshouhinis of Duryodhan is drawn up, there is no specific mention of Krishna's army! Where did it go?
Duryodhana did have many admirers among the Yadavas, the Seniormost being the powerful Balaram himself. His daughter was married to Duryodhan's son. Krutawarma was another powerful chieftain who joined Duryodhan with his one Akshohini army. On the other hand Satyaki who was Arjuna's friend, admirer and tutored by him, joined Pandavas with his one Akshohini army! Satyaki and krutavarma were enemys of each other.
Ultimately 36 years later these spilts and enmities among the Yadavas let to their total destruction which Krisha or Balaram also could not stop. (yadavas today are no different!)
Arjun and Duryodhan meeting Krishna on the same day is a figment or myth. None of the three were idiots!
I intend to take up the next topic soon. Thank you.

Gamma Pailvan said...

प्रभाकरराव,

मला वाटतं की पांडवांनी अज्ञातवास पूर्ण केला का नाही हा प्रश्न थोडा वेगळ्या रीतीने विचारला पाहिजे. पांडव वा द्रौपदी ज्या दिवशी प्रकट झाले त्याच्या बरोब्बर एक वर्षापूर्वी १२ वर्षे संपली होती का? ही १२ वर्षे सौरमानाने धरावी की चांद्रमानाने?

असो.

सौरवर्ष हे चांद्रवर्षापेक्षा मोठे असल्याने चंद्र नेहमी मागे पडत जातो. हा अनुशेष भरून काढायला अधिक महिन्याची योजना केली आहे. याच निमित्ताने एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणू देऊ इच्छिती.

त्या काळी चांद्र व सौर कालगणनेत सुसंगती राखण्यासाठी दर ५ चांद्रवर्षांनी २ अधिक महिने येत असंत. हे प्रमाण हल्लीपेक्षा जरा वेगळे आहे. हल्ली ३ चांद्रवर्षांनंतर १ अधिक महिना येतो. म्हणजेच २ अधिक महिन्यांसाठी ६ वर्षे जावी लागतात. त्यामुळे ३० वर्षांनी हल्लीच्या दराने १० अधिक महिने येतील, तर महाभारतकालीन दराने १२ अधिक महिने होतील. हा २ महिन्यांचा फरक ३० वर्षांत पडला आहे. म्हणून ९० वर्षांनी तो ६ महिन्यांचा होतो. अवघ्या ९० वर्षांत सण वेगळ्याच ऋतूत साजरे करायची पाळी येईल. हे टाळण्यासाठी क्षय तिथींची योजना केली असावी असा माझा अंदाज आहे. मात्र मी या क्षेत्रातला तत्ज्ञ नाही.

असो.

आता पांडवांच्या दाव्याचा फोलपणा पडताळून पाहूया. त्यांची आकडेमोड बरोबर आहे असं गृहीत धरूया. ती जर स्वविसंगत (self inconsistent) निघाली तर त्यांचा दावा फोल ठरेल. दर ५ वर्षांनी एका वर्षी २ अधिक महिने येताहेत. या वर्षास आपण अधिकवर्ष संबोधूया. तर हा अधिकवर्षांचा हिशोब करूया. खालील पाचपैकी एक शक्यता लागू पडते :

१. जर वनवासाचे पहिलेच वर्ष अधिकवर्ष असेल तर सहावे आणि अकरावे देखील अधिकवर्ष असेल. १-६-११ हा क्रम आहे.

२. जर वनवासाचे दुसरे वर्ष अधिकवर्ष असेल तर सातवे आणि बारावे देखील अधिकवर्ष असेल. २-७-१२ हा क्रम आहे.

३. जर वनवासाचे तिसरे वर्ष अधिकवर्ष असेल तर आठवे आणि तेरावे देखील अधिकवर्ष असेल. ३-८-१३ हा क्रम आहे.

४. जर वनवासाचे चौथे वर्ष अधिकवर्ष असेल तर नववे आणि चौदावे देखील अधिकवर्ष असेल. ४-९ हा क्रम आहे. वनवास व अज्ञातवास मिळून १३ च वर्षे होती. १४ वे वर्ष आकडेमोडीस निरर्थक आहे.

५. याच धर्तीवर जर वनवासाचे पाचवे वर्ष अधिकवर्ष असेल तर दहावे देखील अधिकवर्ष असेल. ५-१० हा क्रम आहे.

आता पांडवांनी ६ महिने जास्तीचे धरले आहेत. म्हणजेच प्रत्येक अधिकवर्षाचे २ महिने या प्रमाणाने ३ अधिकवर्षे येऊन गेली. म्हणून शक्यता क्र. ४ व ५ मोडीत निघतात. कारण त्यांत केवळ दोनच अधिकवर्षे अल्ली आहेत.

