आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Friday, June 27, 2008

महाभारतातील शकुंतला - भाग ४

महाभारत म्हणते, शकुंतला पुत्रासह निघाली तेव्हा अशरीरिणी वाणी झाली कीं ’दुष्यंता, हा तुझाच पुत्र आहे तेव्हां याचा स्वीकार करणे तुझे कर्तव्य आहे.’ तेव्हा दुष्यंताने मान्य केले व पुत्र व भार्या यांचा स्वीकार केला. अशरीरिणी वाणी झाली म्हणजे माझ्या मते, उपस्थित ऋत्विज, पुरोहित, आचार्य, व अमात्य यानी दुष्यंताची कान उघाडणी केली असेल, समजूत घातली असेल, तुझ्या आश्रमभेटीना आम्हीहि साक्षीदार आहोत असे बजावले असेल. स्वीकार केल्यावर मात्र आपल्या वर्तणुकीच्या समर्थनासाठी दुष्यंत शकुंतलेला म्हणाला कीं तुझा माझा संबंध नगरात कोणाला माहीत नव्हता. पुरुषाला मोहात पाडणे हा स्त्रियांचा स्वभाव असल्यामुळे तूं तसेच केले असशील व वर आपल्या पुत्राला राज्य मिळाले पाहिजे असा आग्रह धरून बसली आहेस असेंच सार्‍या लोकाना वाटले असते. म्हणून मी तुझा उतावळेपणाने स्वीकार केला नाही. तुला अनावर क्रोध यावा असे मी वागलो हे खरे आहे.’ हे सर्व म्हणून झाल्यावर मग त्याने उच्चारलेले वाक्य मात्र आश्चर्यकारक आहे! तो म्हणतो ’त्यानंतर तू मला जे कटु शब्द ऐकवलेस त्याबद्दल, लाडके, मी तुला क्षमा केली आहे.’ खासा न्याय! अपराध कोणाचा व क्षमा कोणाला!
महाभारतातील या मूळ कथेमध्ये दुष्यंताच्या चित्रणाला उजाळा देण्यासाठी कालिदासाने घुसवलेला दुर्वासाचा शाप, मेनकेने दुष्यंताच्या दरबारातून शकुंतला-भरत याना थेट स्वर्गात घेऊन जाणे, दुष्यंताला माशाच्या पोटातली अंगठी पाहून स्मृति येणे, त्याची विरहावस्था, दुष्यंताने इंद्राच्या मदतीसाठी स्वर्गात जाणे, तेथे भरताला अचानक पाहणे, मग शकुंतलेची भेट व स्वीकार, यातील काहीहि नाही! तेव्हा दुष्यंताचे कालिदासकृत उदात्तीकरण बाजूला ठेवून, त्याच्या वर्तणुकीचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे.
ज्याअर्थी, आपला पुत्र युवराज व्हावा ही शकुंतलेची मीलनापूर्वीची मागणी दुष्यंताने बेलाशक मान्य केली होती त्याअर्थी त्याला पत्नी असली/असल्या तरी पुत्रलाभ झालेला नसावा असे मानण्यास हरकत नाही. (भीष्मपिता शंतनु याला सत्यवतीची अशीच मागणी मान्य करता आली नाही.) भरताच्या जन्माआधी काही काळ दुष्यंताचे शकुंतलेला भेटणे बंद झाले असावे. त्यामुळे भरताच्या जन्माची त्याला कदाचित माहिती नसेल. त्याच्या प्रथम आश्रमभेटीला अनेक साक्षीदार होते. नंतरच्या भेटीहि गुप्त थोड्याच राहिल्या असणार? पण शकुंतला भरताला घेऊन दरबारात उपस्थित झाल्यावर, खुद्द दुष्यंत मान्य करीत नाही तोवर अमात्य वा पुरोहित स्वत:हून काय करणार? शकुंतलेने निकराच्या गोष्टी बोलल्यावर अखेर त्यानीच राजाला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली असणार व अन्यायापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असेल. दरबारातील मंडळींचे मत अनुकूल आहे असे दिसल्यावर मग दुष्यंतालाही शकुंतलेचा स्वीकार करण्याचा धीर आला! या सर्व प्रसंगवर्णनात, इतर राजस्त्रिया वा राजकुमारांचा उल्लेख कोठेहि नाही. दुष्यंतामागून भरताला निर्विघ्नपणे राज्य मिळाले, त्याअर्थी दरबारी राजकारणाचा वा वारसांचा प्रश्न नव्हता, तरीहि सुरवातीला दुष्यंताने शकुंतलेचा स्वीकार न करता उलट असभ्यपणे तिचा अपमान केला तो कां याचा खरेतर पुरेसा उलगडा होत नाही. दरबारी लोक वा जनमत यांचा कौल होईपर्यंत सत्य स्वीकारण्याचा त्याला धीर झाला नाही हे खरे.
या महाभारतातील मूळ कथेमध्ये शकुंतलेचे चित्रण अतिशय ठसठशीत व मनोज्ञ आहे. तिने पति व पिता यांची कर्तव्ये, पितृत्वाचे अवीट सुख व सत्याची असाधारण महति याचे केलेले वर्णन सुंदर आहे. स्वमनाची साक्ष असत्य भाषण करणाराला धुडकावून लावणे अशक्य असते हे प्रतिपादन अप्रतिम आहे. दुष्यंताचा दोष सौम्य करण्यासाठी कालिदासाने त्याला व शकुंतलेला दुर्दैवाची शिकार बनवले आहे यात तिच्यावर अन्यायच केला आहे असे मला वाटते.

