’सौभद्र’ हे मराठीतील एक गाजलेले व सदा लोकप्रिय नाटक आहे. अजूनहि कधीतरी त्याचे प्रयोग होतात. नाटकाची अन त्यातील पदांची मोहिनी अजून कायम आहे. मात्र या नाटकामुळे एक मोठा गैरसमज निर्माण झाला आहे ज्याला महाभारतात काही आधार नाही!
नाटकातील कथानकाप्रमाणे अर्जुन-सुभद्रा यांचे बालवयापासून परस्पर प्रेम होते, अर्जुन तीर्थयात्रेला गेलेला असताना बलराम सुभद्रा दुर्योधनाला द्यायचे ठरवतो, सुभद्रा हवालदिल होते, अर्जुनाचा ठावठिकाणा नसल्यामुळे कृष्णालाहि काय करावे सुचत नाही. पण मग अर्जुन तीर्थयात्रेनिमित्तने भटकत द्वारकेच्या जवळ आल्याचे कृष्णाला कळते व मग अनेक गमतीचे बेत रचून अखेर कृष्ण सुभद्र-अर्जुनाचा विवाह घडवून आणतो! नाटकाची रचना सुरेखच आहे यात शंकाच नाही! मात्र महाभारतात असे काही नाही!
महाभारताप्रमाणे अर्जुन सुभद्रा यांचे बालवयापासून काही ’रहस्य’ नव्हते. कधी गाठभेट झाल्याचेहि उल्लेख नाहीत. पांडव कृष्ण-बलराम यांची प्रथम प्रत्यक्ष भेट द्रौपदीच्य़ा स्वयंवर-मंडपात झालेली वर्णिली आहे. पांच पांडवांचे द्रौपदीशी विवाह झाले, मग त्यानी खांडवप्रस्थ वसवून तेथे राज्य करण्यास सुरवात केली. अर्जुनाने युधिष्ठिर-द्रौपदी याचा एकांतभंग केला म्हणून पांडवांनी स्वत:च केलेल्या नियमाप्रमाणे त्याला तीर्थयात्रेला जावे लागले. (माझ्या मते, ‘स्वयंवराचा पण मी जिंकला, मात्र द्रौपदी पाचांची पत्नी झाली आतां युधिष्ठिर, भीम यांच्या नंतर ज्येष्ठता क्रमाने ती माझ्या वाट्याला येणार कधी?’ असा वैताग येऊन त्याने रस्ता सुधारला व आपली सोय पाहिली!) त्याने ब्रह्मचर्य पाळावे अशीहि अट खरे तर होती पण त्याने ते मुळीच पाळले नाही! उलुपी, चित्रांगदा अशी एकेक ‘प्रकरणे’ करीत तो काही काळाने द्वारकेला आला. यादव समुदायात सुखाने काही काळ काढत असताना कृष्णासमवेत असताना एकदा सुभद्रा त्याचे नजरेस पडली. त्याने कृष्णाला विचारले ‘कोण रे ही?’ कृष्णाने म्हटले ‘अरे ही माझी सावत्र बहिण सुभद्रा’
अर्जुनाचे मन सुभद्रेवर गेलेले ओळखून कृष्णाने विचारले की ‘ही तुला आवडली आहे काय?’ अर्जुनाने कबूल केल्यावर कृष्णाने सल्ला दिला की ‘हिचा आतां विवाह करावयाचा आहे पण स्वयंवर योजले तर तेव्हा ही कोणाला वरील याचा काय भरवसा? तू हिला संधी पाहून पळवून ने. क्षत्रियाना मुलगी पळवून नेऊन केलेला ‘राक्षस विवाह’ शास्त्रसंमत आहे.’