तर आता पहिली शक्यता पडताळून पाहूया. विचारात घेतलेला कालखंड १३ वर्षांचा आहे. यात वनवास आणि अज्ञातवास दोन्हे अंतर्भूत आहेत. पहिल्या वर्षी त्यांनी २ महिने जास्तीचा वनवास भोगला. हा वनवास पुढील ४ वर्षांत भरून निघाला. मग पुढे पाचव्या वर्षी परत २ जास्तीचे महिने वनवास भोगला. हा दहाव्या वर्षापर्यंत भरून निघाला. मग अकराव्या वर्षी परत एकदा २ महिने जास्तीचा वनवास भोगला. जर वनवास पुढे चालू राहिला असता तर तो पंधराव्या वर्षी भरून निघाला असता. पण अटीप्रमाणे १३ व्या वर्षी वनवास संपुष्टात आला. त्यामुळे ११ ते १६ या ५ वर्षांपैकी केवळ ३ वर्षेच (क्र.११, १२ व १३) ग्राह्य धरली पाहिजेत. म्हणजेच पाचावर दोन वर्षांची सूट मिळाली. २ महिन्यांचे (६० दिवसांचे) २:५ या प्रमाणात विभाजन केले तर २४ दिवस होतात. म्हणून १३ वर्षे पूर्ण झाल्याची चांद्र तिथी येण्याआधी २४ दिवसांची सूट घेणे ग्राह्य आहे.

आता दुसरी शक्यता पडताळून पाहूया. युक्तिवाद पहिल्या शक्यतेप्रमाणेच आहे. पहिल्या वर्षी जास्तीचा वनवास नाही. दुसर्‍या वर्षी जास्तीचे २ महिने वनवास भोगला. तो पुढील ४ वर्षांत भरून निघाला. सातव्या वर्षी परत २ महिने जास्तीचा वनवास भोगला, तो अकराव्या वर्षाअखेरीस भरून निघाला. मग बाराव्या वर्षी परत २ महिने जास्तीचा वनवास भोगला. सूट काढण्यासाठी पाच वर्षांपैकी केवळ दोनंच वर्षे (बारावे आणि तेरावे)ग्राह्य धरली आहेत. तर या प्रसंगी सूट ३:५ या प्रमाणात म्हणजे ३६ दिवस येते. अशाच प्रकारे तिसर्‍या शक्यतेची सूट ४:५ या प्रमाणात म्हणून ४८ दिवसांची येते.

म्हणून सर्वात कमी सूट २४ दिवसांची येते. पांडव ५ महिने आणि ६ दिवसांनी प्रकट झाले असते तर वनवास पूर्ण होत होता. भीष्मांच्या आकडेमोडीनुसार ५ महिने आणि १२ दिवसांची मर्यादा येते. प्रत्यक्षात देखील पांडव ५ महिने आणि १२ दिवसांनी प्रकट झाले.

त्यामुळे कमीत कमी सूट ग्राह्य धरूनही पांडवांचा दावा स्वविसंगत ठरत नाही. म्हणून तो पहिल्या चाचणीत उत्तीर्ण झाला आहे. फोल म्हणून सिद्ध झाला नसला तरीही निखालसपणे ग्राह्य आहे असाही सिद्ध झालेलं नाही.

असो.

उद्या दर ३ वर्षांनी १अधिक महिना हे प्रमाण घेऊन आकडेमोड सादर करेन म्हणतो.

