आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Wednesday, April 2, 2008

पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग ३

अद्न्यातवास - पुष्कळ संकटे व हाल सोसून बारा वर्षांचा वनवास पांडव व द्रौपदी यांनी पुरा केला. पांडवांच्या इतर बायका व मुले वनवासात नव्हती. पणामध्ये त्यांचा समावेश नव्हता. पांडवांनी अनुद्यूताला सुरवात करताना द्रौपदीला पणातून वगळण्याची मागणी केली नाही. युधिष्टिराला, आपण पण हरलोच तर द्रौपदीहि वनात आलेलीच बरी असे वाटले असेल कारण ती स्वस्थ बसणार नाही व युद्ध टाळण्याचा उद्देश विफल होईल ही भीति होती! वनवासाचे अखेरीस पांडवांनी सर्व नोकर सारथी आश्रित यांना निरोप दिला व सर्वजण गेल्यावर पांडव स्वतंत्रपणे दुसरीकडे गेले व काही काळ वनात भटकून मग विराटाच्या नगरात गेले. ज्या दिवशी पांदव विराटासमोर व द्रौपदी सुदेष्णाराणीसमोर उभीं राहून चाकरीला लागलीं त्या दिवसापासून अद्न्यातवास सुरू झाला असे म्हटले पाहिजे. या दिवशी कोणती तिथि व महिना होता याचा उल्लेख केलेला नाही! एक वर्षानंतर याच तिथीला अद्न्यातवास संपावयाचा होता. तिथि सांगितलेली नसल्यामुळे तसे झाले काय हा प्रश्न शिल्लक राहतो.
विराटाच्या आश्रयाने आपण अद्न्यातवासाचे एक वर्ष पुरे करू ही आशा बाळगून होते. वर्षापैकी बराचसा काळ, तसे पाहता निर्विघ्नपणे पार पडला. सर्वांना अर्थातच हाल अपेष्टा सोसाव्या लागतच होत्या. विराटाचा मेहुणा कीचक हा राजधानीला परतून सैरंध्री-द्रौपदी त्याच्या नजरेला पडली तेव्हांपासून अडचणी सुरू झाल्या. कीचकाला, ही द्रौपदी आहे याची कल्पना नव्हती. त्याच्या लेखी ती फक्त एक सुंदर दासी होती. तिची अभिलाषा कीचकाने धरली हे सत्ताधीशांच्या वागणुकीशी सुसंगतच होते! कीचकाने विराटाच्या भर दरबारात, युधिष्टिरासमक्ष द्रौपदीचा घोर अपमान केला व त्याचा प्रतिकारहि कोणाला करता आला नाही. हा अपमान न सोसून, नाइलाजाने द्रौपदीने त्याच रात्री भीमाची भेट घेतली व कीचकाला मारून टाकण्याचा आग्रह केला. प्रथम भीमाने तिची समजूत घालून तिला ’दीड महिन्याचा काळ कसा तरी काढ’ असे म्हटले. (विराटपर्व अ. २१/१६-१७). यावेळी अद्न्यातवास संपण्यास तेवढा काळ बाकी होता असे यावरून दिसते. द्रौपदीने दीड महिन्याबद्दल शंका न काढतां भीमाला स्पष्ट सांगितले कीं ’एवढा काळ कीचकाचा छळ सोसत काढणे शक्य नाही. पुन्हा अपमान झाला तर मी प्राअत्याग करीन. पण पुरा होण्याची वाट पहात बसशील तर पत्नी गमावून बसशील तेव्हा लगेचच कीचकाला मार.’ द्रौपदीची अवस्था पाहिल्यावर व तिचा निर्धार ऐकल्यावर अद्न्यातवास पुरा होण्याची वाट न पाहतां व युधिष्टिराशी चर्चा न करताच, दुसऱ्याच रात्री कीचकाला मारण्याचा बेत ठरवला व पारही पाडला. कीचकाचा व अनुकीचकांचाही भीषण वध झाल्यावर याला पर्यायाने द्रौपदीच कारण आहे हे जाणून, भीतीने, विराटाने पत्नी सुदेष्णा हिचेतर्फे द्रौपदीला राज्य सोडून जा असा आदेश दिला. सुदेष्णेशी गयावया करून द्रौपदीने थोडा अवधि मागून घेतला तो मात्र फक्त तेरा दिवस! सुदेष्णेने द्रौपदीला कीचकाकडे मद्य आणण्यास पाठ्वले व तेथे तिचा घोर अपमान झाला त्या दिवसाची तिथि चतुर्दशी होती असा स्पष्ट उल्लेख सुदेष्णेच्या तोंडी आहे मात्र शुक्ल कीं कृष्ण पक्ष याचा खुलासा नाही. तसेच महिनाहि सांगितलेला नाही. लगेच दुसऱ्या रात्री कीचकवध झाला तेव्हा साहजिकच पौर्णिमा वा अमावास्या होती. कीचकवधाच्या रोमहर्षक वर्णनावरून ती अमावास्या होती असे दिसते. तेथून पुढे तेरा दिवस शुक्लपक्ष चालू होता. सुदेष्णेची सूचना कीचकाचे सुतक संपल्यावर दिली गेली असे समजले तर तेरा दिवसांची मुदत कृष्ण्पक्षाच्या सप्तमी - अष्टमीपर्यंत पोचते. प्रत्यक्षात अर्जुन कौरवांबरोबर युद्धाला उभा राहिला व ओळखला गेला तो कृष्ण अष्टमीलाच. मात्र कीचकवधापासून २२ - २३ दिवसच लोटले होते. दीड महिना नव्हे! अद्न्यातवासाचा उरलेला काळ भीमाने दीड महिना म्हटला होता तो द्रौपदीने सुदेष्णेकडे मुदत मागताना २२-२३ दिवसांवर कसा आणला याचा खुलासा महाभारतकारानी केलेला नाही. पुढे या कमी केलेल्या काळाचा खुलासा सौरमानाने तेरा वर्षे पुरी झाली असा केला गेला. त्याबद्दल पुढील भागात पाहूं.

4 comments:

मोरपीस said...

आपला ब्लॉग एक सुंदर व आगळावेगळा असा आहे.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

आपल्याला आवडला याचा मला आनंद आहे. पुढील भागहि जरूर वाचा. धन्यवाद! आपल्या मित्रांनाहि हा ब्लॉग वाचावयास सांगाल काय? जेवढे जास्त वाचक तेवढा नवीन काही लिहिण्याचा उत्साह!

HAREKRISHNAJI said...

आपण महाभारताची एका नव्या दॄष्टीकोनातुन ओळख करुन देत आहात. महाभारतात कौरवांच्या व्यक्तीरेखा रंगवतांना अन्याय झाला आहे असे माझे मत आहे. मी "युगांन्त ", "आणी श्रीकॄष्णाने अर्जुनाचा रथ नरकात घातला " व "रामायण व महाभारतातील आत्महत्ता " ही तिन पुस्तके वाचली आहेत.

पुढील पोस्ट ची वाट पहात आहे.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

हरेकृष्ण्जी, धन्यवाद. मी कुणाची बाजू लढवणार नाही. तो माझा उद्देश नाही. थोडे लक्षपूर्वक महाभारत वाचले तर सहज नजरेला येणाऱ्या गमती व विसंगति विचार करावयास लावतात. त्याबद्दल लिहावे एवढाच विचार आहे. आपण आवडीने वाचा व मित्रांनाहि सांगा. लिहिलेले कोणी वाचले तर उपयोग! खरे ना?