आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Monday, July 18, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग ५

नरो वा कुंजरो वा।
हे आपण बाळपणापासून ऐकत आलो. असे खोटे वाक्य बोलल्यामुळे चार बोटे अधांतरी चालणारा युधिष्ठिराचा रथ पंक्चर होऊन जमिनीवर टेकला अशीहि हरदासी कथा आपण ऐकत आलो. पण महाभारतात असे वाक्यच नाही!
हा उलगडा मलाहि हल्लीच वाचलेल्या श्री. जातेगांवकर यांच्या एका पुस्तकावरून झाला.
भीष्मपतनानंतर द्रोण सेनापति झाला व चौथ्या दिवशी जयद्रथवध झाल्यावर पांचव्या दिवशी द्रोण फार त्वेषाने युद्ध करू लागला व त्या दिवशी पांडव व पांचाल यांचा विध्वंस त्याने आरंभला. तो कोणालाच, अर्जुनाला देखील आवरेना. कृष्णाने अखेर पांडवांना सावध केले कीं असेच युद्ध चालले तर दिवस अखेर तुम्ही पूर्ण नष्ट व्हाल. तेव्हां काहीहि करून याला युद्धत्याग करण्यास उद्युक्त केले पाहिजे. कृष्ण व भीमाने एक कुटिल बेत ठरवला. भीमाने प्रथम एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि द्रोणापाशी जाऊन ’अश्वत्थामा हत:’ असे पुन्हापुन्हा त्याला म्हणाला! आपला पुत्र मारला गेला यावर द्रोणाचा विश्वासच बसेना पण पुन्हापुन्हा ऐकल्यावर खात्री करून घेण्यासाठी तो युधिष्ठिरापाशी आला. असे होईल याची कल्पना असल्यामुळे कृष्ण व भीम यानी युधिष्ठिराला विनवले होते कीं ‘तूं होय म्हण!’ भीमाने त्याला सांगितले कीं मी अश्वत्थामा हत्ती खरोखरीच मारला आहे. असत्य बोलण्यास युधिष्ठिर सहजीं तयार होणेच शक्य नाही याची कृष्ण व भीमाला भीति होती. पण हत्ती कां होईना, अश्वत्थामा मारला गेला आहे या आधारावर युधिष्ठिराने मनाशी तडजोड केली आणि द्रोणाने जेव्हां विचारले कीं ’किं अश्वत्थामा हत:? ’, तेव्हा जबाब दिला ’हत:, कुंजर:’ ! जबाब देताना कुंजर: हा शब्द हळू व तोंड चुकवून उच्चारला जेणेकरून तो द्रोणाला ऐकू जाऊ नये!
द्रोणाला युधिष्ठिराचा ’हत:’ एवढाच शब्द ऐकू गेला व त्याचे मनोधैर्य खचले. काही काळाने त्याने धनुष्य खाली ठेवले आणि मग त्याचा वध झाला. कृष्ण-भीमाचा हेतू साध्य झाला पण खोटे बोलल्याचा डाग युधिष्ठिराला लागला नाहीं! कारण ‘हत:, कुंजर:’ हे सत्यच होते! त्याने ‘नरो वा कुंजरो वा’ म्हटले असते तर ते मात्र असत्य भाषण ठरले असते कारण युधिष्ठिराला नर अश्वत्थामा मारला गेलेला नाहीं हे पक्के ठाऊक होते! कृष्ण आणि भीम खरे हुशार म्हटले पाहिजेत. आपल्याला पाहिजे ते त्यांनी युधिष्ठिराकडून बरोबर वदवून घेतले! आपण मात्र अजूनही ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणत असतो! पण तो गैरसमजच!

3 comments:

Naniwadekar said...

'हत: कुंजर:' वाक्यातला दुसरा शब्द मुद्‌दाम हळू बोलणे, हा कपटाचा आणि असत्यनीतीचा भाग कसा नाही? आपल्याला कृष्णाबद्‌दल आणि युधिष्ठिराबद्‌दल आकस नसल्यामुळे आपण त्यांच्या असत्यवर्तनाचं समर्थन तर करत नाही? ते असत्य एका मोठ्या कार्यपूर्तीसाठी आवश्यक/उपयोगी होतं का, हा प्रश्न इथे वेगळा आहे. 'धर्मराज असत्य वागला-बोलला का' तर नक्कीच तसा वागला.