आपला नम्र,
-गामा पैलवान

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

आपल्या विचारांमध्ये बरीच गफलत आहे!
१.महाभारतकाळी ५८ चांद्रमहिन्यांनंतर २ अधिक महिने घेतले जात असत. भीष्माच्या 'पंचमे पंचमे वर्षे ... मासद्वयं' या वचनाचा हा अर्थ प्रा. ग. वा. कवीश्वर या विद्वान महाभारत-अभ्यासकाने उलगडून दाखवला व तो महामहोपाध्याय मिराशी वगैरे विद्वानानी मान्य केला आहे.
२. आताच्या पद्धतीप्रमाणे साधारणपणे २९ महिन्यानी एक अधिकमास येतो. मात्र आता अधिकमास ठरवण्याची पद्धत अधिक स्पष्ट आहे. ज्या महिन्यामध्ये सूर्य एका राशीतून पुढील राशीत जात नाही (राशिसंक्रमण) तो अधिकमास असतो. ही पद्धत राशीत सूर्याचे स्थान निश्चित करण्याचे शास्त्र-गणिते व वेध-विकसित झाल्यावर आली.
३. ५८ चांद्रमासांनंतर एक अधिक मास या पद्धतीने केलेला खुलासा पूर्वीच comment no. 2 मध्ये केला आहे तो आपण वाचलेला दिसत नाही.
४. पांडवानी १३ 'सौर' वर्षे पूर्ण केली पण द्यूताच्या दिवसाची तिथि १३व्या वेळा गाठली नव्हती किंवा १३ 'चांद्र' वर्षे पुरीं केलीं नव्हती.
५. द्यूताचा पण लावताना सौरवर्षे कीं चांद्रवर्षे हा खुलासा कोणी केलेला नव्हता. व्यवहारात चांद्रगणनाच होती. दुर्योधनाचा दावा हाच होता.
६. ब्लॉगमध्ये मी खुलासेवार लिहिले आहे कीं पांडवानी नाइलाजाने १३ सौरवर्षे पुरी झाल्यादिवशी प्रगट होणे पत्करले. शक्य असते तर आणखी १८ दिवस त्यानी अज्ञातवास नक्कीच लांबवला असता.
७. द्यूताच्या दिवसाची तिथि व अर्जुन-कौरव युद्धाची तिथि स्पष्टपणे न सांगून पांडवांच्या त्रुटीवर व्यासांनी पांघरूण घातले आहे.
८. ब्लोगमध्ये खुलासेवार लिहिले आहे त्याहून जास्त काही माझ्याकडून सांगण्यासारखे नाही तेव्हां हा विषय मी संपवीत आहे. मी सध्या अमेरिकेत आहे. पुढील वर्षी भारतात आल्यावर जमल्यास प्रत्यक्ष भेटूंया.

Gamma Pailvan said...

प्रभाकरराव,

आपण दाखवलेली आकडेमोड मला मान्य आहे. मिराशी वगैरे विद्वानांच्या मतावर मी शंका घेत नाहीच्चे मुळी. comment no. 2 मध्ये भीष्माने काढलेला ५ महिने आणि १२ रात्रींचा कालखंड मला मान्य आहे. त्यात अमान्य करण्यासारखं काहीच नाही.

पण पांडवांनी जरी सौरमानाने १३ वर्षे पुरी केली असली तरी शेवटचे वर्ष पूर्णपणे अज्ञातवासात काढले गेले होते का? या प्रश्नावर चर्चा झालेली दिसत नाही. माझा अंदाज आहे की वनवासाच्या १३ वर्षांतील नेमकी कोणती अधिकवर्षे होती ते कळल्यास या प्रश्नाचं उत्तर शोधण्यास मदत होईल.

अर्थात कौरवांनी पांडवांना पाहिल्याची शेवटची वेळ विराट-कौरव युद्धाच्या एका वर्षापेक्षा आधीची असेल तर हा प्रश्न उद्भवणार नाही. परंतु तसा उल्लेख/पुरावा महाभारतात आहे का?

हा विषय संपविण्याच्या आपल्या इच्छेचा आदर करून मीही राहिलेली आकडेमोड देत नाही.

आपला नम्र,
-गामा पैलवान

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

प्रा. कवीश्वर व इतरांचे जे मी वाचले आहे त्याप्रमाणे अज्ञातवासाचे वर्षी (तिसर्‍या वेळी) दोन अधिकमास होते व कौरव-विराट युद्ध होऊन अर्जुन ओळखला गेला तेव्हा दुसरा अधिकमास चालू होता. आणखी १७-१८ दिवसानी तो पुरा होऊन द्यूताची तिथि-मास आली असती.
अज्ञातवास कधी सुरू झाला हे निश्चित लिहिलेले नाही. पांडवानी आपल्या पाशी असलेल्या सर्व आश्रित माणसाना व सारथ्याना निरोप दिला व तीं गेल्यावरच फक्त पांडव-द्रौपदी वेगळ्या वाटेने जाऊन मग विराटनगराला पोचले असे महाभारत म्हणते. वनवासाची १२ वर्षे (आधी दोनवेळा आलेले दोनदोन अधिक महिने धरून) संपण्याचे वेळीच हे घडले असले पाहिजे मात्र त्या दिवसाची तिथि-मास दिलेली नाहीत. द्यूताचीहि तिथि-मास दिलेली नाहीत! मात्र अज्ञातवास योग्य दिवशी सुरू करण्यास काही अडचण नसल्यामुळे, व त्याबद्दल कौरवानी शंका उपस्थित न केल्यामुळे काही प्रष्न दिसत नाही.
तुम्ही अभ्यासपूर्वक शंका उपस्थित करीत असल्यामुळे खुलासा करीत आहे.

