आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Sunday, November 2, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग १०

अज्ञातवास संपून पांडवांनी राज्याची मागणी केली. दुर्योधनाने ती नाकारली. अनेक वाटाघाटींनंतर अखेर कृष्णशिष्टाई झाली. भीष्म, द्रोण, विदुर, कृप व इतर अनेकांनी धृतराष्ट्र व दुर्योधन याना अनेकवार समजावले. त्या प्रत्येक प्रसंगी कर्णाने त्यांची कुचेष्टा केली व दुर्योधनाला युद्धाच्या भरीस घातले. त्यानेहि आधींच्या प्रसंगांवरून धडा न घेतां, माझा भरवसा मी स्वत:, दु:शासन व कर्ण यांच्यावरच आहे असे म्हटले. कृष्णशिष्टाईच्या वेळी कर्ण दरबारात उपस्थित होता पण चर्चेत त्याने भाग घेतलेला नाही. दुर्योधनाने कृष्णाचे बोलणे धुडकावून लावले व खुद्द कृष्णालाच पकडण्याचा विचार केला. या बेतांत दु:शासन, शकुनि व कर्ण सामील होते. कृष्ण पूर्ण तयारीने आला असल्यामुळे तो बेत सोडून द्यावा लागला. प्रयत्न झाला असता तर कर्ण तोकडाच पडला असता. शिष्टाई असफल झाली. कृष्णाने कुंतीची भेट घेतली व परतण्यापूर्वी तो कर्णाला एकांतात भेटला. कृष्णाने कर्णाला सांगितले कीं तूं कुंतीपुत्र आहेस व पांडवांचा मोठा भाऊ आहेस तेव्हा तूं पांडवांचा पक्ष घे. त्यापासून तूं, पांडव, यादव या सर्वांचाच फायदा होईल. तूं पांडवांचा राजा होशील, युधिष्ठिर युवराज होईल, इतर पांडव व यादवही तुझे अनुचर होतील, सर्व पांडवांची पत्नी या नात्याने द्रौपदी तुझीहि पत्नी होईल वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या. कर्ण हा कुंतीपुत्र आहे हें कृष्णाला कसें माहीत? कुंतीनेच आदल्या दिवशी हे गुपित सांगून, आवश्यक तर ते कर्णालाहि सांगून त्याला वळवण्याचा प्रयत्न कर असे कृष्णाला विनवले असावे. महाभारत अर्थातच तसे स्पष्टपणे म्हणत नाही. पण शक्यता तीच आहे. कुंतीच्या संमतीशिवाय, कृष्णाने स्वत;हून कर्णाला तूं कुंतीपुत्र आहेस असे सांगणे अनुचितच व म्हणून असंभव वाटते. मात्र कर्ण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडला नाही. सर्व आयुष्य सूत म्हणून वावरून व दुर्योधनाचा मित्र म्हणून त्याच्या आश्रयाने राहून सर्व मानसन्मान मिळवून अखेर त्याचा त्याग करण्याचे त्याने स्पष्टपणे नाकारले. कुंतीला अर्थातच त्याने दोष दिला. कर्ण वळत नाही असे पाहून मग कृष्णाने तुला हवा तसा मृत्यु तुला लवकरच रणांत मिळेल असे म्हणून, सात दिवसानी कार्तिक अमावास्येला युद्ध सुरू करूं असा त्याचेबरोबर दुर्योधनाला निरोप दिला व पांडवांकडे कृष्ण परत गेला.
युद्ध अटळ आहे हे कळल्यावर विदुर कुंतीला भेटला. कुंतीने त्यानंतर स्वत:च कर्णाची भेट घेऊन त्याचे मन वळवण्याचा अखेरचा प्रयत्न केला. हें तिला विदुराने सुचवले असावे असा माझा तर्क आहे. कारण कुंतीचे गुपित विदुराला माहीत होते! कुंतीचीहि विनवणी कर्णाने मानली नाही. सर्व जन्म राधेय म्हणून घालवल्यानंतर व अर्जुनाशी उभा दावा केल्यावर दुर्योधनाचा विश्वासघात करून अखेर मी पांडवांकडे गेलो तर अर्जुनाला मी घाबरलो असेच जग म्हणेल. मी तसे करणे धर्माला धरूनहि नाही असे त्याने कुंतीला समजावले. एकच गोष्ट कबूल केली कीं अर्जुनाकेरीज इतर पांडवांना मी मारणार नाही. मी किंवा अर्जुन कोणीहि मेला तरी तुझे पांच पुत्र जिवंत राहतील. कुंतीला एवढ्यावरच समाधान मानावे लागले.
कृष्ण किंवा कुंती यांनी यावेळीहि कर्णाचा खरा पिता कोण हे सांगितले नाहीच. सूर्यापासून जन्म हीच कथा चालू ठेवली! आपला पिता ब्राह्मण वा क्षत्रिय नाही हेंच कर्ण यावरून समजून चुकला असणार. युधिष्ठिर व इतर पांडव यांनी आपला वडील भाऊ म्हणून स्वीकार केला तरी वर्षानुवर्षे मनात बाळगलेली शल्ये कोणाच्याच मनातून जाणार नाहीत. जग मात्र आपल्याला स्वार्थी, भेकड व विश्वासघातकी म्हणेल व तरीहि क्षत्रिय म्हणणार नाहीच, हे जाणूनच त्याने कृष्ण व कुंतीच्या विनंतीचा अव्हेर केला.
या दोन्ही प्रसंगी कर्णाचे वर्तन धीरोदात्त झाले हे निश्चित. त्याच्या आयुष्यातील हे दोन्ही कसोटीचे क्षण होते व त्यातून तो तावून-सुलाखून उजळून निघाला हे नि:संकोचपणे मान्य केले पाहिजे.
यानंतर भारतीय युद्धातील कर्णाच्या कामगिरीचे निरीक्षण पुढील भागात करूं.