5 comments:

Priyabhashini said...

कालीदासाने आपल्या काव्यातून अनेकांना भूल पाडून खरी कथा बाजूला सारली हे खरेच. आपल्या देशाला दुष्यंतपुत्रामुळे भारत हे नाव पडले या खोट्या समजूतीत मीही अनेक वर्षे होते. याचेही श्रेय कालीदासाचे.

हे ही विवेचन आवडले. लिहित रहावे.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

दुष्यंतपुत्र भरत हा चक्रवर्ति राजा झाला व दीर्घकाल त्याने राज्य केले तेव्हा त्याच्यामुळे आपल्या देशाचे नाव भारत पडले हे बरोबर वाटते. त्याच वंशात पुढे कौरव-पांडव झाले म्हणून तर कृष्ण अर्जुनाला ’भारत’ म्हणतो. (यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ...). भारत नाव पडण्याचे इतर काही कारण मला ज्ञात नाही.

Priyabhashini said...

नाही ते बरोबर नाही. महाभारतात तसा उल्लेख कोठेच नाही. खालील उतारा मराठी विकिवर झालेल्या चर्चेतील आहे -

प्राचीन इतिहास सांगतो की, प्रियव्रताने सात पुत्रांस सात द्वीपे(नद्यांनी वेढलेले प्रदेश) दिली. त्यात आग्नीध्र याच्या वाट्याला जंबूद्वीप आले. त्याने आपल्या नाभी इत्यादी नऊ पुत्रांना नऊ वर्षे(एकाच वेळी पाऊस पडणारा भूमिप्रदेश) दिली. नाभीला मिळालेल्या प्रदेशाचे नाव अजनाभवर्ष. नाभीचा मुलगा ऋषभदेव (याला जैनांनी पुढे 'त्यांचा' केला-हिंदूंनी बुद्धाला अवतार केला तसा!). ऋषभाने अजनाभवर्षाचे नऊ खंड करून नऊ मुलांना दिले. खंडांची नावे- कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृक्‌, विदर्भ आणि कीकट. या सर्वांवर, अर्थात अजनाभवर्षावर, अधिपत्य आपल्या भरतनामक पुत्रास दिले. पुढे त्याच्याच नावावरून देशाला भरतवर्ष नाव पडले.--भागवत, स्कंध ५, अध्याय २-२०, २-२१ व ५-४-९,१० व ५-७-१


केवळ गैसमजाने भारतवर्ष हे नाव दुष्यंतपुत्र भरतावरून पडले असे मानले जाते. कारण तोच बालपणी सिंहाचा जबडा उघडून त्याचे दात मोजणारा आणि पुढे महान पराक्रम करून पृथ्वीवर एकछत्री साम्राज्य निर्माण करणारा म्हणून प्रसिद्ध. ऋषभपुत्र भरत आपण क्वचितच ऐकलेला. कुणी शाकुंतलासारखे दिव्य काव्य करून त्यात त्याचा उल्लेखपण केलेला नाही.

पंडित महादेवशास्त्री जोशी लिहितात:-"या देशाला भारत बनवणारा दुष्यंतपुत्र भरत खास नव्हे. तो आहे, ऋषभदेवाच्या शंभर पुत्रातला सर्वात मोठा पुत्र भरत. त्याने अनेक अश्वमेध केले आणि आसमुद्र पृथ्वी पादांक्रांत करून तिच्यावर आपली नाममुद्रा उठवली."

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

तुम्ही पं. महादेवशास्त्री जोशींचा हवाला दिल्यावर मी पुढे काही बोलण्याचा प्रष्नच उद्भवत नाही! नवीन माहिती कळली त्याबद्दल धन्यवाद.

Unknown said...

काही जुन्या लिखाणापैकि जर कोणास द. श्री. मराठे यांनी पूर्वी वसन्त मसिकात लिहिलेली महाभारत ही मालीका एकत्र केलेली म्हणजे पुस्तक स्वरूपत किन्व तत्सम पुन्हा कुठे मिळेल हे सांगता आले तर मी उपकृत होइन. साधारणपणे ६५ च्य पुढे व ६९ च्य आधीची गोष्ट आहे ही, बहुतेक ६६-६७ च्या काळाची अधीक करून असावी.माझ्याशी सम्पर्क येथे करू शकता:
nach_sam@yahoo.com