आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Monday, July 28, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ६

दुसरे दिवशी कृष्ण कौरवदरबारात उपस्थित झाला. त्याचे यथोचित स्वागत झाले. शिष्टाई ऐकण्यासाठी थोर ऋषि आले होते. त्यांना उचित आसनावर बसविल्यावर मग सभा सुरू झाली. कृष्णाशेजारीं सात्यकी व कृतवर्मा बसले होते. कृष्णाने आपले मुद्देसूद भाषण दुर्योधनाकडे दुर्लक्ष करून, खुद्द धृतराष्ट्रालाच उद्देशून केले. त्याने मुख्य मुद्दे माडले ते असे,
१. क्षत्रिय वीरांचा व सैन्याचा संहार व सर्वनाश न होतां कौरवपांडवांचा शम व्हावा हेच चांगले.
२. तुमच्या थोर कुळात तूं निमित्त होऊन कुलक्षय होऊं नये.
३. शम करणे तुझ्या हातात आहे. तूं कौरवाना आवरलेस तर पांडवाना मी आवरीन.
४. शम केलास तर पांडव व त्यांचे सर्व समर्थक – आम्ही यादवही – तुझ्या आधीन होतील. ते सर्व व तुझे सध्याचे समर्थक मिळून तूं अजिक्य सम्राट होशील.
५. युद्ध झाले तर दोन्ही पक्षांचा प्रचंड संहार होईल. त्यांत तुला काय आनंद?
६. पांडवांची तुला विनंति आहे की आम्ही द्यूताच्या अटी पाळल्या व तूही त्या पाळशील असा विश्वास बाळगला. वडील या नात्याने तूंच आता आमचे रक्षण कर व ठेव म्हणून तुजपाशी ठेवलेले आमचे राज्य आता आम्हाला परत दे.
७. सभेलाही पांडवांची विनंति आहे की येथे धर्मज्ञ सभासद उपस्थित असताना अनुचित गोष्ट वा अन्याय होऊ नये.
८. तुझ्या पुत्रांचा लोभ अनावर झाला आहे. त्यांना तूच आवर.
९. पांडव तुझ्या सेवेला तत्पर आहेत तसेच युद्धालाहि तयार आहेत. उचित काय ते तूंच ठरव.
हे भाषण अत्यंत मुद्देसूद आहे. पांडवांचा दावा स्पष्ट्पणे मांडून युद्ध झालेच तर त्याची जबाबदारी तुमचीच आहे असे बजावले आहे. दुसर्‍या महायुद्धाचे वेळी युद्ध करणारी दोन्ही राष्ट्रे एकमेकांकडे वकील पाठवून आमच्या मागण्या मान्य न केल्यात तर होणार्‍या युद्धाला जबाबदार तुम्हीच असे बजावत असत त्याची आठवण येते! लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पांडवांनी द्यूताच्या अटी पूर्ण केल्या आहेत असे कृष्ण स्वत: बजावून सांगत नाही! पांडवांचा तुला तसा निरोप आहे असे म्हणतो. पांडवांच्या दाव्यातील कच्चेपणा जाणवत असल्यामुळे त्यावर कमीतकमी भर दिलेला आहे!
यानंतर सभेमध्ये भाषण करून परशुरामाने सांगितले कीं अर्जुन व कॄष्ण हे नर-नारायणांचे अवतार आहेत, त्यांचेविरुद्ध तुम्ही जिंकू शकणार नाही. कण्वमुनीनेहि त्याला दुजोरा दिला. दुर्योधनाने त्यांच्या भाषणाची ’वटवट’ अशी वासलात लावली! व्यास, भीष्म, नारद यानीहि नानाप्रकारे समझावले. त्यांतल्या कोणीहि, पांडवांनी द्यूताच्या अटी पूर्ण केल्या आहेत त्यामुळे त्याना राज्य दिले पाहिजे असे म्हटले नाही! तूं जिंकू शकत नाहीस व सर्वनाश होईल म्हणून शम कर एवढेच म्हटले! मुख्य प्रष्नाला सर्वानीच बगल दिली. धृतराष्ट्राने अखेर दुर्योधनाला समजावण्याची आपली असमर्थता व्यक्त करून कृष्णाला म्हटले कीं तूंच त्याला समजाव. कृष्णाने नानाप्रकारे पांडवाची थोरवी सांगून व दु:शासन, कर्ण यांची निंदा करून समजावले. त्यानंतर पुन्हा भीष्म-द्रोणानी पुन्हापुन्हा सांगितले की युद्ध सुरू होण्यापूर्वीच शम करा. इतक्या सर्वांनी केलेले अप्रिय भाषण एवढावेळ मुकाट्याने ऐकून घेणार्‍या दुर्योधनाने अखेर कृष्णाला आपला मुद्देसूद जबाब ऐकवला. तो असा :-
१. तुम्ही सर्वांनी माझी निंदा करण्याचे मला काही कारण दिसत नाही.
२. पांडव स्वखुशीने द्यूत खेळले व सर्व राज्य व वैभव हरले, तरी अखेर वडिलांनी ते सर्व त्याना परत केले पण तरीहि मी त्याला विरोध केला नाही. त्यानंतर ते पुन्हा अनुद्यूतात हरले व त्याना वनवास – अज्ञातवास भोगावा लागला यात माझा काहीहि दोष नाही.
३. पांडवांनी अज्ञातवास पुरा केलेला नाही. त्यापूर्वीच ते ओळखले गेले.
४. पांडवांना वा त्यांच्या सहाय्यकाना भिऊन मी नतमस्तक होणार नाही. ताठ मानेने वागणे हेच माझ्या क्षात्रधर्माला उचित आहे. युद्धात वीरगतिहि मला प्रिय होईल.
५. वास्तविक पूर्वीच पांडवाना राज्य देणे उचित नव्हते. आम्ही लहान असताना, अज्ञानामुळे व भीतीने ते दिले गेले.
६. आता सुईच्या अग्रावर राहील एवढीहि भूमि पांडवाना मिळणार नाही.
अद्यापपर्यंत संयमाने व दरबारी रिवाजाना धरून होणार्‍या सभेतील कामाने या जबाबानंतर वेगळेच व अनिष्ट वळण घेतले. त्याचे वर्णन पुढील भागात.