8 comments:

यशोधरा said...

सुरेख लिहित आहात काका..

a Sane man said...

काका, प्रतिक्रिया देत नसलो तरी नेमाने वाचतो मी तुमचा ब्लॉग. महाभारत असं अभ्यासपूर्ण पद्धतीने नि तटस्थपणे उलगडून दाखवता आहात, ते वाचायला आवडतंय मला तरी. असंच वाचायला मिळू देत.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

दोघाच्याही प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

Unknown said...

नमस्कार
आपण महाभारतच जे अभ्यासपूर्ण डोळस लिखाण करत आहाता, ते वाचायला आवडतंय. असंच लिखाण चालू दया
आम्ही वाचत आहोत...

अभिजीत दाते said...

काका,

तुमचा ब्लॉग नियमीतपणे वाचतो. महाभारताचे पदर वास्तवाला धरुन छान उलगडून दाखवता आहात. कर्णानंतर अश्वत्थामा या आणखी एका व्यक्तीरेखेबद्दल आपली मांडणी वाचायला नक्कीच आवडेल.

अभिजीत

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

प्रतिक्रिया वाचून बरे वाटते. तरुण पिढीलाही या जुन्यापुराण्या विषयाबद्दल वाचायला आवडते हे नवलच म्हटले पाहिजे. आपणा सर्वांना धन्यवाद.

Unknown said...

लोकांना वाचायला जरूर आवडते, मात्र भाषेची अडचण येते. आज कालच्या इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांना मराठीतील लेख आवडून वाचता येत नाहीत.

आपले कार्य उत्तम खरेच, अत्यंत सोप्या भाषेत, महाभारतील गोष्टी विषद करीत आहां. त्याबद्दल धन्यवाद !

Unknown said...

Karna Baddal Khuup KamiJanan`na Mahiti Aahe....