मग योग्य संधी पाहून अर्जुनाने सुभद्रेला रथात घालून पळवून नेले! सर्व यादव वीर रागाने खवळून जाऊन युद्धाला तयार होऊ लागले पण कृष्ण ‘थंड’ बसलेला पाहून बलरामाने म्हटले कीं ‘अरे त्या कृष्णाचे काय मत ते तरी विचारा.’ तेव्हा कृष्णाने सल्ला दिला ‘युद्धाला उभे राहण्यापूर्वी जरा विचार करा. गाठ अर्जुनाशी आहे, कोणा सोम्यागोम्याशी नव्हे. निभाव लागला नाहीं म्हणजे अब्रू जाईल. अर्जुनापेक्षा चांगला पती सुभद्रेला मिळेल काय? तेव्हा झाले आहे ते चांगलेच आहे. दोघाना बोलावून आणून सन्मानाने त्यांचा विवाह करून द्यावा आणि यादव-पांडवांचे सख्य साधावे.’ हे सर्वांना पटले व तसेच झाले. या सर्व कथेत दुर्योधनाचे नाव कुठेच आलेले नाहीं.
तेव्हा सौभद्र नाटक छानच आहे. पण महाभारताबद्दल तो एक मोठाच गैरसमज!
महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
6 comments:
मी सध्या कन्नड साहित्यिक भैरप्पा यांची परवा वाचत आहे. थय मध्ये पुष्कळ असे मुद्दे मांडले आहेत कि ते वादग्रस्त ठरावेत. अर्जुनाने युधीस्तीर आणि द्रौपदीचा एकांत भंग केला असे लिहिण्या ऐवजी त्यांनी लिहिले आहे कि तो युध्सित्राचा काळ असताना अर्जुनाने द्रौपदीकडे प्रनायाराधना केली. तिने एकदा मान्य केली पण दुसर्या दिवशी नाही म्हणाली तेवा तो रागावून द्रौपदीला मारून निघून गेला . अर्जुन कोठे होता ते कुणालाच माहित नवते बरीच वर्ष. यावर आपले काय मत आहे.
पर्व
मी डॉ. भैरप्पा यांचे ’पर्व’ वाचले आहे. ते थोर साहित्यिक त्यामुळे त्यानी भरपूर कल्प्ना स्वातंत्र्य घेतले आहे.
मी शक्य तों कथेच्या मूळ गाभ्याला हात घालत नाही, पण जेथे दिलेले खुलासे पटत नाहीत तेथे स्वत:चे विचार मांडतों. अर्जुन तीर्थयात्रेला कां गेला याचे दिलेले कारण मुळीच पटत नाही. यात्रेनिमित्ताने भटकत असताना त्याने स्वत:ची बर्यापैकी सोय लावली (उलुपी, चित्रांगदा वगैरे). मग सुभद्रेला पत्नी बनवून घेऊन आला. अपराध अर्जुनाचा होता तर द्रौपदी व इतर पांडव ब्रह्मचर्य पाळत बसले होते हें कसें? अभिमन्यूच्या जन्मापर्यंत द्रौपदीला पुत्रलाभ झालेला नव्हता!
तेव्हा, स्वयंवराचा पण मी जिंकला पण द्रौपदी माझ्या वाट्याला येणार कधी, तोवर मी काय करू? या वैतागाने तो यात्रेला गेला हा माझा तर्क सयुक्तिक आहे.
मी महाभारत वाचले नाही अजून .आई आजी कडून च गोष्टी ऐकल्यात .
तुमचे blogs वाचून फार interest येतो आहे वाचण्यात .
इतक्या दिवसांनी पुन्हा एक नवीन वाचक माझे लेखन वाचत आहे. आनंद आहे!
प्रभाकरराव,
आयशप्पत सुभद्राहरणाचा असा प्रकार झाला होय! मला माहीत होतं त्याप्रमाणे सुभद्रा रथ हाकीत होती. नेमक्या याच कारणामुळे श्रीकृष्णाने यादवांना सांगितलं की सुभद्रेनं अर्जुनाचं हरण केलंय. अर्जुनाने तिला पळवून नेलेली नाही.
आपला नम्र,
-गामा पैलवान
Post a Comment