'हा प्र के अत्रे मेला चावट माणूस आहे' या वाक्यातले 'हा --- चावट माणूस आहे' हे शब्द १९४० साली त्यांचा सिनेमा पाहून आल्यावर दुसर्‍याला ऐकूच ज़ाणार नाहीत असे उच्चारले असते, तर दुसरा माणूस काय समज़णार? 'प्र के अत्रे मेला'.

'हत: कुंजर:' हा एक गद्‌य भाग वाटतो, आणि माझ्या माहितीनुसार महाभारत हे पूर्णपणे काव्यरुपातच आहे. त्याबद्‌दल संस्कृत उत्तम ज़ाणणार्‍या आणि महाकाव्ये वाचलेल्या माणसाला विचारायला हवं. काही दिवसांपूर्वीच मला माहिती मिळाली की 'अपि स्वर्णमयी लंका - न मे लक्ष्मण रोचते' हे वाल्मिकीरामायणात राम कधी बोललाच नाही. 'गड आला पण सिंह गेला' हे शिवाजी कधी बोललाच नव्हता. (मूळ शब्द: येक गड आला, (पण तानाजीच्या रूपात) येक गड गेला.') सीतास्वयंवराचा प्रसंग रामायणात पुढे कोणीतरी घुसडला, असा दावा शेवाळकरांच्या भाषणांतून ऐकायला मिळतो.

कौरव-पाण्डव भावंडांशी संबंधित महाभारत ग्रंथात कृष्णाचा भाग आहेच. पण कंसहत्येशी कुरुकुलाचा संबंध नाही. तेव्हा कृष्णजन्माचा, कंसहत्येचा वगैरे भाग महाभारतात आहे का? की तो इतर कुठून आलेला आहे?

Naniwadekar said...

मूळ महाभारत तर सोडाच पण मी त्याचं मराठी भाष्न्तरही वाचलेलं नाही. तरी आज़ मिळालेली ऐकीव माहिती इथे देतो. भांडारकर प्राच्य-विद्‌या संस्थेनी महाभारताची प्रसिद्‌ध केलेली आवृत्ती ही 'पुणे एडिशन' नावानी ओळखली ज़ाते आणि अनेक विद्‌वानांना ती स्वीकारार्ह वाटते. तिच्या द्रोण-युधिष्ठिराचा कुठलाच संवाद दिलेला नाही. भीम एक अश्वत्थामा नांवाचा हत्ती मारतो, आणि 'अश्वत्थामा हत:' सांगून गुरुजींना भंडावतो. द्रोण युधिष्ठिराला विचारतो, आणि त्याला कृष्णानी आधीच गळ घातली असते. ती मानून युधिष्ठिर अर्धसत्य (खरं म्हणजे असत्य) सांगतो. त्याचा रथ ज़मिनीवर आदळतो, पण 'पंक्चर होऊन' नाही तर मॅग्नेटिक स्ट्रिपची तरंगण्याची दिव्य शक्ती गमावून. द्रोणाला हे रथ आदळल्याचं लक्षात आलं असतं तर? तरी द्रोण अज़ून थोडा लढला. असत्यरूपे कुठले शब्द बोलले गेले याबद्दल समज़-गैरसमज़ असतीलही, पण Y असत्य बोलला हे नि:संदिग्धपणे सांगितलं आहे. नन्तर मग युधिष्ठिरावरही अविश्वास दाखवल्याबद्‌दल भीमानी गुरुजींना टोचणी लावली. मग मात्र आचार्य खचले, आणि धृष्टद्‌युम्नानी प्राणांतक घाला घातला. (नाकासमोर पाहून चालणार्‍या वाल्मिकीनी नांवही राम-अज-सीता अशी सोपी ठेवली. व्यासानी एक नांव धड ठेवलं असेल तर शपथ.)

त्याआधी काही मुनींनी द्रोणाला भेटून 'तुझे वर्तन अ-ब्राह्‌मण असून आज़ तुझा मृत्यु होणार' ही कल्पना दिली होती.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

माझ्या लेखनाचा विषय युधिष्ठिराचे वर्तन योग्य की अयोग्य हा नाहीं. 'नरो वा कुंजरो वा' म्हटले हा गैरसमज आहे, 'हत:, कुंजर:' म्हटले एवढाच आहे. श्री. नानिवडेकर यांच्या इतर मतांना उत्तर देत बसणे मला आवश्यक वाटत नाहीं.