6 comments:

meltyourfat said...

Dear marathi blogger,
We have recently added Marati category to our blog aggregator service at http://www.enewss.com
Please signup and submit your blog.
Thanks
sri

Priyabhashini said...

वा! तुमचे पुढचे भाग वाचायची उत्सुकता दरवेळेस ताणली जाते.

काका एक सांगा, तुम्ही या भागात उल्लेखलेला परशुराम म्हणजे जमदग्नीपुत्रच ना? त्याचे तर क्षत्रियांशी वाकडे होते. पूर्वी त्याचे भीष्माशी घनघोर युद्ध झाले होते असे ही वाचल्याचे आठवते. तर मग कौरवसभेत तो काय करत होता? विशेषत: अर्जुनाची बाजू का उचलून धरावी? काही विशेष कारण किंवा अशी काही घटना मध्यंतरी घडली का ज्यामुळे परशुरामाचा क्षत्रियांवरील किंवा कुरूकुलावर (क्षत्रिय घराणे म्हणून) राग नाहीसा झाला?

Unknown said...

aajun ek....kanvamuni tevha hotey? Parashuram sapta-chiranjeev aaheyt manhoon ek vel aasey gruhit dharu ki tey hotey pan kanva munincha ulekh sankuntalechya nantar kadhich vachnayaat aala nahi. Aani Shankuntala hee Dhrutarashtrchya aadhi chya 4-5 pidhya aagodarchi nakkich aasavi. Krupaya khulasa karava.

Akash

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

धन्यवाद.
परशुराम व कण्व कसे उपस्थित होते याचा खुलासा महाभारतात नाही. परशुरामाने क्षत्रियवैर रामाकडून पराभव झाल्यापासून सोडून दिले होते. तो धनुर्विद्या क्षत्रियांना शिकवीत होता. कर्णानेहि आपण क्षत्रिय असल्याचे सांगून त्याचे शिष्यत्व मिळ्वले होते. भीष्माशी त्याचे युद्ध वेगळ्याच कारणामुळे - अंबेमुळे - झाले व त्यातहि तो भीष्माला हरवू शकला नाहीच. आता आपले क्षत्रिय वीरांपुढे चालत नाही हे त्याला मान्य करणे भागच होते. परशुराम व कण्व यांचे येथील उल्लेख मान्यवर व्यक्तींच्या प्रतीकात्मक असे समजावयास हरकत नाही.

Unknown said...

khulasya baddal manapurvak dhanyawad. Maazhya mahiti pramaney Parashuram fakta bramhananach aastra vidya shikvit. Karna tethe bramhan manhun gela aani aapli tashich olakh karun dili aani ek diwshi jevha parashuram karnachya mandivar doke thevun zhople hotey tevha ek bhunga aala. Guru chi zhoop mod hovu naye manhun Karna ney aaple mandi pokharu dili aani tyachya raktachya sparshaney tyanna jaag aali. Hey baghun tyanna lakshaat aale hi eka bramhanachi yevhi sahanshakti aasu shakat anhi aani tevha tyanna kalale ki karna ha kshatriya aahe aani tyani shaap dili ki mee dileyli vidya tula garaj aasel tevha kaamas yenaar nahi (aathvnaar nahi). Bhishma la tyanni Ganga Putra manhoon shikshan diley shatanu putra manhun navhey.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

परशुरामाचे दोनच शिष्य प्रख्यात आहेत ते म्हणजे भीष्म व कर्ण. भीष्म हा गंगा व शंतनु चा पुत्र. पितृसावर्ण्याच्या नियमाप्रमाणे तो क्षत्रियच! गंगेला ब्राह्मण मानावयाचे काय? मला ठाऊक नाही. कर्णाने ब्राह्मण असल्याचा दावा केला हे खरे. परशुरामाने क्षत्रियांशी झगडे करणे सोडून दिले होते हे मात्र खरे. त्याचे (तथाकथित) अवतारकार्य संपलेले होते. कौरवदरबारात त्याचे येणेजाणे इतर प्रसंगी दिसत नाही. कृष्णाला आठवा अवतार मानले जाऊ लागल्यानंतर त्याचा उल्लेख कृष्णशिष्टाईच्या प्रसंगात कदाचित मागाहून ’जय’चे ’महाभारत’ होताना घुसडला गेला असेल! दरबारातील मान्यवर त्रयस्थ व्यक्तीनीहि दुर्योधनाला समजावयाचा प्रयत्न केला एवढाच भावार्थ घ्यावयाचा.