Gamma Pailvan said...

प्रभाकरराव,

अर्जुन ओळखला गेला तेव्हा दुसरा अधिकमास चालू होता ही अत्यंत महत्त्वाची माहीती आहे. पांडवांना चांद्रमानाने १३ वर्षे पुरी करण्यास काहीच अडचण नव्हती. पण परिस्थितीवशात १७/१८ दिवस आधी प्रकट व्हावे लागले. चांद्रमानाने १३ वर्षे पुरी करायची झाली तर जरुरीपेक्षा जास्त दिवस वनवास भोगवा लागेल. असे म्हणून पांडव सौरमानाचा आधार घेऊ शकतात. कारण की त्या वर्षी चांद्रमान हे सौरमानापेक्षा लांबलेले आहे.

जर ११ व्या वा १० व्या वा ९ व्या वर्षी हे दोन अधिकमास आले असते तर १३ व्या वर्षी सौरमान चांद्रमानाहून लांबले गेले असते. मग चांद्रमानाने वनवास आणि अज्ञातवास पुरा करणे अनिवार्य होते. जर वनवासाचे १२ वे वर्ष अधिकवर्ष असते, तर १३ व्या वर्षी नक्की कुठले मान लांबले गेले असते ते प्रत्यक्ष तिथी कळल्याशिवाय काढता येणे अवघड वाटते. मग आकडेमोड जास्त किचकट झाली असती.

तर आता घटनाक्रम असा आहे :

१. वनवासाची १२ वर्षे चांद्रमानाने पूर्ण झाली. अज्ञातवास सुरू झाला.
२. काही दिवसांनी वनवासाची १२ वर्षे सौरमानाने पूर्ण झाली.
३. काही महिन्यांनी दोनपैकी पहिला अधिक महिना सुरू झाला.
४. दोनपैकी पहिला अधिक महिना संपून दुसरा अधिक महिना सुरू झाला.
५. १२ रात्रींनंतर झालेल्या अरुणोदयी सौरमानाने १३ वर्षे पुरी झाली. त्याच दिवशी सकाळी अर्जुन ओळखला गेला.
६. आजून १८ दिवसांनी चांद्रमानाने १३ वर्षे पुरी झाली.

आता प्रश्न असा आहे की : सौरमानाने बरोब्बर एक वर्ष आधी (म्हणजे क्र. २ च्या आधी) पांडवांचा अज्ञातवास सुरू झाला होता का? उत्तर हो असावेसे वाटते. कारण की जेव्हा चांद्रमानाने १२ वर्षे झाली तेव्हाच पांडव गुप्त झाले असणार. त्या प्रसंगी सौरमानास चिकटून राहण्याचे काही कारण नव्हते.

म्हणून पांडवांचा दावा स्वविसंगत नाही. अर्थात, अर्जुन ओळखला गेला तेव्हा दुसरा अधिकमास चालू होता या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. लांबलचक संदेश वाचल्याबद्दल धन्यवाद! :-)

आपला नम्र,
-गामा पैलवान

Gamma Pailvan said...

नमस्कार प्रभाकरराव!

खूप दिवसांनी लिहितोय. लिहिण्यास कारण की पांडवांच्या अज्ञातवासासंबंधी एक महत्त्वाचा उल्लेख सापडला.

यक्षरक्षित तलावाचे पाणी पिऊन चार पांडव मरण पावले तेव्हा युधिष्ठिराने यक्षप्रश्नांना उचित उत्तरे देऊन त्यांना जिवंत करविले. ही गोष्ट आपणांस आठवत असेल. त्याप्रसंगी तो यक्ष म्हणजे धर्माचे रूप घेतलेला खुद्द यमराजच होता. त्याने प्रसन्न होऊन पांडव तर जिवंत केलेच, शिवाय युधिष्ठिरास अनेक वरही देऊ केले. त्यातला एक वर म्हणजे पांडवांना अज्ञातवासात कोणीही ओळखू नये हा होता. साक्षात यमराजाने दिलेला वर असल्याने तो फलद्रूप झाला असणारंच. :-)

प्रस्तुत प्रसंग वनपर्वातील ३१४ व्या अध्यायात आहे. स्रोत : https://www.scribd.com/doc/19450489/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A5%A9-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A9 (पीडीएफ पान क्रमांक ३८१)

म्हणून पांडवांचा अज्ञातवास पुरा झाला असावा असा माझा निष्कर्ष आहे.

आपला नम्र,
-गामा पैलवान